स्वाध्याय १०
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः |
अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च ||१-८||
अन्वयः - भवान् भीष्मः च कर्णः च कृपः च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णः च तथा सोमदत्तिः च (सर्वे) एव (अस्माकं विशिष्टाः) ।
(१) भवान् भवत् ह्या आदरार्थी द्वितीयपुरुषी सर्वनामाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन. अर्थ = आपण
(२) भीष्मः = शंतनूपुत्र देवव्रत ह्याने सत्यवतीच्या अटीमुळे शंतनूंची जी अडचणीची परिस्थिती झालेली होती, तिचे "आजन्म ब्रम्हचारी राहीन व सिंहासनावर अधिकार सांगणार नाही" अशी घोर प्रतिज्ञा करून निराकरण केले. त्या घोर, भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांचे "भीष्म" असे नांव पडले. भीष्म म्हणजे प्रतिज्ञेचा भीषणपणा ज्यानं दाखविला तो.
भीः म्हणजे भीति. ’म’ हा गुणवाचक प्रत्यय. मिळून भीष्म म्हणजे भीषणपणा हा गुण असणारा.
खरे तर, भीष्म हे आठ वसूंपैकी आठवे वसू होते. "पृथ्वीवर जावे लागेल" असा आठही वसूना शाप होता. त्यावेळी गंगादेवतेनं "मलाही पृथ्वीवर जायचे आहे. तिथे गेल्यावर मी एकेक करीत मी तुम्हाला मुक्ति देईन" असे वसूना वचन दिले होते. त्याप्रमाणे, शंतनूबरोबर विवाह झाल्यावर तिने आठ मुलाना जन्म दिला. "मी केव्हां काय करते, कां करते, तें विचारायचं नाहीं" अशी अट तिनं शंतनूला घातली होती. त्यामुळे आठापैकी सात मुलाना, वसूना, तिने मुक्ति दिली. पण आठव्या मुलाच्यावेळी शंतनूला रहावले नाही. अट मोडल्यामुळे, गंगा गंगेत विलीन झाली व आठवे वसू भीष्म ह्यांना मुक्ति मिळूं शकली नाही. सात वसूना मुक्ति मिळाली. पण आठव्याला नाही मिळाली. तर त्या आठव्याची कहाणी तशी वेगळी असणार. असो.
गंगेचे पुत्र म्हणून गांगेय असा पण भीष्मांचा उल्लेख केला जातो.
आठ वसू हे आठ दिशांचे दिक्पाल. म्हणून पृथ्वीचे दुसरे नांव वसुंधरा.
वसूना शाप कां होता, गंगेला पृथ्वीवर कां यायचं होतं, शंतनूला अट घालणारी सत्यवती ही महर्षी व्यासांची आई, तिने आधी पराशर मुनींबरोबर विवाह केला होता. त्यांचे अपत्य म्हणजे व्यास. म्हणून त्यांना "पाराशर व्यास" असेही म्हणतात. ह्या पण महाभारतातल्या पोटकथा. अशी, "कथानकात कथानक" अशी अफलातून जोडणी केल्यामुळे "महाभारत" हें बेजोड वाङ्मय आहे. एकेक अप्रतीम व्यक्तिरेखा, प्रत्येक व्यक्तिरेखेचा रोमांचक इतिहास, ती कथानकं आणि अशा मोहक गुंतवळ्याचं आहे महाभारत.
(३) कर्णः = अंगराज कर्ण. राजपुत्रानी संपादन केलेल्या कौशल्यांच्या प्रदर्शन-सोहळ्यात अर्जुनाच्या तोडीस तोड कौशल्य दाखवणा-या अधिरथपुत्राला दुर्योधनानं अंगराज केलं. हा वेगळाच होता. सर्वात मोठं वेगळेपण होतं, त्याची चमकणारी कर्णकुंडलं. ’कर्ण’ हेंच ज्याचं वैशिष्ट्य आहे, तो कर्ण. एरव्ही नदीच्या पात्रातून वहात आलेला आणि अधिरथ आणि राधा ह्यांनी कोडकौतुकानं वाढवलेला कुंतीपुत्र. कुंती ह्या राज्यापासून अंग ह्या राज्याकडे वाहणारी नदी कोणती, हा भौगोलिक संशोधनाचा विषय होऊं शकतो.
दुर्वास ऋषीनी राजकन्या कुंतीनं केलेल्या सेवेनं प्रसन्न होऊन तिला प्रसाद म्हणून मंत्र दिला. त्या मंत्राचा पडताळा पाहण्याच्या उत्साहात सूर्यनारायणाच्या प्रसादानं जो पुत्र जन्मला, तोच हा कर्ण. मेरीनं येशूला टाकलं नाही, टाकावं लागलं नाही. पण कुंतीला तें शक्य नव्हतं.
भीष्माना कर्ण कोण आहे, हें माहीत होतं, कदाचित्. आणि कौशल्य-प्रदर्शन सोहळ्यात कर्णाचं प्रदर्शनही झालेलं होतं. भीष्म आणि द्रोण ह्या दोघानीही दुर्योधनाला अट घातलेली असते, कीं ते सेनानी असताना कर्णानं युद्धात भाग घ्यायचा नाही. पण दोघेही पडल्यावर सेनानीची धुरा कर्णाकडे येते. आदले रात्री भीष्मांची अनुज्ञा मागायला कर्ण शरशय्येकडे येतो, त्यावेळचा हा हृद्य संवाद.
कर्ण गेला मग । रणी जेथे भीष्म । शरशय्येवरी । पहुडले ॥
वंदन करूनी । म्हणाला तुम्हासी । एकांती भेटणे । झाले नाही ॥
आपुले प्रेमही । नाहीच लाभले । सा-या राजपुत्रा । जैसे झाले ॥
युद्धापासूनही । आपण मजला । आजवरी दूर । ठेवीयले ॥
नाही रे बालका । भीष्माच्या न्यायास । ऐसा पक्षपाती । म्हणू नको ॥
युद्ध हे मजला । नव्हतेच मान्य । तरी शरशय्या । मज झाली ॥
आणिक तूं आणि । अर्जुन ऐसाही । सामना मजला । नको होता ॥
तुम्ही दोघे मला । सारखेच प्रिय । कुंतीही जाणते । कारण तें ॥
परि उदईक । मज आहे द्वंद्व । अर्जुनासवेंच । करायाचें ॥
सारखेच प्रेम । तुम्ही दोघांवरी । केलें तें जाणोनी । सुखावलो ॥
अनुदार माझे । वर्तन जाहले । आजवरी त्याची । क्षमा व्हावी ॥
युद्धामध्ये आता । सहभागी होण्या । अनुज्ञा असावी । विनवणी ॥
भीष्मानी "तथास्तु" । म्हणतां तेथून । कर्ण महालात । परतला ॥
सारे अवतारपुरुष चिरंजीवी म्हणावेत, वाटते. सीतास्वयंवराच्या वेळी अवतारकार्याची दीक्षा परशुरामांकडून रामाकडे आली. तरीही कृष्णावतारामध्येही परशुराम होतेच. कर्णानं परशुरामांकडून पाशुपतास्त्राची दीक्षा तर मिळवली. पण क्षत्रियत्व लपवल्यामुळे "अगदी निकडीच्या वेळी, तुला ह्या अस्त्राच्या मंत्राचा आठव राहणार नाही", असा शापही मिळाला.
(४) कृपः म्हणजेच कृपाचार्य. हेही धनुर्विद्येत निपुण होते व कौरव-पाण्डवांचे आचार्य होते. लहानपणापासून ते हस्तिनापूरच्या राजवाड्यात वाढले. त्यांची बहीण कृपी व कृपाचार्य यांचे आई-वडील म्हणजे मुनी शरद्वत व अप्सरा जनपदी. मुनी तपश्चर्येला व अप्सरा स्वर्गात निघून गेल्याने ही बाळे वनांत एका सेवकाला मिळाली. त्यांना त्याने राजदरबारात आणले. राजा शंतनूने त्यांची राजवाड्यातच व्यवस्था केली.
पुढे द्रोणाचार्य वडील भारद्वाजांच्या मृत्यूनंतर उपजीविकेच्या शोधात हस्तिनापूरला आले असताना कृपीसाठी वर म्हणून द्रोणाचार्य ठीक वाटले म्हणून कृपाचार्यानी कृपी आणि द्रोणाचार्य यांचा विवाह करून दिला. अशा रीतीने कृपाचार्य म्हणजे अश्वत्थाम्याचे मामा.
युद्धामधे कृपाचार्य कौरवांच्या बाजूने होते. तोच उल्लेख ह्या श्लोकात आहे.
कृपाचार्य हे चिरंजीवी होते. युद्धानंतर ते राजवाड्यात परतल्यावर युधिष्ठिराने त्यांना सन्मानानेच वागविले.
वर कर्णाने परशुरामांकडून पाशुपतास्त्राचा मन्त्र मिळवल्याचा जो उल्लेख आहे. तिथे पण परशुराम हे अवतारी पुरुष म्हणून चिरंजीवी, असा उल्लेख केला आहे. खरं तर तेही सात चिरंजीवींपैकी एक. सात चिरंजीवींचा नामनिर्देश एका श्लोकात करणारा श्लोक असा आहे. "अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः । कृपश्च परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ॥" मामा आणि भाचा दोघेही चिरंजीवी.
(५) समितिञ्जयः - दुर्योधनानं विशेष उल्लेख करावा असा हा समितिञ्जय कोण होता, हा कुतूहलाचा विषय दिसतो. एरव्ही हा सामासिक शब्द सुद्धा आहे. समितिम् + जयः = समितिञ्जयः
(५.१) समितिम् = समिति, म्हणजे युद्ध, ह्या सामान्यनामाचे द्वितीया एकवचन
(५.२) जयः = जय ह्या सामान्यनामाचे प्रथमा एकवचन
(५.३) समितिञ्जयः = समितौ जयः यस्य सः युद्धात (नेहमीच) ज्याचा जय होतो, तो. हा विग्रह तसा अपवादात्मक आहे. ज्या समासात पदाचं विभक्तिरूप तसंच राहतं अशा समासाना अलुक् समास असे म्हणतात. इथें समितिम् हें समिति ह्या शब्दाचे विभक्तिरूप आहे. पण समासाचा विग्रह समितिम् जयः यस्य सः असा होऊं शकत नाही. योद्ध्यानं युद्धाला जिंकायचं नसतं. त्यानं युद्धात जिंकायचं असतं तेव्हां समिति ह्या शब्दाची सप्तमी हवी. पण समितिञ्जय ह्या सामासिक शब्दात समिति शब्दाची सप्तमी तर नाहीचाहे. त्यामुळे समास अलुक् असला तरी जें विभक्तिरूप आहे, तें योग्य रूप नाही. म्हणून हा अपवाद आहे.
(५.४) युद्धात जिंकणारा ह्या अर्थाने समितिञ्जय हें विशेषण आहे. हें विशेषण ह्या शब्दाच्या सर्वात जवळचं नाम "कृप" ह्यांना पण लागू आहे, कारण ते चिरंजीवी असल्यामुळं कुठल्याही युद्धात जिंकणारच. त्यामुळं समितिञ्जय नांवाचा खरंच कुणी दुसरा सेनानी होता, कीं तें कृपाचार्यांचं विशेषण आहे हा संभ्रम राहतो.
(६) अश्वत्थामा = द्रोणाचार्य आणि कृपी यांचा पुत्र. कृपाचार्यांचा भाचा. जन्मतःच याच्या कपाळावर एक नीलमणी होता, कांहीं नागांच्या फण्यावर असतो, म्हणतात, तसा.
(६.१) अश्वत्थामा हें अश्वत्थामन् ह्या विशेषनामाचे प्रथमा एकवचन. अश्वत्थ वृक्षासारखा धिप्पाड म्हणून द्रोणानी त्याचं नांव अश्वत्थामन् ठेवलं असावं. अश्वत्थामन् ह्या नांवाचं विवरण आपट्यांच्या शब्दकोशात सुद्धा थोडं वेगळं, महाभारताचा संदर्भ देऊन दिलं आहे, तें असं. "अश्वस्येवास्य यत्स्थाम नदतः प्रदिशो गतम् । अश्वत्थामैव बालोऽयं तस्मान्नाम्ना भविष्यति ॥" अर्थ - घोड्याच्या शक्तीप्रमाणे ज्याच्या शक्तीची वार्ता सर्वदूर पसरली, तो हा बालक अश्वत्थामा ह्या नांवानेच ओळखला जाईल. शक्तीचें परिमाण म्हणून व्यासमुनीनी अश्वशक्तीचा संदर्भ घेतला तर !! खरं तर व्यासमुनीना अश्वशक्ती हें शक्तीचे परिमाण म्हणून वापरायच्या कल्पनेचे जनक म्हटलं पाहिजे. हें मनोरम्य आहे.
(७) विकर्णः विकर्ण ह्या विशेषनामाचे प्रथमा एकवचन. आपट्यांच्या शब्दकोशात विकर्ण म्हणजे कुरुवंशीय राजपुत्र असं म्हटलं आहे आणि गीतेतील ह्या श्लोकाचाच संदर्भ दिला आहे. यावरून विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ असला पाहिजे.
(८) सोमदत्तिः सोमदत्ति ह्या विशेषनामाचे प्रथमा एकवचन. ह्या शब्दाला सामासिक शब्द म्हणावं आणि त्यात सोम + दत्तिः ही दोन पदे आहेत म्हणावं, तर सोम हें पद ठीक आहे. पण दत्तिः हें पद विशेषतः दत्तिः अशा पुल्लिंगी प्रथमा एकवचनात हें जमत नाहीये. देवदत्त (अर्जुनाच्या शंखाचं नांव) तसं सोमदत्त हें जमलं असतं.
(८.१) सोम ह्या शब्दाचे आपट्यांच्या शब्दकोशात १२ अर्थ दिले आहेत. सोम म्हणजे चंद्र, सोम म्हणजे शिव, वगैरे.
(८.२) दत्तिः ऐवजी दत्तः चा विचार करायचा तर हें दा (१ प. यच्छति, २ प. दाति, ३ उ. ददाति दत्ते) ह्या धातूचें दत्त हें क. भू. धा. वि. दत्तः हें "दत्त"चें पुल्लिंगी प्रथमा एकवचन. अर्थ दिलेला.

0 comments:
Post a Comment