Friday, August 18, 2017

शेगांवस्थित श्रीगजाननमहाराजांच्या पोथीचा सारांश अभंगवृत्तात

|| ॐ श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीशेगांवस्थिताय श्रीगजाननमहाराजाय नमः ||

अभंगवृत्तात रचयिता - श्रीपाद लक्ष्मण अभ्यंकर  

Shri Gajanan Maharaj 1.jpg






अध्यायक्रमांक  येथील पदें      गजानन-विजयमध्ये ओव्या
                                 १ ………. २० ……………..१४६
                                २ ………. ४२ ……………..१४८
                                ३ ………. ३९ ……………..१५२
                                ४ ………. ५० ……………..१५५
                                ५ ………. ४८ ……………..१५४
                                ६ ………. ३१ ……………..१४५
                                ७ ………. ३० ……………..१५१
                                ८ ………. ४८ ……………..१५५
                                ९ ………. ५० ……………..१५४
                              १० ………. ५२ ……………..१७१
                              ११ ………. ५७ ……………..१९३
                              १२ ………. ४६ ……………..१५१
                              १३ ………. ४९ ……………..१७९
                              १४ ………. ४३ ……………..१५२
                              १५ ………. २८ ……………..१४१
                              १६ ………. ३२ ……………..१५०
                              १७ ………. ४७ ……………..१५९
                              १८ ………. ४४ ……………..२०२
                              १९ ………. ६८ ……………..३४९
                              २० ………. ५१ ……………..२०९
                              २१ ………. २७ ……………..२५३
                          एकूण ………. ९०७ …………….३६६९

 
|| ॐ श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीशेगांवस्थिताय श्रीगजाननमहाराजाय नमः ||

मंगलाचरण तथा प्रस्तावना

नमन गणेशा । नमो गजानना । अवतार नाना । भक्तांसाठी ॥१॥
श्रीक्षेत्र शेगांवी । अज्ञेय प्रकट । जनें संबोधीलें । गजानन ॥२॥
दासगणूजीनी । विजय ग्रंथात । चरित्रमहात्म्य । रचियेले ॥३॥
कितीक भाविक । पोथी-पारायण । आपुल्या नेमाने । करतात ॥४॥
नऊशे पदांत । इथे सामावले । सारे एकवीस । अध्याय की ॥५॥
ऐशा रचियेल्या । सारांशाने पहा । पारायण होते । दीड तासी ॥६॥
अभंगवृत्तात । सद्गुरुकृपेने । रचिले श्रीपाद । अभ्यंकरे ॥७॥
अभंग वृत्त हें | सरल रसाळ | भक्तिभवाचीही हीच रीत ॥८॥
भाविकांनी घ्यावा । आनंद भक्तीचा । मंगल लाभावे । सकळांना ॥९॥

अध्याय १
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ पहिल्या । अध्यायास ॥१॥

शके अठराशे । माघमासी तिथी । वद्यसप्तमीची । होती पहा ॥२॥
शेगांवी मठांत । भोजने घालती । देवीदासराव । पातुर्कर ॥३॥
उष्ट्या पत्रावळी । दारी पडलेल्या । चाटूनी पुसतो । अवलिया ॥४॥
पाहती तें चित्र । बंकटलाल नि । मित्र दामोदर । कुळकर्णी ॥५॥

प्रेरणा जाहली । बंकटलालास । हा तरी महात्मा । आहे कुणी ।।६।।
तजवीज केली । बंकटलालाने । सुग्रास भोजन । खाववीले ॥७॥

अज्ञाताजवळी । होता कमंडलू । अग्रवाल करी । विनवणी ॥८॥
पाणी मी आणीतो । जरा धीर व्हावा । उत्तरले काय । महाराज ॥९॥

भुवनी भरले । परब्रम्ह तरी । भेद न कांहीच । मजलागी ॥१०॥

अन्न पोटी गेले । पाणी तेंही प्यावे । ऐसी रीत जनी । आहे खरी ॥११॥
तुम्हासही जरी । येणे वाटे तुष्टी । आणावे उदक । बोललेले ॥१२॥

परत येईतो । आडाचे ओहोळी । गढूळच पाणी । कां हो प्याले ॥१३॥

ब्रम्हाने व्यापीली । सारीच भुवने । गढूळ निर्मळ । भेद कैसा ॥१४॥
पाणी तरी ब्रम्ह । मलीनता ब्रम्ह । पिणाराही ब्रम्ह । ब्रम्ह सारे ॥१५॥

ईश्वराची लीला । आहे अनिर्वाच्य । श्रुतीही म्हणती । नेति नेति ॥१६॥
सत्य टाकूनीया । व्यवहार मात्र । भरला तुमचे । मनात ना ॥१७॥
जरा कांही आणा । मनात विचार । प्रारंभ जगाचा । कोठून गा ॥१८॥

पाया पडावया । दोघेही वांकले । परि क्षणी होते । दूर गेले ॥१९॥

नमो गजानना । अध्याय पहिला । मनी दृढ होवो । प्रार्थना गा ॥२०॥

अध्याय २
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ दुसऱ्या । अध्यायास ॥१॥

कोठे आढळेना । विरह यातना । उत्कंठा दर्शना । बंकटाला ॥२॥
शेजारी रामजी । पंत देशमुख । त्यांना सांगीतली । मनःस्थिती ॥३॥
पूर्व सुकृताने । दर्शन जाहले । पुन्हाही घडेल । धीर धरी ॥४॥

मंदीरी कीर्तन । गोविन्दबुवांचे । टाकळीकरांचे । रंगलेले ॥५॥
बंकटाचा मित्र । पीतांबर शिंपी । सवें आला होता । कीर्तनाला ॥६॥

देवळाचे मागे । पाराकडे गेली । अचानक दृष्टी । बंकटाची ॥७॥
पाही तो बैसले । महाराज तेथे । गेला लगोलग । त्यांचेकडे ॥८॥
स्वामी कांही खाण्या । आणावें कां आजि । तुजला वाटते । तरी आण ॥९॥
माळीणीकडून । भाकर पिठले । आणूनीया दिले । आनंदाने ॥१०॥

पीतांबर गेला । तुंबा घेऊनीया । पाणी आणावया । ओहोळासी ॥११॥
तुंब्यामध्ये पाणी । भरते निर्मळ । जरी ओहोळाचे । गढूळचि ॥१२॥

बंकटलालासी । स्वामीनी म्हटले । भाकरीचे श्रेय । माळीणीचे ॥१३॥
तुझी दे सुपारी । स्वामीनी म्हणता । नाणेही बंकट । देऊं गेला ॥१४॥
नाणे व्यवहारी । मज नको कांही । तुझ्या भक्तीलागी । भेटलो मी ॥१५॥
भाव तव मनी । म्हणूनी भेटलो । लगबगे जावे । कीर्तनास ॥१६॥

भागवतातील । हंसगीताख्यान । पहिला चरण । बुवांमुखें ॥१७॥
दुसरा चरण । कोणी बा म्हटला । बुवाना जाहले । आश्चर्यचि ॥१८॥
बुवा सांगताती । ऐशा अधिकारी । व्यक्तीस मंडपी । बोलवा हो ॥१९॥
स्वामी परि नाही । जागचे हालत । बुवाही लागले । चरणासी ॥२०॥

सर्वव्यापी जरी । ईश्वर म्हणता । आंत कीं बाहेर । बिघडे कां ॥२१॥
वाणी नि करणी । ठेवा एकसार । पोटार्थी कीर्तन ॥ करूं नये ॥२२॥

कोठे मी बैसलो । नको विवंचना । आपुली ठेवावी । समदृष्टी ॥२३॥

बुवानी श्रोत्याना । जागवीले तेव्हां । शेगावी हें रत्न । अनमोल ॥२४॥

बंकटलालाने । घरासी जाऊन । पित्यासी आग्रह । धरीयेला ॥२५॥
भवानीरामही । करीती संमती । व्यर्थ परि गेले । चार दिन ॥२६॥
सूर्यास्ताचे वेळी । भाग्य उजळले । चौकात पावले । महाराज ॥२७॥
घरी नेऊनीया । सेवा नि भक्तीचा । योग घडवीला । सर्वानाच ॥२८॥

दुसरे दिवशी । होता सोमवार । सोहळाच झाला । शिवस्नाना ॥२९॥

काकांच्या मुलाच्या । मनी तेव्हां आले । प्रदोषभोजना । आमंत्रिले ॥३०॥
दुपारीच अन्न ।  खूप झाले तरी । इच्छाराम वाढी । आग्रहाने ॥३१॥
स्वामींचे स्वगत । गणप्या खादाड । समोरील अन्न । टाकूं नये ॥३२॥

परि जेव्हा झाला । खूपच आग्रह । वमन जाहले । भडभडा ॥३३॥

धर्माचाही पहा । नको अतिरेक । प्रादुर्भाव होतो । अधर्माचा ॥३४॥

लोकांसी जाहला । तेणे पश्चात्ताप । जागा साफ केली । पुनःपुन्हा ॥३५॥
स्वामीना आसनी । बसवूनी मग । सोहळा जाहला । दर्शनाचा ॥३६॥
दिंड्या दोन आल्या । भजन करीत । गजरही चाले । विठ्ठलाचा ॥३७॥
महाराजांची तो । वेगळीच धुन । गण गण् गणात । बोते ऐसी ॥३८॥
लोकाना वाटले । ॐ गं गणपतये । मंत्र तो प्रसिद्ध । म्हणतात ॥३९॥
तेव्हापासूनीया । गजानन नाम । लोकानी ठेवीले । स्वामीजींचे ॥४०॥
निरिच्छ आणीक । मुक्त साधू जरि । बंकटाचा स्वामी । भक्ताधीन ॥४१॥
नमो गजानना । अध्याय दुसरा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४२॥

अध्याय ३
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ तिसऱ्या । अध्यायास ॥१॥

आर्त लोक येती । दर्शनास रोज । एके दिनी आला । परदेशी ॥२॥
मृगाजिनधारी । कासेस लंगोटी । डोक्यास फडके । ऐसा कोणी ॥३॥
जवळील लोकां । स्वामीनी म्हटलें । काशीहूनी आला । कोण पहा ॥४॥
झोळीमध्ये बुवा । लपवीतो बुट्टी । काढ ती बाहेरी । झडकरी ॥५॥
गोसाव्याने दिली । चिलीम भरून । त्यागावी म्हणून । प्रिय वस्तू ॥६॥
गोसाव्याचे झाले । नवस फेडणे । गांजाची पडली । प्रथा परि ॥७॥

अंजनीमातेच्या । इच्छेपोटी शंभू । वानररूपे ना । वावरला ॥८॥
विरागी योग्यास । व्यसन कां होते । ममत्वे ना लिंपे । एक वस्तू ॥९॥
कधी वेदोच्चार । कधी मौनव्रत । "गण गण् गणात । बोते" मग्न ॥१०॥
कधी पिशापरी । संचरण कधी । जागीच मुकाट । बसलेले ॥११॥

नामे जानराव । देशमुख होते । व्याधिग्रस्त तेणे । त्रस्त अति ॥१२॥
वैद्यांचे आणीक । हकीमांचे सारे । उपाय जाहले । अगतिक ॥१३॥
आप्तासी वैद्यानी । म्हटले वाटते । कांबळ्यावरती । घेण्या वेळ ॥१४॥
कोणी इतुक्यात । केलीसे सूचना । स्वामींचे चरण । धरावे ना ॥१५॥
शरण जाण्याने । संकट टळेल । देशमुखप्राण । वांचतील ॥१६॥
एक आप्त आले । भवानीरामांकडे । तीर्थालागी हेतू । निवेदिला ॥१७॥
आणलेल्या पात्री । पाण्यात पायाचे । अंगुष्ठ लावीले । तीर्थ होण्या ॥१८॥
स्वामीनीही दिली । संमती मानेने । नेऊनी प्राशीले । जानरावा ॥१९॥
थांबली घशाची । घर्घर लगेच । व्याधीस उतार । होत गेला ॥२०॥
एकाच सप्ताही । आरोग्य जाहले । सर्वश्रुत झाला । चमत्कार ॥२१॥
कृतज्ञ होऊनी । जानरावे मग । भंडा-याचा घाट । घातला की ॥२२॥

महाराजा तेव्हा । मनी काय आले । लोक-उपद्रव । वाढेल ना ॥२३॥

जनसमुदायी । ढोंगी भक्त एक । स्वामींचा लाडका । म्हणवीता ॥२४॥
स्वामींसी प्रसाद । म्हणूनी मिठाई । मागे लोकांकडे । त्रास फार ॥२५॥
स्वामींच्या सेवेचा । मक्ता जणूं ह्याचा । मिरवे लोकांत । ऐशापरी ॥२६॥
जातीचा तो माळी । नांवाचा विठोबा । स्वामींशी सलगी । दावी लोकां ॥२७॥
एके दिनी काय । घडली हो गोष्ट । परगांवीचे जे । भक्त होते ॥२८॥
त्याना आतुरता । परतण्या होती । स्वामी परि तेव्हां । निद्रिस्त कीं ॥२९॥
विठोबासी लोक । करीती विनंति । दर्शनाची सोय । कांही काढा ॥३०॥
स्वामींचे खांद्यास । लावूनीया हात । उठवाया धार्ष्ट्य । केले त्याने ॥३१॥
दर्शन घेऊनी । जन जैसे गेले । विठोबावरती । कडाडले ॥३२॥
विसरलासी कां । आपुली पायरी । उपद्रव मज । करीसी तुं ॥३३॥
तुवां भलताच । व्यापार कां ऐसा । माझे दर्शनाचा । चालवीला ॥३४॥
काठीचे प्रहार । खाऊनी विठोबा । पळाला करीत । हायहाय ॥३५॥

दैवे लाभलेली । संतांची संगती । हीनशा स्वार्थाने । गमावली ॥३६॥
संत कनवाळू । उदार प्रेमळ । दुष्टास देतील । दंड परि ॥३७॥
संतांचे सन्निध । महंती करणें । सावधपणाचे । काम जाणा ॥३८॥
नमो गजानना । अध्याय तिसरा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३९॥

अध्याय ४
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ चवथ्या । अध्यायास ॥१॥

अक्षय्य तृतीया । दिवशी व-हाडी । पितृश्राद्ध नेमे । करतात ॥२॥
सकाळी सकाळी । स्वामीनी म्हटले । मुलाना चिलीम । भरूनी द्या ॥३॥
मुलानी उत्साहे । भरली चिलीम । शिलगाया हवा । विस्तव ना ॥४॥
चूली पेटवाया । होता अवकाश । विस्तव कोठून । मिळेल गा ॥५॥
बंकटलालाने । सोनाराकडून । विस्तव आणण्या । धाडीयेले ॥६॥
मुहूर्ताचे दिनी । कोणीही मागता । विस्तव देणेचे । होणे नाही ॥७॥
मुले विनवीती । कोणतीही वस्तू । साधूसी नकारूं । नये जाण ॥८॥
जालंधरनाथांचा । देऊनी हवाला । पुनश्च नकारे । जानकीराम ॥९॥
म्हणे खरा साधू । निर्माण करीतो । कोणतीही वस्तू । योगबळे ॥१०॥
तुम्ही सारी पोरे । बंकटलालही । वेड्याचे नादात । गुंतले कीं ॥११॥
हिरमुसलेली । पोरे परतली । स्वामी हांक देती । बंकटाला ॥१२॥
नुसतीच काडी । धरी चिलीमीस । कोरडा झुरका । स्वामी घेती ॥१३॥
जणूं समर्थानी । अग्निदेवा आज्ञा । केली प्रकटण्या । झुरक्याने ॥१४॥
निर्ज्योत काडीने । पेटली चिलीम । टाळ्या वाजवीती । पोरे सारी ॥१५॥

सोनाराचे घरी । पंगत बैसली । मानाचा पदार्थ । चिंचवण ॥१६॥
परि चिंचवणी । कीड पडलेली । पाहूनी पंगत । बिघडली ॥१७॥
जानकीरामाला । झाली उपरती । साधूच्या निंदेने । ऐसे झाले ॥१८॥
बंकटलालासी । केली विनवणी । साधूची मागण्या । माफी आलो ॥१९॥
बंकटलालाची । वेगळीच शंका । चिंचच पहावी । तपासून ॥२०॥
चिंच तरी होती । सारी साफ स्वच्छ । कीड काय टिके । शिजताना ॥२१॥
जानकीरामाने । स्वामींचे चरणी । क्षमा मागीतली । काकुळती ॥२२॥
स्वामीनी म्हटले । चिंचवण तुझे । पाही निरखून । चांगलेच ॥२३॥
वृत्त पसरले । सा-या गांवामाजी । महती दानाची । साध्या सुद्धा ॥२४॥

चंदू मकीनास । दिला अनुभव । आणीक आगळा । ज्येष्ठ मासी ॥२५॥
लोकानी आणीले । आंबे जरी खूप । स्वामींचा आग्रह । चंदूलागी ॥२६॥
अजून शिल्लक । आहेत पहावे । तुझ्या घरी दोन । कानवले ॥२७॥
चंदूच्या पत्नीस । वाटले आश्चर्य । खापराच्या तळी । दोन बाकी ॥२८॥
कैसेनी जाहले । अन्नब्रम्हालागी । एक मासावरी । दुर्लक्ष गा ॥२९॥

चिंचोली गांवीचा । म्हातारा माधव । कुळकर्णी आला । दीनवाणा ॥३०॥
तारुण्यात केला । उधळेपणा ना । आता न उरला । वाली कोणी ॥३१॥
उपाशी राहोनी । मुखे नाम घेई । स्वामी बोललेसे । परखड ॥३२॥
कर्म न भोगीता । हट्ट करूनी कां । ऐसा मोक्ष येतो । आपसुक ॥३३॥
स्वामीनी घेतले । जामदग्न्यरूप । बोबडी वळली । माधवाची ॥३४॥
स्वामीनी म्हटले । तुवां केली पापें । काळ कीं भक्षील । याचपरी ॥३५॥
सम्पूर्ण शरण । माधव विनवी । नका मज धाडूं । नरकाला ॥३६॥
उद्धार करावा । अनंत सामर्थ्य । आहे आपणाचे । कृपा करा ॥३७॥
खोदखोदूनीया । स्वामीनी पुसले । माग काय हवे । देईन गा ॥३८॥
माधव म्हणतो । आणखी जीवित । आता नको कांही । द्यावी मुक्ति ॥३९॥
पाहूनी तयाचे । मनीचा निर्धार । तथास्तु म्हटला । आशिर्वाद ॥४०॥
म्हणती तुज ना । आता पुनर्जन्म । वैकुंठगमन । करी आता ॥४१॥

असेंच एकदा । स्वामीनी म्हटलें । वेदपठण तें । व्हावें वाटे ॥४२॥
शिष्यांची तो चिंता । योग्य घनपाठी । नसती ब्राम्हण । गावांत कीं ॥४३॥
स्वामीनी म्हटले । उद्या नारायण । पाठवील विप्र । सज्ज व्हावे ॥४४॥
दुसरे दिवशी । दोन प्रहरासी । आले खरोखरी । विप्र पहा ॥४५॥
स्वामींच्या इशारें । शास्त्रशुद्ध मंत्रे । वसंतपूजन । सजलें कीं ॥४६॥
लोकांनी दक्षिणा । होती आज्ञेपरी । शंभर रुपये । जमवीली ॥४७॥
अभ्यागत विप्र । जाहले संतुष्ट । आनंदीआनंद । सर्व लोकां ॥४८॥
नेम जाहलासे । वसंतपंचमी । साजरी करावी । वेदमंत्रें ॥४९॥

नमो गजानना । चतुर्थ अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५०॥

अध्याय ५
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ पाचव्या । अध्यायास ॥१॥ 

जनसंपर्काने । उद्विग्न होऊन । निघूनीया जाती । रानीवनी ॥२॥
असेच एकदा । गेले पिंपळगांवी । ध्यान लावीयेले । शिवालयी ॥३॥

गुराखी पोराना । झालें कुतूहल । समोर बैसोनी । न्याहाळती ॥४॥
तर्क सुरूं झाले । जिवंत कीं मृत । भूत कीं महात्मा । कैसी स्थिति ॥५॥
कोण्या भाबड्याने । हार चढवीला । रानटी फुलांचा । फुलें डोई ॥६॥
कांदाभाकरीचा । ठेऊनी नैवेद्य । भजन बेसूर । आळवीले ॥७॥

विदेही आत्म्याच्या । शरीरास नोहे । कांही संवेदना । कसलीही ॥८॥

साय़ंकाळ होतां । घरी गेल्यावर । वार्ता निवेदिली । थोरांलागी ॥९॥
भल्या पहाटेस । मंडळी पाहती । "जैसे थे"च होते । सारे कांही ॥१०॥
पालखी आणोनी । स्वामी बैसवीला । वाजतगाजत । गांवी आले ॥११॥
मारुती मंदीरी । सूर्यास्तापर्यन्त । किती काय केले । उपचार ॥१२॥
कुणास प्रेरणा । करूं उपोषण । नेत्र उघडले । स्वेच्छेनेच ॥१३॥
स्वामींची जागृती । पाहूनी लोकांत । स्पर्धा उसळली । पूजनास ॥१४॥

बाजारहाटासी । शेगांवी जे गेले । कौतुक बोलले । येथील ते ॥१५॥
शेगांवाप्रमाणें । पिंपळगांवीही । लाधलासे भाग्यें । एक यती ॥१६॥

बंकटलालासी । वृत्त तें कळतां । आला लगबग । सपत्निक ॥१७॥
नाना प्रकारानी । केली आळवणी । आत्महत्येचाही । धाक दिला ॥१८॥
पिंपळगांवीच्या । जना आश्वासन । बंकटलालाने । आणि दिले ॥१९॥
विरही न व्हावे । कधीही यावें की । आपुल्याच घरी । निःसंकोच ॥२०॥

वाटेत थट्टेने । बंकटलालासी । स्वामी सांगताती । मर्म कांही ॥२१॥
तुवां निजगृही । लक्ष्मी जेर केली । पाहूनी वाटते । भय मज ॥२२॥
मीही बंदिवान । होईन वाटले । संधी साधूनीया । निसटलो ॥२३॥

बंकटलालही । हजरजबाबी । तत्पर उत्तर । बोललासे ॥२४॥
लक्ष्मीस ना तमा । कुलुपाची कांही । आपुलेच पायी । स्थिरावली ॥२५॥
गप्पागोष्टीसंगे । पोचले शेगांवी । मुक्काम जाहला । कांही दिस ॥२६॥

निघाले पुनश्च । कोणा न कळत । आडगांवा जाण्या । व-हाडात ॥२७॥
कडक उन्हाळा । भाजतो शरीर । घशास कोरड । घामेघूम ॥२८॥
अकोल्याशेजारी । शेतात भास्कर । नकार तो देई । पाण्यासही ॥२९॥
पाटलाने केली । निंदाही आणिक । तूं तो न दुबळा । भिक्षा कां रे ॥३०॥
दुर्लक्षूनी बोल । विहीर दिसता । पाय वळवीले । तेथे जाण्या ॥३१॥
भास्कराची हांक । विहीर ती शुष्क । पाणी नाही कोठे । कोसभर ॥३२॥
स्वामी उत्तरले । दशा ही तुमची । पाहूनी प्रार्थना । मनी येते ॥३३॥
कूप जलयुक्त । करण्या देवास । करून पाहीन । आळवणी ॥३४॥
स्वामींचे ते बोल । ऐकून पाटला । वाटले कौतुक । भिका-याचे ॥३५॥
ध्यान लावूनीया । स्वामीनी आरंभ । केला आळवणी । करण्यास ॥३६॥
दाखले मांडले । पुराणांतरीचे । गोवर्धन आणि । प्रल्हादाचे ॥३७॥
प्रसन्न होई गा । आपा नारायणा । पत्थरी पाझर । फुटो आता ॥३८॥
चालली प्रार्थना । तोंवर कूपात । जळ ऐसे आले । ओसंडले ॥३९॥
तेव्हां शांत होत । निःशब्द होवोन । स्वामीनी नयन । उघडले ॥४०॥
घेऊनी ओंजळी । तृषा शांत केली । भास्कर पाहतो । अचंभित ॥४१॥
चरण धरूनी । क्षमापन मागे । निंदा केली त्याची । लाज मनी ॥४२॥
जैसीही स्फुरली । उपरती स्तुति । बोलत राहीला । चरणासी ॥४३॥
नको हा संसार । म्हणतां स्वामीनी । म्हटले विचार । पुन्हा कर ॥४४॥
संसार त्यागूनी । राहणे ना सोपे । कुंपणापल्याड । रान मोही ॥४५॥
ओसाड प्रदेशी । कूप ओसंडला । वार्ता पसरली । वा-यासंगे ॥४६॥
तृषा शमवीली । कितीक लोकांची । चमत्कारें कृपा । सर्व जनां ॥४७॥

नमो गजानना । पाचवा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४८॥

अध्याय ६
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सहाव्या । अध्यायास ॥१॥

बंकटलालाच्या । मित्रानी एकदा । कणसे पार्टीचा । बेत केला ॥२॥
बंकटलालाचे । मळ्यावर सारी । तयारी जाहली । व्यवस्थित ॥३॥
भक्ताना वाटले । स्वामीही सांगाती । आल्यास अलभ्य । लाभ खरा ॥४॥
आगट्या पेटता । धूर जो उठला । भिडला कोठल्या । मोहोळाला ॥५॥
माशा घोंघावत । येतां पळापळ । कणसें टाकूनी । गेली सारी ॥६॥
स्वामी ते राहीले । झाडाचे खालीच । पाहती मजेने । पळापळ ॥७॥

बंकटलालाला । झाली हळहळ । फुकटचा त्रास । स्वामीना कीं ॥८॥
एकाएकी माशा । दिसेनाशा झाल्या । स्वामींच्या आज्ञेने । गेल्या काय ॥९॥

सा-या अंगावर । पाहूनीया गांधी । बंकट विषण्ण । अति झाला ॥१०॥
स्वामी ते आनंदी । म्हणती मी ब्रम्ह । माशा त्याही ब्रम्ह । दुःख कैसे ॥११॥

डंख बोचलेले । काढाया सोनारा । बोलूनी आणले । बंकटाने ॥१२॥
योगयुक्तीने कां । देह फुलवीला । नांग्या काढण्यास । सोपे झाले ॥१३॥

नंतर लोकांनी । कणसें भाजूनी । सहल आनंदें । आटोपली ॥१४॥

असेच एकदा । स्वामी गेले वनी । अकोटाजवळी । मित्रभेटी ॥१५॥
नृसिंहस्वामींचे । भेटीने जाहला । वार्तालापें मोद । परस्परां ॥१६॥

कुणकुण काय । गांवात लागली । वनाकडे रीघ । पहाटेच ॥१७॥
परि स्वामी गेले । निघून तेथून । दर्यापुरापाशी । शिवर्गांवी ॥१८॥

येई तेथे एक । चंद्रभागेतीरी । व्रजभूषणसा । सूर्यभक्त ॥१९॥
नित्यनेमे अर्घ्य । देण्यास येतसे । प्रभाती पंडित । नदीकांठी ॥२०॥
आजही येऊन । समोर पाहतां । वाळवंटी तेज । अलौकिक ॥२१॥
रविराज स्वतः । आपलेकरीता । आले ऐसे झाले । पंडिताना ॥२२॥
स्वामींचेच पायी । अर्घ्यजल दिले । नमस्कार बारा । वाहीयेले ॥२३॥
आशीष देऊनी । प्रेमाने तयास । सशिष्य शेगांवी । परतले ॥२४॥

शिवगांवाचेच । शेगांव हें नांव । शिवाचे स्वरूप । हनुमंत ॥२५॥

मारुती मंदीरी । श्रावणमासात । उत्सवाची रीत । दरवर्षी ॥२६॥
बंकटलालासी । स्वामीनी म्हटलें । मंदीरी राहीन । इतःपर ॥२७॥
यतीस ना योग्य । घरांत राहणें । मंदीर तें योग्य । भ्रमण वा ॥२८॥
प्रसंगविशेषी । बोलावशील तूं । येईन ती चिंता । नको धरूं ॥२९॥

भास्कर पाटील । मारुती मंदीरी । येऊन राहीला । सेवेकरी ॥३०॥

नमो गजानना । सहावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३१॥

अध्याय ७
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सातव्या । अध्यायास ॥१॥  

पाटलाची पोरे । उद्दाम उर्मट । मुक्काम हलवा । धाक देती ॥२॥
भास्कर पाटील । जाहले अस्वस्थ । स्वामीनीच त्यांना । समजावीले ॥३॥
पोरकटपणा । केवळ पोरांचा । थोरांचे कर्तव्य । क्षमापन ॥४॥

पोरांचा म्होरक्या । हरी पाटील तो । म्हणे चल ऊठ । करूं कुस्ती ॥५॥
स्वामीही लगेच । करूनीया मान्य । गेले तयासंगे । तालमीस ॥६॥
हौद्याचे जवळी । बैठक मारूनी । हरीस म्हटले । उठव की ॥७॥
हालता हालेना । देह तसूभर । हरी तो जाहला । घामाघूम ॥८॥
जडत्व सिद्धीचा । प्रत्यय पाहून । स्वामींची महत्ता । उमगला ॥९॥
शरणागत त्या । हरी पाटलाला । स्वामीनी दिधला । उपदेश ॥१०॥
तरुण जमवा । वाढवा तयांची । शरीरसंपदा । योग्यकामी ॥११॥
बळ मेळवोनी । गांवाचे रक्षण । करीतां समाज । मानेल कीं ॥१२॥

हरीस पटला । लोकां सांगूं गेला । तरी लोक ढोंग । म्हणताती ॥१३॥
आपुल्या प्रकारें । आम्ही ठाव घेऊं । मनी ठरवीती । दुष्ट बेत ॥१४॥
इक्षुदंड हाती । घेऊनी पातले । स्वामीना घेरूनी । बोललेनी ॥१५॥
कसोटी कराया । ऊसानी मारतां । पाहूं वळ कैसे । उठतील ॥१६॥
फुकाचे ना बोल । खरोखरी मार । देण्या सुरवात । त्यानी केली ॥१७॥
आधी होता जोर । सपासप मार । जणूं तालबद्ध । खूप झाला ॥१८॥
ऊंसही तुटले । हातही थकले । वळ ना उठला । एक अंगी ॥१९॥
उलटे स्वामीनी । पोराना म्हटलें । श्रम खूप झाले । रस पिऊं ॥२०॥
केवळ हातानी । ऊंस पिळूनीया । खरोखरी रस । पाजीयेला ॥२१॥
खजील पोरानी । पाया पडूनीया । क्षमा मागीतली । कळवळे ॥२२॥

खंडू पाटलाला । वुत्तांत कळला । तरीही तो बोले । गण्या गजा ॥२३॥
म्हातारा कुकाजी । खंडूस सुचवी । मूलबाळ माग । साधूकडे ॥२४॥
स्वामींचे चरणी । लवून खंडोबा । संततीची कृपा । करा मज ॥२५॥
स्वामीनी म्हटले । देवाघरी उणे । नाही एक शर्त । मात्र आहे ॥२६॥
मुलाचे त्या नांव । ठेवावे भिकाजी । आम्रसभोजन । द्यावे द्विजा ॥२७॥
एकाच वर्षाने । पुत्रलाभ झाला । अन्नदान केले । जैसी आज्ञा ॥२८॥
संतति संपत्ती । पाटला पावली । पाहून मत्सर । देशमुखा ॥२९॥ 

नमो गजानना । सातवा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३०॥

अध्याय ८
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ आठव्या । अध्यायास ॥१॥ 

खंडू हांक देई । म-या महारास । टप्पा भरायला । पाठवाया ॥२॥
तुमचे मी काम । नाही करणार । देशमुखांचाच । सेवक मी ॥३॥
फालतु सेवक । काम नाकारतो । भाषाही तयाची । कायद्याची ॥४॥
देशमुखपद । पाटला वरिष्ठ । ऐसाही प्रवाद । बोलतो कीं ॥५॥
समज हे सारे । उद्धटपणाही । वाटे फूस देतो । देशमुख ॥६॥
उद्दाम उत्तर । म-याचे ऐकून । संताप चढला । पाटलाला ॥७॥
रागाचे भरात । काठीचा प्रहार । पाटलानी केला । म-यावर ॥८॥
वर्मी कां लागले । बेशुद्ध होऊन । जागीच आडवा । म-या झाला ॥९॥

बातमी पोचली । देशमुखा कानी । तत्काळ म-यास । नेले त्यानी ॥१०॥
सरकार दर्बारी । तक्रार नोंदेन । धाकही बोलले । जातां जातां ॥११॥
तेणे हातपाय । खंडूचे गळाले । आगळीक तरी । झाली होती ॥१२॥
बंधू अकोल्यास । श्रेष्ठ हुद्यावर । वशिल्याने अब्रू । वांचेल कां ॥१३॥
महाराजांकडे । सांकडे घालाया । खंडू आला केला । दंडवत ॥१४॥
स्वामीनी तयास । अभयवचन । दिलें तें सांत्वन । सत्य झालें ॥१५॥
खंडूने स्वामीना । नेऊनी स्वगृही । सेवाभक्ती खूप । रुजूं केली ॥१६॥

तिथे असताना । तेलंगणाहून । भिक्षार्थी ब्राम्हण । कोणी आले ॥१७॥
निद्रिस्त स्वामीना । उठावया वेद । मंत्र पदक्रम । म्हणूं गेले ॥१८॥
स्वरप्रमाद कीं । खटकतां स्वामी । उठले ब्राम्हणां । हटकले ॥१९॥
तीच सूक्ते पुन्हा । स्वामीनी बिनचूक । म्हणून दावीली । ब्राम्हणाना ॥२०॥
स्वामीनी पुसीले । वेदमंत्र काय । तुम्ही पोटासाठी । अभ्यासीले ॥२१॥
वेदविद्या ती तो । मोक्षासाठी खरी । फसवूं नका हो । भाविकांना ॥२२॥
क्षमायाचना ते । करीती ब्राम्हण । रुपया दक्षिणा । देववीली ॥२३॥

स्वामी कंटाळले । गांवात रहाण्या । मळ्यामध्ये गेले । कृष्णाजीच्या ॥२४॥
ब्रम्हगिरी आणि । शिष्य कांही त्यांचे । आले अभ्यागत । अचानक ॥२५॥
कृष्णाजी पाटलां । म्हणती गोसावी । तीन दिन आम्ही । राहूं येथे ॥२६॥
गांजाची आणीक । शिरापुरीचीही । व्यवस्था असावी । सांगीतलें ॥२७॥
तुम्ही तरी एक । भ्रमिष्ट पोसला । वेदांत जाणतो । आम्ही पहा ॥२८॥
कृष्णाजी पाटील । बोलला विनये । उद्याचे भोजनी । शिरापुरी ॥२९॥
आत्ता तरी शक्य । भाक-या केवळ । भूक भागवावी । आज त्यानी ॥३०॥
भोजनानंतर । श्रीब्रम्हगिरींचे । प्रवचन व्हावें । नेम तोही ॥३१॥
शिष्य ते होतेच । ग्रामस्थही आले । "नैनं छिन्दन्ति" हा । निरूपणा ॥३२॥
कोणी कुजबूज । करीत म्हणाले । गीता जगतोसा । योगी इथे ॥३३॥
गांजा ओढणा-या । शिष्यानी ऐकली । कुजबूज तेव्हां । रागावले ॥३४॥
स्वामी ते बाजूला । पलंगावरीच । चिलीम ओढीत । बसलेले ॥३५॥
अचानक तेव्हां । ठिणगी पडून । पलंग पेटला । चहूंबाजू ॥३६॥
भास्कर पाटील । स्वामीना विनवी । पलंग सोडून । उठावया ॥३७॥
स्वामीनी म्हटले । जरा धीर धरी । आत्म्यासी पावक । जाळेचिना ॥३८॥
ब्रम्हगिरीनाही । पलंगावरती । येण्यासी आग्रह । धरीयेला ॥३९॥
"नैनं छिन्दन्ति" ह्या । उक्तीचा प्रत्यय । देण्यास आहे ना । नामी संधी ॥४०॥
भास्कर पाटील । आणि ब्रम्हगिरी । यांच्यात लागली । खेंचाखेंच ॥४१॥
ब्रम्हगिरी करी । गयावया आणि । स्वामींचे पायासी । क्षमा मागे ॥४२॥
लोकही करती । स्वामीना आग्रह । पलंग सोडोनी । यावें आतां ॥४३॥
स्वामी उतरले । लोकानी तत्काळ । पलंगाची आग । विझवीली ॥४४॥
ब्रम्हगिरीलागी । केला उपदेश । आत्मज्ञान नोहे । पोटासाठी ॥४५॥
अनुभवाचे जे । तेवढे बोलावे । पांडित्याचा दंभ । कशापायी ॥४६॥
ब्रम्हगिरीना तैं । जाहली विरक्ती । रातोरात गेले । एकटेच ॥४७॥

नमो गजानना । आठवा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४८॥

अध्याय ९
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ नवव्या । अध्यायास ॥१॥ 

स्वामी राहती तें । शिवाचे मंदीर । सुबक जाहलें । जीर्णोद्धारें ॥२॥
मोटे सावकार । यांनी पैका दिला । मोटे मंदीरसे । नांव झाले ॥३॥
एके दिनी तेथे । आले हरिदास । टाकळि गांवीचे । गोविंदबुवा ॥४॥
त्यांचा घोडा होता । भारी अवखळ । रात्रीचा दाव्याशी । बांधलेला ॥५॥
दावे तोडूनीया । जाईल कीं घोडा । बुवांचे मनास । भारी चिंता ॥६॥
अधूनमधून । उठून पाहती । आज तरी घोडा । निवांतसा ॥७॥
आश्चर्य वाटले । निरखण्या गेले । घोड्याचे पायाशी । होते कांही ॥८॥
कंदील घेऊनी । पाहती तों स्वामी । घोड्याचे पायांत । झोपलेले ॥९॥
स्वामी ते निद्रिस्त । तरी "गण् गणात । बोते" ऐसा शब्द । गुंजे कानी ॥१०॥
माजोरी तो अश्व । नरम जाहला । स्वामींचे चरणी । बुवा नत ॥११॥

बाळापुराहूनी । आले दोन भक्त । मनांत स्वामीना । गांजा द्यावा ॥१२॥
परि दोन वेळां । विस्मरण झाले । तैसेच जाहले । तिस-यांदा ॥१३॥
स्वामीनी जाणुन । मनोगत त्यांचे । म्हटले गांवात । जाऊं नका ॥१४॥
पुढील खेपेस । विसर न व्हावा । विचारी आचारी । मेळ हवा ॥१५॥
दर्शना आणीक । पांच वेळां यावें । सफल होईल । मनोगत ॥१६॥
स्वामींचा आदेश । पाळतां फळला । आशीष दोघाना । सुखी झाले ॥१७॥

त्याच बाळापुरी । रामदासी करी । सज्जनगडाची । वारी नेमें ॥१८॥
पुतळा भार्याही । संगे वारी करी । माघ वद्य तिथी । प्रतिपदा ॥१९॥
वय झाले साठ । अशक्ततेमुळे । समाधीशी केली  विनवणी ॥२०॥
येथून पुढती । वारी न झेपेल । समाधीदर्शना । मुकूं आम्ही ॥२१॥
क्षमा मागूनीया । झाले निद्राधीन । स्वप्नांत सांत्वन । समर्थांचे ॥२२॥
चिंता नको कांहीं । गांवीच करावा । उत्सव वार्षिक । तेंही ठीक ॥२३॥
पुढील वर्षीच । माघनवमीस । देईन दर्शन । आश्वासीलें ॥२४॥
दृष्टांतानुसार । माघवद्यपक्षी । उत्सवाचा थाट । बाळापुरी ॥२५॥
ग्रंथपारायण । दिवसा चालावें । कीर्तन रंगावें । सायंकाळी ॥२६॥
रोज दोप्रहरी । ब्राम्हणभोजन । आनंदीआनंद । कार्यक्रमी ॥२७॥
नवमीचे दिनी । दोन प्रहरासी । स्वामी तेथे आले । अचानक ॥२८॥
संतांचे चरण । पावले पाहून । आनंद मावेना । गगनांत ॥२९॥
उत्स्फूर्त उद्घोष । स्वामीनी मांडला । जय जय रघुवीर । समर्थसा ॥३०॥
त्याच रात्री स्वप्नी । समर्थ म्हणती । गजानन जाण । मीच आलों ॥३१॥
ऐसी जाणूनीया । संता एकात्मता । स्वामीना आग्रह । खूप केला ॥३२॥
इथेच रहावे । बाळापुरी आतां । स्वामी आश्वासती । तेव्हां त्यास ॥३३॥
येईन मी पुन्हा । कालांतरें जाण । आम्ही ना राहतों । एके जागीं ॥३४॥

नमो गजानना । नववा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५०॥

अध्याय १०
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ दहाव्या । अध्यायास ॥१॥ 

एकदा स्वामींची । अमरावतीस । भिकाजीचे घरी । आली स्वारी ॥२॥
नांव आत्माराम । नांवाप्रमाणेच । संतसेवाधर्म । पाळीतसे ॥३॥
कितीक ते भक्त । येती भेटावया । गैरसोय मुळी । नाही कोणा ॥४॥
कितीकांना वाटे । आपणाकडेही । चरणसेवेचा । योग व्हावा ॥५॥
खापर्डे वकील । महान व्यक्तित्व । परि झाले लीन । घरी नेले ॥६॥

गणेश अप्पासा । लिंगायत वाणी । आणि त्याची भार्या । चंद्राबाई ॥७॥
यांचेही मनात । आर्तता दाटली । स्वामीना आपुल्या । घरी न्यावे ॥८॥
वाण्याचे मनात । भीड तरी होती । गरीबाचे घरी । येतील कां ॥९॥
चंद्राबाई म्हणे । पहावे बोलून । असल्यास योग । येतील कीं ॥१०॥
भेटीस दोघेही । मिळूनच आली । शब्द अडकला । गळ्यामध्ये ॥११॥
स्वामीनीच हात । गणूचा धरीला । किती दूर घर । पुसीयेले ॥१२॥
यावेसे वाटते । ऐसेही म्हटले । हर्षभरें गणू । आनंदित ॥१३॥

भिकाजीचा भाचा । बाळाभाऊ नांव । मुंबैहून आला । भक्त झाला ॥१४॥
संसाराचा त्याला । वीट मनी आला । स्वामींचे सन्निध । राही सदा ॥१५॥

अमरावती तैं । सोडूनीया स्वामी । परतले पुन्हा । शेगांवास ॥१६॥
माटे मंदिराच्या । निकट ओसाड । जागा होती तेथे । बसायाचे ॥१७॥
मळ्यांत कां नाही । आतां येत स्वामी । कृष्णाजी पाटला । खंत वाटे ॥१८॥
परंतु स्वामीनी । बंकटाकरवी । समज सर्वाना । कांही दिला ॥१९॥
स्वामींचा मानस । जाणूनी सर्वानी । मठ एक तिथे । बांधीयेला ॥२०॥

स्वामींच्या सेवेला । बाळाभाऊ नित्य । लोकांत उठला । सल त्याचा ॥२१॥
मिठाई मिळते । फुकट खायाला । म्हणूनी कां सेवा । पत्करली ॥२२॥
स्वामीनीही त्यास । धाडीले मुंबैस । नोकरीवरती । रुजूं होण्या ॥२३॥
बाळाभाऊ परी । देऊनी इस्तिफा । परतुनी आला । शेगांवास ॥२४॥
लोकांनी स्वामीना । सुचवीलें तेव्हां । ठिकाणा येईल । मार खाता ॥२५॥
स्वामीनीही तेव्हां । बाळास काठीने । झोडतां काठीही । मोडली कीं ॥२६॥
स्वामी बोलावूनी । लोकाना म्हणती । पहा खूण कोठे । माराची कां ॥२७॥
लोक पाहताती । जवळ येऊन । बाळाभाऊ दंग । आनंदात ॥२८॥
एकांतिक भक्ति । पाहूनीया त्याची । वरमले सारे । लोक तेव्हां ॥२९॥

बाळापूर गांवी । सुखलाल सेठ । त्याची गाय द्वाड । मारकुटी ॥३०॥
सुखलाला कानी । गोष्ट समजली । टाकळिकरांच्या । घोड्याची ती ॥३१॥
बैलगाडीसंगें । गाय ती आणली । गरीब जाहली । स्वामींपुढे ॥३२॥

कारंजा गांवात । लक्ष्मणजी कुडे । उदर व्याधीने । त्रस्त अति ॥३३॥
त्याला उचलोनी । लोकांनी आणीला । स्वामींचे दर्शना । संगे पत्नी ॥३४॥
कुंकवाची भीक । मागण्यासी तिने । पायासी पदर । पसरला ॥३५॥
स्वामी खात होते । एक आंबा तेव्हां । तोच पदरात । टाकीयेला ॥३६॥
हाच आंबा देई । खाण्यास पतीला । औषध दुसरे । नको कांही ॥३७॥
वैद्य जरी देई । कुपथ्याचा धाक । आदेश पाळीला । निःसंकोच ॥३८॥
रेचक जाहले । पतीस अनेक । पोट ठीक झाले । व्याधी गेली ॥३९॥

कृतज्ञ वाटून । स्वामींचे दर्शना । लक्ष्मण पातला । शेगांवास ॥४०॥
आग्रह करूनी । आणीले स्वामीना । आदराने घरीं । कारंजास ॥४१॥
दक्षिणा देताना । वरवरी म्हणे । सर्वस्व आपुले । मी कां दाता ॥४२॥
ऐसे म्हणताना । ताटात दक्षिणा । मोजकी ठेवीली । रुपयांची ॥४३॥
त्याची ऐसी कृती । पाहून स्वामीनी । म्हटले दक्षिणा । विसंगत ॥४४॥
तूंच ना म्हटले । सर्वस्व आपुलें । तरी घर खाली । करी आता ॥४५॥
घरातील सर्व । सामान बाहेर । टाकूनी मोकळा । होई आता ॥४६॥
कोठाराच्या चाव्या । देई मजकडे । दिङ्मूढ लक्ष्मण । गप्प उभा ॥४७॥
स्वामीनी म्हटले । इतुके असत्य । भरलेल्या जागी । जेवेन ना ॥४८॥
मायेचा हा गुंता । बोलण्यात खोट । याचे पहा फळ । भोगशील ॥४९॥
रागाने निघून । गेले मग स्वामी । शापच ठरला । त्यांचा शब्द ॥५०॥
लक्ष्मणाची पुढे । झाली वाताहत । कायावाचामने । एक हवे ॥५१॥

नमो गजानना । दहावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५२॥

अध्याय ११
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ अकराव्या । अध्यायास ॥१॥ 

पुढील वर्षीचे । रामनवमीस । बाळापूर गांवी । स्वामी गेले ॥२॥
बाळकृष्णाकडे । उत्सवाचे दिनी । भास्करास कुत्रा । चावला कीं ॥३॥
औषधे घेण्यास । लोकांचा आग्रह । स्वामींचे चरण । औषध हो ॥४॥
स्वामीनी म्हटले । हत्या ऋण वैर । प्रायश्चित्त यांचे । टळेल ना ॥५॥
जन्मजन्मांतरी । येतसे समोर । श्वानास गाईचा । द्वाडपणा ॥६॥
दुधाचे स्वार्थाने । सुखलालाने ना । गाईस आणले । मजकडे ॥७॥
श्वानदंशाने ह्या । कर्माची समाप्ती । जाहलीसे आता । समजावे ॥८॥
तेव्हा द्वाडपणा । गाईचा शमला । परतूनी आला । श्वानाप्रति ॥९॥
भास्करा पुसीले । तुज काय हवे । आयुष्य की मोक्ष । ठरव तूं ॥१०॥
जरी मागशील । आणीक आयुष्य । पुढील जन्मीची । उधारी ती ॥११॥
मरणचि जरी । आत्ता मागशील । दोन मास तरी । जगशील ॥१२॥
विमुक्त होऊन । वैकुंठगमन । पावशील काय । तुज हवे ॥१३॥
माझे जे कां हित । आपणासी ठावे । पूर्ण भरंवसा । तुम्हा पायीं ॥१४॥
विषबाधा कांही । तुज न होईल । शेगावास आता । चल जाऊं ॥१५॥

शेगांवी लोकाना । भास्कर विनवी । अखेरची इच्छा । माझी जाणा ॥१६॥
तीर्थक्षेत्रे जैसी । पंढर्पूर देहू । आळंदी तैसेच । येथे होवो ॥१७॥
स्वामींचे स्मारक । बांधण्या वचन । लोकानी दिधले । भास्करास ॥१८॥
स्वामीनी म्हटले । आता जाया हवे । त्र्यंबकेश्वरास । भास्करा गा ॥१९॥
सारी तीर्थक्षेत्रे । आपुले चरणी । यात्रेचे तरी कां । प्रयोजन ॥२०॥
स्वामीनी म्हटले । स्थानाचे आपुले । महत्त्व असते । ध्यानी धरी ॥२१॥

यात्रा करूनीया । नाशकास आले । तिथे संतबंधू । गोपाळदास ॥२२॥
त्यांचेसंगे केला । अध्यात्मविचार । परस्परां खूप । समाधान ॥२३॥

शेगांवी परत । येतां श्यामसिंग । देई आमंत्रण । आडगांवा ॥२४॥
तेथे आनंदाने । हनुमंजयंती । साजरी होताना । काय केले ॥२५॥
स्वामीनी भास्करा । पाडूनी खालती । बैसले तयाचे । उरावरी ॥२६॥
अतीव ताडण । झाले तेव्हां त्याना । बाळाभाऊ म्हणे । सोडा आता ॥२७॥
स्वामींचा खुलासा । ऐशा ताडणाने । झाडा घालवीला । संचिताचा ॥२८॥
भास्कराकारणें । बाळाभाऊनेच । होता मार खाल्ला । स्वामीहस्तें ॥२९॥
तृतीया तिथीस । स्वामीनी म्हटले । आतां दोन दिस । तुझे बाकी ॥३०॥
पंचमीचे दिनी । भास्करास केली । सूचना घालाया । पद्मासन ॥३१॥
हरीचे चरणी । चित्त स्थिर होतां । स्वामी गरजले । हरहर ॥३२॥
तेव्हांच सहजी । उडाला कीं प्राण । गुरुकृपा थोर । ऐसी केली ॥३३॥
अर्ध्या कोसावर । द्वारकेश्वराचे । मंदिराजवळी । वृक्षवल्ली ॥३४॥
तेथेच समाधी । बांधवूनी मग । अन्नदान झाले । दहा दिन ॥३५॥

कावळ्यांचा खूप । उपद्रव होतां । लोक मारूं गेले । कावळ्याना ॥३६॥
स्वामी आश्वासती । नका मारूं ह्याना । उद्या न येईल । काक एक ॥३७॥
मानवाची वाणी । पक्षी कां जाणेल । खातर कराया । जन आले ॥३८॥
एकही कावळा । नजर ना येई । सामर्थ्य स्वामींचे । कळूं आले ॥३९॥

शेगांवास स्वामी । परतले तेव्हां । दुष्काळाची कामें । चाललेली ॥४०॥
विहीर खोदण्या । सुरुंग लावीले । होते खोल खाली । एके जागी ॥४१॥
सरबत्ती देण्या । पुंगळ्या सोडल्या । विस्तव दारूस । लागेचना ॥४२॥
सुरुंगाजवळी । पाणी जमलेले । पुंगळी पाहिजे । हलवीली ॥४३॥
जोखमीचे काम । करण्या हुकूम । गणू जव-यास । मेस्त्री करी ॥४४॥
दरिद्री आणीक । अगतिक गणू । खाली उतरला । कामासाठी ॥४५॥
सुरुंगाचे स्फोट । अचानक सुरूं । झाले गणू खाली । अडकला ॥४६॥
गणू स्वामीभक्त । स्मरे त्यांचे नाम । सांपडले त्यास । खबदाड ॥४७॥
एकावरी एक । सुरुंग उडती । शिळा एक आली । उडोनीया ॥४८॥
तिने खबदाड । झाले कीं हो बंद । गणू पूर्णपणे । अडकला ॥४९॥
स्फोट थंड झाले । अस्वस्थ लोकाना । वाटले प्रेतच । दिसणार ॥५०॥
वाचवा वाचवा । गणूचा आवाज । ऐकूनी सावध । मेस्त्री झाला ॥५१॥
शिळा हटवूनी । बाहेर निघतां । गणू धाव घेई । स्वामीपदीं ॥५२॥
त्याचे पाठीवरी । ठेऊनीया हात । स्वामीच म्हणती । वाचलास ॥५३॥
शिळेने झांकले । बरें खबदाड । एरव्ही तूं तरी । उतावीळ ॥५४॥
हें काय म्हणावें । अपरोक्ष ज्ञान । कां स्वतःच स्वतःस । वांचवीलें ॥५५॥

नमो गजानना । अकरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५६॥

अध्याय १२
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ बाराव्या । अध्यायास ॥१॥

अकोल्यात एक । भक्त बच्चूलाल । आडनांव त्याचे । अग्रवाल ॥२॥
स्वामींच्या भेटीची । मनी तळमळ । स्वामीच एकदा । अकोल्यात ॥३॥
अवचित आले । त्याचेच घरास । इच्छा व्यक्त करी । पूजा करूं ॥४॥
अनुमति होतां । षोडशोपचारे । पूजा सजवीली । स्वामींची कीं ॥५॥
सुग्रास भोजन । पीतांबर शाल । दागीने मोहरा । दशसहस्र ॥६॥
श्रीराम मंदीर । व्हावें ही प्रार्थना । स्वामीनी वरली । आशीर्वादें ॥७॥
स्वामीनी उठोनी । दागीने नि वस्त्रे । परतोनी दिली । बच्चूलाला ॥८॥
मजसी कांही न । यांचे प्रयोजन । उपाधी ह्या सा-या । विषासम ॥९॥
आपुलें वैभव । ठेवी स्वतःकडे । विठ्ठल तिष्ठतो । मजसाठी ॥१०॥
दोन पेढे फक्त । घेऊनी स्वच्छंदें । स्वामी परतले । शेगांवास ॥११॥
तरी कालांतरें । वैभव वाढतां । मंदीर बांधले । घरापुढे ॥१२॥

शेगांवी मठांत । भक्त पीतांबर । गरीब वस्त्रेही । जीर्ण त्याची ॥१३॥
त्याच्या सेवेवरी । संतुष्ट होवोनी । स्वामीनी दुपट्टा । त्यास दिला ॥१४॥
इतरांचे मनी । पीतांबराविशी । दाटला मत्सर । अविवेकी ॥१५॥
गुरूचें जें वस्त्र । आपण नेसावें । गुरुचा करीतो । अपमान ॥१६॥
खुलासा तो करी । गुरूंचे आज्ञेने । नेसतो ते कोणी । मानेचि ना ॥१७॥
वाद मिटविला । स्वामीनी तो सारा । संचार कराया । धाडीयेले ॥१८॥
विश्वास दिधला । माझा आशीर्वाद । सन्मार्गाने करी । लोकोद्धार ॥१९॥

कोंडोळीस आला । आम्रतरुतळी । सद्गुरुचिंतनी । रात्र गेली ॥२०॥
दुसरे दिवशी । गेला झाडावरी । परि तेथे मुंग्या । मुंगळे ही ॥२१॥
बसावया नाही । जागा फांदीवर । मुंग्यांच्या चाव्यानी । पछाडला ॥२२॥
नटराजापरी । नाचत राहीला । तोल परि मुळी । नाही गेला ॥२३॥
त्याचा तो प्रकार । पाहूनी गुराखी । बोलावीते झाले । गांव सारा ॥२४॥
लोकांनी पुसीले । आलासी कोठून । चढला कशास । झाडावर ॥२५॥
शेगांवीचा भक्त । स्वामींचा म्हटलें । त्यानी धाडियेले । संचारास ॥२६॥
मुंग्यांच्या चाव्यानी । परि मी त्रासलो । म्हणूनी चढलो । झाडावर ॥२७॥
लोक दटावती । फसवीसी काय । स्वामींचे सांगोनी । नांव आम्हां ॥२८॥
तेव्हां देशमुख । नांव श्यामराव । म्हणाले परीक्षा । घेऊं ह्याची ॥२९॥
वृक्ष वठलेला । आहे हा निष्पर्ण । करी डेरेदार । आळवोनी ॥३०॥
तुझी भक्ति जरि । असेल साजीरी । दाखवी पुरावा । एणे रीती ॥३१॥
एरव्ही खाशील । मार पहा खूप । पीतांबर करी । गयावया ॥३२॥
माझीया भक्तीची । कठीण परीक्षा । ऐसी नका घेऊं । विनवीतो ॥३३॥
मंडळी मानेना । तेव्हां पीतांबरें । धावा सुरूं केला । गुरुलागी ॥३४॥
उत्स्फूर्त स्तवन । पीतांबर बोले । डोलाया लागले । सारे जण ॥३५॥
उदंड गजर । जैसा का रंगला । पालवी फुटली । वृक्षावरी ॥३६॥
पाने तोडूनीया । खातरही केली । जयजयकार केला । पीतांबरा ॥३७॥
नंतर लोकानी । कोंडोली गांवात । पीतांबर नांवें । मठ केला ॥३८॥

पुढें काय झालें । शेगांवी एकदा । स्वामी उद्विग्नसे । बसलेले ॥३९॥
मठात रहाया । मन न लागते । लोक बिचकले । नवे काय ॥४०॥
शेगांव सोडूनी । जातील कां स्वामी । चिंता उपजली । सर्वां मनी ॥४१॥
स्वामीनी म्हटलें । सरकारी जागा । बक्षीस मिळाया । अर्ज करा ॥४२॥
लोकां मनी शंका । राजा तो परका । जागा देईल कां । सरकारी ॥४३॥
करी साहेबाने । एक एकराची । खरेंच मंजूर । जागा केली ॥४४॥
आणिक म्हटलें । व्यवस्था राखाल । देईन एकर । आणीकही ॥४५॥

नमो गजानना । बारावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४६॥

अध्याय १३
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ तेराव्या । अध्यायास ॥१॥ 

जमीन मिळाली । मठ बांधावया । वर्गणी पाहिजे । जमवीली ॥२॥
टीका करणा-या । कांहींचे म्हणणें । भीक मागणें हें । संतनांवें ॥३॥
दैवी शक्ति जरी । मठ कशासाठी । स्वामीना हवा कीं । तुम्हालाच ॥४॥
जगदेव तेव्हां । टवाळखोराना । म्हणाले स्वामीना । नको कांहीं ॥५॥
आकाशाची छत्री । निजाया धरित्री । संग्रह कांही का । करतात ॥६॥
संत कार्यासाठी । देतां एकपट । दसपट हित । आपलेंच ॥७॥
वर्गणी जमली । कोट बांधावया । केली सुरवात । प्रथमतः ॥८॥

एकदा स्वामीनी । काय ठरवीलें । रेतीच्या गाडीत । चढले कीं ॥९॥
गाडीवान तेव्हां । खाली उतरला । स्वामींचा आग्रह । बैस जागी ॥१०॥
गाडीवान म्हणे । हनुमान श्रेष्ठ । रामभक्त जरी । तिष्ठतो ना ॥११॥
असो गाडी आली । बांधकामाजागी । स्वामीनी हेरली । एक जागा ॥१२॥
जेथे कां बैसले । स्वामी तयेवेळी । तेथेच समाधी । आज आहे ॥१३॥

स्वामीनी निर्देश । केला त्यानुसार । आंखणी जाहली । कोटासाठी ॥१४॥
अकरा गुंठ्यानी । जाहली अधिक । कोणाची कागाळी । दफ्तरात ॥१५॥
मोजणीस आले । जोशी अधिकारी । अयोग्य वाटले । दंड देणे ॥१६॥
आज्ञापत्र स्पष्ट । मिळतां भक्तांचा । उत्साह वाढला । मठासाठी ॥१७॥

नंतर एकदा । गळत्या कुष्ठाचा । एक रोगी आला । मठाकडे ॥१८॥
सर्वड गांवचा । गंगाभारतीशा । नांवाचा गायक । परित्यक्त ॥१९॥
लोक बजावती । स्वामींचे चरण । नाही स्पर्शायाचे । ध्यान धरी ॥२०॥
एकदा स्वामीना । एकटे पाहून । धरीले चरण । अवचित ॥२१॥
स्वामीनी थप्पड । लाथाही मारून । ढकलूनी दिला । बाजूकडे ॥२२॥
कफाचा बडका । त्यावरी थुंकला । रागाने निघून । गेले स्वामी ॥२३॥
बडक्याचे झाले । मलम पाहून । सर्वांगी फांसला । आनंदाने ॥२४॥
किळसवाणे तें । करणें पाहून । पाटलानी त्याला । धिक्कारीले ॥२५॥
परि उत्तरला । कळली न तुम्हा । स्वामींची विचित्र । पहा कृपा ॥२६॥
स्वामीनी जेथेही । स्नान केले तेथे । जमीन सुगंधी । जाहलीसे ॥२७॥
तिथेच लोळण । घेईन मी आता । वाटतें होणार । चमत्कार ॥२८॥
नास्तिकास दिसे । केवळ ती माती । निरोगी जाहला । कुष्ठ देह ॥२९॥
गंगाभारतीचे । गान बहरले । निवांत आसरा । आश्रमात ॥३०॥
गांवाहून आली । पत्नी आणि मुलें । आग्रह करती । परतण्या ॥३१॥
गंगाभारती तो । त्याना उत्तरला । लटकी तुमची । माया पहा ॥३२॥
तुमचा मी नव्हे । स्वामींचा जाहलो । संसाराचे पाश । नको आता ॥३३॥
नंतर स्वामीनी । गंगाभारतीस । मलकापुरास । धाडीयेले ॥३४॥

झ्यामसिंग भक्त । आला शेगांवास । स्वामीना बोलावी । मुंडगांवी ॥३५॥
भंडा-याकरीता । अमित लोकांची । दिंडीच निघाली । उत्साहात ॥३६॥
चतुर्दशी तिथी । त्याने योजलेली । रिक्त तिथी वर्ज्य । खरे तर ॥३७॥
स्वामींची सूचना । दुर्लक्षली त्याने । पाऊस पडला । पंक्तीवर ॥३८॥
अन्न वांया गेले । शेतीचीही हानी । होणारसी चिंता । सर्वां झाली ॥३९॥
झ्यामसिंग तेव्हां । वरमूनी प्रार्थी । स्वामीना संकट । निवाराया ॥४०॥
स्वामीनी नजर । नेली गगनात । ढग दूर गेले । ऊन आले ॥४१॥
झ्यामसिंगानेही । उद्या पौर्णिमेला । भंडारा घातला । आनंदाने ॥४२॥

भक्त पुंडलिक । भोकरे नामक । वारी दरवर्षी । करीतसे ॥४३॥
वारीस निघता । लागण जाहली । ग्रंथीरोगाची ती । कणकण ॥४४॥
चालवेना तरी । वाहन अव्हेरी । गांठ वाढतेच । कांखेमध्ये ॥४५॥
रडतखडत । मठात पोचेतो । स्वामी खुणावती । दुरूनच ॥४६॥
स्वतःचीच कांख । दाबूनी जोराने । स्वामी ओरडले । गांठ गेली ॥४७॥
पुंडलीकाच्याही । तापाला पडला । तात्काळ उतार । आश्चर्य तें ॥४८॥

नमो गजानना । तेरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४९॥

अध्याय १४
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ चौदाव्या । अध्यायास ॥१॥ 

तात्या बंडोपंत । नांवाचे ब्राम्हण । होते मेहकर । तालुक्याचे ॥२॥
त्याने उदारता । अवास्तव केली । त्याने झाले जीणे । दारिद्र्याचे ॥३॥
तगादे पाठीस । सावकाराचे नि । बायको मुलेही । भंडावती ॥४॥
जीव द्यावा किंवा । जावे हिमालयी । म्हणोनी सोडीले । घरदार ॥५॥
राख फांसूनीया । लंगोटी लावूनी । आला स्थानकास । प्रवासास ॥६॥
अनोळखी विप्र । म्हणे तेव्हा त्याला । हिमालयाआधी । शेगांवी जा ॥७॥
बंडूतात्यालागी । वाटले आश्चर्य । अनोळखी विप्र । मनकवडा ॥८॥
शेगांवी स्वामीनी । खूण सांगीतली । अनोळखी विप्र । भेटल्याची ॥९॥
प्राण का त्यागावा । हताश होऊन । कशासाठी जावे । हिमालयी ॥१०॥
कानात बोलले । बाभूळाजवळी । म्हसोबा मळ्यात । आहे गुप्त ॥११॥
एकटाच खण । मध्यरात्रवेळी । वावभर माती । काढूनीया ॥१२॥
मिळेल जें धन । त्याने कर्ज फेड । राही संसारात । संभाळून ॥१३॥
स्वामींचे सांगणे । तंतोतंत खरें । तांब्याची घागर । सांपडली ॥१४॥
चारशे मोहरा । पाहतां नाचत । स्वामींचा करी तो । जयजयकार ॥१५॥
स्थिति सुधारली । आला शेगांवासी । स्वामी सांगताती । उपदेश ॥१६॥
परोपकारही । करताना लक्ष्मी । आदर राखूनी । संभाळावी ॥१७॥

असेच एकदा । मार्तण्ड पाटील । साधण्या अवस । सोमवती ॥१८॥
नर्मदेस जाण्या । करीती आग्रह । ती तो आहे नित्य । मजपाशी ॥१९॥
पर्वाची महती । मज नाही कांही । विघ्न ओढवेल । निष्कारण ॥२०॥
तरीही आग्रह । भक्तांचा अतीव । आले तीर्थस्थानी । सारे जण ॥२१॥
ओंकारेश्वराचे । दर्शनास सारे । स्वामीनी लावीले । पद्मासन ॥२२॥
परत निघता । स्वामींची सूचना । बैल करतील । अपघात ॥२३॥
सडकेने जाण्या । गर्दीही प्रचंड । नावेने निघाले । खूप लोक ॥२४॥
सर्वांसमवेत । स्वामीही चढले । खडकावरती । आदळली ॥२५॥
बुडाया लागली । नौका खालीखाली । उडी टाकोनीया । माजी गेला ॥२६॥
भयभीत भक्तां । स्वामी सांगताती । आता नर्मदेचा । धावा करा ॥२७॥
स्वामींचा आदेश । भक्तानी पाळतां । पात्रात कोळीण । प्रकटली ॥२८॥
कोण तूं प्रश्नाच्या । उत्तरी म्हणाली । ॐकार-सन्तान । मज जाणा ॥२९॥
नर्मदाच नांव । जळ हेंच रूप । ओलेच वसन । नित्य माझे ॥३०॥
सहज नावेस । ढकलूनी तिने । किनारी लावीली । अलगद ॥३१॥
सारे सुखरूप । वळून पाहती । कोळीण अदृश्य । गेली कोठे ॥३२॥
स्वामीना पुसता । म्हणाले कोळीण । होती ती स्वतःच । नर्मदा ना ॥३३॥

संत माधवनाथ । चित्रकूटवासी । त्यांचा माळव्यात । शिष्यगण ॥३४॥
शेगांवास आले । त्यांचे एक शिष्य । नांव सदाशिव । वानवळे ॥३५॥
भजन संपता । स्वामींनी म्हटलें  । सदाशिवरावाना । सहजीच ॥३६॥
इतुक्यात येथे । येऊनीया गेले । माधवनाथचि । काय म्हणूं ॥३७॥
चुकामूक झाली । थोडा वेळ आधी । येते तरी होती । गुरुभेट ॥३८॥
खुणेसाठी परि । म्हटले हा विडा । त्यांचा जो राहीला । सवें न्यावा ॥३९॥
सदाशिव जेव्हां । गुरूंना भेटले । विड्याची ती पाने । देते झाले ॥४०॥
माधवनाथानी । तेव्हां सांगीतले । योगसिद्धीमुळे । भेट होते ॥४१॥
शेगांवास गेलो । जेवणही केले । विडा तो राहीला । घ्यावयाचा ॥४२॥

नमो गजानना । चौदावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४३॥

अध्याय १५
नमो गजानना । आपल्या कृपेने । सुरू पंधरावा । अध्याय हा ॥१॥ 

शिवजन्मोत्सव । अकोल्यात शके । अठराशे तीस । वैशाखात ॥२॥
सभेचे अध्यक्ष । लोकमान्य होते । स्वामींचा आशिष । मिळावा कीं ॥३॥
सभेला येण्याची । विनंति कराया । खापर्डे वकील । स्वतः आले ॥४॥
स्वामीनी स्वतःच । म्हटले सभेत । असतील दोन । थोर व्यक्ति ॥५॥
टिळक नि अण्णा । पटवर्धनही । येईन देखेन । दोघानाही ॥६॥
टिळकानी दिला । लोकाना आठव । समर्थांची कृपा । शिवराया ॥७॥
आज नष्टचर्य । दास्यत्वाचे आहे । शिक्षणाने व्हावे । राष्ट्रप्रेम ॥८॥
परदेशी राजा । ऐसे कां शिक्षण । जाणूनबुजून । देईल हो ॥९॥
ऐकूनी भाषण । ऐसे रोखठोक । स्वामीजी बोलले । भविष्य कां ॥१०॥
ऐशा बोलण्याने । काढण्या नाही कां । दोन्ही दंडावरी । पडतील ॥११॥
स्वामी जे बोलले । तैसेच जाहले । बंदीत टाकले । टिळकाना ॥१२॥

राजद्रोहामुळे । खटले भरले । मुंबईच्या वा-या । खापर्ड्याना ॥१३॥
खापर्ड्यांचे सवे । कोल्हटकरही । निघाले असतां । मुंबईला ॥१४॥
खापर्ड्यानी तेव्हां । कोल्हटकराना । शेगांवा धाडीले । आशीर्वादा ॥१५॥
स्वामीनी म्हटले । यश ना येईल । शिवाजीस सुद्धा । कैद झाली ॥१६॥
परि ही भाकर । खाववा टिळका । कांही थोरकार्य । घडवेल ॥१७॥
टिळकांचे तोंडी । दात नसल्याने । भाकर सेवीली । कुस्करून ॥१८॥
म्हटले त्रिकाल । जाणताती साधू । पाहूं कामगिरी । आतां काय ॥१९॥
मंडाले येथील । कारागृही ग्रंथ । गीतारहस्याचा । सिद्ध झाला ॥२०॥

भक्त कोल्हापुरी । श्रीधर काळे हा । योजी विद्यार्जन । परदेशी ॥२१॥
निघण्याचे आधी । दर्शनास आला । शब्द बोलवेना । स्वामींपुढे ॥२२॥
स्वामीच म्हणती । भौतिकशास्त्राची । नको अभिलाषा । व्यर्थ गोष्ट ॥२३॥
भारतात जन्म । हेंच थोर पुण्य । योग नि अध्यात्म । अभ्यासावें ॥२४॥
ज्ञान हें मिळतां । होशील कृतार्थ । कशास तूं जाशी । जपानला ॥२५॥
इथेच होईल । अभ्युदय मान । परतूनी जाई । कोल्हापुरा ॥२६॥
स्वामींचा आदेश । मानीतां भूषवी । प्राचार्यपदाला । कालांतरें ॥२७॥

नमो गजानना । पंधरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥२८॥

अध्याय १६
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सोळाव्या । अध्यायास ॥१॥ 

मुंडगावातील । भक्ता पुंडलीका । आग्रह करीते । भागाबाई ॥२॥
अंजनगांवासी । जाऊनीया घेऊं । केकाजीशिष्याचा । कानमंत्र ॥३॥
स्वप्नांत स्वामीनी । केला मंदस्वरें । गण गण् गणात । बोते मंत्र ॥४॥
पुसलें आणीक । तुला कांहीं हवें । पादुका मागतो । पुंडलीक ॥५॥
दुसरे दिवशी । आली भागाबाई । पुंडलीक नाही । जाण्या राजी ॥६॥
पादुकांची वाट । पाहतो विश्वासे । होतील स्वप्नीचे । बोल सत्य ॥७॥
शेगांवाहूनचि । मुंडगांवी येण्या । भक्त झ्यामसिंग । निघालेला ॥८॥
स्वामीनी म्हटले । माझीया पादुका । नेऊनी या देई । पुंडलीकां ॥९॥
वाटेतच त्याला । दिसे पुंडलिक । प्रसाद कांही कां । पुसे आर्त ॥१०॥
आश्चर्य जाहले । झ्यामसिंगालाही । वृत्तांत ऐकून । स्वप्नातील ॥११॥

अकोल्यात एक । सावकार पुत्र । त्र्यंबक कंवर । स्वामीभक्त ॥१२॥
उच्चशिक्षणास । हैद्राबादी राहे । सुट्टीमध्ये आला । अकोल्यास ॥१३॥
मातृहीन भाऊ । म्हणे वहिनीस । स्वामीना भोजन । द्यावें वाटे ॥१४॥
भाकर पिठले । मिर्ची आणि कांदा । साधेच भोजन । घेऊनीया ॥१५॥
पोचतां स्टेशनी । उशीर जाहला । पुढील गाडीने । मग आला ॥१६॥
तिकडे शेगांवी । ताटे वाढलेली । नाना पक्वान्नांची । होती जरी ॥१७॥
स्वामी म्हणताती । माझे तो भोजन । चवथे प्रहरी । नका थांबूं ॥१८॥
भोजन घेऊन । भाऊ येत आहे । माहीत स्वामीना । अंतर्ज्ञानें ॥१९॥
त्र्यंबक पोचतां । स्वामीनी म्हटलें । किती बा विलंब । केलास तूं ॥२०॥
 पक्वान्नाचे नाही । कौतुक मानीले । भाकरी चवीने । खाते झाले ॥२१॥

शेगांवात एक । शेतकरी त्याचे । नांव तुकाराम । शेगोकार ॥२२॥
स्वामीना चिलीम । भरून देण्याचे । काम करीतसे । भक्तिप्रेमें ॥२३॥
बसलेला होता । शेतांत अपुल्या । ससा कीं मारीला । शिका-याने ॥२४॥
बंदुकीचा छर्रा । याचेच कानाचे । जवळी घुसला । अडकला ॥२५॥
डॉक्टरानी खूप । यत्न जरी केले । छर्रा तो निघेना । कांही केल्या ॥२६॥
तुकारामालागी । डोकेदुखी झाली । कांही केल्या स्वस्थ । वाटेना कीं ॥२७॥
दुस-या भक्ताने । म्हटले उपाय । आतां फक्त एक । गुरुसेवा ॥२८॥
मठ झाडण्याचे । काम स्वीकारूनी । सेवा त्याने केली । चौदा वर्षे ॥२९॥
एके दिनी ऐसा । मठ झाडताना । छर्रा अचानक । निघाला कीं ॥३०॥
स्वस्थता वाटली । परि त्याने सेवा । चालूच ठेवली । निरंतर ॥३१॥

नमो गजानना । सोळावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥३२॥

अध्याय १७
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ सत्राव्या । अध्यायास ॥१॥ 

स्वामी अकोल्यात । असताना एका । भक्ताचे मनांत । काय आलें ॥२॥
विष्णूसा नामक । म्हणे भास्करास । मलकापुरास । न्यावे वाटे ॥३॥
तैसाच आग्रह । भास्कराने केला । स्वामींचा इशारा । हट्ट व्यर्थ ॥४॥
तरी भास्कराने । केली गाडीमध्ये । आसने राखीव । परस्पर ॥५॥
स्वामीना म्हटलें । विष्णूसास दिलें । वचन स्वामीना । आणीनसे ॥६॥
स्वामीनी म्हटलें । संकटास तुझे । आमंत्रण मात्र । पाही आतां ॥७॥
गाडी जैसी आली । अकोला स्टेशनी । राहीले बसून । फलाटावर ॥८॥
गाडी सुरूं होतां । राखीव डब्यातं । न जातां शिरले । स्त्रियांचेंच ॥९॥
नग्न वावरतां । रेल्वेचा कायदा । मोडल्याने आलें । वॉरंट कीं ॥१०॥
अटक कराया । आला जो शिपाई । त्याचाच धरीला । हात घट्ट ॥११॥
जठारसाहेब । तेव्हां पाठवीती । मन वळवीण्या । देसायाना ॥१२॥
कोर्टात नेण्यास । कष्टाने धोतर । नेसवीले मार्गी । फेडलेच ॥१३॥
जठारसाहेब । गुन्हा विवरती । स्वामी तिकडे न । लक्ष देती ॥१४॥
वायफळ गप्पा । म्हणत भास्करा । म्हणती चिलीम । भरून दे ॥१५॥
जठार मनात । करीती विचार । अवधूता काय । जनरीत ॥१६॥
भास्करास हवे । होते तारतम्य । पांच रुपे दंड । त्यास केला ॥१७॥
स्वामीनी म्हटले । झाली ना फजीती । हट्ट निष्कारण । केलास तूं ॥१८॥
तेव्हांपासूनीया । रेलगाडी वर्ज्य । त्यांचे प्रवासास । बैलगाडी ॥१९॥

एकदा अकोला । गांवास गेलेले । बापूरावांचे कीं । घरी वास ॥२०॥
कुरूम गांवच्या । मेहताबशाने । निरोप दिलेला । भेटीसाठी ॥२१॥
यवन मित्राना । घेऊनी राहीला । बापूरावांचेच । घरीं तेव्हां ॥२२॥
दुसरे दिवशी । स्वामीनी बोकाट । मेहताबशाचे । धरीयेले ॥२३॥
दणादण मार । स्वामीनी दिधला । मुकाट्याने त्याने । सोशीयेला ॥२४॥
पाहूनी भ्यालेल्या । मित्राना परत । जाण्यास बोलला । मेहताबशा ॥२५॥

मित्र गेले आणि । बच्चूलाल आला । स्वामीना भोजना । बोलवाया ॥२६॥
टांगा पोहोचला । घरी तरी स्वामी । नाही उतरत । टांग्यातून ॥२७॥
तर्क तेव्हां केला । भक्ताने ऐसा कीं । मेहताबास ना । बोलावीले ॥२८॥
चूक समजतां । त्यालाही आणीलें । उतरवीले त्यास । नाट्यगृही ॥२९॥
स्वामींची व्यवस्था । रामाचे मंदीरी । खपला नाहीच । हाही भेद ॥३०॥
स्वामी स्वतःहून । नाट्यगृही गेले । तेथेच भोजने । मग झाली ॥३१॥
मेहताब सांगे । आतां मज जाणें । स्वामींचे आज्ञेने । पंजाबला ॥३२॥
मित्रांचे म्हणणें । मशीद बांधणें । राहील ना काम । तुम्ही जातां ॥३३॥
त्यानें आश्वासीलें । स्वामी असताना । काम न अडेल । मुळीसुद्धा ॥३४॥
मंदीर-मस्जिद । स्वामीना समान । कार्यपूर्ती होते । त्यांच्या कृपें ॥३५॥

बापूरावांच्या त्या । कांतेस बाधली । करणी ती गेली । स्वामीकृपें ॥३६॥

नरसिंगजी जे । होते अकोट्यात । संतबंधूंमध्ये । दाट प्रेम ॥३७॥
स्वामीच अकोटी । आले उठाउठी । विहिरीचे कांठी । बसलेले ॥३८॥
वांकून पाहसी । पुनःपुन्हा कां रे । नरसिंगजीनी । विचारलें ॥३९॥
गंगा गोदा त्याही । स्नान या तीर्थात । करती कोरडा । मीच मात्र ॥४०॥
तीर्थाने येऊन । न्हाऊं घालावें तों । बसून राहीन । येथेच मी ॥४१॥
छंदिष्ट दिसतो । ऐसी परस्पर । लोकांत जाहली । कुजबूज ॥४२॥
तरी कुतूहलें । रेंगाळले तेथें । जळ अवचित । तुडुंबलें ॥४३॥
कारंज्यापरी की । जळ उसळले । स्वामी बोलाबीती । या हो या हो ॥४४॥
भाविकांनी केले । उत्साहाने स्नान । नास्तिकांची झाली । खाली मान ॥४५॥
स्नाने झाल्यावरी । पाणी गेले खाली । खोल जैसे होते । तैसे पुन्हा ॥४६॥

नमो गजानना । अध्याय सत्रावा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४७॥

अध्याय १८
नमो गजानना । आपल्या कृपेने । सुरू अठरावा । अध्याय हा ॥१॥

मुंडगांवी एक । बायजा मुलगी । बालपणी सुद्धा । स्वामीभक्त ॥२॥
विवाह जाहला । परि दुर्दैवाने । तिचा पति होता । नपुंसक ॥३॥
तिच्या सौंदर्याने । थोरला भावोजी । कराया धजला । एकांत कीं ॥४॥
अचानक तेव्हां । त्याचाच मुलगा । जिन्याचेवरूनी । कोसळला ॥५॥
पोरास मस्तकी । मार बसल्याने । पाप कर्माविशी । वरमला ॥६॥
पिता त्यानंतर । घेऊनीया आला । स्वामींचे दर्शना । बायजाला ॥७॥

पुत्रप्राप्ती नाही । हिचे नशिबात । स्पष्टच बोलले । स्वामी तेव्हा ॥८॥
तरीही स्वामीना । मानूनी सद्गुरु । येती झाली सवें । पुंडलिक ॥९॥
साथ संगत ती । पाहूनीया लोक । कराया लागले । कुजबूज ॥१०॥
स्वामीनीच मग । निर्वाळा दिधला । दोघांचे संबंध । निर्मळचि ॥११॥
खामगांवामध्ये । कुंवरास अंगी । फोड उठलेले । दुःख भारी ॥१२॥
डॉक्टर भावाने । केले उपचार । परि सल नाही । कमी झाली ॥१३॥
 स्वामीपदी निष्ठा । कुंवरास होती । सुरूं केली त्याने । प्रार्थनाही ॥१४॥
रात्री अचानक । दमणी दारांत । ब्राम्हण तीतून । उतरला ॥१५॥
नांव म्हणे गजा । आलो शेगांवीचा । अंगारा नि तीर्थ । घेऊनीया ॥१६॥
कुंवर लवूनी । हाती घेई तीर्थ । आणि मग वर । बघितले ॥१७॥
नव्हता ब्राम्हण । कोणीही समोर । दारात नव्हती । दमणीही ॥१८॥
तीर्थाचे होतेच । आचमन केले । अंगा-याची पुडी । मांडीपाशी ॥१९॥
फोड बरे झाले । कुंवर स्वामींचे । दर्शन घेण्यास । शेगांवास ॥२०॥
आला तेव्हां स्वामी । विचारती त्यास । बैलाना पुसीले । पाणी काय ॥२१॥
पांच पन्नासाना । घेऊनीया स्वामी । आले पंढरीला । आषाढात ॥२२॥
समवेत होता । भक्त बापू काळे । त्याचा वेळ गेला । स्नानामुळे ॥२३॥
दर्शन चुकले । विठोबारायाचे । मनात दाटली । हळहळ ॥२४॥
प्रभूला सांकडे । घालण्या उपास । करीतां स्वामीना । दया आली ॥२५॥
वाड्यात दर्शन । विठ्ठलाचे दिले । जैसा देवळांत । हुबेहुब ॥२६॥

द्वादशी तिथीस । अचानक मरी । पंढरपुरात । पसरली ॥२७॥
शेगांवीचे लोक । कुकाजीचा वाडा । सोडूनी निघाले । लगबगा ॥२८॥
कवठे गांवीचा । माळकरी परी । सांथीचे आहारी । सांपडला ॥२९॥
निपचित होता । तो तरी झालेला । हात पुढे केला । स्वामीनीच ॥३०॥
म्हणाले जाऊं या । चल व-हाडास । उठवत नाही । कैसा येऊं ॥३१॥
कैसे परतणे । मृत्यू तो समीप । स्वामीनी म्हटलें । धीर धरी ॥३२॥
मस्तकी ठेऊनी । हात त्या वेळेला । म्हटले टळला । मृत्यू तुझा ॥३३॥
तापाची लक्षणे । उतरली आणि । आली कांही शक्ति । आश्चर्य तें ॥३४॥
मृत्यूचा जबडा । फाडूनी मजला । काढीले म्हणत । भक्त झाला ॥३५॥

एकदा दर्शना । ब्राम्हण आलेला । विधिनिषेधांच्या । गांठी मनी ॥३६॥
एक काळे कुत्रे । वाटेत मेलेले । पहा याला कां न । उचलले ॥३७॥
कोणालाही खंत । नाही शिवाशिव । उगाच कीं आलो । ऐशा गांवा ॥३८॥
जाणूनीया मन । स्वामी अचानक । ब्राम्हणासमोर । स्वतः उभे ॥३९॥
म्हणती कशास । व्हावे बा दुश्चित्त । कुत्रे हें जिवंत । झोपलेलें ॥४०॥
चला आणूं पाणी । म्हणत पाऊल । टाकता कुत्र्यास । स्पर्श झाला ॥४१॥
कुत्रें तें उठलें । ब्राम्हण दिङ्मूढ । पश्चात्ताप त्यास । तेव्हां झाला ॥४२॥
योग्यतेची जाण । नसताना निंदा । केली त्या खंतेने । क्षमा मागे ॥४३॥

नमो गजानना । अठरावा अध्याय । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥४४॥

अध्याय १९
नमो गजानना । आपल्या कृपेने । सुरू अध्याय हा । एकोणीसावा ॥१॥ 

खामगांवाहूनी । काशिनाथ आला । लक्षणें पाहूनी । आनंदला ॥२॥
वडिलानी होती । जैसी सांगितली । तैसीच देखीली । स्वामींचीही ॥३॥
त्यावेळी स्वामीनी । म्हटले तयास । तारवाला तुझी । वाट पाहे ॥४॥
काम झाले तुझे । त्यांच्या बोलण्य़ाचा । अर्थ नाही आला । त्यास ध्यानी ॥५॥
गांवीं परततां । मिळाल्या तारेचा । मजकूर होता । मुन्सफीचा ॥६॥

धनिक गोपाळ । बुट्टीने स्वामीना । नेऊन कोंडीलें । नागपुरी ॥७॥
ब्राम्हणभोजने । नित्य भजनेंही । शेगांवकराना । मज्जावचि ॥८॥
उदास लोकांनी । शेगांवी जमून । हरि पाटलास । विनविलें ॥९॥
जत्था घेऊनीया । पाटील पोंचलें । बुट्टींचे सदनी । नागपुरी ॥१०॥
ढकलूनी दिला । द्वारपाल आणि । पंक्तीत शिरला । भक्तगण ॥११॥
स्वामीही स्वतःच । उठोनीया मिठी । मारते जाहले । पाटलास ॥१२॥
स्वामीनीच केले । लोकांचे स्वागत । पाहूनी बुट्टीनी । जाणीलें कीं ॥१३॥
भरल्या ताटांचा । नको अवमान । दीन विनवणी । करी तेव्हां ॥१४॥
हरी पाटलास । बुट्टीनी म्हटलें । सर्वानी प्रसाद । घ्यावा बरें ॥१५॥
निघतां स्वामीनी । पत्नी जानकीस । पुत्रप्राप्तीवर । प्रेमें दिला ॥१६॥

परतीचे मार्गी । रघुजी भोसले । भेटले तेथील । संस्थानिक ॥१७॥
शेगांवी नंतर । कितीक तपस्वी । आणि साधु येती । भेटावया ॥१८॥
वासुदेवानंद । सरस्वती यांचे । येण्याचे माहीत । झाले तेव्हां ॥१९॥
प्रसंग साधून । शंका कितीएक । विचारीता झाला । बाळाभाऊ ॥२०॥
कर्म भक्ति ज्ञान । त्यास विवरीले । मार्ग वेगळाले । साध्य एक ॥२१॥

साळूबाईलागी । स्वैपाकाची रीती । सांगीतली अन्न । प्रिय होण्या ॥२२॥
जलंब गांवीच्या । आत्मारामें होते । वेद शिकलेले । गंगातीरी ॥२३॥
उच्चारी प्रमाद । होतां लगोलग । सुधारून देती । स्वामी त्याला ॥२४॥
थोरवी कळतां । स्वामीसेवी रत । राहीला शेगांवी । कायमचा ॥२५॥
सारी मिळकत । मठास अर्पिली । विचार टाकीले । बाकी सारे ॥२६॥
आणीकही दोघे । असेच देऊनी । सारी मालमत्ता । धन्य झाले ॥२७॥

मारुतीपंतांचे । बाळापुरी शेत । राखायाचे काम । तिमाजीस ॥२८॥
डोळा लागला नि । नाहीच कळले । गाढवें शिरली । कुंभाराची ॥२९॥
निद्रेतच हांक । स्वामीनी दिधली । अदृश्यही झाले । लगेचच ॥३०॥
जोंधळ्याची रास । अर्धी फस्त झाली । कबूली कथिली । तिमाजीने ॥३१॥
शेगांवी जाण्याचे । मारुतीपंतांचे । मनी असल्याने । बोलले ना ॥३२॥
स्वामीनी स्वतःच । पिकाची नासाडी । तिमाजीची खूण । सांगीतली ॥३३॥
व्हावें क्षमावंत । धरावी सबूरी । स्वामींचा मानीला । उपदेश ॥३४॥

बाळापुरीं स्वामी । सुखलालाचिये । बैठकी बैसले । अवधूत ॥३५॥
नारायणनामें । हवालदारास । त्यांना पाहूनीया । चीड आली ॥३६॥
स्वामीना जोशात । झोडपलें त्याने । जरी समजावी । हुंडीवाला ॥३७॥
साधूला मारून । सर्वनाशालाच । कशास देतोसी । आमंत्रण ॥३८॥
ऐकलेच नाही । पुढे झाली दैना । आप्तेष्ट निमाले । स्वतः सुद्धा ॥३९॥

संगमनेरच्या । हरी जाखाडीच्या । मनांत रमली । विवाहेच्छा ॥४०॥
इच्छेची तुच्छता । पाहून थुंकले । तरीही तथास्तु । वर दिला ॥४१॥

वासुदेव बेन्द्रे । आणि त्यांचा मित्र । रामचंद्र नाम । निमोणकर ॥४२॥
संचार करीत । आले अरण्यात । मुकना निर्झर । तिथे होता ॥४३॥
स्थान तें प्रसिद्ध । कपिलधारातीर्थ । योगाभ्यासीं रस । रामचंद्रा ॥४४॥
समोर देखतां । योगीराज ध्यानी । प्रणाम करूनी । उगा उभा ॥४५॥
त्याचे मनोगत । जाणूनी योग्याने । नेत्र उघडले । समाधानें ॥४६॥
एक चित्रपट । तांबडा खडाही । रामचंद्रालागी । भेट दिला ॥४७॥
योगीराज झाला । क्षणैकात गुप्त । पुन्हा तो दिसला । नाशकात ॥४८॥
कोण तुम्ही प्रश्नी । नर्मदेचा खडा । दिला तो मीच बा । गजानन ॥४९॥
धुमाळांचे घरी । पुनश्च दिसतां । रामचंद्र सांगे । अनुभव ॥५०॥
धुमाळ सांगती । खड्याचे करावें । नेमाने पूजन । भावपूर्ण ॥५१॥

शेगांवी कोकाटे । तुकाराम यांना । संतति जगत । नाही चिंता ॥५२॥
नवस बोलले । जगेल संतति । करीन अर्पण । एक तुला ॥५३॥
बोलल्या नवसा । विसर पडतां । वडील मुलगा । अत्यवस्थ ॥५४।
आठव जाहला । बोलले हा पुत्र । नारायण तुज । अर्पीयेला ॥५५॥
व्याधी बरी झाली । मठद्वारी त्याला । सोडीला आजन्म । सेवेसाठी ॥५६॥

एकोणीश्शे दहा । साली पंढरीस । आषाढीनिमित्ते । होते आले ॥५७॥
विठ्ठला म्हणाले । भाद्रपदमासी । यावेसे वाटते । वैकुंठास ॥५८॥
स्वामींचे नयनी । पाहूनीया अश्रु । हरी पाटलास । चिंता झाली ॥५९॥
तुजला विषय । नाही कळायचा । संगत आपुली । थोडी आतां ॥६०॥
परतल्यावर । गणेशचतुर्थी । सणाची प्रतिष्ठा । झाली तेव्हां ॥६१॥
स्वामीनी लोकाना । म्हटले आजचा । दिवस समजा । अखेरचा ॥६२॥
गेलो ऐसे मनी । कधीही न आणा । केवळ देहाचे । विसर्जन ॥६३॥
पंचमीचे दिनी । बाळाभाऊ यांसी । निजासनी केलें । स्थानापन्न ॥६४॥
"जय गजानन" । ऐसे बोलोनीया । अचल शरीरें । समाधिस्थ ॥६५॥

भक्तानी पालखी । वाहूनी शेगांवी । दर्शन गांवास । घडवीलें ॥६६॥
परिमल द्रव्यें । मूर्तीस सिंचूनी । समाधीचे जागीं । विसावली ॥६७॥

नमो गजानना । एकोणीसावा हा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥६८॥

अध्याय २०
नमो गजानना । आपल्या कृपेने । आरंभ वीसाव्या । अध्यायास ॥१॥ 

शरीर टाकलें । तरी श्रद्धावंता । दर्शन दृष्टांत । अजूनही ॥२॥

शेगांवी कोठाडे । नांव गणपत । दुकानधारक । भक्त एक ॥३॥
असेच एकदा । मनी आले त्यास । घालावें भोजन । ब्राम्हणास ॥४॥
अभिषेक आणि । भोजनासाठीचे । सामान मठात । पाठवीले ॥५॥
पत्नी करे टीका । वाऊगा हा खर्च । अशाने संसार । चालेल कां ॥६॥
पत्नीचे विचार । इतुके वेगळे । असतां सचिंत । गणपत ॥७॥
स्वामीनी पत्नीस । दृष्टांत देऊनी । छळूं नको ऐसे । सांगीतलें ॥८॥
पतीने योजीले । परमार्थकार्य । अहित ना होणे । तेणें कांही ॥९॥
सकाळीं उठतां । तिने तो दृष्टांत । स्वप्नीचा पतीस । सांगीतला ॥१०॥
चिंता ती संपली । साथसंगतीनें । केला परमार्थ । आनंदानें ॥११॥

लक्ष्मण जांजळ । नामक भक्ताला । घराचा वैताग । आला होता ॥१२॥
व्यापाराचे कामी । मुंबैस आलेला । घरी परताया । स्टेशनात ॥१३॥
परमहंसांच्या । वेषांत स्वामीनी । हटकले त्याला । अचानक ॥१४॥
स्वामींच्या शिष्याने । हताश कां व्हावें । जावें परतोनी । विश्वासाने ॥१५॥
सांगूनीया खुणा । आणीकही त्याची । विश्वास नि श्रद्धा । दृढ केली ॥१६॥
खाली वांकूनीया । नमन करीतों । स्वामी अंतर्धान । पावलेले ॥१७॥
तेव्हापासूनीया । जांजळ करीतो । नेमाने साजरी । पुण्यतिथी ॥१८॥

जोशी अधिकारी । काम आटपोनी । बैलगाडीने कीं । निघालेले ॥१९॥
वाटेत उठले । वादळ नदीला । पूर आला गाडी । जावी कैसी ॥२०॥
गाडीवान तरी । होता भयभीत । जोशींचा आग्रह । जाया हवें ॥२१॥
पाणी चढतेच । बैल बिथरले । गाडीवान सोडे । कासराही ॥२२॥
दोघेही मिळून । डोळे मिटूनीया । करताती धावा । गजानना ॥२३॥
आश्चर्य जाहले । डोळे उघडतां । होते शेगांवात । सुखरूप ॥२४॥
साक्ष पटल्याने । ब्राम्हणभोजन । आणि दानधर्म । केला बहु ॥२५॥

यादव गणेश । सुभेदार याना । कपाशीधंद्यात । झाला तोटा ॥२६॥
वर्ध्यात मित्राचे । आसिरकरांचे । घरी बसलेले । चिंतेतच ॥२७॥
लोचट म्हातारा । भिकारी मागतो । आणीक आणीक । भिक्षा किती ॥२८॥
प्रचंड तोट्याने । आधीच त्रासलों । तेंही सांगीतलें । भिका-यास ॥२९॥
गजानन देता । नको कांही शंका । स्थिती सुधारेल । पहा कैसी ॥३०॥
भिक्षेकरी गुप्त । झाला कोठे गेला । ओळख स्वामींची । देऊनीया ॥३१॥
कपाशीला तेजी । पुन्हा आली नफा । प्रचंड जाहला । यादवास ॥३२॥

डॉक्टर कुंवर । राजारामभाऊ । जाई खामगांवा । नोकरीस ॥३३॥
तेल्हा-यापासून । निघतां वाटेत । शेगांवी दर्शन । समाधीचे ॥३४॥
एकदा प्रसाद । अव्हेरूनी गेला । मार्गच चुकला । अपरात्री ॥३५॥
मनोमनी क्षमा । मागीतली तेव्हां । सहजचि आला । शेगांवात ॥३६॥
प्रसाद घेऊनी । पुनश्च निघाला । मुक्कामी पोचला । व्यवस्थित ॥३७॥

भावसार ह्यांचा । एकच वर्षाचा । बाळ दिनकर । व्याधिग्रस्त ॥३८॥
उपाय थकले । एकच कर्तव्य । समाधीचे द्वारी । ठेवीयेले ॥३९॥
बाप रतनशाने । नवस बोलीला । पांच रुपयांचा । काकुळती ॥४०॥
ना तरी मस्तक । फोडीन बोलला । चळवळ करी । बाळ तेव्हां ॥४१॥
आधी निपचित । होता पडलेला । सजीव जाहली । गात्रे सारी ॥४२॥

उदाहरणांचा । नाही तुटवडा । रामचंद्रकन्या । चंद्रभागा ॥४३॥
प्रसूती जवळ । असताना तिला । नवज्वरव्याधी । बाधली कीं ॥४४॥
उपाय थकतां । पाटील पोरीस । तीर्थ नि अंगारा । देता झाला ॥४५॥
पत्नीही पीडित । वातविकाराने । वेडीपिशी वागे । निरुपायें ॥४६॥
रामचंद्र करी । सूचना तिजला । प्रदक्षिणा घाली । समाधीस ॥४७॥
पतीची सूचना । मानीता विकार । कांही दिवसांत । बरा झाला ॥४८॥
नवस फेडणे । व्हावें विधियुक्त । बाळाभाऊ यांचा । अधिकार ॥४९॥
नंतर दृष्टांतें । नांदुरे गांवीचा । नारायण माळी । यांचेकडे ॥५०॥

नमो गजानना । अध्याय वीसावा । मनी दृढ व्हावा । प्रार्थना गा ॥५१॥
अध्याय २१
नमो गजानना । आपल्या कृपेने । एकवीसाव्याची । सुरवात ॥१॥ 

स्वामी दिवंगत । तरीही चालूच । भक्तांची काळजी । वाहणेचे ॥२॥

मंदीर बांधता । मजूराचे हाती । दगड असतां । तोल गेला ॥३॥
लागले रे काय । लोक विचारती । मजूर म्हणतो । मुळी नाही ॥४॥
कोणीतरी मला । अल्गद धरीले । जमीनीवरती । ठेवीयेले ॥५॥
स्वामीनीच माझा । केला प्रतिपाळ । कामात अपेश । नाही आले ॥६॥

राजस्थानामध्ये । जयपूर गांवी । बाईला सतावे । भूतबाधा ॥७॥
दत्तात्रेय देती । स्वप्नात दृष्टांत । जाई शेगांवास । लाभदायी ॥८॥
रामनवमीचा । मुहूर्त धरावा । पिशाच्चाची मुक्ति । होईल गे ॥९॥
अश्मस्तंभ उभे । करायाचे काम । उत्सवाकारणे । थांबलेले ॥१०॥
खांबास टेकूनी । होती बाई उभी । खांब सरकला । गर्दीमुळे ॥११॥
खांबाची शिळाच । पडली तिजवर । कष्टाने लोकांनी । हटवीली ॥१२॥
ऐसी जड शिळा । अंगावर येतां । जाहले असेल । तिचे काय ॥१३॥
आश्चर्य ती होती । सुरक्षित परि । दणका पिशाच्चा । पत्थराचा ॥१४॥

नाईकनवरे । यांचेही मस्तकी । तुळई पडली । मंडपाची ॥१५॥
जणूं हार कोणी । शिरी चढवीला । असेच गमले । त्याना तरी ॥१६॥

एकदा पाटील । रामचंद्रांकडे । भुकेला गोसावी । दारी आला ॥१७॥
पाटील चाणाक्ष । ओळखीले स्वामी । भोजन सत्वर । वाढीयेले ॥१८॥
दक्षिणा म्हणून । पांच रुप्ये दिले । गोसावी सांगतो । ही तो नको ॥१९॥
मठात हिशेब । ठेवण्याचे काम । झाले पाहीजे तें । सचोटीने ॥२०॥
सारा व्यवहार । नीट संभाळावा । सेवा तीच माझी । दक्षिणा बा ॥२१॥

जेथे जेथे माझे । उच्छिष्ट सांडले । द्रव्याचा वाहेल । पूर तिथे ॥२२॥

पुत्राचे गळ्यात । ताईत बांधला । पत्नीसही दिले । समाधान ॥२३॥
सारे बजावूनी । निरोप घेतला । गोसावी पावला । अंतर्धान ॥२४॥

बत्तीस वर्षांचे । सदेह जीवन । आजही अखंड । कृपामय ॥२५॥
ऐशा चरित्राचे । होवो पारायण । वाढो भक्तिभाव । समाधानें ॥२६॥
सारे जग असो । सुखी निरामय । चरणी प्रार्थना । गजानना ॥२७॥

-o-O-o-

No comments: