पाउलें चालती शिरडीची वाट !!
मुंबई ते शिर्डी २२ नोव्हेंबर २००९ ते २९ नोव्हेंबर २००९
श्री साई-श्रद्धा पदयात्रिक सेवा मंडळ, गोराई, बोरीवली (पश्चिम) यांच्याबरोबर केलेल्या पदयात्रेचे
स्वानुभव-निवेदन सौ. सरस्वती अभ्यंकर, दिंडोशी, मुंबई
खरं तर, या पदयात्रिक मंडळाच्या पदयात्रेबरोबर २००७ साली आम्ही साऊळ विहिरीपासून ते खंडोबाचे मंदिरात पालखी नाच व नंतर समाधीमध्ये साई-दर्शन हा छोटासा अनुभव घेतलेला होता. तेव्हांपासून मुंबई ते शिर्डी अशी संपूर्ण पदयात्रा हा काय अनुभव असतो, तो घ्यावा असा विचार तेव्हांपासूनच मनांत घोळत होता. गेल्या वर्षी मुक्ता पण (आव्हाड)सरांच्याबरोबर पदयात्रा करून आलेली होती. यंदाही ती दोघं जाणारच होती. त्यामुळं मोठ्या विश्वासाची सोबत होती. एकंदरीनं यंदा आपण पण जायचंच असा हिय्याच केला, असं म्हणायला हरकत नाहीं. इतके सगळे जण मिळून जातात, त्यांच्याबरोबर जायचं, असं तें इतकं सोपं असणार नव्हतं, याची कांहीशी धास्तीही मनात होती. शिवाय आतां वयाची साठी उलटून गेल्यामुळे कसं काय झेपेल, ही मोठी शंका होतीच. मग असंही मनांत आलं, कीं झेपायचं असेल, तर आत्तांच झेपेल.
दस-याच्या निमित्तानं हणजे २८ सप्टेंबर २००९ दिवशी सरांनी साईंची चरणपूजा त्यांच्या घरीच ठेवली होती. संध्याकाळी आरती-प्रसादाला मंडळाचे संस्थापक श्री. गुरुनाथ गाड स्वतः आले होते. सरानी आम्हाला सांगितलंच होतं, कीं श्री. गाड यांच्याशी ओळख होणं महत्त्वाचं आहे. नुसतीच ओळख नव्हे, तर ते कांहीं मोलाचे मार्गदर्शनही देतील. त्याप्रमाणं त्यांच्याशी ओळख झाल्या-झाल्या त्यांनी आम्हां नव्यानं पदयात्रेत सामील होऊं इच्छिणा-यांच्याकडे एक नजर टाकून म्हणाले, जमेल तुम्हाला, पण हेंही स्पष्टच सांगितलं कीं, उद्यापासूनच तुम्हाला दररोज साधारण ५-६ किलोमीटर तरी चालायचा सराव करायला सुरवात केली पाहिजे. आधी दीड-दोन किलोमीटर आणि वाढवत वाढवत ५-६ किलोमीटर पर्यंतचा सराव व्हायला पाहिजे. पदयात्रेत जाण्याची इच्छा असणा-या प्रत्येकाने दोन फोटो व फॉर्म भरून द्यायचा होता. पोलिसाना पण तशी सविस्तर माहिती द्यावी लागते, हें तेव्हां समजलं. आता चालण्याचा सराव करायला बरोबर ७ आठवड्यांचा अवधी हाताशी होता. सरानी आणि श्री. गाढ यानी पण, हें पण आग्रहानं सांगितलं कीं, जी पादत्राणें घालून तुम्ही पदयात्रा करणार असाल, ती घालूनच सराव करा. पदयात्रेसाठी म्हणून खास नवीन पादत्राणें त्यावेळी वापरायली काढलीत तर त्यांचा जास्त त्रास होईल.
तेव्हांच मुक्ताबरोबर ठरवलं कीं आरे कॉलनीत गांवदेवीचं देऊळ आहे, तिथपर्यंत जाऊन यायचं. सरांचा तर गेल्या ब-याच वर्षांचा दैनंदिन ठेकाच असतो, दररोज १२-१ किलोमीटर रपेटीचा. त्यांनी पहिल्या दिवशी गांवदेवीच्या देवळापर्यंत नेलं. तिथून ते त्यांच्या रोजच्या वाटेला गेले. मी व मुक्ता परत येताना रिक्षानं परतलो. हचरेकरांचं मात्र कौतुक होतं, कीं पहिल्याच दिवशी ते सरांच्याबरोबर संपूर्ण ११-१२ किलोमीटरचा फेरफटका करून आले. दुसरे दिवशी ते येतील की नाही, असं वाटत होतं. पण आले. त्यांच्याकडे पाहून आमचीही हिम्मत वाढत गेली. व गांवदेवीला जाऊन येणं, म्हणजे ५-६ किलोमीटरचं अंतर अंगवळणीच पडून गेलं.
सकाळचं फिरणं झालं कीं झालं, असंही नव्हतं. पदयात्रा कशी असेल असा विचार मनात यायचाच. एके दिवशी हरचेकर म्हणाले, आपण सकाळचं चालतोय तें ठीक आहे. पण पदयात्रेमध्ये आपल्याला संध्याकाळी पण चालायचं आहे. तें काल लक्षात आल्यावर संध्याकाळी ओबेरॉय् मॉल् च्या बाजूने हाय्-वे कडे जाऊन मोहन गोखले रस्त्यानं फेरी करून आलो. तेव्हां आम्ही पण ठरवलं कीं आपण पण संध्याकाळी सुद्धां किती चालूं शकतो तें पहायला पाहिजे.
मध्यंतरीच्या काळात, मंडळाच्या दोन सभाही झाल्या. काय काय सामान बरोबर असावे लागेल, यासंबंधी सूचना मिळाल्या. मंडळाचे कार्यकर्ते, वाटेत कुठे कुठे थांबायचे, तिथे पदयात्रिकांची खानपानाची, विश्रांतीची कायकाय सोय असेल, याविषयी ठिकठिकाणच्या भक्तमंडळींना भेटून सर्व व्यवस्थेची खातरजमा करून आलेले होते.
आणि अखेर आम्ही खूप उत्सुकतेने वाट पहात होतो, तो रविवार २२ नोव्हेंबर २००९ चा दिवस उजाडला. सकाळी ६॥ वाजताच सगळे पदयात्री श्री. गाड यांच्या निवासस्थानी हजर झाले होते. साईंच्या पादुकांची पालखी सुंदर फुलानी सजवलेली होती. श्री. गाढ-भाऊंच्या घरालाच नव्हे तर आजूबाजूलाही सणाचे स्वरूप आले होते. मंडळाचा बॅनर व ध्वज लाऊन तीन टेंपो सज्ज होते. जोडीला श्री. म्हात्रे यांची कार पण होती. सर्वानी आपापले सामान टेंपोमध्ये ठेवायला दिले, तें एका टेंपोत. दुस-या टेंपोत नाश्ता-जेवणें यासाठीची शिधासामग्री आणि तिस-या टेंपोत मिनरल् वॉटरच्या बाटल्या, प्रथमोपचाराची पेटी, नव्या को-या २ डझन मध्यम आकाराच्या बादल्या, वगैरे. याच टेंपोला सर्चलाइट्ची पण व्यवस्था होती. मंडळाच्या कार्यकर्त्याना पदयात्रेचं किती डीटेल्ड प्लॅनिंग करावं लागतं, ह्याचं ते तीन टेंपो म्हणजे चालतं-बोलतं प्रदर्शनच होतं. श्री साईनाथमहाराजकी जय अशा उद्घोषात सर्वात पुढे पालखी, तिच्यामागे ध्वज, त्यामागे पदयात्री अशी पदयात्रेला सुरवात झाली. हो, पालखीमागच्या ध्वजाच्यापुढें कुणीच कधी जायचं नाहीं, हाही पदयात्रेचा महत्त्वाचा नियम.
तिथून पालखी गोराई येथीलच साईमंदिरात आली. तेथे प्रार्थना, आरती करून अल्पोपहारानंतर पुढे एका सोसायटीत असलेल्या साईमंदिरात पालखी पोंचल्यावर तिथल्या रहिवाशानी सर्व पदयांत्रींचे चहा-पाणी देऊन स्वागत केले. पुढे गोराई खाडीजवळील साईमंदिराचे दर्शन करून पदयात्रा वजीरा नाक्याजवळील गणेश मंदिरात श्रीगजाननाचे दर्शन घेऊन पुढे निघाली. तेव्हा सकाळ्चे १०॥ झाले होते. वाटेत एके ठिकाणी थोडी विश्रान्ती घेऊन मग मात्र पालखी निघाली आमच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठीकाणी, म्हणजेच मंडळाचे अध्यक्ष श्री अजय पाटील याच्या य़ोगेश्वर सोसायटी, कान्दरपाडा लिंक रोड, दहिसर (पश्चिम) इथे पोंचली तेव्हा दुपारचे साधारण १२ वाजले होते. तिथल्या रहिवाशानी पालखीचे जंगी स्वागत केले. केळीचे खांब रांगोळ्या काढून सर्वच आवार सुशोभित केलेलं होतं. पालखी उतरण्याची व्यवस्था बेसमेंटमध्ये होती. दुपारची आरती करून सर्व पदयात्रीना (सुमारे ८० जणाना) प्रसादाचे जेवण दिले गेले. मग थोडी विश्रांती, नंतर चहापान करून ४॥ चे सुमारास पालखी निघाली. संध्याकाळी ६॥ चे सुमारास आम्ही घोडबंदर रोडवरील "एक्स्प्रेस् इन्" या हॉटेलच्या आवारात पोंचलो. तेथे एक पदयात्री श्री. जोशी यांच्या मातोश्री, मिसेस् व भगिनी या सर्वांतर्फे इडली-चटणी व मसाला दूध असा नाश्ता दिला गेला. मग सातचे सुमारास सांजारती करून आम्ही कूच केले ते थेट रात्रीच्या भाइंदरपाडा श्रीदत्तमंदिराजवळील श्री. भोईर यांच्याकडील मुक्कामाकडे.
निघण्याआधी कार्यकर्त्यानी सर्व पदयात्रीना फ्लूओरेसेंट जॅकेट्स् ओळखपत्रे व हॅट्स् या गोष्टी दिल्या. रात्रीच्या पादचा-यांसाठी किती महत्त्वाच्या गोष्टी नाही कां ? केव्हांही कुठेही रात्रीचं पायी जायचं असेल, तर ह्या गोष्टी लक्षात ठेऊन बरोबर असाव्यात ! शिवाय सर्वांनी दोन-दोनांच्या ओळीनी चालायचं. अगदी शाळेतल्या मुलांना चालवतात तसं. हा सर्व रस्ता म्हणजे एका बाजूला दाट झाडी आणि डोंगर तर दुसरीकडे दूरवर समुद्राची खाडी. शुक्ल षष्ठीचं चांदणं तें काय असणार ? त्यामुळं तसा अंधारच होता. पण घोडबंदर रोडवर वाहनांची रहदारी बरीच असते. त्यामुळं अंधार फार जाणवला नाहीं. रात्री ९-९॥ चे सुमारास पदयात्रा मुक्कामाला पोंचली. श्री. गाढ यांच्या घरापासून एव्हाना २१ कि.मी अंतर आलेलों होतो. जेवणं करून निद्राधीन होणार त्याआधी सूचना मिळाली कीं पहाटे ३ वाजतां पहिली शिट्टी होईल. श्री. भोईर यांचं घर म्हणजे प्रशस्त वाडाच आहे. महिला पदयात्रींची झोपायची सोय त्यांच्या घरातच केली होती.
सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर, पदयात्रेचा दुसरा दिवस
सूचनेप्रमाणें बरोबर तीन वाजतां शिट्टी झाली व आम्ही सर्वजणी ताड्कन् उठलों. आन्हिकं आवरून, चहापान करून सर्वजण पालखीपाशी जमलों. पूजा-आरती करून ३॥ च्या सुमारास यात्रा निघाली सुद्धा. सकाळी ८॥ च्या सुमारास वाटेतील एका सोसायटीत थोडा वेळ मुक्काम झाला. आज नाश्त्याला पोहे होते. आरती करून पुन्हा निघालो, तें ११॥ च्या सुमारास श्रीसाईबाबा मंदिर, भिवंडी-कल्याण फाटा येथे पोंचलों. (गोराईपासून ३५ कि.मी.) तिथे सर्वानी आंघोळी केल्या. दुपारचीच आंघोळ असल्यामुळे, गरम पाणी हवे असं पण वाटलं नाही. ६॥-७ तासांच्या २०-२२ कि.मी. चालण्यानंतर आंघोळ करतांना खूप बरं वाटत होतं. मध्यान्हीची आरती करून सर्वांची जेवणं झाली व मग वामकुक्षी.
रात्रीचा मुक्काम पडघा इथे होता. गाढ-भाऊ सांगायचेच कीं एकदा पडघा गाठलं कीं आपण शिर्डीला पोंचलोच समजायचं. विश्रांतीनंतर ठीक ३॥ वाजता प्रस्थान ठेवलं. वाटेत लिंबू-सरबत पी, संत्रे खा, चहा पी, असें करत पाय चालत होते. पण पायांना खरी लय मिळत होती, ती "श्री साई, जय साई" अशा स्वतःच्याच जपाची. आणि एकदाचें पडघ्याला श्री. बिडवी यांच्याकडे पोंचलों. तिथे पोचणारे आम्ही सीनियर सिटिझन्स हेच शेवटचे होतो. पण पोंचलो. आजच्या दिवसभराचे अंतर ४५-५० कि.मी. झालेले होते. बाप रे!! खरंच आपण इतकं चाललो ? खरं तर, जेवणही नको, लहान बाळासारखे पाय हळुवार कुरवाळावेत आणि सरळ झोपून जावें असे वाटत होते. पण सरांनी आग्रह केला. थोडे तरी खा. उद्या परत असाच बराच पल्ला आहे. मनात आले, बाप रे!! पण सरानी धीर दिला. पडघा तर आलं. मग थोडं तोंडावर पाणी मारून जरा फ्रेशन्-अप् झालों. जेवण केलं. "अन्नदाता सुखी भव" हें अनाहूतपणे मनात उमटलं. पायाला थोडा मसाज केला आणि झोपून गेलों.
रात्री मधेच जाग आली. वाटलं, अरे अजून शिट्टी कशी झाली नाही. शिट्टी वाजली कीं जाग येते किंवा जाग आली असेल तर शिट्टी वाजली असणार असंच मनांत ठसलं होतं.
तिसरा दिवस मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २००९
नेहमीप्रमाणे ३॥ च्या सुमारास चालायला सुरवात केली. चालणं हें आतां अंगवळणी पडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे जपाबरोबर गाणी भेंड्या अधूनमधून होऊं लागल्या. सकाळी ११ च्या सुमारास शहापुरात (गोराईपासून ८० कि.मी.) पोंचलों. दोन-दोनांच्या ओळीनें गावांत प्रवेश केला. रस्त्याने सुद्धा लोक पालखी थांबवून दर्शन घ्यायचे. शहापुरात श्री. परदेशी यांच्या वाड्यावर दुपारची आरती भोजन विश्रांती असे नियोजन होते. हो, श्री. परदेशी राहतात तो वाडा लोकमान्य टिळकांच्या भगिनींचा. छान सुस्थितीत आहे.
आज श्री. हरचेकरांच्या लग्नाचा वाढदिवस होता. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पण फॅमिलीतर्फे सगळ्याना जिलेबीची व्यवस्था केली. आणखी एक पदयात्री लंडनला परीक्षा देऊन आले होते. त्यांचा रिझल्ट् ही त्यांना आजच समजला. ते उत्तम उत्तीर्ण झालेले होते. साईनी कृपाप्रसाद दिला होता.
आज दुस-या टप्प्यात शहापूरचा घाट चढायचा होता. त्यामुळे व्यवस्थित जेवण करून विश्रांतीसाठी पहुडलों. ३ च्या सुमारास चहा घेऊन ३॥ च्या सुमारास कूच करायला सगळेजण तयार होते. अर्थात् निघण्या अगोदर शहापूरच्या प्रसिद्ध लस्सीचा आस्वाद घ्यायला कुणी चुकणार कसे ? चालणं सुरूं झालं. ४ ते ५॥ च्या दरम्यान उतरत्या उन्हाचा थोडा त्रास वाटला. संध्याकाळनंतर इतक्या मोठ्या सुदूर रस्त्याला दिवे कसे असणार. अमेरिकेत सुद्धा नाहीत. पण रात्री व पहाटे आतां चांदणं बरं असायचं. रात्री ९॥-९॥। च्या सुमारास खर्डीला (गोराईपासून १०० कि.मी.) श्री. देसाई यांच्याकडे पोंचलों. अर्थात् आम्ही सीनियर सिटीझन्स नेहमीप्रमाणें लेट लतीफच होतो. अर्ध्या अधिक लोकांची झोपायची सुद्धा तयारी झालेली होती. आम्ही जेवणें केली, पायांना मसाज केला व झोपेच्या अधीन झालों.
गेले दोन दिवस रोजचे ४५-५० कि.मी. चालणें झाल्यानें पायांना थोडे फोडही आलेले होते. पण सरानीं सांगितलं, कीं फोडूं नका. आपोआप बसतील. तें जास्त बरं. एरव्ही फोड फोडले तर, पाणी निघते. तिथे ओलेपणा राहतो व धूळ जंतू गेले तर उपद्व्याप होतो. अशा अनुभवी टिप्स् मिळाल्या. त्याचंही समाधान वाटलं.
चौथा दिवस बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २००९
दुपारपर्यंत लतीफवाडीला पोंचायचें होते. कसारा घाट चढताना उन्हं पण जाणवत होती. विचार आला, हिमालय चढताना शेर्पा कसे बरं चढत असतील, तेंही पाठीवर सामान घेऊन ? लगेच उत्तर आलं, थोडं पुढे झुकून ! आमच्याकडे कांहीं तसं सामान नव्हतं. पाण्याची बाटली, स्वेटर, जॅकेट्, टोपी अशा वर लागणा-या गोष्टी असलेली शबनम तेवढीच काय ती होती. तीही पाठीकडे सरकवून थोडं पुढे वाकून चालायचं बघितलं. आणि खरंच चालणं थोडं सोपं वाटूं लागलं. आणि पोंचलो लतीफवाडीला. (गोराईपासून १२० कि.मी.)
आज घाट चढायला सुरूं करण्याअगोदरच श्री. पांडे यांच्याकडे सकाळचा नाश्ताच नव्हे तर आंघोळीही झालेल्या होत्या. त्यामुळे लतीफवाडीला आरती आणि जेवणं झाल्यावर सर्वानी विश्रांती घेतली. इथें श्री. हरचेकरानी "गुरूचे श्रेष्ठत्व" हा विषय गोष्टींचे दाखले देत सुंदरपणे सांगितला. त्यांची विषयाची मांडणी करण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.
इथून पुढे इगतपुरीचा घाट चढायचा होता. घाट तसा अवघड, कारण घाटातील चढण दम काढणारी आहे. शिवाय वाहनांची रहदारी पण बरीच असतेच. मग पदयात्रीनी एक कल्पना काढली. दोन-दोनांच्या रांगा केल्या व सर्वानी मिळून भजन करीत पुढे जात रहायचें, दिंडीप्रमाणें. कोणी फार मागे नाही, कोणी फार पुढे नाही. भजनाच्या तालात पावलांना पण थिरक आली होती. महिला पण मागे नव्हत्या. कांहीनी फुगड्या घातल्या, कांहींचे नाच पण झाले. ढोलकीवादक श्री. कदम यांचे वादन इतके अप्रतीम होते कीं सर्वानीच त्याना भरभरून दाद दिली. चढण कधी संपली तें कळले सुद्धा नाही. आजूबाजूला हिरवा-गार प्रदेश, एका बाजूला डोंगर, तर दुस-या बाजूला दरी आणि खालून जाणारी रेल्वे लाइन. सगळीकडे वनराईचा वास दरवळत होता. १०० टक्के प्रदूषणविरहित हवा ! छाती भरभरून शुद्ध हवा घेण्यात काय मजा असते, तें शब्दांत काय सांगावं ? घाटात उतरणीवर एका गुरे घराकडे परत नेणा-या कातकरी बाईबरोबर तिचा १२-१३ वर्षाचा मुलगा होता. त्याच्या हातात क्रिकेटची बॅट् होती, त्यानं स्वतः बनवलेली. बॅटीला लाल आणि हिरवा रंग लावून तिचा तिरंगाही केलेला होता. देशभरात खेड्यापाड्यात सुद्धा क्रिकेट् किती लोकप्रिय आहे याचा अजून काय दाखला हवा ? त्या मुलाबरोबर थोड्या गप्पा मारताना त्यानं हें पण सांगितलं कीं बॅटीला लावलेले रंग पण झाडाच्या पाना पासून तयार केलेले होते.
आजच्या संध्याकाळच्या चालण्याच्या वेळी गाण्याच्या भेंड्या खेळताना समजलं, कीं सराना खूप गाणी येतात. चांदणं पडलं तसं आकाशातले, सप्तर्षी, व्याधाचा बाण, मृगनक्षत्र असं सगळं बघतबघत जरा रमतगमत चालत होतो. साधारणपणे ९ च्या सुमाराला इगतपुरीला श्री. दळवींच्याकडे पोंचलों. (गोराईपासून १५० कि.मी.) त्यांच्याकडे जेवणाचा सुंदर मेनू होता - शिरा, पुलाव, कोशिंबीर, वगैरे. रात्री झोपायला बारा वाजले. महिलांची सोय घराच्या पडवीत आणि पुरुषांची अंगणात. पांघरूण ओढणार एवढ्यात गाढ-भाऊ सांगत होते, कीं उद्याची शिट्टी पहाटे ३ च्या ऐवजी २ लाच होईल. मुली म्हणाल्या, दोनच तास उरलेत. मग झोपायचं कशाला ? पण आम्ही झोपलों.
पांचवा दिवस, गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २००९
शिट्टी झाली तसे सगळे उठलो. इथे पाण्याचा त्रास आहे. लोकांनी टाक्या केल्या आहेत. पण आडात नाही, तर पोह-यात कुठून अशीच परिस्थिति असते. आणि एकदम इतकी मंडळी आली म्हणजे मोठी अडचणच. पण, श्री, दळवींसारखे भक्त श्रद्धेच्या आधारावर अडचणींचा पाढा वाचत बसत नाहीत. हें पाहून समजतं कीं श्रद्धेचं बळ काय असतं.
ठरल्याप्रमाणे पहाटे २॥-३ ला चालायला सुरवात केली. पालखी केव्हांच पुढे निघालेली होती. इगतपुरीला हाय्-वे ओलांडून घोटीच्या रस्त्याने धामणगांवला (गोराईपासून १७० कि.मी.) पोचायचे होते. ह्या वाटेत धुक्याचा एक सुखद अनुभव घेतला. समोरून अंगावर येणारे धुके क्षणात मागचा पुढचा रस्ता हरवून टाकायचे.
वाटेत इतर पदयात्रीनी बेफिकीरपणे टाकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि इकडेतिकडे केलेली घाण पाहिल्यावर आमच्या मंडळाच्या लोकांनी नव्याको-या बादल्या कां घेतल्या होत्या तो त्यांचा दूरदर्शीपणा व कांटेकोरपणा न बोलता न सांगता मनात ठसून गेला.
दुपारी धामणगांवला श्री. गाढवे यांच्याकडे आरती, जेवण, विश्रांती.
संध्याकाळचा रस्ता हा कांही हमरस्ता नव्हता. पण मुखी साईनाम आणि पायांना गति. ७॥ च्या सुमारास वाटेत एका मारुतीमंदिरात सायंआरती झाली. पुढें एके ठिकाणी एका गांवातील लोकानी पालखी थांबवून, सर्व पदयात्रीना दूध, केळी, उपासाचे सांडगे-पापड असा फराळ देऊन स्वागत केले. रात्री १० ला श्री. गीते यांच्याकडे मुक्काम झाला. (गोराईपासून १८५ कि.मी.) आचा-यानी सुंदर जेवण बनवलेले होते. गीते यांचे घर प्रशस्त ! त्यामुळे सर्वांची झोपायची चांगली सोय झाली.
सहावा दिवस शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २००९
ठरल्याप्रमाणे ३ वाजता शिट्टी वाजली. खरं तर जाग यायचीच. लहानपणापासूनच असं ब्रम्हमुहूर्ताला उठून अभ्यास करायची संवय असती, तर कुठे पोंचलो असतो ?!
आताशी, "अजून किती अंतर ?" हें विचारायचं सोडून दिलं गेलं होतं. सुरवातीला विचारायची. आणि उत्तर मिळायचं, "तें काय ? तो खांब दिसतो ना, तिथंपर्यंत." मग कधी तो खांब झाड व्हायचा, कधी घर, कधी विजेच्या तारेवरचा पक्षी !
आता रस्त्याला इतर ठिकाणाहून निघालेले इतर मंडळांचे पदयात्री भेटायचे. दुपारी मणेगांव सिन्नर येथे (गोराईपासून २१० कि.मी.) पोंचलों. दिवसा-ढवळ्या पोंचलों असं हें पहिलं मोठं शहर. त्याआधी, मधे कुठे तरी शीघ्रकवी श्री. नामदेवबुवा पदयात्रेत सामील झालेले होते. जेवणानंतर त्यांच्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला.
श्री. आव्हाड सरांचे नातेवाईक भेटायला आलेले. सिन्नरमधून निघायला बराच उशीरच झाला, जवळजवळ १॥ तास. रात्रीचा मुक्काम पांगरी येथे मंडळानं स्वतः उभारलेल्या "श्रीसाईश्रद्धा कुटीर" या प्रशस्त वास्तूत मुक्काम झाला. (गोराईपासून २२५ कि.मी.)
सातवा दिवस शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २००९
पहाटे ३॥ च्या सुमारास चालायला सुरवात झाली. चढत्या उन्हात एका पदयात्रीच्या नाकातून रक्त येऊं लागले. पण विशेष सीरियस् नव्हते. थोड्या वेळानें थांबले सुद्धा. आणखी एक सीनियर सिटिझन् बाकावर बसले असताना पाहतापाहता जमिनीवर पडलेच. त्याना चक्कर आल्याचं आजूबाजूच्यांच्या लगेचच लक्षात आलं. कांदा हुंगायला आणि वर्तमानपत्रानं वारं दिल्यावर तेही सांवरले.
दुपारचा मुक्काम पाथरी येथील वनराई हॉटेलमध्ये झाला. (गोराईपासून २४० कि.मी.) मध्यान्ह आरतीनंतर जेवणामध्ये वनराईचे मालक श्री. जोशी यांच्याकडून बाजरीची भाकरी होती. पदयात्रेमध्ये अशा प्रत्येक पदार्थाचं, पक्वान्न नसला तरी, खूप अप्रूप वाटतं खरं. संध्याकाळी चालायला सुरवात करण्याआधी अनुभवकथन व सूचनांचा कार्यक्रम हॉटेलच्या आवारातच मंडळानं मुद्दाम ठेवला होता. सगळी व्यवस्था चोखच होती. त्यामुळं सूचना अशा नव्हत्याच. पण पदयात्रींचे अनुभव रेकॉर्ड करून संकलित करायला हवे होते, असें वाटले.
रात्रीचा मुक्काम देरडे येथे श्री. इनामके यांच्याकडे झाला. (गोराईपासून २६० कि.मी.) श्री. इनामके यांनी पालखीच्या स्वागतासाठी घरासमोर चक्क मोठा मांडव घातलेला होता. त्यांच्याकडे पालखी येणार म्हणून त्यांचे पाहुणे-रावळे पण आलेले होते. मोठ्या मुंबईतल्या कुठल्याशा कोप-यातल्या गोराईहून आलेली श्री साईंची पालखी. पण श्रीसाईंची पालखी म्हटलं कीं बाकी सगळे संदर्भ निरर्थक मानणारी ही खेडोपाडीची मंडळी. असाच आहे आपला देश, अशाच भावूक साध्या-भोळ्या गांवक-यांचा. हीच आपली संस्कृति आहे. संस्कृतीची आणखी वेगळी व्याख्या कशाला शोधायची ?
जेवणाला पोळ्या, भाकरी, भरलेल्या वांग्यांची भाजी आणि गोड पदार्थ म्हणून शिरा होता. मस्तच होता. सगळ्यानीच तावच मारला, असं म्हटलं पाहिजे. झोप अर्थातच छान झाली.
झोप छान लागण्याचं खरं कारण हेंही होतं कीं उद्यां पहाटे ३ वाजता शिट्टी वाजणार नव्हती. कारण शिर्डी इथून फक्त २० कि.मी. वर, हो, फक्त २० कि.मी.वर होती. त्यामुळे सकाळि ६-६॥ ला पालखी निघाली तरी चालणार होते. कारण सकाळच्या वेळी साऊळ विहिरीपर्यंत १५ कि.मी. जायचं होतं.
आठवा दिवस रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २००९
सर्व महिलावर्गानं गरम पाण्यानं मस्त आंघोळी केल्या. सगळ्यांचाच मुड् फ्रेश् आणि रिलॅक्स्ड् होता. ६॥-७ वाजतां निघून वाटेत संत्री, पेरू, डाळिंबं असे स्टॉल् लागले कीं, थांबत, एकंदरीनं रमतगमत १०॥-११ च्या सुमारास साऊळ विहिरीला श्री. के. सी. पाण्डे यांचेकडे पोचलों. (गोराईपासून २७५ कि.मी.) साऊळ विहिरीचा उल्लेख श्रीसाईसच्च्ररितात आलेला आहे. तात्यां कोते बाबांची अनुमति न घेतां शिर्डी सोडतात. पण त्यांच्या घोड्याला साऊळ विहिरीजवळ लटका भरतो. ज्यानी श्रीसाईसच्चरित् वाचलेलं आहे, त्यांना सहजपणें भावतं, कीं, "ही कां ती साऊळ विहीर.?"
मला तर तिथं साऊळ विहीर फाट्याला पोंचल्यावरंच मनात आलं, "साईराम भेटला आपल्याला." निघतानाच मनात होतं, "Now or never". वाढत्या वयात यानंतर शरीर किती साथ देईल, ह्याचा काय भरंवसा धरायचा ? तसं गाडीनं वगैरे येणं होईलही. पण मुंबई ते शिर्डी चालत ? हंऽऽऽ इथवर तर आलों. आलों कसले ? त्या अद्भुत शक्तीने आणलं. कृतार्थता डोळ्यातून वहात होती. मुक्ताच्या पण तें लक्षांत आलं. बोलली नाही. पाठीवर हात मात्र ठेवलान्.
बहुतेकांचे नातेवाईक रविवार सुट्टीचा दिवस असल्याने, "येऊं" म्हणाले होते. आले सुद्धा. मुक्ताचा सत्यजित, मनालीला व तिच्या आई-वडिलाना घेऊन आला. सर्वच पदयात्रीना नातेवाइकांकडून स्नेही-संबंधींकडून कौतुक ऐकण्यानं मोठं समाधान वाटत होतं. त्यामुळं जेवणं झाल्यावर विश्रांती हवी असं कुणालाच वाटत नव्हतं सगळीकडे गप्पागोष्टीना जणूं ऊत आला होता.
३॥-४ च्या सुमाराला सगळे पुन्हा उठले. शिर्डीत श्रीसाईदर्शनाचा सोहळा अनुभवायचा होता. त्यामुळं महिलाच नव्हे तर पुरुषवर्ग सुद्धा परीटघडीचे वेगळे बांधून आणलेले कपडे घालून तयार झाले. नामदेवबुवांचा भजनरंग झाला. टाळा पण होत्या. त्यांची पण साथ झाली. मग शेवटच्या ५ कि.मी. साठी नेहमीप्रमाणे रांगा लागल्या. बॅण्डही होता आणि फटाके पण. अगदी शोभायात्राच सजली. पण निघण्यापूर्वी कृतज्ञतेचा व क्षमायाचनेचा हृद्य सोहळा सुरूं झाला. या सात-आठ दिवसात आपल्या हातून चुकूनही कुणी दुखावलं गेलं असेल तर माफी असावी म्हणून प्रत्येक पदयात्री दुस-या प्रत्येकाची पाया पडून माफी मागत होता. मोठेसुद्धा निःसंकोचपणें लहानांच्या पण पाया पडत होते. खरं तर सर्वजण सगळ्याना नांवानिशी ओळखत होते, असंही नव्हतं. तरी पण, क्षमायाचनेत कृतज्ञतेत पूर्ण स्वाभाविकता होती. आम्ही सर्व सहयात्री होतो, त्या एका साईरामाचे. ही ओळख कमी कां होती ?
मग वाजतगाजत दिंडी निघाली. ५ कि.मी.चें अंतर केव्हां संपले, तें कळलेसुद्धा नाहीं. प्रथम खंडोबाच्या देवळात पालखी आली. ह्या खंडोबाच्या देवळाचे तेव्हांचे पुजारी भगत म्हाळसापति ह्यानी चांदपाटलाच्या व-हाडासोबत आलेल्या बाबांचे "आवो साई" असें अनाहूतपणें म्हणत स्वागत काय केले, बाबांचे त्यानी नामकरणच केले. बाबा "साईबाबा" झाले.
पालखी खंडोबाला प्रदक्षिणा करून येईतोंवर कित्येक पुरुष गाभा-यापासून देवळाच्या उंबरठ्यापर्यंत पालखीच्या मार्गात पालथे पडलेले होते. पालखी त्यांच्या पाठीवरून गेली, तेव्हां सहजपणें "जय साई" म्हणत प्रत्येकानं तो पदन्यास झेलला. प्रयेकाला त्या मालिशीनं धन्य वाटलेलं होतं, त्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.
द्वारकामाईत म्हणजे समाधीमंदिरात भक्तांची रीघ नेहमीच असते. पण पदयात्रींना दर्शनासाठी स्वतंत्र प्रवेश देतात. श्रीसाईंचे भावपूर्ण दर्शन घेऊन, पालखी चावडीकडे गेली. तिथे महिलाना प्रवेश नसतो. महिलावर्ग चावडीच्या बाहेर थांबला. तिथून पालखी नियोजित शेवटच्या सम्मेलनाच्या जागी पोंचली. तिथेच पदयात्रेचे विसर्जन झाले. सर्वानी काहीशा जड अंतःकरणानंच एकमेकाचा निरोप घेतला.
मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मनांत काय चाललं असेल, त्यावेळी ? म्हणत असतील ना, "येणार ना पुढल्या वर्षी ? श्री साईश्रद्धा पदयात्रिक सेवा मंडळ आपल्या सेवेची पुन्हा संधि द्याल, म्हणून आतूरच असेल."
जय साईराम !