Tuesday, January 1, 2008

चला होऊं योनाथन् !


“चला होऊं योनाथन्” असं शीर्षक वाचल्यावर साहजिक प्रश्न येतील - कोण हा योनाथन्, किं कुणी म्हणावं “चला होऊं योनाथन्” ? आणि योनाथन् व्हायला काय करायचं ? कसं व्हायचं योनाथन् ? मुळांत कां व्हायचं योनाथन् ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वाचल्यानंतर आपोआप मिळतील. तेव्हां करूं या सुरवात …

नुकतंच फटफटत होतं. उगवत्या सूर्याची किरणं शांत समुद्राच्या मंद लाटांवर सोन्याची पखरण करीत होती.

किनाऱ्यापासून मैलभराच्या अंतरावर एक मच्छीमारी होडी पाणी ढवळीत निघाली होती. त्या एकंदरीनं शांत, स्तब्ध वातावरणातूनही एक संकेतात्मक संदेश घुमून गेला जणूं. आणि एकाएकी, कुठून कुणास ठाऊक, हजारेक सीगल्सचा थवा होडीच्या शिडांच्या दांड्यांवर एकमेकांशी हुज्जत करीत, मासळीचा केवढासा तुकडा कसा मिळेल, या स्पर्धेसाठी दाखल झाला. पुन्हां एका कार्यमग्न दिवसाची सुरवात झाली होती.

पण, या सगळ्या खटाटोपापासून दूर, किनाऱ्यापासून आणि होडीपासूनही दूर, योनाथन् लिव्हिंगस्टन् सीगल् आपला आपणच कांही सराव करत होता.

आकाशाकडे शंभरेक फुटावर झेप घेऊन त्यानं आपल्या पावलांची वल्ही खाली वळवली, चोंच वर केली आणि पंखांवर एका अतिशय नागमोडी वळणाचा ताण घ्यायचा त्याचा तो उपद्व्याप चालूं होता. इतकं नागमोडी वळण घेण्यानं त्याला आपल्या उड्डाणाची गती रोधायची होती. आणि होतां होतां गति इतकी कमी झाली कीं अंगावरून जाणारी हवा, मात्र एक झुळुक, नव्हे, मात्र एक फुंकर, इतकीच वाटूं लागली. आणि नजरेखालचा अथांग सागर एका जागी थांबल्यासारखा वाटत होता. आपले डोळे बारीक किलकिले करून, एकाग्रतेच्या तीव्रतेनं, श्वास रोधून, त्या नागमोडी वळणावर इंचभरातच हालचाल राहावी, असा तो खटाटोप होता. पण पंख जरासे फडफडलेच. गतिरोध झाला, पण तो खाली कोसळला.

खरं तर सीगलनं एकदा उड्डाण भरली किं त्यांत डगमग नसते, गतिरोध नसतो. भरल्या उड्डाणांत डगमग आली, गतिरोध झाला, तर ती सीगल्सच्या जातिधर्माच्या विपरीत गोष्ट होय. पण जातिधर्माची वगैरे पर्वा न करतां त्या अवघड नागमोडी वळणाच्या नादात, पुनःपुन्हा आपल्या पंखांवर जबरदस्तीनं ताण देणारा योनाथन् लिव्हिंगस्टन् सीगल् हा रूढींची बंधनं मानणाऱ्यातला नव्हताच मुळी.

एरव्ही बहुतेक सगळ्या सीगल्सना किनाऱ्यावरून होडीच्या शिडावर अन्नासाठी झेप घेणं आणि तिथून किनाऱ्याकडे परतणं, या पलीकडे, उड्डाणाच्या शास्त्राचे काय बारकावे असतात, असलं कांही समजून घेण्यांत, शिकण्यात मुळीच स्वारस्य नसतं. त्यांना झेप, भरारी, उड्डाण या कशाशी कांही मतलब नसतो. त्यांना मतलब असतो अन्नाशी. योनाथन्-ला मात्र अन्नापेक्षा उड्डाणांचं कौतुक होतं.

असलं कौतुक डोक्यात घेण्यानं थव्यामधे आपल्याला कसलाही मान मिळणार नाही, हेंही योनाथन्-ला पक्कं माहीत होतं. उलट त्याच्या आईवडिलांनाही, उड्डाणातील प्रयोग करीत दिवस न् दिवस घालवण्यानं उद्वेगच व्हायचा. त्याचं त्यालाही अजून समजलं नव्हतं किं, पसरल्या पंखांच्या कवेपेक्षा पाण्यापासूनची उंची कमी असेल तर, हवेंत अधिक वेळ तरंगत राहणं खूपच सोपं कां असतं, त्याचे हे तऱ्हेवाईक प्रकार पाहून योनाथन्-ची आई त्याला म्हणायची, “योनाथन्, कां हे असले नसते उपद्व्याप करत असतोस सारखा ? कमी उंचीवरून उडणं ते पेलिकन पक्षी करतात. त्यांना करूं दे. नसत्या नादापायी स्वतःची काय अवस्था करून घेतलीयेस, याची कांही कल्पना आहे कां तुला ? नुसती हाडांची काडं राहिलीयेत ती ?”

योनाथन्-चं मात्र ठरलेलं उत्तर असायचं, “माझा मी ठीक आहे. तूं निष्कारण काळजी करतेस. हवेंत उडण्याचे कायकाय प्रकार आपण करूं शकतो, कायकाय करूं शकत नाहीं, नाही तर कां नाही, हेंच माझ्या डोक्यात घोळत असतं. तेंच मला बरंही वाटतं.”

अशावेळी त्याचे वडील बजावायचे, “हे बघ योनाथन्, हिंवाळा जवळ येत चाललाय. होड्या उशीरानंच किनाऱ्यावरून निघतील. आणि मासळ्या देखील पाण्यांत जरा खोलवरच फिरत राहतील. तुला अभ्यासच करायचा असेल तर अन्नाचा आणि तें कसं मिळेल, त्याचं बघ. हें तुझं असं-तसं उडणं वगैरे सगळं ठीक आहे. पण त्यानं भूक नाही भागणार. उडण्यानं आपण खायला मिळवूं शकतो, तें महत्त्वाचं आहे.”

मग योनाथन्-नं पण आपल्या वागण्यांत आज्ञाधारकपणा आणला. त्यानं पण होड्यांच्या शिडांवर इतर सीगल्सशी हुज्जत घालायलाही सुरवात केली, अन्नाच्या तुकड्यासाठी. पण त्याचं मन रमेना. सगळा फोल खटाटोप आहे, एवढंच त्याला मनोमन वाटत रहायचं. मग मोठ्या हिकमतीनं मिळवलेला तुकडा, कोणी थोडा वयस्क सीगल त्याचा धापा टाकीत पाठलाग करीत असेल, तर मुद्दामच तो तुकडा आपल्या चोंचीतून निसटल्यासारखा सोडून द्यायचा. ‘हाच वेळ आपण आपल्या उड्डाणाच्या सरावावर, अभ्यासावर खर्च केला तर ?! कितीतरी शिकायचं आहे” हें असंच त्याच्या मनांत घोळत राहायचं.

कळत न कळत योनाथन् दूर निघून गेलेला असायचा, आपला आपण, एकटा, एकांताकडे; भुकेला, तरीही आपल्याच नादांत, अभ्यासाच्या ओढीनं.

आतां त्याच्या कुतूहलांत बदल झाला होता. त्याला आतां कौतुक होतं वेगाचं. आठवडाभराच्या सरावानं त्याला विश्वास आला किं पैज लावून सर्वांत जास्त वेगानं उडणाऱ्या कुणाही सीगलला वेगाचं इंगित काय कळलं असेल, त्यापेक्षा आतां त्याला वेगाच्या किमयेची अधिक स्पष्ट कल्पना आली होती. हजारेक फूट उंच जाऊन मग तिथून जोरदार झोकांडी मारून मारून त्याला पुरं कळून चुकलं होतं किं अतिवेगानं खाली झोकांडी मारतांना काय परिस्थिती होऊन जाते. केवळ पांच-दहा सेकंदांत ताशी सत्तरेक मैलांचा वेग कसा मिळतो, आणि अशा वेगानं झोकांडी उतरत असतांना फडफडवायच्या पंखांना वर नेतांना, त्यांच्यावर कसला दाब आणि ताण असतो, तें. कितीही संभाळायचा म्हटलं, तरी तशा त्या वेगवान झोकांडीत तोल ढळायचाच. पण त्याचं आपलं चालूंच. झेप घेऊन वर जायचं, हजारेक फुटांपर्यंत, घ्यायची तिथून झोकांडी. पुन्हां कलमडायला व्हायचं. त्यातल्या त्यांत डावा पंख वर उचलला जायचा नाहीं. त्यानं तोल जायचा. उजवा पंख आडवा धरून सांवरायला पाहिलं तरी कोलांट्या व्हायच्याच आणि समुद्राच्या पाण्यावर कोसळायला व्हायचं. त्यानं विचार केला, ‘असं नाहीं. पन्नासेक मैलांचा वेग आला किं पंख वर खाली करायचीच जरूर नाहीं. नुसते आडवे पसरून धरायचे.’

असं कांही ठरवून त्यानं थेट दोन हजार फुटांवरून झोकांडी घेतली. पन्नासेक मैलांचा वेग आल्यावर त्यानं पंख आडवेंच धरून ठेवायचा पूरा प्रयत्न केला. झोकांडीत तो खाली उतरत होता आणि वेग वाढतच होता, ताशी नव्वद मैल ! योनाथन्-नं एक जागतिक विक्रम सिद्ध केला होता, सीगल किती वेग पेलूं शकतो त्याचा !

पण क्षणार्धात विजयाच्या त्या आनंदाचा विरस झाला. समुद्र जवळ येत असल्यामुळे झोकांडीत खाली जात राहणं चूक होतं. दिशा बदलण्यासाठी पंखांचा कल बदलणं जरूर होतं. जरा धडपड करायला गेला मात्र, सगळाच तोल कोलमडला. समुद्राच्या पाण्यावर पडतांनाचा रपाटा इतका जबरदस्त होता किं सगळं सुन्न झालं.

त्या सगळ्यातून सांवरेपर्यंत संध्याकाळ टळून गेली होती. लुकलुकणाऱ्या चांदण्यांत समुद्राच्या पाण्यावर तरंगणारं शरीर त्याचं त्यालाच जड वाटत होतं. पण अपयशाचं दडपण त्याहीपेक्षा अधिक अवजड होतं.

अशातच त्याला एका आंतरिक आवाजाचा भास झाला. अंतर्मन सांगत होतं, ‘योनाथन्, तूं एक सीगल आहेस. निसर्गानंच सीगल साठी मर्यादा घालून दिल्या आहेत. सीगलला खूप वेगानं उडतां यायचं असतं, तर गरुडाप्रमाणें तुझे पंख बरेच आंखूड असते. आणि मासळीवर जगण्याऐवजी तूं उंदरांची शिकार करतास.’ योनाथन्-ला पण पटलं किं वडील सांगत तें बरोबरच होतं. मी हा सगळा खुळेपणा सोडून दिला पाहिजे.

तितक्यांत त्याच्या लक्षांत आलं किं रात्रीच्या वेळीं सीगल्सनी किनाऱ्यावर राहिलं पाहिजे. जड झालेले पंख सांवरून तो किनाऱ्याकडे निघाला. मनोमन स्वतःशी शपथ घेतली किं ‘आतां मी पण आम सीगल्ससारखाच राहीन आणि वागेन. स्वतःच्याच कल्पनेची आव्हानं नकोत आणि अपयशाचे रपाटे पण नकोत.’ सारे अतिउत्साही विचार पुसून टाकून, समुद्रावरील काळोखातून, किनाऱ्यावरील प्रकाशाकडे जातांना त्याला कांही निवांतपणाची प्रसन्नता जाणवली; मात्र, तितक्यांतच मनांत कांही चर्रर्र झालं. काळोखातून … ? अंधार बराच होता, हेंही खरंच होतं. सीगल आणि अंधारातून उडत निघालाय् ?!

आणि विचारांनी पुन्हां फिरकी घेतली. सीगलनी अंधारात उडायचं असतं, तर त्यांना घुबडाचे डोळे असते. गरुडासारखी भरारी मारतां यायची असती तर पंख बरेच आंखूड असते.

अरे, आंखूड पंख ? गरुडासारखे आंखूड पंख ? हेंच तर उत्तर नव्हे ? वेगानं भरारी मारायला पंख आंखूड हवेत. वेग आणि आंखूड पंख. वेगानं उडतांना पंख आख्खे पसरले राहूं देण्यानंच तर सगळी गडबड नसेल झाली ? काय खुळ्यासारखी खटपट केली दिवसभर ! पंखांचा बहुतेक पसारा आवरून टोकंच तेवढी बाहेर ठेवली, तर झालं काम !!

पाहतां पाहतां त्यानं सरळ दोन हजार फुटांची उंची गांठली. पंखांचा पसारा शरीराजवळ गुंडाळला आणि झोकांडी झोकून दिली. उलट्या वाऱ्याचा सूंसाट चोंचीवरून डोक्याशी घोंघावत होता. सत्तर … नव्वद … शंभर … एकशें वीस ,, आतां एकशें चाळीस मैलांचा वेग असूनसुद्धां पंखांवरील दडपण, दिवसां सत्तरीच्या वेगाच्या वेळी होतं, त्यापेक्षा कितीतरी हलकं आणि सहज पेलवत असल्याचं जाणवत होतं. पंखांच्या टोकांनाच उगाच असा झटका काय दिला, किं झोकांडीची उतरण बदलून आकाशाकडे झेपावायला मिळालं ! डोळे किलकिले करून वाऱ्याचा गारवा घेतांना नवी तरतरी वाटली. ताशी एकशें चाळीस मेल आणि तरीही पूर्णपणें नियंत्रित ! दोन हजारांऐवजी पांच हजार फुटांवरून झेप घेतली तर किती बरं वेग होईल ?!

कांही वेळापूर्वीच स्वतःशीच घेतलेली, सगळ्यांप्रमाणे आईवडलांच्या आज्ञेत राहायची शपथ एव्हांना विस्मृतीत जमा झाली. आपलीच शपथ आपणच मोडल्याचं विशेष वैषम्यही त्याला वाटलं नाहीं. तसल्या शपथा ज्यांनी आम जीवनाचा समझोता केला, त्यांच्यासाठी असतात. ज्याला आगळ्या, मर्यादेपलीकडे अमर्याद ज्ञानाचा ध्यास लागला, त्याला असल्या शपथांचं काय ?!

सूर्योदय व्हायचाही होता. योनाथन् आपल्या स्वतःच्या स्वतंत्र आकाशांत पोचलेला होता. पांच हजार फुटांवरून खाली पाहतांना मच्छीमारी होड्या समुद्राच्या निळ्याशार सपाटीवर केवळ ठिपक्यांप्रमाणें दिसत होत्या. अन् न्याहरीसाठी येत असलेले सीगल्सचे थवे म्हणजे घोंघावणाऱ्या किड्यांच्या झोतांसारखे दिसत होते. आणि ---

अधिक कसला विचार न करतां योनाथन्-नं पंख शरीराशी बिलगवून घेतले पंखांची टोकंच फक्त कांटयांप्रमाणें बाहेर ठेवली अन् त्या पांच हजार फुटांवरून स्वतःला झोकून दिलं. चारेक हजार फूट उतरेतोंवर गतीचीच मर्यादा गांठली गेली होती जणूं ! अंगावरून उलट्या जाणाऱ्या वाऱ्यालाही त्या सीमांत गतीमुळं अवजडपणा आला होता. ताशी दोनशें चौदा मैलांच्या वेगानं ती झोकांडी झेपावत होती. योनाथन्-नं एक आवंढा गिळला. चुकून जरी त्याचे पंख खुलते, तर त्याच्या शतशः ठिकऱ्या उडाल्या असत्या. पण योनाथन् त्या सीमांत वेगांत धुंद होता. तो अनुभवत होता, किं वेग म्हणजे काय ताकद आहे, वेगांत काय आनंद आहे, वेगाचं आपलं सौंदर्य आहे !!

हजारेक फुटांच्या उंचीवरच त्यानं झोकांडीचा मोर्चा वरतीकडे वळवायचं ठरवलं. एरव्ही न्याहरीसाठी जमलेल्या सीगल्सपैकी वाटेत आडव्या येणाऱ्या आठ-दहा सीगल्सशी टक्कर अटळ होती. पण त्या प्रचंड वेगाचा गतिरोध कसा करायचा, थोडं बाजूला वळून टक्कर चुकवायची म्हटलं तरी, त्या आवेगांत बाजूला तरी कसं व्हायचं, असलं कसलंच नियोजन त्यानं गृहीत धरलं नव्हतं. झालीच टक्कर तर खल्लास ! त्याने आपले डोळे मिटून घेतले “व्हायचं तें होवो” म्हणत त्या दोनशेचौदा मैलांच्या झोकांडीतही वरतीकडे मोर्चा वळवण्याची आपल्यापरी सारी खटपट योनाथन्-नं केली.

मान उचलून चोंच वर करायला हरकत नाहीं, असं वाटलं. तोंवर सारं संकट टळून गेलं होतं. सीगल्स जमातीच्या सार्यांचेच जीवनालेख ठरवणारा जो दैवी सीगल आकाशांत असेल, त्याचीच ही मेहेरबानी म्हटली पाहिजे. सीमांत वेग, ताशी दोनशेंचौदा मैल ! योनाथन् लिव्हिंग्स्टन् सीगलच्या आयुष्यातला तो परमोच्च आनंदाचा क्षण होता. त्यांत एका अप्रतिम विजयाचा उल्हास होता. त्यांत बेडर प्रयोगशीलतेनं आणि अथक परिश्रमानं मिळवलेल्या यशस्वितेचं समाधान होतं !!

त्या यशाच्या जोषात त्या दिवशी त्यानं आपल्या स्वतंत्र एकाकी आकाशक्षेत्रांत आणखी कितीतरी नवखे प्रयोग केले. सगळेच एकापाठोपाठ एक यशस्वी होत होते. वर्तुळाकार लूप मारणें, वळतां वळतां गिरकी पूर्ण करणें, जागच्या जागी गिरकी घेणें, शेपटीच्या टोकाभोवती शरीराची फेरी करणें, वगैरे, वगैरे ….

रात्री उशीरा योनाथन् वस्तीत परतला. दिवसभराच्या मेहनतीचा थकवा तर खूप होता. तरीही उतरतां उतरतां एक छोटासा लूप घेतलान् आणि हलकीशी गिरकी घेऊन जमिनीवर पाय टेकले. त्याच्या मनांत आलं, “थव्यातल्या सीगल्सना एकेक करामत सांगेन, तर थक्क होतील. त्यांनाही समजेल किं रोजरोज सकाळी उठून मच्छीमारी होड्यांच्या शिडांवर जाऊन बसणं आणि मेलेल्या मासळीच्या तुकड्यांवर भूक भागवून परतणं यापलीकडं सीगल्सच्या जीवनालाही कांही अर्थ असायला हवा. रूढ कल्पनांतच कशाला जखडून राहायचं ? अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर पडलों, किं आपण देखील ज्ञानाची, उत्कर्षाची, कर्तबगारीची नवी क्षितिजं पाहूं शकूं. ज्ञानाच्या नवनवीन दालनांत विहार करायला कुणाला कुणीही बंदी घातलेली नाहीं, घालूं शकत नाहीं. स्वातंत्र्य हा प्रत्येक जीवाचा जन्मसिद्ध हक्क आहे.”

योनाथन् वस्तीत उतरला, त्यावेळी सीगल्सच्या पंचायतीची सभा भरली होती. सभेंत स्तब्धता होती, जणूं सारी सभा कुणाची, कशाची वाट पहात होती.

“योनाथन् लिव्हिंग्स्टन् सीगल ! इथें समोर ये !” आवाजात प्रतिष्ठितपणाचा आब होता. सभेत सर्वांसमोर उभं राहायला बोलावलं जायचं, तें एक तर सन्मान करण्यासाठी, नाही तर हजेरी घेण्यासाठी.

“सकाळी पांच हजार फुटांवरून मारलेली झोकांडी आणि त्यावेळी साधलेला वेग, न्याहरीसाठी जमलेल्या बहुतेकांनी समक्षच पाहिला होता बहुतेक. त्याबद्दल हा सन्मान तर नसेल ? पण मला सन्मानाचा हव्यास आहेच कुठे ? मला जें कांही साधलं, त्यातून थोडी कांही प्रेरणा कुणा सवंगड्याला द्यायला मिळाली, तसा कोणी सवंगडी आपण होऊन माझ्याकडे आला, तर मला अधिक आनंद होईल.”

“योनाथन् लिव्हिंग्स्टन् सीगल ! तुझे सारे वागणें अन् तुझे सारे उपद्व्याप सीगल्सच्या जातीला न शोभणारे आणि म्हणूनच शर्मनाक आहेत. कुणा सीगलचं व्यक्तित्व किती लाजिरवाणं असतं, तें सर्वांनाच पाहूं दे. ये, सर्वांसमोर उभा रहा.”

योनाथन्-चा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. जागच्या जागीच आपल्याला जोरदार थप्पड बसल्यासारखं त्याला वाटलं. पाय गुडघ्यांत वाकले आणि पंख निस्त्राण ओघळले.

“सीगल्स जातीची शान आणि परंपरा यांचं …” अधिकारवाणीचा उद्घोष चालूच होता “बेजबाबदार बेदरकार उल्लंघन केल्याबद्दल …”

काय शिक्षा सुनावली जाणार आहे, ती न ऐकतांच समजून चुकली. हद्दपारी आणि वाळीत टाकलं जायचं. थव्याच्या शिरस्त्यामधे अपराध्याला स्वतःची सफाई देण्याचा अवसर असावा, अशी सोयही नव्हती. पण सगळ्या प्रकारानं अस्वस्थ झालेल्या योनाथन्-नं तोही उद्धटपणा करून टाकला. म्हणाला, “मी आणि बेजबाबदार ? चाकोरीबद्ध जीवनक्रमाहून वेगळा, पापी पोटाची खळगी भरण्यापलीकडे देखील जीवनाला कांही अर्थ असूं शकतो, ही धारणा ज्यानं जोपासली, तो मीच बेजबाबदार ? अथक परिश्रमानं, ज्ञानाची, अनुभवाची, कर्तबगारीची अपार पुंजी ज्याला गंवसली आणि त्या आनंदाचा, त्या सुखाचा मार्ग आपल्यापैकी कुणालाही दाखवण्याची ज्याची तयारी आहे, तो मीच बेजबाबदार ?”

त्याचं सगळं वक्तृत्व बहिऱ्या कानांवर आणि कठोर पत्थरांवर आदळलं न् विरून गेलं.

“थव्याला एकीत बांधून ठेवत आल्या आहेत, त्या म्हणजे आपल्या परंपरा आणि रूढी. योनाथन्-चे विचार त्यांना शह देणारे आहेत. थव्याच्या एकीवर असे आघात होऊं देऊन चालणार नाहीं.”

योनाथन् मधोमध उभा होता. सर्वांनी माना वळवल्या आणि पाठी फिरवल्या.
ती वस्ती सोडून, तिथून दूरवरील उंच कड्यांच्या पलीकडे आल्याला बरेच दिवस झाले होते. एकटं पडल्याचं तसं त्याला कांही विशेष वाईट वाटलं नाहीं. आई-वडिलांची आठवण यायची. पण त्यांची मतं सुद्धा पंचायतीच्या मतांपेक्षा वेगळी नव्हतीच ना !

त्याला उलट कींवच वाटायची, किं, उंच भरारी, झोकांडी, वेग, गतिरोध, हवेतल्या करामती, या सगळ्या वैभवाचं कुतूहल एवढ्या साऱ्या थव्यातल्या एकालाही कसं काय भावत नाहीं ? सगळ्यांना झापडं बांधून जगणं कां मान्य आहे ?

स्वतःपुरता तो दररोज कांही तरी नवीन शिकत होता, अनुभवत होता, आत्मसात करत होता. अमुक रोख धरून अतिवेगाची मुसंडी मारली, तर समुद्राच्या पाण्यांत दहाएक फुटांच्या खोलीवर फिरणाऱ्या चविष्ट आणि कोवळ्या मासळीचा मेवा त्याला सहजपणे मिळूं शकत होता. त्यामुळं मच्छीमारी होड्या समुद्रांत आल्याच नाहीत, म्हणून उपासमार होण्याची भीतीही उरली नव्हती.

हवेतल्या हवेत डुलकी घेण्याचं आणि उडतां उडतां थकवा घालवण्याचं तंत्रही त्याला बरंच जमलं होतं. सारी सीगल्सची जमात धुकं किंवा पाऊस यांच्या चिंतेनं वस्तीतच कुढत बसली असेल, अशावेळी सुद्धा योनाथन् मात्र आंतरिक संयमाच्या बळावर, धुक्याचे आणि ढगांचे थर पार करून ढगांच्या वर असणाऱ्या स्वच्छ, निरभ्र, उजळ आणि अफाट आकाशांत मनमुराद विहार करूं शकत होता.

खरं तर कुणाही सीगल्ला तें शक्य होतं. पण सध्या तरी त्याला तें स्वतःपुरतं साधलं होतं. थव्याच्या, जमातीच्या, जातीच्या हिशेबानं म्हणायचं, तर या सिद्धी मिळवण्याच्या नादात त्यानं अवहेलनेची, हद्दपारीच्या शिक्षेची मोठी किंमत मोजली होती. पण एव्हांना त्याला उमगलं होतं किं कमी आयुर्मर्यादा हा सीगल्सच्या जातीला मिळालेला कुठला शाप नव्हता. त्याची खरी कारणं होती, ती म्हणजे त्यांच्या जीवनक्रमाला आलेली, रुढीबध्द रटाळपणा, अकारण भीती आणि अनाठायी राग यांमुळं उद्भवलेली विकृती. योनाथन्-च्या एकाकी पण तपोमय जीवनक्रमानं सगळ्या विकृतींचं निराकरण झालेलं होतं. शांत, सुंदर, निवांत, तरीही प्रगतीमय आणि चिरकाली जीवनाचा तो अनुभव घेत होता.
कुठून कुणास ठाऊक. सायंकाळचा योनाथन् आपल्या आकाशकक्षात निवांत फेऱ्या मारत होता. आणि दोन सीगल्सनी, एका ताऱ्यांसारख्या शुभ्र जोडीनं योनाथन्-ला गांठलं. त्यांच्या शुभ्रपणाचं तेज तसं दिपवणारं वगैरे नव्हतं. सुखावह होतं. योनाथन्-ला त्याहीपेक्षा कौतुक वाटलं, तें त्यांच्या उड्डाणाच्या कौशल्याचं. दोघेही त्याच्या बाजूनं इतके बरोबरीनं उडत होते किं त्यांच्या पंखांच्या टोकांपासून त्याच्या स्वतःच्या पंखांच्या टोकांमधील अंतर एक इंच म्हणजे एक इंच, जणूं कसल्याशा अदृश्य पट्टीनं तें पक्कं केलेलं असावं.

त्यांची साथसोबत चक्रावून टाकणारी होती, असंही नव्हतं. पण कांही पारख करायला हवी म्हणून त्यानं आपले पंख मुडपून गतिरोध केला, ताशी केवळ एक मैलाच्या गतीइतका धीमा होत. सोबती पण, जणूं अनाहूत संवेदनेनं त्यांचीही गति त्याच्या गतीशी जुळवून होते, स्वयंचलित यंत्राप्रमाणें. धीम्या गतीनं उडणं त्यांनाही अवगत होतं तर !

पंख शरीराशी बिलगवून घेऊन हलकं वळण घेऊन योनाथन्-नं त्याची आवडती अतिवेगाची झोकांडी घेतली. तेही त्याच्याबरोबर होतेच, त्याच्याशी त्यांनी साधलेल्या रचनेत जरासाही फरक होऊं न देतां !

मग पुन्हां मान वळवून त्यानं वरतीकडची दिशा घेतली. तेही वळले, जणूं हलकंसं स्मित करीत. अमुक उंचीवर त्यानं क्षितिजसमांतर स्थिरता साधली आणि थोडा दम घेऊन त्यांना विचारलंनच, “कोण म्हणायचे आपण ?”

“आम्ही तुझ्याच थव्यातले आहोत, योनाथन् !”

यांना आपलं नांव पण माहीत आहे ?!

“तुझे भाऊच समज.” त्यांचे शब्द शांत, खरेच प्रेमळ होते. म्हणाले, “आम्ही तुला न्यायला आलों आहोत, इथूनही वर. तिथलं तुझं घर देखील आम्ही बघून आलों आहोत.”

“माझं घर ? माझं कुठलं घर नाहीं. मी कुठल्या थव्याचा नाहीं. त्यांनी तर मला केव्हांच हद्दपार केलं, वाळीत टाकलं. आणि इथून आणखी वर कुठें ? आधीच तर आपण महानगाच्या अत्युच्च शिखरावरील ढगांच्याही वर उडत आहोंत. आतां या वयांत मी याहून आणखी वर जाऊं शकत नाहीं.”

“नाहीं योनाथन्, तूं नक्कीच आणखी वर येऊं शकतोस. इथवर यायचं तर तूं तुझा तूंच शिकला आहेस. अभ्यासक्रमाचा एक टप्पा इथं संपला असं समज. दुसरा टप्पा आहेच ना. तो इथूनच सुरूं होतोय. आणि खरं तर, नवीन अभ्यास, अधिक अभ्यास, पुढचा अभ्यास हाच तर तुझा स्वभावधर्म आहे.”

योनाथन् ऐकत होता, त्याला पटतही होतं. “खरं आहे”, तो हलकेच पुटपुटला.

चांदण्यांच्या प्रकाशात, रुपेरी तेजानं चमकणाऱ्या, त्याच्या नजरेखालील प्रदेशाचं आणि आकाशकक्षाचं त्यानं क्षणभर अवलोकन केलं. कितीकिती आणि कायकाय शिकला होता तो इथं. पण त्या सगळ्या गतकाळांत गुंतून राहण्याची ही वेळ नव्हती.

त्या शुभ्र तेजस्वी सोबत्यांच्या साथीनं योनाथन् तिथूनही पलीकडे असणाऱ्या अनोळखी आकाशांत झेपावला.

“हा तर स्वर्ग दिसतोय ?!” स्वर्गाच्या द्वारांत प्रवेश करतां करतांच असं अतिकुतूहलात्मक विश्लेषण मनांत घोळवायला सुरूं करणं योग्य नव्हतं. म्हणून स्वतःचं मन सांवरण्यासाठी त्यानं स्वतःलाच न्याहाळूं पाहिलं.

ढगांच्या वर, पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर, तेजस्वी सोबत्यांच्या साथीनं इथं येतांयेतांनाच त्याच्याही पंखांवर सर्वच अंगावर कांही कांती आणि उजाळा आल्याचं त्याच्या लक्षांत आलं. त्याचे पिवळसर डोळे तेच होते. त्या डोळ्यांकरवी ज्या जाणीवा मनांत, हृदयांत, आत्म्यांत भावात होत्या, त्या जाणीवांची तरलता आतां अधिक समृद्ध होती. पण त्या जाणीवा सामावणारा आत्मा तोच होता, त्याच योनाथन्-चा तोच आत्मा. त्या आत्म्याचं कोंदण बनलेल्या शरीराच्या बाह्यांगी कांतीला निराळं तेज मात्र आलं होतं.

तें शरीर सीगलचंच शरीर होतं पण त्या साऱ्या कुडीला जणूं नवा सहजपणा आला होता. पृथ्वीवरील अभ्यासादरम्यान केलेल्या करामतींपेक्षा कितीतरी पट अधिक चांगल्या करामती आपण कितीतरी कमी मेहनतीनं, कितीतरी अधिक सहजपणे करूं शकूं, हें त्याच्या लक्षांत आलं.

त्याचे पंख नुसतेच कांतिमय झालेले नव्हते, तर त्यांना एक झळाळी आलेली होती. ते घासून गुळगुळीत केलेल्या चांदीच्या पत्र्याप्रमाणें सफाईदार झालेले होते. या अशा पंखांना जरा भरारी देऊन पाहूं, म्हणून त्यानं सहज वेग घेतला. अडीचशे मैलांच्या वेगाच्या सुमारास त्याला वाटलं किं क्षितिजसमांतर भरारीची ही सीमांत गति म्हणायला हरकत नाहीं. पण हलक्याशा प्रयत्नानं वेग आणखी वाढला, दोनशें सत्तरीपर्यंत. आणखी प्रयत्न केला तर आणखी वेग वाढेल ? कुठं तरी कांही तरी गतीची सीमा असेल ? अशी सीमा असेल, किं जी ओलांडणं प्रयत्नांच्या पलीकडचं ठरेल ? प्रश्न उठत होते. पण उत्तरंही आपोआपच उमटत होती. “नाहीं, स्वर्गात कसल्या मर्यादा ? निस्सीमता म्हणजेच स्वर्ग. इथं पायऱ्या नाहीत, पातळ्या नाहीत, सीमारेषा नाहीत. सगळं अफाट, अमर्याद, मुग्ध, दिगंत, मुक्त आहे !”

पाहतां पाहतां धुक्यासारखे वाटत होते, ते तरल तरंगही विरले होते.

“सुस्वागतम् योनाथन् !”

त्याच्या सोबत्यांनी दिलेली साद होती ती ? पण होते कुठे ते ? अंतर्धान पावले ?

पुन्हां एकटा ? पण आतां त्याला कुणी वाळीत टाकलं नव्हतं. कुणी हद्दपार केलं नव्हतं. उलट ‘स्वगृही’ आणून पोचवलं होतं.

इथं देखील आपला स्वतःचा स्वतंत्र एकाकी आकाशकक्ष नाही ना ठरवायचाय ? जरा इकडेतिकडे झेपावतांनाच एकीकडे कांही सीगल्स त्यांच्या करामतींत दंग असलेले दिसले. “यानांही अभ्यासाचा जिज्ञासेचा उत्साह दिसतो. समस्वभावी दिसतात. सवंगडीच ?!”

“पण थवा म्हणायला संख्येने हे खूपच कमी आहेत. स्वर्गात सगळंच अमर्याद असायला हवं ना ? सीगल्सचे पण थवेच थवे.” एकाएकी स्वतःच्याच विचारांनी स्वतःलाच शीण आल्यासारखं त्याला वाटलं.

“स्वर्गात आणि शीण ? स्वर्गात नसतो शीण.” “कुणी रुजवली होती शीण येण्याची कल्पना ? पृथ्वीवरील आयुष्यात रुजलेल्या कल्पना, श्रुती आणि स्मृती, इथल्या नवीन जाणीवांनी किंबहुना नेणिवांकरवी अजून पुरत्या विरल्या नव्हत्या तर !”

“त्या दोन शुभ्र तेजस्वी सोबत्यांनी इथवर आणून पोंचविण्याचा सारा प्रकार किती कालावधीचा झाला बरं ? कसं ठरवणार ? इथं आहे तो दिवस किं रात्र ? दोहोंपैकी कांहीच नाही असं दिसतं. दोहोंपैकी कांहीच नाही, तर कालगणना काय करणार ? जो कांही काळ गेला, इतक्या सगळ्या वेळेत आपण कांहीच खाल्लेलं नाहीं. भूकच कुठे लागली ? भूक भागवायला इथे तर पाणीच नाहीये, मासोळ्या देखील नाहीत ! कदाचित आतां कधी भूक लागणारच नाहीं. भूक ही देखील तिथली पृथ्वीवरची जाणीव, संकल्पना ! होतां होतां, एकेक करत सगळ्याच जाणीवा विरून जातील. इथं असतील निव्वळ नेणीवा !”

ते जे डझनभर सीगल्स तिकडे दिसले होते, ते आतां त्याच्या अंवतीभोवतीच होते. तो त्यांच्याकडे गेला होता, किं ते त्याच्याकडे आले होते ? कदाचित कांही अनाहूत संवेदनांतून परस्परांशी संबंध आणि संपर्क जुळले आणि सगळ्यांचा मिळून एक सहज शेजार जमला. शेजारधर्म हा इथला सहज स्थायीभाव होता. त्यासाठी कसल्या संकेताची किंवा संवादाची जरूर नव्हती.

प्रत्येकाचा आपापला अभ्यास चालूं होता. तरीही त्यांच्या हालचालीत एक अगम्य लय होती. प्रत्येकाच्या करामतीत निश्चित सहजपणा, सफाई, सौंदर्य, सारं अप्रतीम होतं. नवीन दृश्यं, नवे विचार, नव्या कल्पना, नवी आव्हानं, नवे अभ्यास ! नाविन्याला देखील अमर्यादपणा ! एका उसाशानिशी योनाथन् निद्राधीन झाला.

कांही जाणीवा इथंही होत्या अजून. इथल्या दिनमानाचे बरेच दिवस उलटले. उड्डाणाच्या शास्त्राची बरीच नवी तंत्रं, बरेच नवे मंत्र त्याला अवगत होत होते. एक मोठा फरक हा होता, किं सारेच सवंगडी अभ्यासार्थी होते. सर्वांनाच ज्ञानाची अपार लालसा होती. सगळ्यांनाच मान्य होतं किं जो विषय भावला, त्यांत परिपक्वता, परिपूर्णता साधण्यासाठी अखंड साधना करणं यातच जीवनाची खरी सार्थकता आहे.

जें जग सोडून योनाथन् इथं रमला होता, त्या जुन्या जगाची त्याला कधीमधी आठवणही यायची. तिथल्या सीगल्सना भूक होती. भुकेसाठी अन्न हवं असायचं. अन्नासाठी खटपट करावी लागायची. आणि ती खटपट सफल व्हायची, ती उडतां येण्यामुळे. उड्डाणाच्या साऱ्या शास्त्राचा इतकाच मतलब तिथल्या सीगल्सनां ठाऊक होता. तितकंच ज्ञान त्यांना पुरेसं वाटायचं. इथं भूकच नव्हती. त्यामुळं ज्ञानसाधनेमागं कसला मतलब नव्हता. किंबहुना ज्ञानसाधनेला ज्ञानसाधना म्हणूनच स्वतंत्र आणि संपूर्ण अर्थ होता, सार्थकता होती.

इथल्या आणि तिथल्या संकल्पनातील असल्या तुलनात्मक फरकाची जाणीव कधीकधी त्याच्या मनात उमटायची. आतां इतक्यांत आपल्या प्रशिक्षकाबरोबर गिरकीच्या एका नवीन प्रकाराचा अभ्यास करून थोडा विश्राम घेतांना ती तुलनात्मक जाणीव हलकीशी उमटली. खरं तर, अशा तुलनेलाही कांही अर्थच नव्हता. हें लक्षांत येतांच योनाथन्-नं स्वतःला सांवरलं.

“सलीव्हन् कुठे गेले सगळे ?” योनाथन् आपल्या प्रशिक्षकांना विचारत होता.

विचारण्यासाठी शब्द बोलायची आणि आवाज करायची इथं जरूर नव्हती. निःशब्द संवादानंच इथला सगळा कारभार चालायचा. “शब्देविण संवादु” अशी इथली रीत एव्हानां योनाथन्-ला चांगली अवगत झालेली होती.

“इथं आपण इतके मोजके सीगल्स कसे ? तिथे पृथ्वीवर आमच्या थव्यात …. “ योनाथन् विचारत होता.

“... हजारो सीगल्स असायचे. ठाऊक आहे मला.” सलीव्हन्-नं संकेत दिला. “याचं कारण इतकंच असलं पाहिजे योनाथन्, किं तूं लाखांत एक असा लाखमोलाचा पक्षी आहेस.”

मला वाटतं, मी आणि इथल्या सवंगड्यापैकी आम्ही कितीकजण इथवर पोंचलों खरे, पण खूपच टप्प्याटप्प्यानं. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात, एका अनुभवांतून दुसऱ्या अनुभवात, एका योनीतुन दुसऱ्या योनीत उन्नत होतोय, असं त्या त्या वेळीं वाटलंही असेल. पण आतां वाटतं किं एक विश्व आधीच्या विश्वापेक्षा, एक अनुभव आधीच्या अनुभवापेक्षा, एक योनी आधीच्या योनीपेक्षा फारशी वेगळी नव्हती बहुधा. आम्हालाही विशेष कसली फिकीर कधी वाटली नाही, किं कुठल्या विश्वात आहोत आणि कुठल्या विश्वात जायचं आहे. कसला अनुभव घेत आहोत आणि कोणता अनुभव साधला पाहिजे. बहुतेक अनुभव क्षणिक असायचे. दुःखंही फारशी वेगळी नव्हती कदाचित. पण सुखं नक्कीच क्षणिक असायची. जीवनंच क्षणिक होती. क्षणांपुरतें जगलों.

“कांही हिशेब मांडतां येईल, योनाथन्, किं खायला मिळवणें, अन्नासाठी हुज्जत घालणें, किंवा थव्यात कांही तरी मान, प्रतिष्ठा, धाक किंवा सत्ता असणें, या सगळ्यापलीकडे जीवनाच्या सार्थकतेच्या कांही वेगळ्या संकल्पना असायला हव्यात, याची त्रोटकमात्र जाणीव होतांहोतांच माझ्यासारख्याची किती जीवनं उलटली असतील ? हजारों योनाथन्, नव्हे लाखों योनी ! आणखी शेकडो योनीनंतर उमगलं किं ज्ञानसाधनेचा कस, अचूकपणा आणि बिनतोडपणा या निकषांवर पारखला गेला पाहिजे. त्याहीनंतर शेकडो योनी उलटल्या असतील, कीं स्वतःच्या ज्ञानाला कसोटीवर उतरवायचा विश्वास धरूं शकलों.

एका विश्वातून दुसऱ्या विश्वात संक्रमण करायला पात्र ठरायला आजही किंबहुना तोच नियम आहे, कायदा आहे, किं या जीवनांत काय शिकूं, साध्य करूं, त्यावरून पुढचं जीवन कसं असेल, काय असेल, तें ठरेल. या जीवनांत कांहीच शिकलों नाही, कांहीच साध्य केलं नाहीं, तर पुढचं जीवन ह्या जीवनापेक्षा काय म्हणून वेगळं असेल ? या जीवनांतील बंधनं, या जीवनांतील संकल्पना त्याही जीवनांत तशाच असतील. बंधनं आणि संकल्पना, त्यांच्या मर्यादा, त्यांचे आराखडे तशाच सीमारेषांनीं आखलेले असतील.

तुझं मात्र कौतुक वाटतं, योना, किं टप्प्याटप्प्यातली तुझी झेप चांगली भरारीची होती. पाहतांपाहतांच त्यामुळं तूं इथवर पोंचलास.”

संवादाबरोबर त्यांचा अभ्यासही चालू होता. तो महत्त्वाचा होता. जागच्या जागीं उभी कोलांटी पूर्ण करायची म्हणजे एका परीनं उलट्या डोक्यानं तोल सांवरायचा, तोही सलीव्हन्-शी कायम संतुलन जमवून.

“चल, पुन्हां एकदा प्रयत्न करूं”, सलीव्हन् दरवेळी म्हणायचा. अचूकपणा, बिनतोडपणा, परिपूर्णता, हें सगळं साधल्याशिवाय दोघांपैकी कुणीच थांबणार नव्हतं. “वाः ! उत्तम !” असं वाटलं तेव्हां मग त्यांनी उभ्या चक्रावलींचा अभ्यास सुरूं केला.

अशीच एका संध्याकाळीं एक छोटेखानी सभा जमली होती. योनाथन्-च्या डोक्यांत कांही विचार घोळत होते. मग जरा धैर्य एकवटून तो सभेतील श्रेष्ठींकडे गेला. खरं तर, तें जग - किं तो स्वर्ग - सोडून श्रेष्ठी आणखीन कुठें जायचे आहेत, असे बरेच कांही संकेत आधीच पसरले होते.

“च्यँग्” योनाथन्-नं श्रेष्ठींना साद दिली.

“बोल योना” च्यँग्-च्या आवाजात माधुर्य होतं, प्रेमळपणा होता, तरीही ठसठसशीतपणा होता. वाढत्या वयानं देखील च्यँग्-मधे कसलाही कमकुवतपणा नव्हता. उलट वाढल्या अनुभवाचा भरभक्कमपणा होता. तिथल्या कुणाही सीगलला मागे टाकूं शकेल अशी झेप च्यँग्-ला अवगत होती. अभ्यासानं कायकाय सिद्धी अवगत होऊं शकतात, याची फक्त जंत्रीच बहुतेकांना माहीत होती. च्यँग्-ला साऱ्या सिद्धीच अवगत होत्या.

योनाथन् विचारत होता, “च्यँग्, हि इथली दुनिया म्हणजे सुद्धा स्वर्ग नव्हे, खरं ना ?”

च्यँग् हंसला. “वाः योनाथन् ! सतत अभ्यास, सतत चिंतन चालूं आहे तुझं !”

योनाथन्-चा पुढचा प्रश्न होताच, “ही दुनिया सुद्धा जर स्वर्ग नव्हे, तर इथूनही पुढें आणखी कुठं नि काय ? कां अमुक एक जग, अमुक एक ठिकाण म्हणजे स्वर्ग, असं कांही नाहीच मुळीं ?”

“हो, योनाथन्, स्वर्ग म्हणजे कुठलं ठिकाण, कुठलं जग, असं कांही नाही. परिपूर्णता, परिपक्वता, अचूकपणा, बिनतोडपणा म्हणजेच स्वर्ग. ज्ञानसाधनेत या गोष्टी साधायच्या म्हणजेच स्वर्ग गांठायचा.”

थोडा वेळ थांबून च्यँग् पुढें म्हणाला, “तुला वेग आवडतो, होय ना ?” आपल्या आवडीचं च्यँग्-नं असं निरीक्षण केलं होतं, याबद्दलही योनाथन्-ला च्यँग्-चं कौतुक वाटलं.

“तुझ्या वेगाला बिनतोडपणा येईल, तेव्हां तूं स्वर्ग गांठलेला असशील. आणि बिनतोडपणा म्हणजे ताशी हजार मैल, ताशी दशलक्ष मैल, प्रकाशाच्या वेगानं, असलाही कसला अमुक इतका वेग नव्हे. अमुक इतका म्हटली किं कल्पनेला संख्यात्मक मर्यादा आली. बिनतोडपणाला मर्यादाच नाही. बिनतोड वेग म्हणजे “तिथवर” पोंचलेलंच असणं, असं म्हणूं.”

आणि बोलतां बोलतां च्यँग् अदृश्य काय झाला, किं दुसऱ्याच क्षणीं पन्नासेक फुटांवरील ढगावर टेकल्यासारखा दिसला. तेवढ्यात तो पुन्हां अदृश्य झाला आणि क्षणार्धातच योनाथन्-च्याच खांद्यावर अलगद टेकला होता.

“आहे ना गंमत ?” च्यँग् योनाथन्-च्या कानांत पुटपुटला. योनाथन् नुसताच थक्क होऊन गेलेला नव्हता, तर चांगलाच चक्रावून गेला. स्वर्गाबद्दल आणि वेगाच्या बिनतोडपणाचा जो संवाद झाला होता, तो अपरिहार्यपणे तुटला. आणि योनाथन्-नं निराळंच विचारायला सुरवात केली, “ही नक्की काय जादू आहे ? कुठंही जाऊं शकतोस ? केव्हांही ?”

“हो. तुलाही जमेल. एक लक्षात ठेव. केवळ अंतरच पार करण्यासाठी ज्यांना वेगाचा बिनतोडपणा साधायचा असेल, ते खऱ्या अर्थानं कुठंच पोंचत नाहीत. ज्यांनी अंतरांचीच कल्पना मोडून काढली, ते कुठेही जाऊं शकतात, केव्हांही. म्हणून म्हणायचं योना, किं स्वर्ग म्हणजे अमुक कोणतं ठिकाणं नव्हे, किं अमुक कोणती वेळ नव्हे. स्थल, काल याही मुळात संकल्पना आहेत. निरर्थकही आहेत. स्वर्ग म्हणजे …”

“मला शिकायचंय् असं कुठेही, कधीही पोचायचं.” योनाथन् म्हणाला खरा. पण अजूनही तो चक्रावला होता. एक नवी जिज्ञासा मात्र चाळवली गेली होती. “शिकवाल मला ?”

तुला इतकी उत्कटता असेल, तर केव्हांही.”

“आत्तां ?”

“हो आत्तां !”

“पण सुरवात कुठून कशी करायची ?”

“मनोवेगानं कुठवरही जायला शिकायचं, तर आपण तिथवर पोंचलोंच आहोत, हें उमगलं पाहिजे. तीच सुरवात.”

च्यँग्-च्या म्हणण्यानुसार त्याच्या सिद्धींचं गमक हें होतं किं स्वतःला बेचाळीस इंची पसारा असणाऱ्या शरीरांत सामावलेला मानणं आणि आपल्या किमयागिरीला कसल्या आलेखाच्या मर्यादा आहेत, हें मानणं, हें सगळं संपलं पाहिजे. उमगलं पाहिजे किं आत्म्याचं खरं स्वरूप अमर्याद संख्येप्रमाणं बिनतोड, बेबंद आहे. म्हणूनच आत्मा स्थलकालांच्या अखंड पटलावरचा कुठलाही क्षण, कुठलाही बिंदू क्षणार्धात गाठू शकतो.

या अगाध ज्ञानाची साधना चालूं असतांना किती काळ उलटला कोण जाणे. शंकासमाधानाची गरज भासायची. च्यँग्-चा आशीर्वाद तत्काळ मिळायचा.

“आपण तिथवर पोंचलोंच आहोत, हें उमगायला, मनोवेग ही देखील कसली धारणा, निष्ठा, श्रद्धा वगैरे कांही आहे कां ?”

“नाही. धारणा, निष्ठा, श्रद्धा, हें सगळं देखील खोटं आहे. तुला उडतां यायचं होतं आणि घरट्यातून बाहेर पडून तूं पहिली झेप घेतलीस, ती कसली श्रद्धा नव्हती. तुला उडतां येऊं लागलं, कारण हवेत अधांतरी स्वतःला झोकून देण्याची ऊर्मी तुला उमगली. हेंही तसंच आहे. प्रयत्न कर.”

ही अशी बरीचशी ज्ञानसाधना ध्यानमग्नतेनं सुरूं होती आणि अचानक कुठल्याशा क्षणीं डोळे मिटून ध्यानमग्न असतांनाच योनाथन्-ला सारं कांही लख्ख प्रकाशात स्वच्छ स्पष्ट दिसावं, तसं उमगलं. एका अननुभूत आनंदाचा धमाका उडाला.

“खरंच, आत्मा बेबंद, सर्वगामी आहे.” योनाथन्-ला उमगलेल्या संवेदनेची च्यँग्-ला देखील पूर्ण कल्पना होती. “वा योनाथन् ! वा ! शाब्बास !” ध्यानाची एकाग्रता अजून पक्की करण्याचा प्रयत्न कर. आणखी मजा येईल.”

या संवादादरम्यान योनाथन्-नं जरा परिसर न्याहाळला. हें वेगळंच जग होतं. त्या स्वर्गाहून वेगळा स्वर्ग ?!

“कुठं आहोंत आपण ?”

आहोत कुठल्या तरी तारांगणातील कुठल्याशा ग्रहावर, जिथलं आकाश हिरवंगार आहे, प्रकाशच प्रकाश आहे. कारण एकाच एक सूर्याऐवजी दोन्ही बाजूंनी दोन ताऱ्यांचा अखंड प्रकाश आहे.”

हें असलं अवकाशभ्रमण खरंच जमतं तर !”

“नक्कीच योनाथन् नक्कीच जमतं. ज्ञानसाधनेनं जमतं.”

आधीच्या स्वर्गात दोघेही परतले, तसे तिथले बाकीचे सगळे सीगल योनाथन्-कडे थक्क होऊन पाहात होते. ध्यानाच्या जागी ध्यानमग्न असतांनाच त्यांनी त्याला च्यँग्-च्या जोडीनं अंतर्धान झालेलं पाहिलं होतं. त्यांच्या कौतुकाला आणि कुतुहलाला अवसर न देतां च्यँग् योनाथन्-ला म्हणाले, “कालपटलावरचा सद्यःकालाचा संदर्भ उल्लंघून भूतकाळात आणि भविष्यकाळातही अवकाशभ्रमण करण्याचा प्रयोग देखील आपण करूं शकतो. तें साधलं किं तीन्ही जगांत, तीन्ही कालांत विहार करण्याचं सामर्थ्य तुला अशा उच्च पातळीवर पोंचवेल किं दया, क्षमा, प्रेम यांचा एक उदार, विशाल अर्थ तुला उमगेल.”

च्यँग्-ची हि प्रवचनं आपल्या आकलनशक्तीत सामावत, हिमतीनं आणि हिरिरीनं नवनव्या प्रयोगांची आव्हानं पेलत योनाथन्-च्या प्रगतीचा आलेख झपाट्यानं झेपावत होता. इतरांचेही प्रयत्न आपापल्या परीनं चालूंच होते. योनाथन्-ची भरारी अर्थातच दांडगी होती. पण, ज्ञानसाधना हा सर्वांचाच स्वभावधर्म बनलेला होता. च्यँग् सगळ्यांनाच प्रोत्साहन देत असत. स्वतः च्यँग्-नां सिद्धत्वाची वाढती झळाळी चढत होती.

आणि असंच एकदा प्रवचन चालूं असतांना च्यँग्-चं तेज असं वाढत गेलं, किं इतर कुणाही सीगलला त्यांच्याकडे पाहणं शक्य झालं नाहीं.

“आणि योनाथन्, उदात्त प्रेमाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न चालूं ठेव.” च्यँग्-चा शेवटचा निःशब्द संवाद सर्वाँना थरारून गेला.

तेजाची प्रखरता निवली. सर्वजण पुन्हां नेहमीप्रमाणें पाहूं शकत होते. च्यँग् तिथें नव्हते.

“भूत, वर्तमान, भविष्य - तीन्ही त्रिकालात वावरायचं, उदात्त प्रेमाचा अर्थ समजून घ्यायचा. त्या प्रयत्नात च्यँग्-चा कांही नवा साक्षात्कार होईलही कदाचित, च्यँग् हा च्यँग्-च राहिला असेल तर. पण कां राहावं च्यँग्-सारख्यानं च्यँग्-च ? मीही योनाथन्-च राहीन कशावरून ? राहावं तरी कशाला ? सध्यां आहे, पूर्वी होतों, इतकंच.” योनाथन्-चं चिंतन चालूं होतं.
“पूर्वी होतो” असं म्हणतांना पृथ्वीवरील आयुष्याच्या स्मृती चाळवल्या गेल्या, असं नव्हे, तर आपल्याला जें गंवसलं, त्यांत कुणाकुणाला सहभागी करून घेतां येईल, हा विचार त्याच्या मनांत घोळायचा. उदात्त प्रेमाचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रेम दिलं पाहिजे.

योनाथन्-च्या डोक्यात काय घोळतंय तें सलीव्हन्-ला देखील सहज समजायचं. मनोवेगाच्या भरारीचं तंत्र त्यालाही साधलं होतं. तिथल्याच इतरांना मदत करणें जास्त श्रेयस्कर आहे, असं सलीव्हन्-चं मत होतं.

योनाथन्-ला मात्र वाटायचं, “गेलोच तिथे पृथ्वीवर, तर भेटेल कां कुणी एकादा तरी वेडा, ज्याला रूढ कल्पनांच्या मर्यादा ओलांडायचं वेड असेल आणि वाळीत टाकलं जायची, हद्दपार केलं जायची फिकीर नसेल ?

सलीव्हन् म्हणायचा, “ज्या थव्यानं तुला वाळीत टाकलं, ते तुझं आतां तरी ऐकतील असं तुला कां वाटतं ? आणि खरी परिस्थिती ही आहे, किं केवळ एकमेकांशी हुज्जत घालून अन्नाचा तुकडा मिळवण्यात कर्तबगारी मानणारे ते सारे सीगल्स पृथ्वीवर, या स्वर्गापासून खूप दूर आहेत. तिथे ते ज्या उंचीवर वावरतात, त्या उंचीवर त्यांच्या दृष्टीक्षेपात सामावणारं जगच खूप लहान आहे. आणि खरी आहे ना म्हण, किं जितकं उंच जावं, तितकं दूरवरचं दिसतं. त्या सीगल्सना स्वतःच्या पंखांची टोकं देखील दिसत नाहीत. त्यांचा नाद कशाला ? जे आधीच इथवर आलेले आहेत, त्यांना मदत केलेली अधिक बरी नव्हे कां ? असं समज किं स्वतः च्यँग् त्यांच्या जुन्या, मुळातल्या जगांत परत गेलेले असते, तर तूं स्वतः आज कुठें असतास ?”

सलीव्हन् म्हणत होता, तेंही खरं होतं. इथं नव्यानं येणाऱ्या सीगल्सना शिकवण्यातही एक समाधान असायचं. ते सर्व चांगले उमेदीचे पक्षी असत आणि त्यांची शिकायची जिद्दही दांडगी असे. पण सलीव्हन्-नं केलेल्या च्यँग्-च्या उल्लेखानं एक निराळाच विचार चमकून गेला. मला वाळीत टाकलं, त्याचवेळी तिथंच च्यँग् भेटते तर ? ते दोघे सीगल्स भेटले, ते सुद्धा किती तरी नंतर. कुणाच्या उमेदीला वेळीच प्रोत्साहन देणं पण महत्त्वाचं नव्हे कां, विशेषतः त्यांच्या संकटाच्या वेळी ? आणि योनाथन्-चा विचार पक्का झाला.

“सली, मला तिकडं गेलं पाहिजे. तुझे इथले विद्यार्थी चांगलेच आहेत. स्वतः तयार होतीलच. नव्यानं येऊं पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यांतही ते तुला मदत करतील.”

सलीव्हन्-ला योनाथन्-चं पृथ्वीवर जाणं तसं पटत नव्हतं. पण वेळीच मदत करतां येण्याचा मुद्दाही योग्यच होता. म्हणाला, “तूं गेल्यावर, योनाथन्, मला चुकल्यासारखं होईल, नक्की.”

“हें काय सलीव्हन् ? एकाच्या एकीकडे जाण्यानं दुसऱ्याला असा विषाद होणार असेल, तर स्थलकालांच्या सीमा ओलांडण्याची आपली सारी चर्चा म्हणजे नुसत्या बौद्धिक वल्गनाच म्हणायच्या कां ? आपणां दोघांमधे जुळलेला बंधुत्वाचा दुवा स्थलकालांची अंतरं तोडायला अजून कमकुवत आहे, असं कां समजायचंय ? स्थलनिविशिष्टता ओलांडायची तर इथे आणि तिथें हा भेद मिटला पाहिजे. आणि कालनिविष्टता ओलांडायची तर तेव्हां आणि आतां हा भेद मिटला पाहिजे. हे भेद मिटले किं उरेल तें एकमेव शाश्वत सत्य .. कुठेंही आणि कधीही, निव्वळ इथें आणि आतां.

या ओघानं विचार करायचा तर मी तिकडे गेल्यानं आपली फारकत होईल, ही कल्पना निराधार आहे. आपण नक्की पुन्हां भेटूं सलीव्हन्. त्यामुळं आत्तापुरता मी तिकडं जायचा निर्णय नक्की केलाय.”

योनाथन्-च्या वक्तृत्वानं भारावलेल्या सलीव्हन्-नं स्मित करत म्हटलं, “तेंही बरोबर आहे म्हणा. तिथल्या कुणाला हजारों मैलांचा परिसर दृष्टिक्षेपांत कसा सामावायचा, हें जर कुणी दाखवूं शकेल, तर तो म्हणजे योनाथन् लिव्हिंग्स्टन् सीगल. तूं एवढ्या दृढ निश्चयानं घेतलेला निर्णय यशस्वी होणारच. ठीक आहे, योना !”

“चल, भेटू पुन्हां सली !” असं म्हणत योनाथन्-नं आपलं ध्यान केंद्रित करून दुसऱ्या कुठल्या कालौघाच्या किनारी रेंगाळलेल्या त्या तिकडच्या सीगल्सच्या थव्याचं दृश्य आपल्या मनांशी स्थिर केलं आणि पक्षाचं शरीर आणि पंख या कुडीपलीकडील अनिर्बंध, अमर्याद स्वातंत्र्याचा सहज अनुभव साधून मनोवेगाच्या एकाच भरारीत तिथं पोंचला.
फ्लेचर लिंड सीगल तसा वयानं कोंवळा होता. पण या वयातही त्यानं कांहीं कटु अनुभव पचवले होते. आपल्याच थव्यानं आपल्याला अशी कठोर वागणूक द्यावी, याची त्याला खंत होती, तिढीकही होती. थव्यातल्या सर्वांच्या संकुचित विचारांचीच त्याला चीड आली होती.

स्वतःशीच पुटपुटणं चालूं होतं, “क्ष जागेवरून य जागेवर पोंचण्यासाठी पंख फडफडवणं यापेक्षा पक्ष्याच्या उडण्याला कांहीं अधिक अर्थ असायला हवा. एरव्ही इतकी फडफड तर मच्छर देखील करतात. श्रेष्ठींच्या समोर एक साधी गिरकी काय घेतली, तर म्हणे, “फ्लेचर लिंड सीगल ! हे थेर फार झाले. तुला हद्दपार करण्यांत येत आहे !” खुळ्यांची चावडी, नाहीं तर काय ? उंच भरारीचं वैभव, त्याचा आनंद … कांहींच कसं यांच्या कल्पनेतही येत नाही ? जाऊं दे ! माझा मीच सराव करून अशा करामती बसवेन, किं तोंडात बोटं घालतील !”

असं पुटपुटणं चालूं होतं आणि त्याला आपल्याच अंतर्मनात एक निराळाच आवाज उमटल्याचं जाणवलं. तो जरा चमकलाच. तसं तर त्या आवाजात शांत, निवांत, समजूतदारपणा होता. तेव्हां हडबडून जायचं कारण नव्हतं. तरीही एका वेगळ्या अनुभवाचा झटकासा असेल, त्याचं तें उंच आकाशांत तरंगणं थोडं डळमळलं खरं.

“जाऊं दे फ्लेचर. त्यांच्याशी तूं इतका कठोर नको होऊस. तुला हद्दपार करून त्यांनी स्वतःचंच नुकसान केलंय, हें उमगेल त्यांना केव्हांतरी आणि तुला ज्या वैभवाची आंस वाटते, त्याची त्यांनाही ओढ लागेल. हें सारं व्हायला वेळ जायला हवा.”

अंतर्मनात उमटतोय असं वाटणारा तो आवाज फ्लेचर समजून घेत असतांनाच एक तेजस्वी, स्वच्छ सफेद सीगल त्याच्या उजव्या पंखाच्या टोकापासून निव्वळ एक इंचाचं अंतर संभाळून, फ्लेचर स्वतः त्याच्या उत्कृष्ट वेगानं भरारी मारत असतांना देखील, त्या गतीशी गति जुळवून, अन् तरीही अगदी सहजपणे उडत असल्याचं फ्लेचरच्या लक्षांत आलं आणि फ्लेचर जरा गडबडलाच. ‘मला जाणवला तो माझ्या अंतर्मनातला आवाज किं या पांढऱ्या सफेद भुताची माया ?’ या धांदलीतच आणखी एक संथ स्वर उमटला, “तुला आणखीन चांगली भरारी शिकायचीय, फ्लेचर ?”

“शिकायचीय म्हणजे ? तीच तर धडपड चालूं आहे !” असं तडकाफडकी उत्तर देतांनांच फ्लेचर चक्रावलेला पण होता किं ‘पण याला माझं नांव कसं माहीत ?’

“शिकायचंय तुला, हें ठीक. पण कशासाठी फ्लेचर ? थव्यातल्या त्या सर्वांना त्यांच्या अज्ञानाबद्दल माफ करण्याइतपत स्वतःचं कौशल्य, स्वतःचं ज्ञान वाढवण्याची आणि कधीकाळी परत येऊन, तोंवर उपरती उमजलेल्याना ज्ञानाचं खरं स्वरूप समजावण्याइतकी उदार दृष्टी जोपासता आली, तर तुझ्या धडपडीला कांहीं अर्थ असेल, फ्लेचर.”

ज्ञानसाधनेचं इतकं प्रचंड तत्त्वज्ञान, ओळखदेख व्हायच्या आधीच अन् एका दमांत, एका वाक्यांत, इतक्या रोखठोकपणें कुणी सुनवावं, याचा नक्की मतितार्थ काय ? आपण या अशा ज्ञानसाधनेला लायक आहोत किं नाही, याचा विचार करण्याच्या विशेष फ़ंदात न पडतां, फ्लेचरला इतकं तरी माहीत होतं किं आणखी चांगली भरारी तर शिकायचीच आहे. आणि सहजच फ्लेचर म्हणाला, “मला शिकायचंय.”

“ठीक तर. क्षितिजसमांतर तरंगण्यापासून सुरवात करूं.”

योनाथन्-नं त्या उंच कड्याच्या अंवतीभंवतीनं एक प्रदक्षिणा केली. पण युवा फ्लेचरवर सारखी नजर होती. फ्लेचर ठेवणीनं जरा मजबूतच होता. त्यामुळं अवघड गोष्टीही जराशा प्रयत्नानं त्याला जमून जायच्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्याची जिद्द, निष्ठा आणि तळमळ. त्यामुळं मनानं तो थकायचाच नाही. उमेद नेहमीच बाकी असायची. सच्च्या विद्यार्थ्यात आणखी काय हवं ?

“आठ … नऊ … दहा … पाहिलं योनाथन्, मी अजून वाऱ्याच्या वेगानं येतोय. अकरा .. मला तुझ्यासारखं सपकन वेग कापून थांबणं जमत नाहीये. बारा .. तेरा .. या इतक्या उभ्या गिरक्या झाल्या तरी वेग आटोक्यात येत नाहीये. चौ S  S S दा S S ! आ S S S … !”

वेग कापण्याची ती सोळा गिरक्यांची कसरत फ्लेचरला जमतच नव्हती.

“मला वाटतं योनाथन्, हें सोळा गिरक्यांचं तंत्र जमवण्यामागे मी तुझ्यासारख्याचे श्रम आणि वेळ वांया घालवतोय. तेरा-चौदा पर्यंत वेग आटोक्यात नाही आला तर कसं काय जमायचं ?”

“नाही जमणार ! येड्या गिरकीत वर जातांना इतका झटका देतोयस, तर वेग आटोक्यात कसा येणार ? वेगातले बदल कसे कळत न कळत झाले पाहिजेत.”

योनाथन् स्वतः फ्लेचरकडे खाली उतरला आणि म्हणाला, “चल, दोघे मिळून सराव करूं. आणि गिरकीत वर जातेवेळी लक्ष ठेव. सहजपणा राहिला पाहिजे.”

फ्लेचरबरोबरच्या कसरती चालूं असतांनाच या तीनेक महिन्यात आणखी सहाजण त्यांच्या त्या उंच कड्याकडे आले होते, सगळेच हद्दपार झालेले, अनाठायी कुतुहलापायी, किं उडण्याच्या निखालस आनंदासाठी उडणं, याची मजा काय असते, या आनंदाच्या नादात कसरती आत्मसात करण्यांत सगळेच रमून जायचे. पण आनंदाचं तत्त्वज्ञान वगैरेचा विशेष विचार किंवा फिकीर कुणी केलेली नव्हती.

योनाथन् आपल्या परीनं तात्त्विक चर्चा करत राहायचा. म्हणायचा, “आपण प्रत्येक जण त्या महान सीगलच्या कल्पनाविश्वातले सहभागी. आणि तें महान कल्पनाविश्व म्हणजे अनिर्बंध स्वातंत्र्य. कारण स्वातंत्र्य हा आपणा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. कुणीच कुणावर बंधनं लादणं, कल्पनांच्या, रूढींच्या मर्यादा आंखून देणं म्हणजे जन्मसिद्ध स्वातंत्र्याची पायमल्ली आहे. आपल्या स्वाभाविक गुणांना प्रकटित करण्यापासून रोखू पाहणाऱ्या साऱ्या कल्पना आणि रूढी निकरानं बाजूला केल्या पाहिजेत. अतिवेगाच्या भरारींचा सराव, एकाएकी गतिरोध साधण्याचा सराव, निरनिराळ्या करामतींचा सराव, हा सारा उपद्व्याप मुळांत, अवरोधक मर्यादांची बंधनं झुगारण्याची वृत्ति जोपासण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे.”

सराव संपवून परतल्यावर निवांत वेळी योनाथन्-चं हें असं प्रवचन सुरूं व्हायचं. पण तें सुरूं असतांनाच, दिवसभराच्या श्रमानं थकलेल्या सर्वांनाच डुलकी आलेली असायची. शिवाय असल्या तत्त्वचिंतनातही कांहीं सार्थकता आहे, प्रत्यक्ष उड्डाणाच्या भराऱ्या आणि करामतींप्रमाणेंच मनाच्या भरारीत उमटणारे विचार देखील निव्वळ स्वप्नं किंवा परिकल्पना नसून ते विचार प्रत्यक्ष अनुभवांत साकार होऊं शकतात, हें त्यांच्या, फ्लेचर लिंड सीगलच्याही आवाक्याबाहेरचं होतं.

पण सारखं सांगत राहिलं किं हळूहळू उमगत जातं, असा योनाथन्-चा विश्वास होता. तो बोलत राहायचा, म्हणायचा, “या पंखाच्या टोकापासून त्या पंखाच्या टोकापर्यंतचा पसारा म्हणजे सुद्धा, नजरेला दिसूं शकेल, अशा स्वरूपातला विचारांचा शेला आहे. किंबहुना विचारांचं दृश्य स्वरूप म्हणजे देह.”

ते नवीन सहा जण सामील झाल्यालाही महिनाभर होऊन गेला होता. योनाथन्-नं तेव्हां ठरवलं, “सराव आणि प्रशिक्षणासाठी हें असं दूरचं आकाशक्षेत्र कशाला ? सरळसरळ थव्याच्या अंवतीभंवतीच्या आकाशातच ही शाळा न्यायची.”

पण तिकडे थव्याकडे गेलो, तर आपलं काय स्वागत होणार, याची सर्वांना कल्पना होती. हद्दपार झालेल्या कुणीही थव्याकडे परतायचं नाहीं, हा तिथला कायदा होता. अन् गेल्या हजारों वर्षांत तो मोडण्याचं धाडस कुणीही केलेलं नव्हतं. आणि कशासाठी ? हेन्री केव्हिन म्हणाला, “जिथं आपलं जाणं स्वागतार्ह नाहीं, तिथं जायचंच कशाला ?”

“आपण निव्वळ करामती शिकलेलों नाहीत. अनिर्बंध स्वातंत्र्याचा अर्थ देखील आपल्याला उमगला आहे. कुठंही जायला आपण मुक्त आहोंत.” योनाथन्-नं निर्वाळा दिला. आणि स्वतःच पूर्वेकडे कूच केलं.

बाकीचे थोडे रेंगाळले. पण फ्लेचरच्या लक्षांत आलं किं अधिक उशीर केला, तर हद्दपार केलेला कुणी योनाथन् थव्याचा थव्याकडे न येण्याचा कायदा मोडूं पाहतोय, याबद्दल थव्याची काय प्रतिक्रिया होईल. त्याची धास्तीही त्याच्या मनाला चाटून गेली. पण सवंगड्याना विश्वास देत म्हणाला, “एकदा हद्दपार झाल्यावर थव्याच्या कायद्याची कसली बंधनं ? कुठंही जायला आपण मुक्त आहोंत, हा विश्वास महत्त्वाचा आहे. आणि समजा जुंपलीच, तर योनाथन्-ला एकट्याला थव्याच्या तोंडी देणं आपल्याला शोभत नाहीं. “चला लवकर.”

आठही मिळून थव्याच्या अंवतीभंवती ताशी १३५ मैलांच्या वेगानं पोंचले, त्यावेळी दुहेरी चौकटीचा आकार साधलेला होता. एका झोकांडीत, चौकटीच्या आकारात तिळमात्रही बदल न होऊं देतां खाली थव्याच्या खूप जवळ आले आणि सूं करत वर चढत निघाले. तशातच संपूर्ण समन्वयानं सर्वांनी छात्या वर वळवल्या, पुन्हां सरळ, पुन्हां उलट.

थव्यातल्या आठ हजार नजरा अवाक होऊन पाहात राहिल्या. सगळा गलबला कुणी हुकूम केल्याप्रमाणं निःशब्द झाला होता. आठाच्या दुहेरी चौकटीनं एक वलयाकार उभी फेरी पूर्ण करत, गतिरोधातही समन्वय साधत, अलगद आणि एकसाथ चौकट वाळूवर उतरवली.

मुद्दामच थोडा आवाज उंचावून योनाथन् म्हणाला, “दुहेरी चौकट साधतांना सुरवातीला थोडी गडबड होतेय.”

थव्यात पण थोडी पुटपुट सुरूं झाली, “हे तर आपल्याच थव्यातून तडीपार झालेले सीगल्स आहेत.” इतर जरा तरुण मंडळी म्हणत होती, “तें बरोबर. पण हें असं इतक्या वेगानं, चौकटीच्या आकाराचा तरीही समन्वय राखून, उलट सुलट वळायचं, उभी वलयं मारायची, इतकं सगळं इतक्यातच यांना कसं यायला लागलं ?” तऱ्हेतऱ्हेची चिंवचिंव होत होती. फ्लेचरला जी “जुंपेल” म्हणून धास्ती होती, ती त्या गोंधळातच विरून गेली.

त्या गोंधळामुळं श्रेष्ठींचा आदेश थव्यात सर्वांपर्यंत पोचेपर्यंत आणि उमजेपर्यंत बराच वेळ गेला. आदेश होता, “त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तडीपार केलेल्यांबरोबर जो कुणी बोलूं पाहील, तो देखील तडीपार होईल. त्यांचे थेर पाहणं हें देखील कायदा मोडणं आहे.”

आदेश उमजला, तशा सगळ्यांनी योनाथन्-च्या चमूकडे पाठी फिरवल्या. पण योनाथन्-नं तिकडं लक्ष दिलं नाहीं. त्यानं कसरती सुरूच ठेवल्या, इतकंच नव्हे तर, प्रत्येकजण एकेका कसरतीत प्रगती कशी करेल, यावर योनाथन्-नं आणखीनच भर द्यायला सुरवात केली.

“मार्टिन गल्, अतिमंद गतीनं तरंगायचं आता कितपत जमलंय, पाहूं बरं” छोटा मार्टिन पुढे आला. त्यानं गती इतकी मंद केलीन किं वारा जणूं पडलेला असतांनाही आपण किती सहजपणे तरंगू शकतोय, याचं त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं.

चार्ल्स रोलँड सीगल थेट दहा हजार फुटांवरून धूमकेतूप्रमाणे झेपावला. उद्या आपण आणखीही उंच जाऊं म्हणाला.

फ्लेचरला करामतींचं कौतुक होतं. त्यानं त्या सोळा गिरक्यांच्या करामतीत सफाईदारपणा तर आणलाच, त्यात आणखीही एकदोन हरकती गोंवल्यान.

वेळोवेळी योनाथन् एकेकाच्या जोडीनं भाग घेत होता, उणीवा दाखवून देत होता, खुब्या सांगत होता, प्रोत्साहन देत होता.

थव्याचा कायदा तसा कडक होता. तरी पण कितीक चोरट्या नजरा त्यांच्या इतक्या बाजूलाच चाललेला इतका बहारदार कार्यक्रम दुर्लक्षू शकत नव्हत्या.

दिवसभराच्या कसरती संपल्यावर योनाथन्-चं प्रवचन चालायचं. प्रवचनासाठीची जागा तशी चांगली होती. आजूबाजूला झाडीच्या काळोखाचा आडोसा होता. योनाथन्-च्या भोवती त्याच्या चमूचं वर्तुळ असायचं. आणि होताहोतां अंधाराच्या आडोशात, झुडपांच्या मागं, उत्सुक सीगल्सचं आणखी एक कडं तयार झालं होतं. उत्सुकता तर होती, पण कुणी पाहील, चुगली करेल, ही भीती होती.

पण “स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे” हा मर्मबिंदू ठेऊन रोज निरनिराळ्या उदाहरणांनी गुंफलेल्या प्रवचनांचा परिणाम होत होता. महिन्याभराच्या श्रवणसेवेनंतर धीर एकवटून टेरेन्स लॉवेल सीगलनं ती अंधाराच्या आडोशाची सीमा ओलांडलीच.

त्यानंतरच्याच रात्री कर्क मेनर्ड सीगल लंगडत, लुडकत, आपला डावा पंख रखडत येऊन योनाथन्-च्या पायां पडला. मृत्यू समीप आलेल्या रुग्णानं सद्गदित होऊन कांहीं बोलावं, तशा स्वरांत म्हणाला, “मला मदत करा, योनाथन्. मला पण भरारी घ्यायचीय.”

“मग अडखळ कसली ? चल जरा पंखांत हवा भरू दे. ये माझ्याबरोबर.”

“पण योनाथन्, माझा पंख … मी अपंग आहे. माझा हा डावा पंख उचलला जात नाही.”

“तें दिसतंय मला, मेनर्ड. तरीही तुला सुद्धां तुझ्यातला खरा मेनर्ड अनुभवण्याचा हक्क आहे, शक्य आहे. कुणीही तो हक्क रोखू शकत नाही. त्या महान सीगलच्या साम्राज्यात हाच कायदा आहे. तोच खरा नियम आहे.”

“म्हणजे मला सुद्धा उडतां येईल, योनाथन् ?”

“नक्की मेनर्ड, तूं देखील अनिर्बंध आहेस.”

त्या विश्वासाच्या जोरातच कर्क मेनर्ड सीगलनं बळेंच पंखांत हवा भरली. आणि काय आश्चर्य ? पाहतां पाहतां शंभर फुटांवर पोंचला ! त्या आश्चर्याच्या भरात त्यानं रात्रीच्या प्रहाराचा निवांतपणा चिरणारी साद घातली, “अरे पहा, मीही खरोखर उडूं शकतोय ! कर्क मेनर्ड सीगल देखील भरारी मारतोय. हुर्रे ! मी उडतोय, भरारी मारतोय !” त्याच्या या ओरडण्यानं सारा थवा खडबडून जागा झाला.

अजून झुंजूमुंजू व्हायचं होतं. पण थव्यापैकी हजारेक तरी पक्षी मेनर्डचं तें आश्चर्य पाहायला गोळा झाले. ते इतक्या स्वाभाविकपणे आडोशातून बाहेर आले होते, किं आपणाला कुणी पाहील आणि आपलं हें असं नियमबाह्य वर्तन बरं नव्हे, याचं कुणाला भानच राहिलं नाही.

कर्क मेनर्डला प्रथमच उडतांना ते पहात होते आणि योनाथन् त्याला मार्गदर्शन करीत होता, तेंही. कर्कला प्रोत्साहन देतांना देखील योनाथन् त्याच्या सरळसोट गोष्टीच बोलत होता. हेंच किं “स्वातंत्र्य, बंधमुक्तता, हा प्रत्येक जीवाचा स्वाभाविक धर्म आहे. स्वाभाविक प्रवृत्तींना अडसर घालणारी प्रत्येक बाब, जी कसल्या कर्मकांडानं, अंधश्रद्धेनं किंवा कुठल्या अस्वाभाविक नियमांनी जखडली असेल, ती प्रत्येक बाब, स्वतःच्या निष्ठेनं, निश्चयानं निकरानं झुगारून दिली पाहिजे.”

तशांत त्या प्रेक्षक जमावातून एक उत्स्फूर्त प्रश्न आला, “थव्याच्या कायद्याची बाब सुद्धा झुगारून द्यायची ?”

योनाथन्-नं ठासून उत्तर दिलं, “जो स्वाभाविक स्वातंत्र्याची दिशा दाखवतो, तोच खरा कायदा. त्याविरुद्ध असेल, असा कुठलाही कायदा अस्वाभाविक होय.”

“पण तूं जशा भराऱ्या मारूं शकतोस, तशा आम्हां सर्वांना कशा जमणार ? तूं तर कोणी सिद्धीप्राप्त अतिविशिष्ट सीगल आहेस. प्रत्येकाला तशा सिद्धी कशा साधणार ?” आणखी एक प्रश्न.

“फ्लेचरकडे पहा, हा लॉवेल, हा चार्ल्स रोलँड, हे सगळे देखील अतिविशिष्ट म्हणायचे कां ? हे सारे तर तुमच्यातूनच आले. हे जसे तुमच्यापेक्षा अतिविशिष्ट किंवा वेगळे नाहीत, तसाच मी देखील अतिविशिष्ट किंवा वेगळा नाहीं. फरक एवढाच आहे, निव्वळ फरक इतकाच आहे, किं या सर्वांना देखील आपल्या खऱ्या स्वभावधर्माची, आपल्या खऱ्या ताकदीची, सामर्थ्याची बरीचशी जाण येऊं लागली आहे. त्याची त्यांना ओढ आहे. आणि त्या अनिवार ओढीनिशी त्यांची स्वतःची धडपड देखील चालूं आहे.”

योनाथन्-नं केलेला आपल्या धडपडीचा हा अन्वयार्थ ऐकून त्याच्या चमूतील सीगल्सना सुद्धा एक निराळा दृष्टिकोन मिळाल्याचं जाणवलं.

हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम देखील दैनंदिन परिपाठ होऊं लागला. प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यात मुद्दाम म्हणून खोचकपणा करणारेही होते. अगदी प्रथम इकडे येतांना “जुंपेल कीं काय” अशी शंका आलेला फ्लेचर आपल्या परीनं सतर्क राहून सगळ्या रागरंगाचा अंदाज घेत असायचा.

योनाथन्-बरोबर मोकळं बोलायचा अवसर मिळताच त्यानं योनाथन्-ला कल्पना दिली. म्हणाला, “तिकडे थव्यात जे सूर उमटताहेत, त्यांत असंही म्हटलं जातंय किं एक तर तूं त्या महान सीगलचा सुपुत्र तरी आहेस, नाही तर तूं जमान्याच्या फार पुढे गेलेला कुणी आहेस.”

हुंकार भरत योनाथन् म्हणाला, “हीच तर खंत आहे किं तुम्हाला समजूं शकले नाहीत, तर दुनियावाले तुम्हाला दैवी तरी म्हणतील, नाही तर मायावी. तुला काय वाटतं फ्लेचर, खरंच कां आपण जमान्याच्या फार पुढे गेलों आहोंत ?”

थोड्या स्तब्धतेनंतर फ्लेचर म्हणाला, “आपण ज्या उड्डाणांतल्या करामती करतो, त्या साध्यच होत्या. जशा त्या आपल्याला साधल्या, तशा त्या कुणालाही साध्य आहेत. प्रश्न फक्त कुणाला त्याची ओढ वाटण्याचा आहे. त्यामुळं मुद्दा काळाच्या फार पुढं जाण्याचा नाहीये. तरी पण प्रचलित कल्पनांच्या पुढे आहोंत, असं म्हटलं, तर तें मान्य करावं लागेल.”

“तेंच तर” योनाथन् म्हणाला. “आणि प्रचलित कल्पनांच्या पुढे जाणं याला काळाच्या पुढे जाणं असं म्हणणं, हाच तर निष्कारण विपर्यास आहे ना ?”

असंच एकदा फ्लेचर नवीन विद्यार्थ्यांच्या गटाला अतिवेगवान भरारीचं प्रात्यक्षिक दाखवत होता. सात हजार फुटांवरून घेतलेल्या झोकांडीतून वरतीकडे वळत असतांनाच एक छोटा पक्षी त्याच्या वाटेत येतोय, हें त्याच्या लक्षांत आलं. तो पक्षीही घाबरून गेला होता आणि त्यानं “आई ग !” म्हणून किंकाळी ठोकली. क्षणार्धात फ्लेचरनं त्या पक्ष्याला सांवरलं खरं, पण स्वतःच बाजूच्या काळ्याकभिन्न कड्यावर जाऊन आदळला !

“पण हें काय ? आदळल्यानं ठिकऱ्या उडायला हव्या होत्या नं ? उलट कुठं कांही धक्का लागल्याचं देखील जाणवत नाहीये ? आणि हें आपण समजूं शकतोय, म्हणजे खरंच आपल्याला कांहीच झालेलं नाहीये ?”

तो काळाकभिन्न कडा म्हणजे कसलासा भला मोठा दरवाजा होता जणूं ! दुसऱ्याच कुठल्या विश्वांत नेणारा ? कसला कांही संभ्रम तर नव्हे ?”

हें असं स्वगत चालूं असतांनाच, ज्या दिवशी पहिल्या प्रथम योनाथन् लिव्हिंग्स्टन् सीगलनं आपल्याला साद घातली होती, तशीच साद त्याला जाणवली.

“त्याचं काय आहे फ्लेचर, फत्तराच्या पार धडक मारण्याचा प्रयोग आपल्या करामतींच्या अभ्यासक्रमांत अजून खूप नंतर यायचा भाग आहे. पण तूं जरा घाईच केलीस किं काय ?”

“योना s s थन् s s !”

“कुणी ज्याला त्या महान सीगलचा सुपुत्र म्हणताहेत, हो ना ?” योनाथन्-नं हंसत म्हटलं.

“आपण आहोंत कुठं योनाथन् ? माझ्या ठिकऱ्या उडायच्या होत्या ना ? पण मी मेलों नाही योनाथन् ! कांहीं झालं नाही मला !”

“अरे हो, हो, फ्लेचर ! तूं स्वतःच बोलतोयस ना माझ्याबरोबर ? मग तूं मेलेला नाहीसच. असं समज किं स्वतःच्या अस्तित्वाच्या एका नव्या जाणिवेचा तुला एक अचानक अनुभव तुला गंवसलाय. आतां तुझं तुलाच ठरवायचंय, किं या नव्या जाणिवेचा आणखी अनुभव घ्यायचा किं तुझ्या त्या विद्यार्थ्यांच्या गटात परत जायचं. अर्थात हि नवी जाणीव खूपच उच्च कोटीची आहे.”

“पण विद्यार्थ्यांच्या त्या नवीन गटाबरोबर मी नुकतीच कुठं सुरवात केली होती. मला त्यांच्यात परत जायला हवं ना ?”

“ठीक आहे फ्लेचर, इथं काय नि तिथं काय ? मी म्हणत असतो ना, किं आपली कुडी म्हणजे आपल्या विचारविश्वाचंच एक प्रकट रूप आहे, इतकंच. एरव्ही विचारविश्व ही खूप व्यापक आणि रास्त संकल्पना आहे. ती नेहमी स्पष्ट असली पाहिजे.”

फ्लेचरची कड्याशी झालेली धडक पाहून, कड्याच्या पायथ्याशी गोळा झालेल्या सीगल्सच्या मधोमध पडल्यापडल्या फ्लेचरनं मानेला हलकासा झटका दिला आणि आपले पंख पसरले. तसे त्याच्याभोवतीचे सगळेच पक्षी चक्रावल्यासारखे झाले. एकच गलका झाला, “अरे, हा तर जिवंत आहे ! किं ,,, मेलेला जागा झाला ?!”

त्यानंच, त्यानंच हा चमत्कार केलान्. नुसतं आपला पंख याच्या अंगावरून फिरवलान् आणि हा मेलेला जागा झाला !

महान् सीगलचा अवतार म्हटलं तर नाही म्हणतो. तर मग मायावी प्रकार करणारा कुणी चेटका आहे हा !”

“चेटका s !” सगळ्या जमावात एक चीड पसरली. सगळ्यांनी आपल्या तीक्ष्ण चोंची सरसावल्या आणि खुपसायच्या तयारीतच होते.

“आपण इथून सटकावं, हें बरं, नाही कां फ्लेचर ?” योनाथन्-नं एक संकेत दिला.

फ्लेचर होकार खुणावणारच होता., तेवढ्यात दोघे मिळून अर्धा-एक मैल दूर जाऊन पोंचल्याचं फ्लेचरच्या लक्षांत आलं. आणि जमावातल्यांच्या चोंची हवेतच टोचल्या गेल्या.

कांही झालंच नाही अशा अभिनिवेशात योनाथन्-चं चिंतन चालू होतं, “सर्वसाधारण सीगलला समजावून सांगायला सर्वात कठीण गोष्ट ही कां असावी किं प्रत्येकजण स्वभावतः स्वतंत्र आहे. आणि थोड्याशा नियमित सरावानं प्रत्येकजण हें स्वातंत्र्य अनुभवूं शकतो. मग कां ही गोष्ट कळायला नि वळायला कठीण असावी ?”

फ्लेचर मात्र अजून दिङ्मूढावस्थेत होता. साऱ्या चोंची सरसावल्या काय होत्या, सटकावं म्हणून योनाथन्-नं संकेतच काय तो दिला अन् दोघं खरोखरच सटकून अर्धा-एक मैल दूर पोंचलों आहोंत आणि तिथं चोंची हवेतच टोचे काय मारताहेत, काय आहे हा सगळा प्रकार ?!

फ्लेचरला विश्वासात घेणं जरूर होतं. योनाथन् म्हणाला, “सटकायला हवं होतं, हें तुला पण कबूल होतं ना ?”

“पण मी स्वतः कांहीच हालचाल केली नाही ? म्हणजे तूच मला इथं आणलंस ? ही काय किमया आहे ?”

“सराव, फ्लेचर, सराव, अभ्यास !”

सकाळ होईतोंवर ते सीगल आपला खुळेपणा विसरले होते, म्हणा, किंवा हवेत चोंची मारल्याबद्दल खजील होते, म्हणा. पण फ्लेचर विसरला नव्हता. म्हणाला, “योनाथन् उदात्त प्रेमाबद्दल बोलतांना मागं तूं म्हणाला होतास, प्रगल्भ ज्ञानानंतर प्रेम इतकं दृढ झालं पाहिजे, किं या थव्यात परतून त्यांच्या ज्ञानसाधनेत त्यांना मार्गदर्शन करण्याइतपत मनाचा मोकळेपणा असला पाहिजे.”

“हो, तर ?”

“मग, जे पक्षी टोचे मारायला सरसावले होते, त्यांच्याविषयी तुला अजूनही तितकंच प्रेम वाटतं ?”

“नाही फ्लेचर. त्यांच्या टोचे मारायला सरसावण्याच्या वृत्तीवर प्रेम करण्याचा हा प्रश्न नाहीये. द्वेष किंवा खुनशी वृत्तीवर प्रेम करायचं नाहीच आहे. प्रश्न आहे तो हा किं, त्यांच्या वर्तनावर चढलेलं दुष्प्रवृत्तीचं आवरण, आपल्या त्यांच्याकडील दृष्टीतून बाजूला सारून, त्यांच्यांत तरीही एक खरा सीगल दडलेला आहे, तो आपण पाहूं शकतो किं नाही, याचा. तो पाहूं शकण्याइतपत आपली दृष्टी समजदार झाली असेल, तर त्यांच्यांत दडलेला खरा सीगल त्यांचा त्यांना देखील समजूं शकेल, यासाठी आपण त्यांना मदत करूं शकतो कां, हा विचार महत्त्वाचा आहे. उदात्त प्रेमाची माझी संकल्पना अशी आहे. आणि अशी विचाराची बैठक जमली, किं दुष्प्रवृत्तींच्या अनुभवांनी सुद्धा मन स्वच्छ राहतं.

तसं तर एक तरणाबांड सीगल माझ्या स्मरणांत आहे, चिडलेला, नुकताच हद्दपार केला गेलेला, फ्लेचर लिंड सीगल. साऱ्या थव्याचाच वचपा कसा काढतां येईल, या विचारांच्या काहुरानं, तिथे त्या उंच कड्याच्या आकाशकक्षात स्वतःचाच एक द्वेषपूर्ण नरक बनवण्याच्या नादात होता त्यावेळी.

किती मोठा बदल झालाय आतां. चांगल्या भराऱ्या, तऱ्हेतऱ्हेच्या करामती, त्यांचा आनंद जमेल तितक्यांना वाटायची पूर्ण उमेद आहे आतां त्याच्यात !”

बोलतां बोलतां हें नवीन काय सुचवतोय योनाथन्, या विचारानं फ्लेचर थोडा चमकलाच. म्हणाला, “मी मार्गदर्शक ? मी शिक्षक ? सुचवायचंय काय योनाथन् ? खरा शिक्षक तर तूं आहेस. ती जबाबदारी माझ्यावर सोंपवायचं तर नाही ना सुचवतोयस ?”

“कां नाही फ्लेचर ? अजूनही कितीतरी ठिकाणी कितीतरी थवे आहेतच ना, ज्यांना इथल्या थव्यापेक्षा कुणा शिक्षकाची जास्त गरज आहे, कारण कुणी शिक्षक कधी तिकडे फिरकलाच नाहीं ? इथे फ्लेचर लिंड सीगल आहे, ज्याला स्वतःला ज्ञानसाधनेचा मार्ग आतां गंवसला आहे.”

“मी ? मला मार्ग गंवसला योनाथन् ? मी तर अजून साधा भाबडा सीगलच आहे. आणि तूं तर …. “

“... त्या महान सीगलचा सुपुत्र ? नाही फ्लेचर, आतां तुला माझी गरज नाहीं. किंबहुना असं समज, किं यापुढची ज्ञानसाधना तुझी तूच चालूं ठेवणं, हेंच तुझ्या हिताचं आहे. स्वतःचं खरं स्वरूप समजून घेण्याच्या मार्गावरील प्रगतीचा एकेक टप्पा इथून पुढं तुझा तूच पार केला पाहिजेस. बोट धरून वाट चालवण्याचं तंत्र कांही टप्प्यापर्यंतच ठीक असतं. आतां, तुझ्यातला तो अमर्याद, अनिर्बंध फ्लेचर लिंड सीगल तोच खरा शिक्षक. त्याला समजून घे. त्याच्याच मार्गदर्शनाचा विश्वास वाढला पाहिजे.”

बोलतां बोलतांच योनाथन्-च्या पक्षीरूपी देहात जणूं हवा भरत गेली. आकाराच्या रेषा पुसट होत गेल्या आणि कुडी पारदर्शी होत असतांनाच एक ध्वनि उमटला…

“माझ्याबद्दल कसल्या खुळसट कल्पना त्यांच्यात पसरूं देऊं नकोस, फ्लेचर. मला देव बनवूं देऊं नकोस. ठीक फ्लेचर ? मी एक सीगलच आहे, उडण्याची भरारीची हौस असलेला, म्हणूनच कदाचित … “

“योनाथन् s s !”

“नाहीं फ्लेचर ! आपण जें पाहतोय, असं वाटतंय, त्यानंही संभ्रमित होऊं नकोस. ते देखील कांही आकार आहेत. आकार म्हटलं किं रेषा, सीमारेषा, म्हणजे मर्यादा. नजरेला अशा संभ्रमाचा धोका असतोच. अंतर्मनानं पहायचं बघ.”

हवेतली पारदर्शी आंदोलनंही थांबली. योनाथन् अंतर्धान पावला होता.

या सगळ्यातून सांवरून फ्लेचरनं एक झेप घेतली आणि विद्यार्थ्यांच्या गटात दाखल झाला.

“हां तर मित्रानों !” फ्लेचरनं सुरवात केली. “सर्वप्रथम आणि कायम लक्षांत ठेवायची गोष्ट ही किं आपण प्रत्येक सीगल म्हणजे स्वातंत्र्याच्या एका अमर्याद कल्पनेचं रूप आहोंत. आणि एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंतचा आपल्या देहाचा पसारा म्हणजे विचारांचा जणूं एक शेला आहे… “

सगळे विद्यार्थी चक्रावूनच ऐकत होते. पण स्वतःच सांवरात फ्लेचर म्हणाला, “ठीक, ठीक. आपण क्षितिजसमांतर तरंगण्यापासून सुरवात करूं.”

असं म्हणत असतांनाच त्याच्या लक्षांत आलं किं त्याचा तो महान दोस्त दैवी वगैरे म्हणण्याइतका वेगळा नव्हता. त्याच्याच प्रवचनांतली वाक्यं आता शिक्षकाची भूमिका घेतल्याबरोबर अगदी सहजपणे आपल्या तोंडी देखील उमटताहेत.

“सगळे बंध तोडणारी ज्ञानसाधना, नाही कां योनाथन् ? ठीक तर, मलाही हवेंत अदृश्य होऊन, अंतर्धान पावून स्थलकालांच्या मर्यादा भेदायचं जमेल, योनाथन्, लवकरच. आणि असाच फिरत फिरत येईन आणि गांठीन तुला, असशील तिथं.”

विद्यार्थ्यांबरोबर बोलतां बोलतां कांही विचार अंतर्मनात उमटत होते. पुन्हां सावरून विद्यार्थ्यांकडे पाहिलं, तेव्हां त्या साऱ्यांबद्दल एक प्रेमाचा उमाळा त्याला जाणवला. उदात्त प्रेम … अमर्याद ज्ञानसाधना ! फ्लेचरच्या स्वयंशिक्षणानंही चांगलाच वेग साधला होता. …

कसं झालं हें लेखन …  

माझे स्नेही डॉ. रॉबर्ट यांनी रिचर्ड बाख् यांचं योनाथन् लिव्हिंगस्टन् सीगल् हें पुस्तक वाचायला दिलं.

रिचर्ड बाख् हे अमेरिकन हवाई दलात पायलट होते. त्यामुळं त्यांचं पुस्तक भरारीच्या संकल्पनेला अनुसरून असावं हें साहजिक आहे. पण तत्त्वचिंतनाची जी उंची त्यांनी साधली आहे, ती अफलातून आहे.

खरं तर पुस्तक वाचायला सुरवात केली तेव्हां महत्त्वाचे मुद्दे, चांगली वाक्यं यांची टिपणं करत वाचावं अशी तयारी करून वाचायला सुरवात केली. पण सुरवात केल्याकेल्या लगेचच वाटलं, कितीकिती आणि कायकाय टिपणवहीत टिपणार. टिपणांचा विचार सोडून दिला आणि टिपणवहीत थेट हे मराठी अडाप्टेशनच लिहीत गेलों. टिपणं ही स्वतःसाठीच असतात. त्यामुळं टिपणवहीत लिहून तयार झालेलं हें अडाप्टेशन मुळांत स्वतःसाठीचंच आहे. कुणाला आवडेल असं वाटल्यास तें शेअर करणार आहे. कॉपीराईटचं कांही उल्लंघन वगैरे करायचा हेतू नाहीये. ज्यांना पावेल, त्यांनी देखील काळजी घ्यावी, ही विनंति. पात्रांची नांवें बदलतां आली असती. पण टिपणवहीत हें लिहितांलिहितां पुस्तकसुद्धा लवकर वाचून परत द्यायचं होतं. असं हें लेखन झालं !
हें लेखन अनेकांच्या प्रेरणांनी घडलं. मुळांत रिचर्ड बाख् यांचं योनाथन् लिव्हिंगस्टन् सीगल् हें पुस्तकच अफलातून आहे. तें पुस्तक वाचायचा आग्रह केला, डॉ. रॉबर्ट यांनी. मी जें कांहीं लिहितो, तें शांतपणें ऐकणारा पहिला श्रोता असते माझी पत्नी. ती स्वभावतः मनमिळाऊ असल्याने, तिचं मैत्रवर्तुळ मोठं आहे. त्या तिच्या मैत्रवर्तुळांमधेही ह्याचं वाचन केलं. त्यांच्या कौतुकांचंही पाठबळ असतं. सगळ्यासगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
****************************