Wednesday, February 3, 2010

गीतेचा सखोल अभ्यास - स्वाध्याय ६

स्वाध्याय ६ सञ्जय उवाच |
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा |
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ||१-२||

(१) अन्वयः - सञ्जयः उवाच, "पाण्डवानीकं तु व्यूढं दृष्ट्वा राजा दुर्योधनः तदा आचार्यं उपसंगम्य वचनं अब्रवीत् ।
(२) सञ्जयः - सञ्जय ह्या विशेषनामाचे प्रथमा एकवचन. राजे धृतराष्ट्र ह्यांचा सारथी.
(३) उवाच = म्हणाला
(४) पाण्डवानीकम् = पाण्डवानां अनीकम् षष्ठी तत्पुरुष समास. अर्थ, पाण्डवांचे सैन्य.
(५) पाण्ड्वानाम् = पाण्डव ह्या विशेषनामाचें षष्ठी बहुवचन. अर्थ पाण्डवांचे
(६) अनीकम् अनीक म्हणजे सैन्य, ह्या सामान्यनामाचे द्वितीया एकवचन. ह्या वाक्यात "दृष्ट्वा" ह्या धातुसाधिताचें "अनीकम्" हें कर्म असल्याने त्याची द्वितीया आहे.
(७) तु = तर, अव्यय
(८) व्यूढम् = व्युह् ह्या धातूचे क. भू. धा. वि. अर्थ रचलेले. युद्धामध्ये शत्रूला मात देण्याची विशेष योजना आंखून सैन्याची रचना केली जाते. त्याला व्यूहरचना म्हणतात. व्यूहरचनेचे बरेच प्रकार संभवतात. व्यूहरचना शिकवणे हा युद्धकौशल्याचे शिक्षण देण्याचा एक आवश्यक भाग. द्रोणाचार्यानी पाण्डव व कौरव ह्याना शिक्षण देताना ब-याच व्यूहरचना शिकविल्या. पण चक्रव्यूह कसा असतो, तें फक्त अश्वत्थामा आणि अर्जुन ह्यांनाच सांगितले. खरं तर त्यांना तें फक्त अश्वत्थाम्यालाच सांगायचे होते. म्हणून नदीवरून पाणी आणण्यासाठी त्यानी अश्वत्थाम्याला रुंद तोंडाची घागर दिली, जेणेंकरून तो तें काम लवकर संपवून येईल व त्याला अशा खास गोष्टी शिकवायला वेळ मिळेल. पण अर्जुनानेही कांही युक्ति लढवून आपले काम अश्वत्थाम्याच्या जोडीनेच आटोपले व चक्रव्यूहासारख्या खास गोष्टी अश्वत्थाम्याच्या जोडीनेच संपादन केल्या.
(९) दृष्ट्वा = दृश् (१ प., पश्यति, दृष्ट) ह्या धातूचे त्वान्त क्रियाविशेषण. अर्थ, पाहून.
(१०) राजा दुर्योधनः ह्या वाक्यांशाचा थोडा स्वतंत्र विचार असा कीं हस्तिनापूरचे राजे तर धृतराष्ट्र होते. मग इथे दुर्योधनाचा उल्लेख "राजा दुर्योधनः" असा कसा काय केला आहे ? युद्धनीतीचा असा संकेत असावा कीं ज्या पक्षाचा राजा पडेल किंवा बंदी होईल, तो पक्ष पराभूत ठरेल. त्यानंतर युद्ध थांबवायचे. पराभूत पक्षाच्या सगळ्याच सैन्याचा खातमा होण्याची गरज नाही. त्यामुळे युद्धभूमीवर कोणत्या पक्षाचा राजा कोण तें आधीच दोन्ही पक्षाना माहीत हवें. सैन्याचे सेनानी एकानंतर दुसरा असे अनेक असूं शकतात. पण प्रत्येक पक्षाचा राजा एकच. म्हणूनच भीष्म पितामह पडले तरी युद्ध चालूच राहिले. ते सेनानी होते. कौरवसैन्याचा राजा म्हणून दुर्योधनाला मान्यता दिली गेली होती.
(११) राजा = राजन् ह्या "न्"-व्यञ्जनान्त सामान्यनामाचे प्रथमा विभक्ति एकवचन.
(१२) दुर्योधनः = दुर्योधन ह्या विशेषनामाचे प्रथमा विभक्ति एकवचन.
(१३) दुर्योधनः = "दुः योधनं येन सह" म्हणजे "ज्याच्याबरोबर युद्ध करणें कठीण असते, असा". असा दुर्योधन ह्या नामाचा सामासिक विग्रह लक्षात घेतला कीं दुर्योधन ह्या नांवालाही विचारात घेण्यासारखा अर्थ दिसतो.
(१४) दुः हा उपसर्ग असलेल्या सर्व नामांचे विशेषणांचे अर्थ नकारात्मक असतात. जसें, दुःख, दुष्ट, दुर्जन. दुः हा उपसर्ग त्याच्या पुढील व्यञ्जनाशी सन्धिनियमानुसार जोडला जातो. त्यामुळे त्याचा विसर्ग तसाच तरी राहतो किंवा त्याच्या विसर्गाचे दुस् दुश्, दुष् दुर् असे बदल होतात.
(१५) दुः हा उपसर्ग नकारात्मक अर्थ देणारा असल्याने, दुर्योधनाची व्यक्तिरेखा नकारात्मक असण्यात ह्या उपसर्गाचाही वांटा आहे, असे वाटते. पण दुर्योधन = "दुः योधनं येन सह" म्हणजे "ज्याच्याबरोबर युद्ध करणें कठीण" अशा अर्थाने त्याचे नांव युद्धभूमीवर आदरणीयच ठरते.
(१६) योधनम् युध् ह्या धातूपासूनचें कर्मसूचक नाम. अर्थ, युद्ध करणें.
(१७) तदा = कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. अर्थ, तेव्हां
(१८) आचार्यम् = आचार्य ह्या सामान्यनामाचे द्वितीया विभक्ति एकवचन. उपसंगम्य ह्या धातुसाधिताशी कर्म म्हणून संबंध. म्हणून द्वितीया विभक्ति
(१९) उपसंगम्य = गम् (१ प, गच्छति, गतः) ह्या धातूला उप आणि सम् हे उपसर्ग लागून उपसंगम् ह्या धातूचे कालवाचक क्रियाविशेषण. अर्थ "जवळ जाऊन"
(२०) उप = ह्या उपसर्गाचा अर्थ "जवळ" हा उपसर्ग धातूना आणि नामाना पण लागतो, जसें - उपविश म्हणजे जवळ बसणें उपनाम म्हणजे नामाजवळ असणारे नाम. श्रीपाद हें माझे विशेषनाम आणि अभ्यंकर हें उपनाम.
(२१) वचनम् = वचन ह्या नपुंसकलिंगी सामान्यनामाचें ह्या वाक्यांत द्वितीया एकवचन. "अब्रवीत्" ह्या क्रियापदाचें कर्म, म्हणून ह्याची द्वितीया
(२२) अब्रवीत् = ब्रू (ब्रवीति, ब्रूते २ उ.) ह्या धातूचे परस्मैपदी अनद्यतनभूतकाल तृतीय पुरुषी एकवचन. अर्थ "म्हणाला"
(२३) संपूर्ण वाक्याचा अर्थ सञ्जय म्हणाला, "पाण्डवांचे सैन्य (तर) व्यूहरचनेनुसार सिद्ध झालेले पाहून राजा दुर्योधन आचार्य द्रोणांकडे गेला व त्याना असें म्हणाला...

0 comments: