हरिः ॐ
रामायणातील सुंदरकाण्डाची ही अभंगरचना
(१)
प्रथम वंदन । सदा कार्यारंभी । देवाधिदेवास । गणेशास ॥१॥
तसेच वंदन । रामा रघुराया । सर्वथा कृपाळु । जगदीशा ॥२॥
नमन आणिक । अञ्जनीसुतास । भक्तांमध्ये श्रेष्ठ । हनुमान ॥३॥
वंदन वाल्मीकि । ऋषीना त्यांचीच । जग उद्धाराया । रामकथा ॥४॥
ऋषींची महत्ता । खरी त्यांची कथा । होण्यासाठी होती । अवतार ॥५॥
आणिक वंदन । तुलसीदासाना । चरित मानस । रचियेले ॥६॥
(२)
रामायणामध्ये । पहा सात काण्डे । आधी बालकाण्ड । अयोध्याकाण्ड ॥७॥
अरण्यकाण्ड नि । किष्किंधाकाण्डही । सुंदरकाण्ड नि । युद्धकाण्ड ॥८॥
उत्तरकाण्ड गा । साती काण्डातही । सुंदरकाण्ड तें । कौतुकाचे ॥९॥
सुंदरकाण्डात । हनुमान गेला । सीतेस शोधाया । लंकेकडे ॥१०॥
अष्टौ सिद्धी सा-या । वापरून कैसे । रामदूत काज । निभावले ॥११॥
पाहूं ते सगळे । सुंदरकाण्डाची । अभंगरचना । करूनीया ॥१२॥
(३)
सुंदरकाण्ड हें । किष्किंधाकाण्डाचा । संदर्भ घेऊन । सुरूं होते ॥१३॥
म्हणूनी पाहिला । पाहिजे प्रसंग । किष्किंधाकाण्डाचे । अखेरीचा ॥१४॥
जटायूचा भाऊ । सम्पति सांगतो । रावण लंकेस । सीतेसह ॥१५॥
सभा तेव्हां झाली । आतां शोध हवा । लंकेस जाऊन । करायला ॥१६॥
अंगद म्हणाला । जाईन मी सज्ज । विश्वास ठेवा कीं । मजवरी ॥१७॥
जांबवंत तरी । पाहती मारुति । बोलत कां नाहीं । गप्प गप्प ॥१८॥
स्तुति आरंभिली । पवनसुताची । विवेकी विज्ञानी । बलभीमा ॥१९॥
कोणतेही काज । तुजसाठी नाही । कठीण हें तरी । सर्वमान्य ॥२०॥
पर्वताएवढा । मोठाही होशील । लहान होतोसी । माशीसम ॥२१॥
अणिमा गरिमा । लघिमा महिमा । ईशित्व वशित्व । प्राकाम्यता ॥२२॥
कामावसायिता । ऐशा आठी सिद्धी । वरताती तुज । भक्तश्रेष्ठा ॥२३॥
रामकाजासाठी । अवतार तुझा । तेजःपुंज देह । सूर्यासम ॥२४॥
लंकेस जाऊनी । रावणा मारूनी । आणणे त्रिकूट । उखाडूनी ॥२५॥
हें सारे शक्य । केवळ तुजसी । सीतेची अवस्था । पहा तरी ॥२६॥
(४)
जांबवंतानी जें । केले आवाहन । ऐकूनि मारुति । संतोषला ॥२७॥
म्हणाला आभार । मित्रा जांबवंता । जाण मज दिली । कार्य काय ॥२८॥
सीतामाईचे मी । दर्शन घेऊन । येईन तोंवर । विश्राम ना ॥२९॥
खाऊं कीं दोघेही । कंदमुळें साथ । आत्ता तरी लंका । गांठायची ॥३०॥
सर्वाना वंदन । करूनी निघाला । कपिवर आला । प्रभूंकडे ॥३१॥
रामानी दिधली । खुणेस आंगठी । आणि यशस्वी हो । आशिर्वाद ॥३२॥
(५)
हनुमान आला । समुद्रकिनारी । फुगविली छाती । महाश्वासें ॥३३॥
हृदयी आसन । दिलें रघुनाथा । घेतलें उड्डाण । दक्षिणेस ॥३४॥
झेप घेण्यासाठी । पर्वताचे माथी । जोर दिला कांहीं । हनुमानें ॥३५॥
तेवढ्या दाबाने । पर्वत दबला । पहा पाताळात । पोहोंचला ॥३६॥
सागर पाहतो । हा तो रामदूत । आकाशमार्गाने । निघाला कीं ॥३७॥
मैनक पर्वता । त्याने सांगितले । विसावा देण्यास । ऊठ बरा ॥३८॥
सागराचे जळी । फँवारा उडाला । मैनक उठला । उंच-उंच ॥३९॥
मारुति म्हणाले । आभार मैनका । परि मज आतां । विश्राम ना ॥४०॥
लंकेस जाईन । शोधून काढीन । सीतामाई कोठे । आहे कैसी ॥४१॥
मनी आता नाही । दुसरा विचार । परतेन तेव्हां । पुन्हा भेटूं ॥४२॥
अलगद हात । मैनका लावून । मारुति वेगाने । पुढे गेला ॥४३॥
(६)
मनोवेगे जातो । हनुमान देखा । कौतुके पाहती । देवगण ॥४४॥
परीक्षा पहावी । त्याच्या त्या निष्ठेची । ऐसे मनी आले । देवाजींच्या ॥४५॥
सुरसा नांवाच्या । सर्पिणीस त्यांनी । धाडीले मार्गच । अडविण्या ॥४६॥
मारुतीचे पुढे । ठाकली सर्पीण । जबडा थोरला । पसरूनी ॥४७॥
वाटले तिजला । जबडा पाहूनी । घाबरेल आता । हनुमान ॥४८॥
म्हणाली वानरा । निघालास कुठे । गिळून टाकाया । आले तुज ॥४९॥
मारुती कां कधी । संकट पाहूनी । घाबरूनी काज । त्यजेल बा ॥५०॥
त्याने केला देह । जबड्यापेक्षाही । दुप्पटसा मोठा । क्षणार्धात ॥५१॥
तिनेही जबडा । आणि मोठा केला । तरीही दुप्पट । हनुमंत ॥५२॥
आणिक जबडा । तिने पसरता । माशीसम छोटा । हनुमंत ॥५३॥
करी सर्पिणीचे । कानी गुणगुण । परत जाताना । भेटूंच कीं ॥५४॥
आत्ता तरी मज । जाऊं दे ना माये । प्रभूचे कामास । लगबग ॥५५॥
सुरसा म्हणाली । यशस्वी हो बाळा । परीक्षा मी केली । उत्तीर्ण तूं ॥५६॥
रावणाची लंका । आहे मोहमाया । भयाणही आहे । सावध जा ॥५७॥
देवानाही आहे । काळजी मनात । रावण पाहिजे । संपविला ॥५८॥
म्हणून देवानी । मला पाठविले । सावध करण्या । परीक्षेने ॥५९॥
श्रीरामाचे काम । करशील नीट । ।विश्वास वाटतो । मला सुद्धा ॥६०॥
ऐसा सुरसीचा । आशिष मिळता । मारुति निघाला । भरारीने ॥६१॥
(७)
लंकेजवळील । सागरात एक । राक्षसी कपटी । रहातसे ॥६२॥
नभी उडणा-या । पक्षांची प्रतिमा । पाण्यात पाहूनी । झेप घेई ॥६३॥
चट्टामट्टा करी । कितीक पक्षांचा । दैनंदिन तिचा । उपद्व्याप ॥६४॥
तसाच प्रयोग । हनुमंतावर । करण्याचा बेत । तिचा होता ॥६५॥
परन्तु चकवा । देऊनी तिजला । आघात करूनी । मारीयेले ॥६६॥
(८)
समुद्राचे काठी । होती वनराई । मनास मोहन । घालणारी ॥६७॥
वानर जातीस । सहज भुरळ । घालील ऐसीच । होती शोभा ॥६८॥
पण वायुसुता । नव्हती उसंत । क्षणभरसुद्धा । थांबण्यास ॥६९॥
डोंगरानजीक । दिसला किल्ल्याचा । भला मोठा तट । उंचापुरा ॥७०॥
साधासा वानर । होऊनी मारुति । चढला डोंगर । माथ्यावरी ॥७१॥
तटाजवळील । एका वृक्षावर । बसूनी करीतो । निरीक्षण ॥७२॥
निशाचरांच्या त्या । वस्तीच्या रक्षणा । धिप्पाड राक्षस । सारीकडे ॥७३॥
मायावीही होते । त्यातील कितीक । अंतर्ज्ञानाने ते । ध्यानी आले ॥७४॥
राजवाडा कोठे । तिथेच असेल । सीतामाईस कां । कोंडलेले ॥७५॥
सूर्यास्त होईल । आता इतुक्यात । अंधारात कोणा । दिसेन ना ॥७६॥
तरीही मच्छर । होऊनी सर्वत्र । संचार करावा । हेंच बरें ॥७७॥
तोंवरी अंदाज । घेऊं सारीकडे । व्यवस्था कैसी बा । रावणाची ॥७८॥
झाडांच्या फांद्यांना । झोके देत जाणे । वानरास तरी । काम सोपे ॥७९॥
महाल दिसले । छोटे मोठे ऐसे । ज्याचा जैसा हुद्दा । तेणे रीती ॥८०॥
गर्द झाडीमागे । आणि एक तट । दिसला तिथे कां । राजवाडा ॥८१॥
मारुति निघाला । तिकडेच जाण्या । द्वारीच लंकिणी । राक्षसीण ॥८२॥
वानरा तूं कोठे । ऐसा निघालास । सारे पशूपक्षी । खाद्य माझे ॥८३॥
चुकवूनी माझी । नजर कुणीही । नाहीच जायाचे । नेम आहे ॥८४॥
तिच्या वल्गनेस । उत्तर म्हणून । जोरदार ठोसा । लगावला ॥८५॥
सा-याच प्रश्नांची । उत्तरे शब्दात । नाही कांही देत । बसायाचे ॥८६॥
विवेक तो सारा । मारुतीस होता । अवगत त्याने । तैसे केले ॥८७॥
जबड्याचे तिच्या । दात निखळले । हा तरी वानर । साधा नव्हे ॥८८॥
अचानक एक । पुराण प्रसंग । आठवूनी म्हणे । मारुतीला ॥८९॥
ब्रम्हाने रावणा । वर जरी दिला । मलाही संकेत । खास दिला ॥९०॥
जेव्हा तुज कोणा । वानराचा ठोसा । पडेल जाण तूं । संकेत तो ॥९१॥
राक्षसकुळाच्या । नाशाचीच नांदी । प्रभूचें दर्शन । तुज जाण ॥९२॥
धन्य मी जाहलें । रामदूताचे कीं । दर्शन जाहलें । हनुमंता ॥९३॥
अडवूं शकेल । नाही तुज कोणी । तरीही जाई गा । संभाळून ॥९४॥
(९)
घेऊनीया मग । अति लघुरूप । सतत स्मरण । श्रीरामाचे ॥९५॥
करीत निघाला । नगर धुंडण्या । कोठे कां दिसेल । सीतामाई ॥९६॥
घराघरामध्ये । महाली महाली । धुंडीत चाललें । लघुरूप ॥९७॥
एका प्रासादात । स्वतः दशानन । पाहीला जाताना । शयनास ॥९८॥
तिथे तरी नाही । दिसली वैदेही । कांहीसे हायसे । वाटलेही ॥९९॥
धुंडीत राहीला । इकडे तिकडे । लघुरूपामुळे । वेळ लागे ॥१००॥
नाही उमगले । किती वेळ गेला । ब्रम्हमुहूर्तही । सुरू झाला ॥१०१॥
(१०)
एका प्रासादात । सारेच आगळे । सर्वत्र पावित्र्य । दाटलेले ॥१०२॥
ईशान्य दिशेस । नेटक्या देऊळी । हरीची मूरत । विराजित ॥१०३॥
छोट्या वृंदावनी । तुळस साजिरी । पणती तेवती । कोनाड्यात ॥१०४॥
देवाचीये दारी । उभा क्षणभरी । नमन करूनी । निघणार ॥१०५॥
तेव्हाच वाटले । कोणी जागे झाले । कानी आले शब्द । जय श्रीराम ॥१०६॥
कपि चमकला । ऐसा श्रद्धापूर्ण । इथे आहे कोण । रामभक्त ॥१०७॥
ओळख घ्यावी का । ह्याची करूनीया । कालापव्यय हा । ठरूं नये ॥१०८॥
कदाचित ह्याची । ओळख झाल्यास । मदत होईल । निजकामी ॥१०९॥
रामभक्त येतो । वाटले बाहेर । प्रासादाचे दारी । पोहोचला ॥११०॥
हनुमंत घेई । ब्राम्हणाचे रूप । मंद मंद बोले । रामजप ॥१११॥
यजमान आले । पुसती विप्रास । रामप्रहरास । कैसे आले ॥११२॥
वाटते प्रभूनी । मजवरी कृपा । करूनी आपणा । धाडीयेले ॥११३॥
किंवा कां स्वतःच । प्रभू रामचंद्र । माझे दारी आज । प्रकटले ॥११४॥
ऐसी रामभक्ती । पाहूनी मारुति । ओळख आपुली । देता झाला ॥११५॥
यजमानानीही । ओळख दिधली । रावणाचा भ्राता । विभीषण ॥११६॥
मारुतीने मग । सांगीतले कैसे । प्रभूंचे दर्शन । त्यास झाले ॥११७॥
सीतेस शोधणे । आहे काम मज । कृपया दावावा । मार्ग मज ॥११८॥
विभीषण तेव्हां । सांगते जाहले । अशोकवनात । सीतामाई ॥११९॥
पाळत ठेवतो । रावण कैसेनी । खबरदारीही । कैसी हवी ॥१२०॥
विभीषण देती । यशाचा आशिष । निरोप दिधला । सौहार्दाने ॥१२१॥
(११)
अशोकवनात । थेट पोहोचला । देखीयेली दीन । सीतामाई ॥१२२॥
रोडावला देह । डोईवर जटा । एक वेणी देखे । पादांगुष्ठ ॥१२३॥
राक्षसिणी चार । होत्या पहा-यास । आतां केव्हां कैसा । पुढे होऊं ॥१२४॥
नजर टाकतां । इकडेतिकडे । रावणाची स्वारी । येतां दिसे ॥१२५॥
रावण बोलला । साम दाम दण्ड । भेद सा-या नीति । चतुराई ॥१२६॥
म्हणे एकवार । पाही मजकडे । राम काय तुझा । मजसम ॥१२७॥
शिवाय देशील । मजसी नजर । कौतुक करेन । पहा कैसे ॥१२८॥
सा-या माझ्या राण्या । मंदोदरी सुद्धा । दासी होतील त्या । तुझे पायी ॥१२९॥
गवताची पात । ओठास धरून । स्मरूनीया मनी । रघुपति ॥१३०॥
म्हणे दशानना । काजवा करेल । किती टिमटिम । त्याने काय ॥१३१॥
कमळ फुलेल । कल्पनाच नाही । रामाचे बाणाची । तुज कांहीं ॥१३२॥
शिवधनुष्य तें । छातीवरी येता । पंचप्राण तुझे । कासावीस ॥१३३॥
विसरलास तूं । तेंच की धनुष्य । मोडले रामाचे । हाती कैसे ॥१३४॥
परि तुज नाही । कांही सुद्धा लाज । कपटाने मज । आणीयले ॥१३५॥
रावणा संताप । जाहला म्हणाला । इथे राम परि । येत नाही ॥१३६॥
पुन्हा त्या रामाचे । नाव माझ्यापुढे । घेशील छाटीन । जीभ तुझी ॥१३७॥
ऐसी देऊनीया । ताकीद सीतेस । धपाधप पाय । आपटीत ॥१३८॥
रावण निघून । गेला तेव्हां सा-या । राक्षसिणी सुद्धा । घाबरल्या ॥१३९॥
(१२)
एका स्त्रीचे दुःख । स्त्रीच समजते । राक्षसिणीनाही । तैसे झाले ॥१४०॥
त्यांच्यामध्ये होती । राक्षसीण एक । त्रिजटा नांवाची । रामभक्त ॥१४१॥
तिला म्हणे एक । स्वप्न कीं पडले । वानर जाळीतो । लंका सारी ॥१४२॥
रावणाची दशा । आणीक भयाण । वीस बाहु त्याचे । कापलेले ॥१४३॥
तैसा ओरडत । जाई दक्षिणेस । लंका राख आता । विभीषणा ॥१४४॥
सीता म्हणे तीस । नव्हे स्वप्न मात्र । प्रत्यक्ष असेच । घडेलही ॥१४५॥
सीतेचे बोलणे । ऐकूनी सा-याच । सीतेचे चरणी । गोळा झाल्या ॥१४६॥
जळेल कां लंका । खरेच गे सीते । कोणी सुद्धा नाही । उरणार ॥१४७॥
सीतेने म्हटले । त्रिजटेचे स्वप्न । ऐकूनी बोलले । अचानक ॥१४८॥
मला तरी आता । जीणे नको वाटे । त्याने ऐसे बोल । उमटले ॥१४९॥
त्याचे तुम्ही मनी । घेऊं नका कांही । सख्यांचे वाईट । चिंतेन कां ॥१५०॥
सीतेने दिलासा । दिल्याने सगळ्या । आपापल्या जागी । गेल्या सा-या ॥१५१॥
त्रिजटा एकटी । राहीली तिजला । म्हणे सीतामाई । काकुळती ॥१५२॥
खरेच वाटते । आता नको जीणे । रच एक चिता । माझ्यासाठी ॥१५३॥
विरहयातना । असह्य झाल्यात । प्रभूस दया कां । येत नाही ॥१५४॥
त्रिजटा म्हणाली । भलतेच काय । रामावरी नाही । विश्वास कां ॥१५५॥
शिवाय पहा ना । चिता पेटविण्या । विस्तव रात्रीस । मिळेल कां ॥१५६॥
ऐसे बोलूनीया । निघूनही गेली । त्रिजटा आपुल्या । घराकडे ॥१५७॥
यातनांची आग । मनास जाळीते । विस्तव कां नाही । चितेसाठी ॥१५८॥
ऐशा विचाराने । सीतेच्या मनाची । आणीक जाहली । तडफड ॥१५९॥
आकाश पेटले । ता-यानी दिसते । एकही ना येत । पृथ्वीवर ॥१६०॥
झाडानो तुम्ही ना । नांवाचे अशोक । आपुले नांव कीं । करा सार्थ ॥१६१॥
सीतेचा पाहूनी । विलाप कपीस । वाटला तो क्षण । युगासम ॥१६२॥
(१३)
काय करावेसा । विचार करीत । अंगठी टाकली । मारुतीने ॥१६३॥
सीतेने घेतली । उचलून हाती । खूण ओळखली । प्रभूंची ही ॥१६४॥
आत्ता इथे कैसी । आली ही अंगठी । शंका नि आश्चर्य । मनी तिच्या ॥१६५॥
इतुक्यात आले । मंद स्वर कानी । श्रीरामनामाचा । जपचि तो ॥१६६॥
कोण रामभक्त । इथे आसपास । प्रकट कां नाही । तुम्ही होत ॥१६७॥
आज्ञा ती मानून । कर जोडोनीया । समोरी ठाकले । कपिरूप ॥१६८॥
मारुतीने सारी । कथा सांगितली । धाडीले रामानी । खुणेसह ॥१६९॥
विश्वास दिधला । सक्षेम आहेत । राम नि लक्ष्मण । कोठे कैसे ॥१७०॥
सीतामाई तुझा । शोध हा तो झाला । आता आहे घेणे । अंदाजही ॥१७१॥
राक्षससेनेचा । कैसे तिचे बल । कमकुवतता । काही कैसी ॥१७२॥
सीतेच्या मनात । आली काही शंका । राक्षससेनेचा । अंदाज तूं ॥१७३॥
वानर साधासा । कैसा बा घेशील । वाटे सानमुखी। मोठा घास ॥१७४॥
क्षमा करी माये । दावीतो नमुना । रामानी मजला । परखले ॥१७५॥
ऐसे म्हणूनीया । काही उग्ररूप । तिजला केवळ । दिसेलसे ॥१७६॥
दावीले सीताही । धास्तावली कांही । म्हणे क्षमा करी । हनुमाना ॥१७७॥
तेव्हा पुन्हा साधा । होऊनी वानर । म्हणे सीतामाई । आशिष दे ॥१७८॥
आणीक विनंति । साधीशीच आहे । भूक फार आहे । लागलेली ॥१७९॥
इथे झाडांवरी । फळे लगडली । आहेतही खूप । वाटे खावी ॥१८०॥
तुझ्या अनुज्ञेने । भूक भागवावी । देई गे अनुज्ञा । प्रार्थितो मी ॥१८१॥
इथे परि पहा । विक्राळ राक्षस । पहारा ठेवण्या । नेमलेले ॥१८२॥
त्यांची कांही भीती । मला न वाटते । केवळ अनुज्ञा । तुझी हवी ॥१८३॥
लडिवाळ त्याचा । आग्रह पाहून । वात्सल्य दाटलें । तिचे मनी ॥१८४॥
बरें जा घेई जें । हवें तें खाऊन । संभाळूनि राही । एवढेच ॥१८५॥
नमन करूनी । आशिष घेऊनी । अशोकवनात । आला कपि ॥१८६॥
(१४)
फळे चाखताना । मुद्दामच बिया । राक्षसाना मारी । वेडावीत ॥१८७॥
छोटी मोठी झाडे । उपटली तेव्हां । राक्षस चिडले । मारण्यास ॥१८८॥
झाडांच्या फांद्याच । घेऊनीया हाती । लढाई त्यांच्याशी । आरंभिली ॥१८९॥
कितीक जणाना । जागी लोळवीले । भ्यालेले पळाले । ओरडत ॥१९०॥
साध्या वानराने । उच्छाद मांडला । अशोकवनात । नासधूस ॥१९१॥
कितीक राक्षस । लोळवीले त्याने । आवरत नाही । कोणा मुळी ॥१९२॥
दरबारातही । वार्ता पोहोचली । कसला गोंधळ । काय झाले ॥१९३॥
रावणाने एक । सेनेची तुकडी । अशोकवनात । पाठविली ॥१९४॥
मारुती करीतो । सैनिकांची थट्टा । कधी घोर रूप । कधी साधा ॥१९५॥
सैनिक दिङ्मूढ । कैसी चालवावी । तल्वार करावा । कोठे वार ॥१९६॥
भालेही फेकले । त्यांचे तर त्याने । तुकडेच केले । जैसे ऊंस ॥१९७॥
काही भाले तर । उलट मारूनी । केले हताहत । सैनिकचि ॥१९८॥
वार्ता ती ऐकून । रावण चिडला । म्हणाला अक्षास । राजपुत्रा ॥१९९॥
जाई ये बघून । काय प्रकरण । आण तूं बांधून । वानरास ॥२००॥
जैसा अक्ष आला । अशोकवनात । काही त्याचे ध्यानी । येण्या आधी ॥२०१॥
मारुती शिरला । त्याचे पायामध्ये । प्रचंड होऊनी । फेकीयेले ॥२०२॥
जंगलात अक्ष । जाऊनी पडला । घाबरूनी सेना । पलटली ॥२०३॥
पळणा-यानाही । नाहीच सोडले । फटके मारूनी । पाडीयेले ॥२०४॥
अक्षाचा जाहला । मृत्यू त्याची वार्ता । जरी रावणास । समजली ॥२०५॥
पुत्रवधाचा त्या । करण्यास शोक । नव्हती उसंत । कोणासही ॥२०६॥
हें तो वाटे युद्ध । एका वानराने । लंकेच्या विरुद्ध । मांडीयेले ॥२०७॥
तेव्हा रावणाने । पुत्र इंद्रजित । यास आज्ञा केली । विजयी हो ॥२०८॥
मारूं नको त्यास । बांधूनीया आण । समजाया हवे । कोण आहे ॥२०९॥
भली मोठी सेना । सवे घेऊनीया । अशोकवनात । मेघनाद ॥२१०॥
आला तरी काय । भीति मारुतीस । सैन्याची दाळण । उडविली ॥२११॥
एक मोठा वृक्ष । भिरकावुनीया । रथाचे तुकडे । झाले क्षणी ॥२१२॥
इंद्रजिताशीच । जाऊनी भिडला । जणू कीं जुंपली । साठमारी ॥२१३॥
मारुतीने एक । ऐसा ठोसा दिला । लंकेशपुत्रास । मूर्च्छा आली ॥२१४॥
सांवरला तेव्हां । ब्रम्हास्त्रच त्याने । संधान साधाया । खडे केले ॥२१५॥
मारुतीने तेव्हा । धरिला विचार । ब्रम्हबाणाचा ह्या । अवमान ॥२१६॥
होणे नव्हे योग्य । म्हणूनी नाटक । भोंवळ आल्याचे । त्याने केले ॥२१७॥
इंद्रजितासही । आठवली आज्ञा । बांधीला वानर । नागपाशें ॥२१८॥
घेऊनीया आला । दरबारामध्ये । सा-या लंकेमध्ये । कुतूहल ॥२१९॥
(१५)
हळूंहळूं डोळे । उघडूनी पाही । मारुती दर्बार । रावणाचा ॥२२०॥
सोन्याच्या पत्र्यानी । हिरेमाणकानी । मढवीले खांब । चोहीकडे ॥२२१॥
रत्नजडितशा । उच्च सिंहासनी । विराजला होता । लंकाधीश ॥२२२॥
पाहूनी वानर । हसला कुत्सित । जरि एक क्षण । दशानन ॥२२३॥
पुत्रवध काय । ऐशा वानराने । केला विषादही । मनी आला ॥२२४॥
लगेच सावध । होऊन रावण । पुसीतो रागाने । वानरास ॥२२५॥
वानरा ठाऊक । नाही काय माझा । दरारा त्रिलोकी । कैसा आहे ॥२२६॥
काय म्हणूनीया । अशोकवनात । उच्छाद मांडला । निष्कारण ॥२२७॥
घेतले कितीक । राक्षसांचे प्राण । देहान्त शिक्षेस । पात्र कृत्य ॥२२८॥
स्वतःच्या प्राणांची । पर्वा तुज नाही । औद्धत्य हें केलें । कोणासाठी ॥२२९॥
(१५-१)
राक्षस मारीले । हें जरी खरें । त्यांत माझा कांहीं । नाही दोष ॥२३०॥
स्वतःच्या जीवाची । असते सर्वाना । काळजी भुकेने । कासावीस ॥२३१॥
झाल्याने फळे मी । तोडत असतां । उगाच मजला । हटकले ॥२३२॥
इतुकेच नव्हे । चाल करूनीया । आले मजवरी । तेव्हा मला ॥२३३॥
स्वतःचे रक्षण । करावे लागले । उगाच जाहली । झोंबाझोंबी ॥२३४॥
राजपुत्रानाही । तूच ना धाडीले । अवसर नाही । मज दिला ॥२३५॥
असो जे जाहले । आता बंधनात । आहे हा समोर । तुझ्यापुढे ॥२३६॥
ऐक दशानना । तू स्वतः जयाच्या । कृपेने लंकेश । म्हणवीतो ॥२३७॥
तीन्ही जगांचा जो । आहे खरा स्वामी । कर्ता-धाता-हर्ता । विश्वाचाच ॥२३८॥
खर नि दूषण । त्रिशिर नि वाली । ऐसे बलशाली । नष्ट केले ॥२३९॥
शिवधनुष्यही । भंगले ज्या हाती । ज्याची सीतामाई । तुझ्या इथे ॥२४०॥
त्याच श्रीरामाचा । दूत हा मी इथे । समज देण्यास । तुज आलो ॥२४१॥
जाणतो रावणा । चरित्र गा तुझे । सहस्रबाहूने । काय केले ॥२४२॥
वालीबरोबर । तुझा जो जाहला । प्रेमप्रसंग तो । जाणतो मी ॥२४३॥
खरे तर होते । वालीने रावण । कांखेमध्ये होता । जखडला ॥२४४॥
दरबारामध्ये । तेही रावणाच्या । वाच्यता करणे । अनुचित ॥२४५॥
जें कां समजावे । समजेल खास । रावण स्वतःच । तेच पुरे ॥२४६॥
तैशा बलशाली । वालीलाही ज्याने । यमसदनास । धाडीयेले ॥२४७॥
त्याच श्रीरामाच्या । दूताचा हा सल्ला । ऐक तूं सीतेस । सोडूनी दे ॥२४८॥
पुलस्ती मुनींचा । नातू असूनही । डागाळूं नकोस । त्यांची कीर्ति ॥२४९॥
श्रीरामांची मूर्ति । हृदयी धरून । शरण तूं जा गा । त्यांचे पायीं ॥२५०॥
तरी दयावंत । प्रभू रामचंद्र । क्षमा करतील । अपराध ॥२५१॥
लंकेचे हें राज्य । देतील तुजला । अखंड भोगाया । भक्तिप्रेमें ॥२५२॥
(१५-२)
जरी रावणाने । मनी समजलें । चरित्र वानर । जाणतो कीं ॥२५३॥
दूत खरोखरी । आहे हा सर्वज्ञ । नव्हे कोणी साधा । वानर हा ॥२५४॥
परि सर्वांपुढे । होतो अवमान । आव्हानच ह्याने । मांडीयेलें ॥२५५॥
याचें आवाहन । मानणे मजला । लंकाधिपतीस । शोभते ना ॥२५६॥
धरूनी आवेश । क्रोध नि संताप । मारुतीस म्हणे । दशानन ॥२५७॥
स्वतःचे मरण । निकट असता । मजसी देतोस । उपदेश ॥२५८॥
कोण्या वानराने । राक्षस मारावे । वरती म्हणावे । रामदूत ॥२५९॥
ढोंग हें असलें । नाही चालणार । कळले पाहिजे । ह्यास नीट ॥२६०॥
राक्षस मारणे । ऐसा घोर गुन्हा । केल्याने तुजला । देहदंड ॥२६१॥
अरे कोणी ह्याला । टाका रे मारूनी । म्हणता राक्षस । पुढे झाले ॥२६२॥
इतुक्यात तिथे । विभीषण आले । म्हणाले थांबा रे । अयोग्य हें ॥२६३॥
खरे असो खोटे । म्हणवीतो दूत । दूतास मारणे । अशिष्ट तें ॥२६४॥
खरे असल्यास । मारण्याने होते । शत्रूस निमित्त । आक्रमणा ॥२६५॥
विवेक धरूनी । शिक्षा बदलावी । विनम्र सूचना । करीतो मी ॥२६६॥
ठीक आहे ऐसे । मान्य करूनीया । रावण बोलला । कुत्सितसे ॥२६७॥
म्हणती वानरा । स्वतःची शेपटी । भारी आवडती । असतसे ॥२६८॥
आग लावूनी द्या । ह्याच्या शेपटीस । म्हणता राक्षस । सर्सावले ॥२६९॥
शेपटीवरती । गुंडाळण्यासाठी । उपरणे दिली । सर्वानीच ॥२७०॥
मारुतीने परि । थट्टा आरंभली । शेपटी करीतो । लांब लांब ॥२७१॥
वस्त्रे गुंडाळली । जिथे त्यावरती । तेलही ओतणे । चाललेले ॥२७२॥
सा-या लंकेतून । उपरणे आली । सर्व घरातून । तेल आले ॥२७३॥
वस्त्रेही संपली । तेलही संपले । शेपटीची लांबी । संपेच ना ॥२७४॥
वस्त्रे गुंडाळून । तेल ओतणारे । राक्षस जाहले । घामाघूम ॥२७५॥
शेवटी म्हणाले । आता हें तो पुरे । लावू आता आग । शेपटीस ॥२७६॥
शेपटीस आग । लागता मारुती । लागला नाचाया । धावू पळू ॥२७७॥
रावणास वाटे । कैसी वानराची । जाहली फजिती । नाचे आता ॥२७८॥
मारुतीचे होते । नाटक केवळ । आगीचे चटके । लागल्याचे ॥२७९॥
परंतु सर्वांचे । देखत आगीचे । डोंबात दर्बार । पेटला कीं ॥२८०॥
पळापळ आता । सुरू जी जाहली । रावणही गेला । महालात ॥२८१॥
उंच एक झेप । घेऊनी मारुती । आला महालाचे । छतावर ॥२८२॥
ह्या छतावरूनी । त्या छतावरती । गेला पेटवीत । लंका सारी ॥२८३॥
लंकेत लोकांची । झाली पळापळ । आरडाओरड । दंगा सारा ॥२८४॥
पवनसुताच्या । सहाय्यास आले । पवन छप्पन्न । चहूंकडे ॥२८५॥
आगीचा भडका । वाढतच गेला । महालीमहाली । पसरला ॥२८६॥
रावणास मुळी । नव्हती कल्पना । परिणाम ऐसा । होईल कीं ॥२८७॥
विनाशकाले ही । विपरीत बुद्धि । पश्चात्तापाचा ना । उपयोग ॥२८८॥
विभीषणासंगे । भेट जाहल्याने । ठाऊक होता ना । त्याचा वाडा ॥२८९॥
तेवढाच वाडा । सोडूनी मारुती । समुद्राचे काठी । पोहोचला ॥२९०॥
पाण्यात सोडूनी । पेटती शेपटी । आग ती टाकली । विझवून ॥२९१॥
(१६)
तेथून पुनश्च । अशोकवनात । सीतामाईपुढे । नमस्कार ॥२९२॥
करीत म्हणाला । प्रभूस सांगावा । आणि काही खूण । द्यावी मज ॥२९३॥
वेणीमध्ये होता । एक चूडामणी । सीतेने काढून । दिला त्यास ॥२९४॥
म्हणाली प्रभूना । देई गा निरोप । आता नाही धीर । राहवत ॥२९५॥
एक मास मात्र । वेळ निभावेन । आणिक जगणे । होईल ना ॥२९६॥
रावण काढील । माझी जरी छेड । जीवन तेथेच । संपवेन ॥२९७॥
मारुतीने तरी । धीर दिला तीस । विश्वास ठेव गे । रामपदी ॥२९८॥
सीतेचे चरण । वंदूनी निघाला । आकाशमार्गाने । रामांकडे ॥२९९॥
"जय श्रीराम"शी । आरोळी दिधली । तिने लंकावासी । हादरले ॥३००॥
(१७)
एकाच झेपेत । समुद्र लंघूनी । किष्किंधेजवळी । पोहोचला ॥३०१॥
मुखे रामनाम । जप चाललेला । वानरसेनेस । कानी आला ॥३०२॥
सारेच वानर । उत्कंठित होते । हकीकत सारी । ऐकण्यास ॥३०३॥
त्यांच्या घोळक्यात । मारुती अल्गद । मधुबनामध्ये । उतरला ॥३०४॥
त्यानी मधुबनी । घातला धुड्गुस । बनाचे रक्षक । त्रस्त झाले ॥३०५॥
वानरानी दिले । रक्षकाना ठोसे । भेटाया निघाले । सुग्रीवाना ॥३०६॥
मारुतीने केला । राजाना प्रणाम । छातीस धरले । सुग्रीवानी ॥३०७॥
मारुतीने लाज । वानरजातीची । राखीली पाहून । समाधानी ॥३०८॥
म्हणाले जाऊया । रामचंद्रांकडे । त्यांच्याच कृपेने । यश आले ॥३०९॥
पुढे राजे आणि । साथ जांबुवंत । थोडे त्यांच्यामागे । हनुमंत ॥३१०॥
ऐशी सारी स्वारी । रामचंद्रांपुढे । आनंदी विनीत । पोहोचली ॥३११॥
सुग्रीवानी केला । हनुमंताप्रती । इशारा चरण । वंदायास ॥३१२॥
प्रभूंचे चरणी । माथा टेकूनीया । चूडामणि दिला । रामाकडे ॥३१३॥
मणि पाहताच । रामानी धरीले । प्रेमाने छातीशी । मारुतीस ॥३१४॥
आलिंगनाने त्या । मारुतीस झाले । धन्य धन्य माझे । जीवन गा ॥३१५॥
रामांचे नयनी । अश्रू टपकले । मारुतीचा देह । रोमांचित ॥३१६॥
शब्देवीण संवादु । ऐसा तो सोहळा । पाहूनी सर्वाना । धन्य झाले ॥३१७॥
प्रभूनी सर्वाना । म्हटले पहा ह्या । पठ्ठ्याने केवळ । सीताशोध ॥३१८॥
नाही केला त्याने । दहशत दिली । खुद्द रावणास । वीराने ह्या ॥३१९॥
होय ना मारुती । ऐसे विचारता । आपुलीच कृपा । उत्तरला ॥३२०॥
सेवकाकडून । सेवा घडवीली । सेवकास श्रेय । नको त्याचे ॥३२१॥
आणिकही सेवा । घ्यावी करवून । इतुकीच आहे । अभिलाषा ॥३२२॥
सीतेने संदेश । काय बा दिधला । उत्तर देताना । मारुतीचा ॥३२३॥
कंठ की दाटला । म्हणाला कष्टाने । दिवस कंठते । सीतामाई ॥३२४॥
आपुले स्मरण । सदा सर्वकाळ । तेच हवापाणी । मानते ती ॥३२५॥
एका मासाचीच । मुदत बोलली । मुक्ति न झाल्यास । प्राणत्याग ॥३२६॥
करेन म्हणाली । तिला जरी दिला । काहीसा विश्वास । आपुला मी ॥३२७॥
तरीही विनंति । माझी आपणास । करावी पुढील । तजवीज ॥३२८॥
प्रभूनी पाहता । सुग्रीवांचेकडे । सेनापति सारे । पुढे आले ॥३२९॥
त्यानीही हुकूम । सैनिकाना दिले । शिस्तीने जमावे । मैदानात ॥३३०॥
पाहता पाहता । लाखोंची की सेना । दाखल जाहली । शस्त्रसज्ज ॥३३१॥
समुद्रतीरास । तरी पोहोचली । समुद्र करावा । पार कैसा ॥३३२॥
विवंचनेत या । थांबले असता । लंकानगरीत । काय झाले ॥३३३॥
(१८)
लंकावासी तरी । होते भयभीत । धिंगाणा इतुका । वानराचा ॥३३४॥
प्रत्यक्ष स्वामीच । आल्यास लंकेची । होईल अवस्था । कैसी काय ॥३३५॥
मंदोदरी सुद्धा । दशाननापुढे । सीतेस सोडण्या । विनवीते ॥३३६॥
परंतु रावण । तिजला म्हणतो । तुलाही विसर । पडला का ॥३३७॥
मंचकाखालती । किती देवगण । आहेत अजूनी । खितपत ॥३३८॥
वानराने केल्या । मर्कटचेष्टा त्या । तुज ना शोभते । भय होणे ॥३३९॥
दर्बारात तरी । मंत्रीगण सारे । कौतुक बोलती । रावणाचे ॥३४०॥
देवानाही कैद । करता आपणा । व्यत्यय कसला । नाही झाला ॥३४१॥
वानरांची आणि । मानवांची सुद्धा । आपणापुढती । तमा काय ॥३४२॥
इतुक्यात आले । विभीषण तेथे । पाहती तमाशा । चाललासे ॥३४३॥
आपमतलबी । करताती स्तुति । मनातून जरी । बिथरले ॥३४४॥
रावणाची आज्ञा । होतां विभीषण । बोलला विचार । परखड ॥३४५॥
रामदूताने जी । दशा इथे केली । त्याचे कांही कैसे । ध्यान नाही ॥३४६॥
सीता पळवीली । अपराध झाला । ऐसे कोणा नाही । वाटत कां ॥३४७॥
अपराधाचे त्या । प्रायश्चित्तासाठी । तिला परतणे । साधे सोपे ॥३४८॥
ऐशा विवेकाने । लंकेचे रक्षण । होईल तें सुद्धा । स्पष्ट आहे ॥३४९॥
विभीषणांचे ते । विचार ऐकून । मंत्री माल्यवंत । तोही म्हणे ॥३५०॥
विभीषणांच्या ह्या । विचाराशी आहे । मीही सहमत । योग्य सर्व ॥३५१॥
रावण चिडला । म्हणे ह्या दोघाना । घालवूनी द्या रे । समोरून ॥३५२॥
माल्यवंत तरी । स्वतःच निघून । गेले स्वगृहास । खिन्नमने ॥३५३॥
विभीषण तरी । आर्जवाने करी । विवेक करावा । विनवणी ॥३५४॥
राज्याचे प्रजेचे । हित मनी धरा । अहंकारे होतो । सर्वनाश ॥३५५॥
खूप ऐकले मी । विभीषणा तुझे । सहनशक्ती तूं । ताणू नको ॥३५६॥
धाकटा बंधू तूं । म्हणून संयम । अजून राखला । आहे जाण ॥३५७॥
एवढी रामाची । तुज आहे भक्ती । जा ना मग तूही । त्याचेकडे ॥३५८॥
बोलणे खुंटले । पाहूनी हताश । झाला विभीषण । काय म्हणू ॥३५९॥
(१९)
प्रभुचरणीच । आता रुजूं व्हावें । तशीच दिसते । ईश्वरेच्छा ॥३६०॥
हें तरी सौभाग्य । वाटते लाभते । सफळ होते ना । तपश्चर्या ॥३६१॥
परि वानरांच्या । सेनेत होईल । गैरसमजही । काय ठावें ॥३६२॥
प्रभूंचे दर्शन । व्हावे हीच आस । त्यांचाच विश्वास । मनी धरूं ॥३६३॥
भक्तिभाव ऐसा । मनी साठवून । आकाशमार्गाने । विभीषण ॥३६४॥
समुद्र लंघूनी । पोचला निकट । जेथे रामसेना । जमलेली ॥३६५॥
येतो विभीषण । पाहूनी सुग्रीव । म्हणे श्रीरामाना । इथे हा कां ॥३६६॥
आज्ञा व्हावी तरी । त्यास बांधूनीया । आणाया सांगेन । वानराना ॥३६७॥
श्रीराम म्हणती । नका होऊं ऐसे । तुम्ही उतावीळ । धीर धरा ॥३६८॥
वाटते शरण । येतो हा मजसी । शरणागत ते । मज प्रिय ॥३६९॥
कोटि पापे जरी । असतील केली । शरण आल्याने । नाश होती ॥३७०॥
कोणी पापी जीव । माझ्याकडे कधी । येऊंच शकत । नाही पहा ॥३७१॥
विभीषण तरी । इकडे येताहे । नक्कीच निष्पाप । मन त्याचे ॥३७२॥
आणि हा लक्ष्मण । आहे ना शेजारी । कर्दनकाळ हा । राक्षसांचा ॥३७३॥
प्रभूंचे वचन । ऐकूनी वानर । हर्षित जाहले । सुखावले ॥३७४॥
विभीषणासच । पुढे घालूनीया । रामांचे समोरी । आणीयले ॥३७५॥
विभीषणाने तो । प्रभूंचे चरणी । माथा टेकवीला । झडकरी ॥३७६॥
म्हणे काकुळती । संचिताने झाला । राक्षसकुळात । जन्म माझा ॥३७७॥
राक्षसांचा संग । भोगीत राहीलो । आता मात्र वाटे । धन्य धन्य ॥३७८॥
आपुला हा संग । आता जन्मभर । असू द्यावा देवा । विनवणी ॥३७९॥
करवून घ्यावी । सेवा चरणांची । विसर न व्हावा । क्षणभरी ॥३८०॥
श्रीरामानी तरी । उचलूनी त्यास । धरीलें प्रेमाने । हृदयास ॥३८१॥
लक्ष्मणाचे सुद्धा । चरण वंदीले । त्यानीही हृदयी । धरीयेले ॥३८२॥
हृद्य तो प्रसंग । पाहूनी सर्वांचे । डोळे पाणावले । भक्तिपूर्ण ॥३८३॥
हें सर्व होताना । डोईचा मुकुट । हातात धरीला । विभीषणे ॥३८४॥
त्याचा तो मुकुट । स्वतः श्रीरामानी । विभीषणाडोई । ठेवीयेला ॥३८५॥
विभीषणा तूंच । जनहितदक्ष । योग्यसा लंकेश । शोभतोस ॥३८६॥
समुद्र लंघूनी । कैसेनी जाईल । सारे सज्ज सैन्य । सध्या चिंता ॥३८७॥
विभीषण म्हणे । एकाच बाणाने । शुष्क की होतील । जलाशय ॥३८८॥
आपुल्या बाणांचा । प्रताप थोरला । जाणतो सागर । ठावे मज ॥३८९॥
तरी एक वार । सागर स्वतःच । देईल कां वाट । पहावे ना ॥३९०॥
आपुले पूर्वज । सम्राट सागर । ह्यानीच केले हे । जलाशय ॥३९१॥
त्यांच्या वंशजाच्या । विनंतीचा मान । ठेवतील काय । पहावे ना ॥३९२॥
संवाद हा ऐसा । चालला असता । भली मोठी लाट । उसळली ॥३९२॥
लक्ष्मण चिडला । म्हणे हा उद्धट । सागर देईल । वाट काय ॥३९३॥
धनुष्यास बाण । लावण्यास आज्ञा । करावी सत्वर । मज बंधो ॥३९४॥
सबूर लक्ष्मणा । प्रार्थना करणे । प्रथम कर्तव्य । ध्यानी हवे ॥३९५॥
समुद्रकिनारी । ठेवूनीया दर्भ । प्रभूनी लावीले । पद्मासन ॥३९६॥
हें सारे होताना । सैन्यात कुठेशी । कांही खळबळ । कैसी झाली ॥३९७॥
रावणाने होते । विभीषणापाठी । तीघा मायावीना । धाडलेले ॥३९८॥
वानर बनूनी । तेही तीघे होते । पहात प्रसंग । रममाण ॥३९९॥
मायावी रूपाचा । विसर पडला । राक्षस जाहले । नकळत ॥४०१॥
दक्ष वानरानी । बांधूनी तीघाना । खूप चोप दिला । तेव्हा त्यानी ॥४०२॥
केली गयावया । नका आणि मारूं । माफ करा आम्हा । श्रीरामांची ॥४०३॥
शपथ तुम्हाला । सांगतो आम्हीही । प्रभूंच्या दर्शने । सुखावलो ॥४०४॥
ऐकूनी ते बोल । लक्ष्मण म्हणाले । सोडा त्याना आणा । माझ्याकडे ॥४०५॥
भुर्जपत्रावरी । सन्देश लिहूनी । म्हणाले त्या हेर । राक्षसाना ॥४०६॥
तुमच्या येण्याने । काम सोपे झाले । सन्देश देण्याचे । रावणास ॥४०७॥
सांगावे अजूनी । वेळ नाही गेली । सीतेस परत । करूनीया ॥४०८॥
युद्ध टाळूनीया । सर्वांचेच हित । साधावें सद्बुद्धि । धरूनीया ॥४०९॥
रामानीही स्मित । करूनी दिधली । संमती बंधूचे । प्रस्तावास ॥४१०॥
(२०)
लंकेत येऊनी । रावणासमोर । दाखल जाहले । तीन्ही हेर ॥४११॥
तीघांचा म्होरक्या । नांव त्याचे शुक । रावणाने त्यास । विचारीले ॥४१२॥
स्वागत जाहलें । विभीषणाचे कां । शंकाच घेतली । त्याचेवरी ॥४१३॥
भोगत ना होता । राजवैभव तो । आता न घरचा । घाटाचा ना ॥४१४॥
दुर्बुद्धि झाल्याने । असेच होणार । मज शिकवतो । उपदेश ॥४१५॥
शुक परि सांगे । रामानी प्रेमाने । स्वागतचि केले । विभीषणाचे ॥४१६॥
लंकाधिपतीचा । मानही दिधला । ऐकून रावण । संतापला ॥४१७॥
परि सांवरून । म्हणाला नाटक । झाल्याने लंकेश । कोणी होतो ॥४१८॥
बरे सांग कैसी । आहे मर्कटांची । सेना जमवली । बेशिस्तशी ॥४१९॥
माकडे अस्वले । घेऊनी लंकेशी । युद्धाचा करेल । घाट कुणी ॥४२०॥
शुक परि सांगे । कधी महाराज । शत्रूस अशक्त । मानू नये ॥४२१॥
एका वानराने । धिंगाणा घातला । तो तरी वाटतो । लहानगा ॥४२२॥
सेनेत आहेत । आणीक कितीक । प्रचंड धिप्पाड । बलशाली ॥४२३॥
द्विविद मलंद । नल नील गद । अंगद केसरी । बिकटास्य ॥ ४२४॥
दधिमुख आणि । निशठ नि शठ । आणि शक्तिशाली । जांबवंत ॥४२५॥
सुग्रीवासमान । वाटताती सारे । अगणित सेना । त्यांची आहे ॥४२६॥
वानरांची वृत्ती । जात्याच लढाऊ । तशात प्रेरणा । रामकाज ॥४२७॥
सागरजलाची । करू आम्ही वाफ । किंवा पर्वतचि । टाकूं त्यात ॥४२८॥
रावणाची लंका । उध्वस्त करूनी । सोडवून आणू । सीतामाई ॥४२९॥
ऐसेच म्हणत । आहेत ते सारे । वृथा अभिमान । नाही त्यात ॥४३०॥
परि विभीषण । यानी दिला सल्ला । त्यानुसार पूजा । सागराची ॥४३१॥
आहे चाललेली । कोणत्याही क्षणी । होईल प्रसन्न । सागरही ॥४३२॥
शुकाने दिलेला । वृत्तांत ऐकूनी । रावणास हंसूं । आवरेना ॥४३३॥
समुद्र लंघणे । ज्याना नाही ठावे । समुद्राची पूजा । करतात ॥४३४॥
विभीषण तरी । जात्या नेभळट । त्याचा म्हणे सल्ला । विचारला ॥४३५॥
सांगा त्याना आता । तिथेच रहावे । सीता आहे इथे । सुखरूप ॥४३६॥
रावण हंसत । असता शुकाने । पुढ्यात धरले । भुर्जापत्र ॥४३७॥
डाव्या हातानेच । घेऊनीया आज्ञा । रावणाने केली । अमात्याना ॥४३८॥
वाचा कोणी काय । सन्देश धाडीला । म्हणतात काय । सन्देशात ॥४३९॥
लक्ष्मणाने होते । लिहिले रावणा । राक्षस जातीच्या । विनाशास ॥४४०॥
कारण स्वतःच । नको तू होऊस । शरण तू येई । रामपदी ॥४४१॥
ऐकून रावण । मनी बिथरला । आणून आवेश । गरजला ॥४४२॥
सागर किनारी । स्वतः अडलेले । आम्ही तरी मुक्त । जातो येतो ॥४४३॥
स्वतःची मर्यादा । ध्यानी न घेताच । रावणास धाक । दाखवीतो ॥४४४॥
आणि कां रे शुका । तिकडे जाऊन । तूही मतिभ्रष्ट । जाहला का ॥४४५॥
शत्रूसैन्याचीच । स्तुति सांगतोस । त्यासाठी तुजला । धाडीले कां ॥४४६॥
ऐसे म्हणूनीया । रावणाने दिली । शुकास जोराने । थोबाडीत ॥४४७॥
तेव्हा शुक मान । खाली घालूनीया । निघाला तो आला । रामपदी ॥४४८॥
शुक तरी होता । खरा एक मुनी । अगस्तीनी शाप । होता दिला ॥४४९॥
म्हणूनी राक्षस । कुळात राहीला । आता उद्धाराची । वेळ आली ॥४५०॥
रामानी ठेवीता । हात डोक्यावर । ऋषित्व पुनश्च । सिद्ध झाले ॥४५१॥
वंदूनी रामांचे । चरण शतधा । शुकमुनी गेले । निजाश्रमी ॥४५२॥
(२१)
तीन दिन झाले । अजूनी सागरा । पूजा नाही काय । राज येत ॥४५३॥
रामानी म्हटले । लक्ष्मणास आण । बाण नि धनुष्य । आता माझे ॥४५४॥
गर्विष्ठ दिसते । हें तो जलसत्त्व । अग्न्यस्त्र पाहीजे । ह्यास आता ॥४५५॥
धनुष्यास बाण । लावूनी रामानी । अग्न्यस्त्राचा मंत्र । सुरूं केला ॥४५६॥
जलचर सारे । अस्वस्थ जाहले । कितीकांचे प्राण । कासावीस ॥४५७॥
झालेसे पाहून । सागर जाहला । भ्रम झटकूनी । सविनय ॥४५८॥
दाखल जाहला । ब्राम्हण वेषात । हात जोडूनीया । प्रभूंपुढे ॥४५९॥
क्षमा मागीतली । प्रभूंच्या पूजेचा । आदर न केला । त्याचेसाठी ॥४६०॥
म्हणतो प्रभूना । वाचवा होऊन । कृपाळू येथील । जलसृष्टी ॥४६१॥
प्रभूनी म्हटले । ठीक आता सांग । येथून लंकेस । जावे कैसे ॥४६२॥
सागर बोलला । आपुल्या सैन्यात । नल आणि नील । दोघे बन्धू ॥४६३॥
आहेत दोघाना । लहानपणीच । मुनीनी दिलेले । वरदान ॥४६४॥
पर्वतास जरी । त्यांचा हस्तस्पर्श । झाल्यास सागरी । तरतील ॥४६५॥
सेतू बांधण्याची । त्याना आज्ञा द्यावी । मीही काही भार । उचलेन ॥ ४६६॥
वंदन करूनी । प्रभूंचे चरण । सागर सागरी । निवर्तला ॥४६७॥
(२२)
कैसा झाला सेतू । कसे गेले सैन्य । लंकेस कैसेनी । झाले युद्ध ॥४६८॥
तें सारें पहावे । पुढील काण्डात । सुन्दरकाण्ड हें । सिद्ध झाले ॥४६९॥
प्रभूंच्या कृपेने । कैसे मारुतीने । भयभीत केले । रावणास ॥४७०॥
सीतामाईचीही । भेट जाहल्याने । सफल जाहले । सारे कार्य ॥४७१॥
त्यांच्याच कृपेने । अभंगरचना । जमली श्रीपाद । अभ्यंकरा ॥४७२॥
सर्वानाच होवो । मनोकामनांची । पूर्ती श्रीरामांच्या । प्रसादाने ॥४७३॥
सुन्दरकाण्डाच्या । वाचकाना सदा । श्रीरामभक्तीची । आस राहो ॥४७४॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment