Friday, August 18, 2017

श्रीरामायणातील सुंदरकाण्ड - अभंगवृत्तात

 हरिः ॐ 
श्रीरामायणातील सुंदरकाण्ड (अभंगवृत्तात)

Hamumanji in front of Sita.jpgहरिः ॐ 
रामायणातील सुंदरकाण्ड (अभंगवृत्तात)
अनुक्रमणिका

१ मंगलाचरण ............................................   पदे १ ते ६
२ रामायणाची तोंडओळख ...............................        ७ ते १२
३ सुन्दरकाण्डाच्या प्रारंभासाठी किष्किंधाकाण्डातील 
   शेवटचा प्रसंग ........................................       १३ ते २६
४ हनुमानाला खुणेची अंगठी ............................        २७ ते ३२
५ विश्रांतीसाठी मैनक पर्वत समुद्रातून उफाळतो .........        ३३ ते ४३
६ सरसा सर्पीण वाटेत ...................................       ४४ ते ६१
७ समुद्रकिनारी राक्षसिणीला मारले .......................      ६२ ते ६६
८ लंकिणी राक्षसिणीला ठोसा .............................      ६७ ते ९४
९ लघुरूपात सीतेचा शोध .................................      ९५ ते १०१
१० विभीषणाशी भेट व त्यांचेकडून मार्गदर्शन ............      १०२ ते १२१
११ अशोकवनात सीता दिसली, पण रावण तिथे ..........      १२२ ते १३९
१२ सीता आणि त्रिजटा यांचा संवाद .....................      १४० ते १६२
१३ सीतेशी भेट, भुकेल्या मारुतीला फळे खाण्याची अनुमति      १६३ ते १८६
१४ अशोकवनात धुडगुस, राजपुत्र अक्षाला फेकून दिले, इंद्रजिताच्या 
ब्रम्हास्त्राचा मान, कैद झालेला मारुती दरबारात .......      १८७ ते २१९
१५ रावणाचा मारुतीला प्रश्न ..............................     २२० ते २२९
१५ - १ मारुतीचे उत्तर, रामदूत असल्याचा दावा ..........     २३० ते २५२
१५ - २ देहदंडाची शिक्षा, विभीषणाची मध्यस्थी, शेपटीस आग 
    लावण्याची आज्ञा मारुतीने लंका पेटवली .............   २५३ ते २९१
१६ सीतामाईकडून चूडामणि ...............................     २९२ ते ३०१
१७ सुग्रीवाना व श्रीरामाना वृत्तांतनिवेदन, 
सेना जमली, समुद्राचे काठी ...........................      ३०२ ते ३३३
१८ रावण विभीषणाचे ऐकत नाही .........................     ३३४ ते ३५९
१९ विभीषण रामाकडे, पाठोपाठ रावणाने धाडलेले 
राक्षस हेरही प्रभूदर्शनाने मोहित, लक्ष्मणाचा 
त्यांच्याकरवी रावणाला संदेश ........................       ३६० ते ४१०
२० रावण संदेश धुडकारतो, शुकमुनींचा उद्धार ............      ४११ ते ४५२
२१ सागराला रामबाणाचा धाक, नल-नीलानी सेतू बांधावा      ४५३ ते ४६७
२२ उपोद्-घात ..........................................      ४६८ ते ४७४


हरिः ॐ 
रामायणातील सुंदरकाण्ड (अभंगवृत्तात)
(१)
प्रथम वंदन । सदा कार्यारंभी ।
देवाधिदेवास । गणेशास ॥१॥
तसेच वंदन । रामा रघुराया ।
सर्वथा कृपाळु । जगदीशा ॥२॥
नमन आणिक । अञ्जनीसुतास ।
भक्तांमध्ये श्रेष्ठ । हनुमान ॥३॥
वंदन वाल्मीकि । ऋषीना त्यांचीच ।
जग उद्धाराया । रामकथा ॥४॥
ऋषींची महत्ता । त्यांची कथा खरी ।
होण्यासाठी होती । अवतार ॥५॥
आणिक वंदन । तुलसीदासाना ।
चरित मानस । रचियेले ॥६॥
(२)
रामायणामध्ये । पहा सात काण्डे ।
आधी बालकाण्ड । अयोध्याकाण्ड ॥७॥
अरण्यकाण्ड नि । किष्किंधाकाण्डही ।
सुंदरकाण्ड नि । युद्धकाण्ड ॥८॥
उत्तरकाण्ड गा । साती काण्डातही ।
सुंदरकाण्ड तें । कौतुकाचे ॥९॥
सुंदरकाण्डात । हनुमान गेला ।
सीतेस शोधाया । लंकेकडे ॥१०॥
अष्टौ सिद्धी सा-या । वापरून कैसे ।
रामदूत काज । निभावले ॥११॥
म्हणून पठण । सुंदरकाण्डाचे ।
व्हावे भक्तिभावे । नित्यनेमे ॥१२॥
(३)
सुंदरकाण्ड हें । किष्किंधाकाण्डाचा ।
संदर्भ घेऊन । सुरूं होते ॥१३॥
म्हणूनी पाहिला । पाहिजे प्रसंग ।
किष्किंधाकाण्डाचे । अखेरीचा ॥१४॥
जटायूचा भाऊ । सम्पति सांगतो ।
रावण लंकेस । सीतेसह ॥१५॥
सभा तेव्हां झाली । आतां शोध हवा ।
लंकेस जाऊन । करायला ॥१६॥
अंगद म्हणाला । जाईन मी सज्ज ।
विश्वास ठेवा कीं । मजवरी ॥१७॥
जांबवंत तरी । पाहती मारुति ।
बोलत कां नाहीं । गप्प गप्प ॥१८॥
स्तुति आरंभिली । पवनसुताची ।
विवेकी विज्ञानी । बलभीमा ॥१९॥
कोणतेही काज । तुजसाठी नाही ।
कठीण हें तरी । सर्वमान्य ॥२०॥
पर्वताएवढा । मोठाही होशील ।
लहान होतोसी । माशीसम ॥२१॥
अणिमा गरिमा । लघिमा महिमा ।
ईशित्व वशित्व । प्राकाम्यता ॥२२॥
कामावसायिता । ऐशा आठी सिद्धी ।
वरताती तुज । भक्तश्रेष्ठा ॥२३॥
रामकाजासाठी । अवतार तुझा ।
तेजःपुंज देह । सूर्यासम ॥२४॥
लंकेस जाऊनी । रावणा मारूनी ।
आणणे त्रिकूट । उखाडूनी ॥२५॥
हें सारे शक्य । केवळ तुजसी ।
सीतेची अवस्था । पहा तरी ॥२६॥
(४)
जांबवंतानी जें । केले आवाहन ।
ऐकूनि मारुति । संतोषला ॥२७॥
म्हणाला आभार । मित्रा जांबवंता ।
जाण मज दिली । कार्य काय ॥२८॥
सीतामाईचे मी । दर्शन घेऊन ।
येईन तोंवर । विश्राम ना ॥२९॥
खाऊं कीं दोघेही । कंदमुळें साथ ।
आत्ता तरी लंका । गांठायची ॥३०॥
सर्वाना वंदन । करूनी निघाला ।
कपिवर आला । प्रभूंकडे ॥३१॥
रामानी दिधली । खुणेस आंगठी ।
आणि यशस्वी हो । आशिर्वाद ॥३२॥
(५)
हनुमान आला । समुद्रकिनारी ।
फुगविली छाती । महाश्वासें ॥३३॥
हृदयी आसन । दिलें रघुनाथा ।
घेतलें उड्डाण । दक्षिणेस ॥३४॥
झेप घेण्यासाठी । पर्वताचे माथी ।
जोर दिला कांहीं । हनुमानें ॥३५॥
तेवढ्या दाबाने । पर्वत दबला ।
पहा पाताळात । पोहोंचला ॥३६॥
सागर पाहतो । हा तो रामदूत ।
आकाशमार्गाने । निघाला कीं ॥३७॥
मैनक पर्वता । त्याने सांगितले ।
विसावा देण्यास । ऊठ बरा ॥३८॥
सागराचे जळी । फँवारा उडाला ।
मैनक उठला । उंच-उंच ॥३९॥
मारुति म्हणाले । आभार मैनका ।
परि मज आतां । विश्राम ना ॥४०॥
लंकेस जाईन । शोधून काढीन ।
सीतामाई कोठे । आहे कैसी ॥४१॥
मनी आता नाही । दुसरा विचार ।
परतेन तेव्हां । पुन्हा भेटूं ॥४२॥
अलगद हात । मैनका लावून ।
मारुति वेगाने । पुढे गेला ॥४३॥
(६)
मनोवेगे जातो । हनुमान देखा ।
कौतुके पाहती । देवगण ॥४४॥
परीक्षा पहावी । त्याच्या त्या निष्ठेची ।
ऐसे मनी आले । देवाजींच्या ॥४५॥
सुरसा नांवाच्या । सर्पिणीस त्यांनी ।
धाडीले मार्गच । अडविण्या ॥४६॥
मारुतीचे पुढे । ठाकली सर्पीण ।
जबडा थोरला । पसरूनी ॥४७॥
वाटले तिजला । जबडा पाहूनी ।
घाबरेल आता । हनुमान ॥४८॥
म्हणाली वानरा । निघालास कुठे ।
गिळून टाकाया । आले तुज ॥४९॥
मारुती कां कधी । संकट पाहूनी ।
घाबरूनी काज । त्यजेल बा ॥५०॥ 
त्याने केला देह । जबड्यापेक्षाही ।
दुप्पटसा मोठा । क्षणार्धात ॥५१॥
तिनेही जबडा । आणि मोठा केला ।
तरीही दुप्पट । हनुमंत ॥५२॥
आणिक जबडा । तिने पसरता ।
माशीसम छोटा । हनुमंत ॥५३॥
करी सर्पिणीचे । कानी गुणगुण ।
परत जाताना । भेटूंच कीं ॥५४॥
आत्ता तरी मज । जाऊं दे ना माये ।
प्रभूचे कामास । लगबग ॥५५॥
सुरसा म्हणाली । यशस्वी हो बाळा ।
परीक्षा मी केली । उत्तीर्ण तूं ॥५६॥
रावणाची लंका । आहे मोहमाया ।
भयाणही आहे । सावध जा ॥५७॥
देवानाही आहे । काळजी मनात ।
रावण पाहिजे । संपविला ॥५८॥
म्हणून देवानी । मला पाठविले ।
सावध करण्या । परीक्षेने ॥५९॥
श्रीरामाचे काम । करशील नीट । ।
विश्वास वाटतो । मला सुद्धा ॥६०॥
ऐसा सुरसीचा । आशिष मिळता ।
मारुति निघाला । भरारीने ॥६१॥
(७)
लंकेजवळील । सागरात एक ।
राक्षसी कपटी । रहातसे ॥६२॥
नभी उडणा-या । पक्षांची प्रतिमा ।
पाण्यात पाहूनी । झेप घेई ॥६३॥
चट्टामट्टा करी । कितीक पक्षांचा ।
दैनंदिन तिचा । उपद्व्याप ॥६४॥
तसाच प्रयोग । हनुमंतावर ।
करण्याचा बेत । तिचा होता ॥६५॥
परन्तु चकवा । देऊनी तिजला ।
आघात करूनी । मारीयेले ॥६६॥
(८)
समुद्राचे काठी । होती वनराई ।
मनास मोहन । घालणारी ॥६७॥
वानर जातीस । सहज भुरळ ।
घालील ऐसीच । होती शोभा ॥६८॥
पण वायुसुता । नव्हती उसंत ।
क्षणभरसुद्धा । थांबण्यास ॥६९॥
डोंगरानजीक । दिसला किल्ल्याचा ।
भला मोठा तट । उंचापुरा ॥७०॥
साधासा वानर । होऊनी मारुति ।
चढला डोंगर । माथ्यावरी ॥७१॥
तटाजवळील । एका वृक्षावर ।
बसूनी करीतो । निरीक्षण ॥७२॥
निशाचरांच्या त्या । वस्तीच्या रक्षणा ।
धिप्पाड राक्षस । सारीकडे ॥७३॥
मायावीही होते । त्यातील कितीक ।
अंतर्ज्ञानाने ते । ध्यानी आले ॥७४॥
राजवाडा कोठे । तिथेच असेल ।
सीतामाईस कां । कोंडलेले ॥७५॥
सूर्यास्त होईल । आता इतुक्यात ।
अंधारात कोणा । दिसेन ना ॥७६॥
तरीही मच्छर । होऊनी सर्वत्र ।
संचार करावा । हेंच बरें ॥७७॥
तोंवरी अंदाज । घेऊं सारीकडे ।
व्यवस्था कैसी बा । रावणाची ॥७८॥
झाडांच्या फांद्यांना । झोके देत जाणे ।
वानरास तरी । काम सोपे ॥७९॥
महाल दिसले । छोटे मोठे ऐसे ।
ज्याचा जैसा हुद्दा । तेणे रीती ॥८०॥
गर्द झाडीमागे । आणि एक तट ।
दिसला तिथे कां । राजवाडा ॥८१॥
मारुति निघाला । तिकडेच जाण्या ।
द्वारीच लंकिणी । राक्षसीण ॥८२॥
वानरा तूं कोठे । ऐसा निघालास ।
सारे पशूपक्षी । खाद्य माझे ॥८३॥
चुकवूनी माझी । नजर कुणीही ।
नाहीच जायाचे । नेम आहे ॥८४॥
तिच्या वल्गनेस । उत्तर म्हणून ।
जोरदार ठोसा । लगावला ॥८५॥
सा-याच प्रश्नांची । उत्तरे शब्दात ।
नाही कांही देत । बसायाचे ॥८६॥
विवेक तो सारा । होता अवगत ।
मारुतीस त्याने । तैसे केले ॥८७॥
जबड्याचे तिच्या । दात निखळले ।
हा तरी वानर । साधा नव्हे ॥८८॥
अचानक एक । पुराण प्रसंग ।
आठवूनी म्हणे । मारुतीला ॥८९॥
ब्रम्हाने रावणा । वर जरी दिला ।
मलाही संकेत । खास दिला ॥९०॥
जेव्हा तुज कोणा । वानराचा ठोसा ।
पडेल जाण तूं । संकेत तो ॥९१॥
राक्षसकुळाच्या । नाशाचीच नांदी ।
प्रभूचें दर्शन । तुज जाण ॥९२॥
धन्य मी जाहलें । रामदूताचे कीं ।
दर्शन जाहलें । हनुमंता ॥९३॥
अडवूं शकेल । नाही तुज कोणी ।
तरीही जाई गा । संभाळून ॥९४॥
(९)
घेऊनीया मग । अति लघुरूप ।
सतत स्मरण । श्रीरामाचे ॥९५॥
करीत निघाला । नगर धुंडण्या ।
कोठे कां दिसेल । सीतामाई ॥९६॥
घराघरामध्ये । महाली महाली ।
धुंडीत चाललें । लघुरूप ॥९७॥
एका प्रासादात । स्वतः दशानन ।
पाहीला जाताना । शयनास ॥९८॥
तिथे तरी नाही । दिसली वैदेही ।
कांहीसे हायसे । वाटलेही ॥९९॥
धुंडीत राहीला । इकडे तिकडे ।
लघुरूपामुळे । वेळ लागे ॥१००॥ 
नाही उमगले । किती वेळ गेला ।
ब्रम्हमुहूर्तही । सुरू झाला ॥१०१॥
(१०)
एका प्रासादात । सारेच आगळे ।
सर्वत्र पावित्र्य । दाटलेले ॥१०२॥
ईशान्य दिशेस । नेटक्या देऊळी ।
हरीची मूरत । विराजित ॥१०३॥
छोट्या वृंदावनी । तुळस साजिरी ।
पणती तेवती । कोनाड्यात ॥१०४॥
देवाचीये दारी । उभा क्षणभरी ।
नमन करूनी । निघणार ॥१०५॥
तेव्हाच वाटले । कोणी जागे झाले ।
कानी आले शब्द । जय श्रीराम ॥१०६॥
कपि चमकला । ऐसा श्रद्धापूर्ण ।
इथे आहे कोण । रामभक्त ॥१०७॥
ओळख ह्याची का । करूनीया घ्यावी ।
कालापव्यय हा । ठरूं नये ॥१०८॥
कदाचित ह्याची । ओळख झाल्यास ।
मदत होईल । निजकामी ॥१०९॥
रामभक्त येतो । वाटले बाहेर ।
प्रासादाचे दारी । पोहोचला ॥११०॥
हनुमंत घेई । ब्राम्हणाचे रूप ।
मंद मंद बोले । रामजप ॥१११॥
यजमान आले । पुसती विप्रास ।
रामप्रहरास । कैसे आले ॥११२॥
वाटते प्रभूनी । मजवरी कृपा ।
करूनी आपणा । धाडीयेले ॥११३॥
किंवा कां स्वतःच । प्रभू रामचंद्र ।
माझे दारी आज । प्रकटले ॥११४॥
ऐसी रामभक्ती । पाहूनी मारुति ।
ओळख आपुली । देता झाला ॥११५॥
यजमानानीही । ओळख दिधली ।
रावणाचा भ्राता । विभीषण ॥११६॥
मारुतीने मग । सांगीतले कैसे ।
प्रभूंचे दर्शन । त्यास झाले ॥११७॥
सीतेस शोधणे । आहे काम मज ।
कृपया दावावा । मार्ग मज ॥११८॥
विभीषण तेव्हां । सांगते जाहले ।
अशोकवनात । सीतामाई ॥११९॥
पाळत ठेवतो । रावण कैसेनी ।
खबरदारीही । कैसी हवी ॥१२०॥
विभीषण देती । यशाचा आशिष ।
निरोप दिधला । सौहार्दाने ॥१२१॥
(११)
अशोकवनात । थेट पोहोचला ।
देखीयेली दीन । सीतामाई ॥१२२॥
रोडावला देह । डोईवर जटा ।
एक वेणी देखे । पादांगुष्ठ ॥१२३॥
राक्षसिणी चार । होत्या पहा-यास ।
आतां केव्हां कैसा । पुढे होऊं ॥१२४॥
नजर टाकतां । इकडेतिकडे ।
रावणाची स्वारी । येतां दिसे ॥१२५॥
रावण बोलला । साम दाम दण्ड ।
भेद सा-या नीति । चतुराई ॥१२६॥
म्हणे एकवार । पाही मजकडे ।
राम काय तुझा । मजसम ॥१२७॥
शिवाय देशील । मजसी नजर ।
कौतुक करेन । पहा कैसे ॥१२८॥ 
सा-या माझ्या राण्या । मंदोदरी सुद्धा ।
दासी होतील त्या । तुझे पायी ॥१२९॥
गवताची पात । ओठास धरून ।
स्मरूनीया मनी । रघुपति ॥१३०॥
म्हणे दशानना । काजवा करेल ।
किती टिमटिम । त्याने काय ॥१३१॥
कमळ फुलेल । कल्पनाच नाही ।
रामाचे बाणाची । तुज कांहीं ॥१३२॥
शिवधनुष्य तें । छातीवरी येता ।
पंचप्राण तुझे । कासावीस ॥१३३॥
विसरलास तूं । तेंच की धनुष्य ।
मोडले रामाचे । हाती कैसे ॥१३४॥
परि तुज नाही । कांही सुद्धा लाज ।
कपटाने मज । आणीयले ॥१३५॥
रावणा संताप । जाहला म्हणाला ।
इथे राम परि । येत नाही ॥१३६॥
पुन्हा त्या रामाचे । नाव माझ्यापुढे ।
घेशील छाटीन । जीभ तुझी ॥१३७॥
ऐसी देऊनीया । ताकीद सीतेस ।
धपाधप पाय । आपटीत ॥१३८॥
रावण निघून । गेला तेव्हां सा-या ।
राक्षसिणी सुद्धा । घाबरल्या ॥१३९॥
(१२)
एका स्त्रीचे दुःख । स्त्रीच समजते ।
राक्षसिणीनाही । तैसे झाले ॥१४०॥
त्यांच्यामध्ये होती । राक्षसीण एक ।
त्रिजटा नांवाची । रामभक्त ॥१४१॥
तिला म्हणे एक । स्वप्न कीं पडले ।
वानर जाळीतो । लंका सारी ॥१४२॥
रावणाची दशा । आणीक भयाण ।
वीस बाहु त्याचे । कापलेले ॥१४३॥
तैसा ओरडत । जाई दक्षिणेस ।
लंका राख आता । विभीषणा ॥१४४॥
सीता म्हणे तीस । नव्हे स्वप्न मात्र ।
प्रत्यक्ष असेच । घडेलही ॥१४५॥
सीतेचे बोलणे । ऐकूनी सा-याच ।
सीतेचे जवळी । गोळा झाल्या ॥१४६॥
जळेल कां लंका । खरेच गे सीते ।
कोणी सुद्धा नाही । उरणार ॥१४७॥
सीतेने म्हटले । त्रिजटेचे स्वप्न ।
ऐकूनी बोलले । अचानक ॥१४८॥
मला तरी आता । जीणे नको वाटे ।
त्याने ऐसे बोल । उमटले ॥१४९॥
त्याचे तुम्ही मनी । घेऊं नका कांही ।
सख्यांचे वाईट । चिंतेन कां ॥१५०॥
सीतेने दिलासा । दिल्याने सगळ्या ।
आपापल्या जागी । गेल्या सा-या ॥१५१॥
त्रिजटा एकटी । राहीली तिजला ।
म्हणे सीतामाई । काकुळती ॥१५२॥
खरेच वाटते । आता नको जीणे ।
रच एक चिता । माझ्यासाठी ॥१५३॥
विरहयातना । असह्य झाल्यात ।
प्रभूस दया कां । येत नाही ॥१५४॥
त्रिजटा म्हणाली । भलतेच काय ।
रामावरी नाही । विश्वास कां ॥१५५॥
शिवाय पहा ना । चिता पेटविण्या ।
विस्तव रात्रीस । मिळेल कां ॥१५६॥
ऐसे बोलूनीया । निघूनही गेली ।
त्रिजटा आपुल्या । घराकडे ॥१५७॥
यातनांची आग । मनास जाळीते ।
विस्तव कां नाही । चितेसाठी ॥१५८॥
ऐशा विचाराने । सीतेच्या मनाची ।
आणीक जाहली । तडफड ॥१५९॥
आकाश पेटले । ता-यानी दिसते ।
एकही ना येत । पृथ्वीवर ॥१६०॥
झाडानो तुम्ही ना । नांवाचे अशोक ।
आपुले नांव कीं । करा सार्थ ॥१६१॥
सीतेचा पाहूनी । विलाप कपीस ।
वाटला तो क्षण । युगासम ॥१६२॥
(१३)
काय करावेसा । विचार करीत ।
अंगठी टाकली । मारुतीने ॥१६३॥
सीतेने घेतली । उचलून हाती ।
खूण ओळखली । प्रभूंची ही ॥१६४॥
आत्ता इथे कैसी । आली ही अंगठी ।
शंका नि आश्चर्य । मनी तिच्या ॥१६५॥
इतुक्यात आले । मंद स्वर कानी ।
श्रीरामनामाचा । जपचि तो ॥१६६॥
कोण रामभक्त । इथे आसपास ।
प्रकट कां नाही । तुम्ही होत ॥१६७॥
आज्ञा ती मानून । कर जोडोनीया ।
समोरी ठाकले । कपिरूप ॥१६८॥
मारुतीने सारी । कथा सांगितली ।
धाडीले रामानी । खुणेसह ॥१६९॥
विश्वास दिधला । सक्षेम आहेत ।
राम नि लक्ष्मण । कोठे कैसे ॥१७०॥
सीतामाई तुझा । शोध हा तो झाला ।
आता आहे घेणे । अंदाजही ॥१७१॥
राक्षससेनेचा । कैसे तिचे बल ।
कमकुवतता । काही कैसी ॥१७२॥
सीतेच्या मनात । आली काही शंका ।
राक्षससेनेचा । अंदाज तूं ॥१७३॥
वानर साधासा । कैसा बा घेशील ।
वाटे सानमुखी। मोठा घास ॥१७४॥
क्षमा करी माये । दावीतो नमुना ।
रामानी मजला । परखले ॥१७५॥
ऐसे म्हणूनीया । काही उग्ररूप ।
तिजला केवळ । दिसेलसे ॥१७६॥
दावीले सीताही । धास्तावली कांही ।
म्हणे क्षमा करी । हनुमाना ॥१७७॥
तेव्हा पुन्हा साधा । होऊनी वानर ।
म्हणे सीतामाई । आशिष दे ॥१७८॥
आणीक विनंति । साधीशीच आहे ।
भूक फार आहे । लागलेली ॥१७९॥
इथे झाडांवरी । फळे लगडली ।
आहेतही खूप । वाटे खावी ॥१८०॥
तुझ्या अनुज्ञेने । भूक भागवावी ।
देई गे अनुज्ञा । प्रार्थितो मी ॥१८१॥
इथे परि पहा । विक्राळ राक्षस ।
पहारा ठेवण्या । नेमलेले ॥१८२॥
त्यांची कांही भीती । मला न वाटते ।
केवळ अनुज्ञा । तुझी हवी ॥१८३॥
लडिवाळ त्याचा । आग्रह पाहून ।
वात्सल्य दाटलें । तिचे मनी ॥१८४॥
बरें जा घेई जें । हवें तें खाऊन ।
संभाळूनि राही । एवढेच ॥१८५॥
नमन करूनी । आशिष घेऊनी ।
जवळील वनी । आला कपि ॥१८६॥
(१४)
फळे चाखताना । मुद्दामच बिया ।
राक्षसाना मारी । वेडावीत ॥१८७॥
छोटी मोठी झाडे । उपटली तेव्हां ।
राक्षस चिडले । मारण्यास ॥१८८॥
झाडांच्या फांद्याच । घेऊनीया हाती ।
लढाई त्यांच्याशी । आरंभिली ॥१८९॥
कितीक जणाना । जागी लोळवीले ।
भ्यालेले पळाले । ओरडत ॥१९०॥
साध्या वानराने । उच्छाद मांडला ।
अशोकवनात । नासधूस ॥१९१॥
कितीक राक्षस । लोळवीले त्याने ।
आवरत नाही । कोणा मुळी ॥१९२॥
दरबारातही । वार्ता पोहोचली ।
कसला गोंधळ । काय झाले ॥१९३॥
रावणाने एक । सेनेची तुकडी ।
अशोकवनात । पाठविली ॥१९४॥
मारुती करीतो । सैनिकांची थट्टा ।
कधी घोर रूप । कधी साधा ॥१९५॥
सैनिक दिङ्मूढ । कैसी चालवावी ।
तल्वार करावा । कोठे वार ॥१९६॥
भालेही फेकले । त्यांचे तर त्याने ।
तुकडेच केले । जैसे ऊंस ॥१९७॥
काही भाले तर । उलट मारूनी ।
केले हताहत । सैनिकचि ॥१९८॥
वार्ता ती ऐकून । रावण चिडला ।
म्हणाला अक्षास । राजपुत्रा ॥१९९॥
जाई ये बघून । काय प्रकरण ।
आण तूं बांधून । वानरास ॥२००॥
जैसा अक्ष आला । अशोकवनात ।
काही त्याचे ध्यानी । येण्या आधी ॥२०१॥
मारुती शिरला । त्याचे पायामध्ये ।
प्रचंड होऊनी । फेकीयेले ॥२०२॥
जंगलात अक्ष । जाऊनी पडला ।
घाबरूनी सेना । पलटली ॥२०३॥
पळणा-यानाही । नाहीच सोडले ।
फटके मारूनी । पाडीयेले ॥२०४॥
अक्षाचा जाहला । मृत्यू त्याची वार्ता ।
जरी रावणास । समजली ॥२०५॥
पुत्रवधाचा त्या । करण्यास शोक ।
नव्हती उसंत । कोणासही ॥२०६॥
हें तो वाटे युद्ध । एका वानराने ।
लंकेच्या विरुद्ध । मांडीयेले ॥२०७॥
तेव्हा रावणाने । पुत्र इंद्रजित ।
यास आज्ञा केली । विजयी हो ॥२०८॥
मारूं नको त्यास । बांधूनीया आण ।
समजाया हवे । कोण आहे ॥२०९॥
भली मोठी सेना । सवे घेऊनीया ।
अशोकवनात । मेघनाद ॥२१०॥
आला तरी काय । भीति मारुतीस ।
सैन्याची दाळण । उडविली ॥२११॥
एक मोठा वृक्ष । भिरकावुनीया ।
रथाचे तुकडे । झाले क्षणी ॥२१२॥
इंद्रजिताशीच । जाऊनी भिडला ।
जणू कीं जुंपली । साठमारी ॥२१३॥
मारुतीने एक । ऐसा ठोसा दिला ।
लंकेशपुत्रास । मूर्च्छा आली ॥२१४॥
सांवरला तेव्हां । ब्रम्हास्त्रच त्याने ।
संधान साधाया । खडे केले ॥२१५॥
मारुतीने तेव्हा । धरिला विचार ।
ब्रम्हबाणाचा ह्या । अवमान ॥२१६॥
होणे नव्हे योग्य । म्हणूनी नाटक ।
भोंवळ आल्याचे । त्याने केले ॥२१७॥
इंद्रजितासही । आठवली आज्ञा ।
बांधीला वानर । नागपाशें ॥२१८॥
घेऊनीया आला । दरबारामध्ये ।
सा-या लंकेमध्ये । कुतूहल ॥२१९॥
(१५)
हळूंहळूं डोळे । उघडूनी पाही ।
मारुती दर्बार । रावणाचा ॥२२०॥
सोन्याच्या पत्र्यानी । हिरेमाणकानी ।
मढवीले खांब । चोहीकडे ॥२२१॥
रत्नजडितशा । उच्च सिंहासनी ।
विराजला होता । लंकाधीश ॥२२२॥
पाहूनी वानर । हसला कुत्सित ।
जरि एक क्षण । दशानन ॥२२३॥ 
पुत्रवध काय । ऐशा वानराने ।
केला विषादही । मनी आला ॥२२४॥
लगेच सावध । होऊन रावण ।
पुसीतो रागाने । वानरास ॥२२५॥
वानरा ठाऊक । नाही काय माझा ।
दरारा त्रिलोकी । कैसा आहे ॥२२६॥
काय म्हणूनीया । अशोकवनात ।
उच्छाद मांडला । निष्कारण ॥२२७॥
घेतले कितीक । राक्षसांचे प्राण ।
देहान्त शिक्षेस । पात्र कृत्य ॥२२८॥
स्वतःच्या प्राणांची । पर्वा तुज नाही ।
औद्धत्य हें केलें । कोणासाठी ॥२२९॥
(१५-१)
राक्षस मारीले । हें जरी खरें ।
त्यांत माझा कांहीं । नाही दोष ॥२३०॥
स्वतःच्या जीवाची । काळजी सर्वाना ।
असते मी तरी । भुकेलेला ॥२३१॥
झाल्याने फळे मी । तोडत असतां ।
उगाच मजला । हटकले ॥२३२॥
इतुकेच नव्हे । चाल करूनीया ।
आले मजवरी । तेव्हा मला ॥२३३॥
स्वतःचे रक्षण । करावे लागले ।
उगाच जाहली । झोंबाझोंबी ॥२३४॥
राजपुत्रानाही । तूच ना धाडीले ।
अवसर नाही । मज दिला ॥२३५॥
असो जे जाहले । आता बंधनात ।
आहे हा समोर । तुझ्यापुढे ॥२३६॥
ऐक दशानना । तू स्वतः जयाच्या ।
कृपेने लंकेश । म्हणवीतो ॥२३७॥
तीन्ही जगांचा जो । आहे खरा स्वामी ।
कर्ता-धाता-हर्ता । विश्वाचाच ॥२३८॥
खर नि दूषण । त्रिशिर नि वाली ।
ऐसे बलशाली । नष्ट केले ॥२३९॥
शिवधनुष्यही । भंगले ज्या हाती ।
ज्याची सीतामाई । तुझ्या इथे ॥२४०॥
त्याच श्रीरामाचा । दूत हा मी इथे ।
समज देण्यास । तुज आलो ॥२४१॥
जाणतो रावणा । चरित्र गा तुझे ।
सहस्रबाहूने । काय केले ॥२४२॥
वालीबरोबर । तुझा जो जाहला ।
प्रेमप्रसंग तो । जाणतो मी ॥२४३॥
खरे तर होते । वालीने रावण ।
कांखेमध्ये होता । जखडला ॥२४४॥
दरबारामध्ये । तेही रावणाच्या ।
वाच्यता करणे । अनुचित ॥२४५॥
जें कां समजावे । समजेल खास ।
रावण स्वतःच । तेच पुरे ॥२४६॥
तैशा बलशाली । वालीलाही ज्याने ।
यमसदनास । धाडीयेले ॥२४७॥
त्याच श्रीरामाच्या । दूताचा हा सल्ला ।
ऐक तूं सीतेस । सोडूनी दे ॥२४८॥
पुलस्ती मुनींचा । नातू ना आपण ।
डागाळूं नकोस । त्यांची कीर्ति ॥२४९॥
श्रीरामांची मूर्ति । हृदयी धरून ।
शरण तूं जा गा । त्यांचे पायीं ॥२५०॥
तरी दयावंत । प्रभू रामचंद्र ।
क्षमा करतील । अपराध ॥२५१॥
लंकेचे हें राज्य । देतील तुजला ।
अखंड भोगाया । भक्तिप्रेमें ॥२५२॥
(१५-२)
जरी रावणाने । मनी समजलें ।
चरित्र वानर । जाणतो कीं ॥२५३॥
दूत खरोखरी । आहे हा सर्वज्ञ ।
नव्हे कोणी साधा । वानर हा ॥२५४॥
परि सर्वांपुढे । होतो अवमान ।
आव्हानच ह्याने । मांडीयेलें ॥२५५॥
याचें आवाहन । मानणे मजला ।
लंकाधिपतीस । शोभते ना ॥२५६॥
धरूनी आवेश । क्रोध नि संताप ।
मारुतीस म्हणे । दशानन ॥२५७॥
स्वतःचे मरण । निकट असता ।
मजसी देतोस । उपदेश ॥२५८॥
कोण्या वानराने । राक्षस मारावे ।
वरती म्हणावे । रामदूत ॥२५९॥
ढोंग हें असलें । नाही चालणार ।
कळले पाहिजे । ह्यास नीट ॥२६०॥
राक्षस मारणे । ऐसा घोर गुन्हा ।
केल्याने तुजला । देहदंड ॥२६१॥
अरे कोणी ह्याला । टाका रे मारूनी ।
म्हणता राक्षस । पुढे झाले ॥२६२॥
इतुक्यात तिथे । विभीषण आले ।
म्हणाले थांबा रे । अयोग्य हें ॥२६३॥
खरे असो खोटे । म्हणवीतो दूत ।
दूतास मारणे । अशिष्ट तें ॥२६४॥
खरे असल्यास । मारण्याने होते ।
शत्रूस निमित्त । आक्रमणा ॥२६५॥
विवेक धरूनी । शिक्षा बदलावी ।
विनम्र सूचना । करीतो मी ॥२६६॥
ठीक आहे ऐसे । मान्य करूनीया ।
रावण बोलला । कुत्सितसे ॥२६७॥
म्हणती वानरा । स्वतःची शेपटी ।
भारी आवडती । असतसे ॥२६८॥
आग लावूनी द्या । ह्याच्या शेपटीस ।
म्हणता राक्षस । सर्सावले ॥२६९॥
शेपटीवरती । गुंडाळण्यासाठी ।
उपरणे दिली । सर्वानीच ॥२७०॥
मारुतीने परि । थट्टा आरंभली ।
शेपटी करीतो । लांब लांब ॥२७१॥
वस्त्रे गुंडाळली । जिथे त्यावरती ।
तेलही ओतणे । चाललेले ॥२७२॥
सा-या लंकेतून । उपरणे आली ।
सर्व घरातून । तेल आले ॥२७३॥
वस्त्रेही संपली । तेलही संपले ।
शेपटीची लांबी । संपेचि ना ॥२७४॥
वस्त्रे गुंडाळून । तेल ओतणारे ।
राक्षस जाहले । घामाघूम ॥२७५॥
शेवटी म्हणाले । आता हें तो पुरे ।
लावू आता आग । शेपटीस ॥२७६॥
शेपटीस आग । लागता मारुती ।
लागला नाचाया । धावू पळू ॥२७७॥
रावणास वाटे । कैसी वानराची ।
जाहली फजिती । नाचे आता ॥२७८॥
मारुतीचे होते । नाटक केवळ ।
आगीचे चटके । लागल्याचे ॥२७९॥
परंतु सर्वांचे । देखत आगीचे ।
डोंबात दर्बार । पेटला कीं ॥२८०॥
पळापळ आता । सुरू जी जाहली ।
रावणही गेला । महालात ॥२८१॥
उंच एक झेप । घेऊनी मारुती ।
आला महालाचे । छतावर ॥२८२॥
ह्या छतावरूनी । त्या छतावरती ।
गेला पेटवीत । लंका सारी ॥२८३॥
लंकेत लोकांची । झाली पळापळ ।
आरडाओरड । दंगा सारा ॥२८४॥
पवनसुताच्या । सहाय्यास आले ।
पवन छप्पन्न । चहूंकडे ॥२८५॥
आगीचा भडका । वाढतच गेला ।
महालीमहाली । पसरला ॥२८६॥
रावणास मुळी । नव्हती कल्पना ।
परिणाम ऐसा । होईल कीं ॥२८७॥
विनाशकाले ही । विपरीत बुद्धि ।
पश्चात्तापाचा ना । उपयोग ॥२८८॥
विभीषणासंगे । भेट जाहल्याने ।
ठाऊक होता ना । त्याचा वाडा ॥२८९॥
तेवढाच वाडा । सोडूनी मारुती ।
समुद्राचे काठी । पोहोचला ॥२९०॥
पाण्यात सोडूनी । पेटती शेपटी ।
आग ती टाकली । विझवून ॥२९१॥
(१६)
तेथून पुनश्च । अशोकवनात ।
सीतामाईपुढे । नमस्कार ॥२९२॥
करीत म्हणाला । प्रभूस सांगावा ।
आणि काही खूण । द्यावी मज ॥२९३॥
वेणीमध्ये होता । एक चूडामणी ।
सीतेने काढून । दिला त्यास ॥२९४॥
म्हणाली प्रभूना । देई गा निरोप ।
आता नाही धीर । राहवत ॥२९५॥
एक मास मात्र । वेळ निभावेन ।
आणिक जगणे । होईल ना ॥२९६॥
रावण काढील । माझी जरी छेड ।
जीवन तेथेच । संपवेन ॥२९७॥
मारुतीने तरी । धीर दिला तीस ।
विश्वास ठेव गे । रामपदी ॥२९८॥
सीतेचे चरण । वंदूनी निघाला ।
आकाशमार्गाने । रामांकडे ॥२९९॥
"जय श्रीराम"शी । आरोळी दिधली ।
तिने लंकावासी । हादरले ॥३००॥
(१७)
एकाच झेपेत । समुद्र लंघूनी ।
किष्किंधेजवळी । पोहोचला ॥३०१॥
मुखे रामनाम । जप चाललेला ।
वानरसेनेस । कानी आला ॥३०२॥
सारेच वानर । उत्कंठित होते ।
हकीकत सारी । ऐकण्यास ॥३०३॥
त्यांच्या घोळक्यात । मारुती अल्गद ।
मधुबनामध्ये । उतरला ॥३०४॥
त्यानी मधुबनी । घातला धुड्गुस ।
बनाचे रक्षक । त्रस्त झाले ॥३०५॥
वानरानी दिले । रक्षकाना ठोसे ।
भेटाया निघाले । सुग्रीवाना ॥३०६॥
मारुतीने केला । राजाना प्रणाम ।
छातीस धरले । सुग्रीवानी ॥३०७॥
मारुतीने लाज । वानरजातीची ।
राखीली पाहून । समाधानी ॥३०८॥
म्हणाले जाऊया । रामचंद्रांकडे ।
त्यांच्याच कृपेने । यश आले ॥३०९॥
पुढे राजे आणि । साथ जांबुवंत ।
थोडे त्यांच्यामागे । हनुमंत ॥३१०॥
ऐशी सारी स्वारी । रामचंद्रांपुढे ।
आनंदी विनीत । पोहोचली ॥३११॥
सुग्रीवानी केला । हनुमंताप्रती ।
इशारा चरण । वंदायास ॥३१२॥
प्रभूंचे चरणी । माथा टेकूनीया ।
चूडामणि दिला । रामाकडे ॥३१३॥
मणि पाहताच । रामानी धरीले ।
प्रेमाने छातीशी । मारुतीस ॥३१४॥
आलिंगनाने त्या । मारुतीस झाले ।
धन्य धन्य माझे । जीवन गा ॥३१५॥
रामांचे नयनी । अश्रू टपकले ।
मारुतीचा देह । रोमांचित ॥३१६॥
शब्देवीण संवादु । ऐसा तो सोहळा ।
पाहूनी सर्वाना । धन्य झाले ॥३१७॥
प्रभूनी सर्वाना । म्हटले पहा ह्या ।
पठ्ठ्याने केवळ । सीताशोध ॥३१८॥
नाही केला त्याने । दहशत दिली ।
खुद्द रावणास । वीराने ह्या ॥३१९॥
होय ना मारुती । ऐसे विचारता ।
आपुलीच कृपा । उत्तरला ॥३२०॥
सेवकाकडून । सेवा घडवीली ।
सेवकास श्रेय । नको त्याचे ॥३२१॥
आणिकही सेवा । घ्यावी करवून ।
इतुकीच आहे । अभिलाषा ॥३२२॥
सीतेने संदेश । काय बा दिधला ।
उत्तर देताना । मारुतीचा ॥३२३॥
कंठ की दाटला । म्हणाला कष्टाने ।
दिवस कंठते । सीतामाई ॥३२४॥
आपुले स्मरण । सदा सर्वकाळ ।
तेच हवापाणी । मानते ती ॥३२५॥
एका मासाचीच । मुदत बोलली ।
मुक्ति न झाल्यास । प्राणत्याग ॥३२६॥
करेन म्हणाली । तिला जरी दिला ।
काहीसा विश्वास । आपुला मी ॥३२७॥
तरीही विनंति । माझी आपणास ।
करावी पुढील । तजवीज ॥३२८॥
प्रभूनी पाहता । सुग्रीवांचेकडे ।
सेनापति सारे । पुढे आले ॥३२९॥
त्यानीही हुकूम । सैनिकाना दिले ।
शिस्तीने जमावे । मैदानात ॥३३०॥
पाहता पाहता । लाखोंची की सेना ।
दाखल जाहली । शस्त्रसज्ज ॥३३१॥
समुद्रतीरास । तरी पोहोचली ।
समुद्र करावा । पार कैसा ॥३३२॥
विवंचनेत या । थांबले असता ।
लंकानगरीत । काय झाले ॥३३३॥
(१८)
  लंकावासी तरी । होते भयभीत ।
धिंगाणा इतुका । वानराचा ॥३३४॥
प्रत्यक्ष स्वामीच । आल्यास लंकेची ।
होईल अवस्था । कैसी काय ॥३३५॥
मंदोदरी सुद्धा । दशाननालागी ।
सीतेस सोडण्या । विनवीते ॥३३६॥
परंतु रावण । तिजला म्हणतो ।
तुलाही विसर । पडला का ॥३३७॥
मंचकाखालती । किती देवगण ।
आहेत अजूनी । खितपत ॥३३८॥
वानराने केल्या । मर्कटचेष्टा त्या ।
तुज ना शोभते । भय होणे ॥३३९॥
दर्बारात तरी । मंत्रीगण सारे ।
कौतुक बोलती । रावणाचे ॥३४०॥
देवानाही कैद । करता आपणा ।
व्यत्यय कसला । नाही झाला ॥३४१॥
वानरांची आणि । मानवांची सुद्धा ।
आपणापुढती । तमा काय ॥३४२॥
इतुक्यात आले । विभीषण तेथे ।
पाहती तमाशा । चाललासे ॥३४३॥
आपमतलबी । करताती स्तुति ।
मनातून जरी । बिथरले ॥३४४॥
रावणाची आज्ञा । होतां विभीषण ।
बोलला विचार । परखड ॥३४५॥
रामदूताने जी । दशा इथे केली ।
त्याचे कांही कैसे । ध्यान नाही ॥३४६॥
सीता पळवीली । अपराध झाला ।
ऐसे कोणा नाही । वाटत कां ॥३४७॥
अपराधाचे त्या । प्रायश्चित्तासाठी ।
तिला परतणे । साधे सोपे ॥३४८॥
ऐशा विवेकाने । लंकेचे रक्षण ।
होईल तें सुद्धा । स्पष्ट आहे ॥३४९॥
विभीषणांचे ते । विचार ऐकून ।
मंत्री माल्यवंत । तोही म्हणे ॥३५०॥
विभीषणांच्या ह्या । विचाराशी आहे ।
मीही सहमत । योग्य सर्व ॥३५१॥
रावण चिडला । म्हणे ह्या दोघाना ।
घालवूनी द्या रे । समोरून ॥३५२॥
माल्यवंत तरी । स्वतःच निघून ।
गेले स्वगृहास । खिन्नमने ॥३५३॥
विभीषण तरी । आर्जवाने करी ।
विवेक करावा । विनवणी ॥३५४॥
राज्याचे प्रजेचे । हित मनी धरा ।
अहंकारे होतो । सर्वनाश ॥३५५॥
खूप ऐकले मी । विभीषणा तुझे ।
सहनशक्ती तूं । ताणू नको ॥३५६॥
धाकटा बंधू तूं । म्हणून संयम ।
अजून राखला । आहे जाण ॥३५७॥
एवढी रामाची । तुज आहे भक्ती ।
जा ना मग तूही । त्याचेकडे ॥३५८॥
बोलणे खुंटले । पाहूनी हताश ।
झाला विभीषण । काय म्हणू ॥३५९॥
 (१९)
प्रभुचरणीच । आता रुजूं व्हावें ।
तशीच दिसते । ईश्वरेच्छा ॥३६०॥
हें तरी सौभाग्य । वाटते लाभते ।
सफळ होते ना । तपश्चर्या ॥३६१॥
परि वानरांच्या । सेनेत होईल ।
गैरसमजही । काय ठावें ॥३६२॥
प्रभूंचे दर्शन । व्हावे हीच आस ।
त्यांचाच विश्वास । मनी धरूं ॥३६३॥
भक्तिभाव ऐसा । मनी साठवून ।
आकाशमार्गाने । विभीषण ॥३६४॥
समुद्र लंघूनी । पोचला निकट ।
जेथे रामसेना । जमलेली ॥३६५॥
येतो विभीषण । पाहूनी सुग्रीव ।
म्हणे श्रीरामाना । इथे हा कां ॥३६६॥
आज्ञा व्हावी तरी । त्यास बांधूनीया ।
आणाया सांगेन । वानराना ॥३६७॥
श्रीराम म्हणती । नका होऊं ऐसे ।
तुम्ही उतावीळ । धीर धरा ॥३६८॥
वाटते शरण । येतो हा मजसी ।
शरणागत ते । मज प्रिय ॥३६९॥
कोटि पापे जरी । असतील केली ।
शरण आल्याने । नाश होती ॥३७०॥
कोणी पापी जीव । माझ्याकडे कधी ।
येऊंच शकत । नाही पहा ॥३७१॥
विभीषण तरी । इकडे येताहे ।
नक्कीच निष्पाप । मन त्याचे ॥३७२॥
आणि हा लक्ष्मण । आहे ना शेजारी ।
कर्दनकाळ हा । राक्षसांचा ॥३७३॥
प्रभूंचे वचन । ऐकूनी वानर ।
हर्षित जाहले । सुखावले ॥३७४॥
विभीषणासच । पुढे घालूनीया ।
रामांचे समोरी । आणीयले ॥३७५॥
विभीषणाने  तो । प्रभूंचे चरणी ।
माथा टेकवीला । झडकरी ॥३७६॥
म्हणे काकुळती । संचिताने झाला ।
पुलस्ती कुळात । जन्म जरी ॥३७७॥
राक्षसांचा संग । भोगीत राहीलो ।
आता मात्र वाटे । धन्य धन्य ॥३७८॥
आपुला हा संग । आता जन्मभर ।
असू द्यावा देवा । विनवणी ॥३७९॥
करवून घ्यावी । सेवा चरणांची ।
विसर न व्हावा । क्षणभरी ॥३८०॥
श्रीरामानी तरी । उचलूनी त्यास ।
धरीलें प्रेमाने । हृदयास ॥३८१॥
लक्ष्मणाचे सुद्धा । चरण वंदीले ।
त्यानीही हृदयी । धरीयेले ॥३८२॥
हृद्य तो प्रसंग । पाहूनी सर्वांचे ।
डोळे पाणावले । भक्तिपूर्ण ॥३८३॥
हें सर्व होताना । डोईचा मुकुट ।
हातात धरीला । विभीषणे ॥३८४॥
त्याचा तो मुकुट । स्वतः श्रीरामानी ।
विभीषणाडोई । ठेवीयेला ॥३८५॥
विभीषणा तूंच । जनहितदक्ष ।
योग्यसा लंकेश । शोभतोस ॥३८६॥
समुद्र लंघूनी । कैसेनी जाईल ।
सारे सज्ज सैन्य । सध्या चिंता ॥३८७॥
विभीषण म्हणे । एकाच बाणाने ।
शुष्क की होतील । जलाशय ॥३८८॥
आपुल्या बाणांचा । प्रताप थोरला ।
जाणतो सागर । ठावे मज ॥३८९॥
तरी एक वार । सागर स्वतःच ।
देईल कां वाट । पहावे ना ॥३९०॥
आपुले पूर्वज । सम्राट सागर ।
ह्यानीच केले हे । जलाशय ॥३९१॥
त्यांच्या वंशजाच्या । विनंतीचा मान ।
ठेवतील काय । पहावे ना ॥३९२॥
संवाद हा ऐसा । चालला असता ।
भली मोठी लाट । उसळली ॥३९२॥
लक्ष्मण चिडला । म्हणे हा उद्धट ।
सागर देईल । वाट काय ॥३९३॥
धनुष्यास बाण । लावण्यास आज्ञा ।
करावी सत्वर । मज बंधो ॥३९४॥
सबूर लक्ष्मणा । प्रार्थना करणे ।
प्रथम कर्तव्य । ध्यानी हवे ॥३९५॥
समुद्रकिनारी । ठेवूनीया दर्भ ।
प्रभूनी लावीले । पद्मासन ॥३९६॥
हें सारे होताना । सैन्यात कुठेशी ।
कांही खळबळ । कैसी झाली ॥३९७॥
रावणाने होते । विभीषणापाठी ।
तीघा मायावीना । धाडलेले ॥३९८॥
वानर बनूनी । तेही तीघे होते ।
पहात प्रसंग । रममाण ॥३९९॥
मायावी रूपाचा । विसर पडला ।
राक्षस जाहले । नकळत ॥४०१॥
दक्ष वानरानी । बांधूनी तीघाना ।
खूप चोप दिला । तेव्हा त्यानी ॥४०२॥
केली गयावया । नका आणि मारूं ।
माफ करा आम्हा । श्रीरामांची ॥४०३॥
शपथ तुम्हाला । सांगतो आम्हीही ।
प्रभूंच्या दर्शने । सुखावलो ॥४०४॥
ऐकूनी ते बोल । लक्ष्मण म्हणाले ।
सोडा त्याना आणा । माझ्याकडे ॥४०५॥
भुर्जपत्रावरी । सन्देश लिहूनी ।
म्हणाले त्या हेर । राक्षसाना ॥४०६॥
तुमच्या येण्याने । काम सोपे झाले ।
सन्देश देण्याचे । रावणास ॥४०७॥
सांगावे अजूनी । वेळ नाही गेली ।
सीतेस परत । करूनीया ॥४०८॥
युद्ध टाळूनीया । सर्वांचेच हित ।
साधावें सद्बुद्धि । धरूनीया ॥४०९॥
रामानीही स्मित । करूनी दिधली ।
संमती बंधूचे । प्रस्तावास ॥४१०॥
(२०)
लंकेत येऊनी । रावणासमोर ।
दाखल जाहले । तीन्ही हेर ॥४११॥
तीघांचा म्होरक्या । नांव त्याचे शुक ।
रावणाने त्यास । विचारीले ॥४१२॥
स्वागत जाहलें । विभीषणाचे कां ।
शंकाच घेतली । त्याचेवरी ॥४१३॥
भोगत ना होता । राजवैभव तो ।
आता न घरचा । घाटाचा ना ॥४१४॥
दुर्बुद्धि झाल्याने । असेच होणार ।
मज शिकवतो । उपदेश ॥४१५॥
शुक परि सांगे । रामानी प्रेमाने ।
स्वागतचि केले । विभीषणाचे ॥४१६॥
लंकाधिपतीचा । मानही दिधला ।
ऐकून रावण । संतापला ॥४१७॥
परि सांवरून । म्हणाला नाटक ।
झाल्याने लंकेश । कोणी होतो ॥४१८॥
बरे सांग कैसी । आहे मर्कटांची ।
सेना जमवली । बेशिस्तशी ॥४१९॥
माकडे अस्वले । घेऊनी लंकेशी ।
युद्धाचा करेल । घाट कुणी ॥४२०॥
शुक परि सांगे । कधी महाराज ।
शत्रूस अशक्त । मानू नये ॥४२१॥
एका वानराने । धिंगाणा घातला ।
तो तरी वाटतो । लहानगा ॥४२२॥
सेनेत आहेत । आणीक कितीक ।
प्रचंड धिप्पाड । बलशाली ॥४२३॥
द्विविद मलंद । नल नील गद ।
अंगद केसरी । बिकटास्य ॥ ४२४॥
दधिमुख आणि । निशठ नि शठ ।
आणि शक्तिशाली । जांबवंत ॥४२५॥
सुग्रीवासमान । वाटताती सारे ।
अगणित सेना । त्यांची आहे ॥४२६॥
 वानरांची वृत्ती ।  जात्या खोडसाळ ।
तशात प्रेरणा । रामकाज ॥४२७॥
सागरजलाची । करू आम्ही वाफ ।
किंवा पर्वतचि । टाकूं त्यात ॥४२८॥
रावणाची लंका । उध्वस्त करूनी ।
सोडवून आणू । सीतामाई ॥४२९॥
ऐसेच म्हणत । आहेत ते सारे ।
वृथा अभिमान । नाही त्यात ॥४३०॥
परि विभीषण । यानी दिला सल्ला ।
त्यानुसार पूजा । सागराची ॥४३१॥
आहे चाललेली । कोणत्याही क्षणी ।
होईल प्रसन्न । सागरही ॥४३२॥
शुकाने दिलेला । वृत्तांत ऐकूनी ।
रावणास हंसूं । आवरेना ॥४३३॥
समुद्र लंघणे । ज्याना नाही ठावे ।
समुद्राची पूजा । करतात ॥४३४॥
विभीषण तरी । जात्या नेभळट ।
त्याचा म्हणे सल्ला । विचारला ॥४३५॥
सांगा त्याना आता । तिथेच रहावे ।
सीता आहे इथे । सुखरूप ॥४३६॥
रावण हंसत । असता शुकाने ।
पुढ्यात धरले । भुर्जापत्र ॥४३७॥
डाव्या हातानेच । घेऊनीया आज्ञा ।
रावणाने केली । अमात्याना ॥४३८॥
वाचा कोणी काय । सन्देश धाडीला ।
म्हणतात काय । सन्देशात ॥४३९॥
लक्ष्मणाने होते । लिहिले रावणा ।
राक्षस जातीच्या । विनाशास ॥४४०॥
कारण स्वतःच । नको तू होऊस ।
शरण तू येई । रामपदी ॥४४१॥
ऐकून रावण । मनी बिथरला ।
आणून आवेश । गरजला ॥४४२॥
सागर किनारी । स्वतः अडलेले ।
आम्ही तरी मुक्त । जातो येतो ॥४४३॥
स्वतःची मर्यादा । ध्यानी न घेताच ।
रावणास धाक । दाखवीतो ॥४४४॥
आणि कां रे शुका । तिकडे जाऊन ।
तूही मतिभ्रष्ट । जाहला का ॥४४५॥
शत्रूसैन्याचीच । स्तुति सांगतोस ।
त्यासाठी तुजला । धाडीले कां ॥४४६॥
ऐसे म्हणूनीया । रावणाने दिली ।
शुकास जोराने । थोबाडीत ॥४४७॥
तेव्हा शुक मान । खाली घालूनीया ।
निघाला तो आला । रामपदी ॥४४८॥
शुक तरी होता । खरा एक मुनी ।
अगस्तीनी शाप । होता दिला ॥४४९॥
म्हणूनी राक्षस । कुळात राहीला ।
आता उद्धाराची । वेळ आली ॥४५०॥
रामानी ठेवीता । हात डोक्यावर ।
ऋषित्व पुनश्च । सिद्ध झाले ॥४५१॥
वंदूनी रामांचे । चरण शतधा ।
शुकमुनी गेले । निजाश्रमी ॥४५२॥
(२१)
तीन दिन झाले । अजूनी सागरा ।
पूजा नाही काय । राज येत ॥४५३॥
रामानी म्हटले । लक्ष्मणास आण ।
बाण नि धनुष्य । आता माझे ॥४५४॥
गर्विष्ठ दिसते । हें तो जलतत्त्व ।
अग्न्यस्त्र पाहीजे । ह्यास आता ॥४५५॥
धनुष्यास बाण । लावूनी रामानी ।
अग्न्यस्त्राचा मंत्र । सुरूं केला ॥४५६॥
जलचर सारे । अस्वस्थ जाहले ।
कितीकांचे प्राण । कासावीस ॥४५७॥
झालेसे पाहून । सागर जाहला ।
भ्रम झटकूनी । सविनय ॥४५८॥
दाखल जाहला । ब्राम्हण वेषात ।
हात जोडूनीया । प्रभूंपुढे ॥४५९॥
क्षमा मागीतली । प्रभूंच्या पूजेचा ।
आदर न केला । त्याचेसाठी ॥४६०॥
म्हणतो प्रभूना । कृपाळू होऊन ।
वाचवा येथील । जलसृष्टी ॥४६१॥
प्रभूनी म्हटले । ठीक आता सांग ।
येथून लंकेस । जावे कैसे ॥४६२॥
सागर बोलला । आपुल्या सैन्यात ।
नल आणि नील । दोघे बन्धू ॥४६३॥
आहेत दोघाना । लहानपणीच ।
मुनीनी दिलेले । वरदान ॥४६४॥
पर्वतास जरी । त्यांचा हस्तस्पर्श ।
झाल्यास सागरी । तरतील ॥४६५॥
सेतू बांधण्याची । त्याना आज्ञा द्यावी ।
मीही काही भार । उचलेन ॥ ४६६॥
वंदन करूनी । प्रभूंचे चरण ।
सागर सागरी । निवर्तला ॥४६७॥
(२२)
कैसा झाला सेतू । कैसे गेले सैन्य ।
लंकेस कैसेनी । झाले युद्ध ॥४६८॥
तें सारें पहावे । पुढील काण्डात ।
सुन्दरकाण्ड हें । सिद्ध झाले ॥४६९॥
प्रभूंच्या कृपेने । कैसे मारुतीने ।
भयभीत केले । रावणास ॥४७०॥
सीतामाईचीही । भेट जाहल्याने ।
सफल जाहले । सारे कार्य ॥४७१॥
त्यांच्याच कृपेने । अभंगरचना ।
जमली श्रीपाद । अभ्यंकरा ॥४७२॥
सर्वानाच होवो । मनोकामनांची ।
पूर्ती श्रीरामांच्या । प्रसादाने ॥४७३॥
सुन्दरकाण्डाच्या । वाचकाना सदा ।
श्रीरामभक्तीची । आस राहो ॥४७४॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

ShriRama Panchayatan-1.jpg

No comments: