Friday, August 18, 2017

गीतेचा सारांश अभंगवृत्तात

गीतेचा सारांश अभंगवृत्तात
रचयिता - श्रीपाद अभ्यंकर
प्रथमावृत्ती - एप्रिल २०१०


पदे  
एकूण पदे 
गीतेत श्लोक
फरक (+/-)
नमन 
१ ते ४


अध्याय १
५ ते १५ 
११
४७
-३६
अध्याय २
१६ ते ४४
२९
७२
-४३
अध्याय ३
४५ ते ६९
२५
४३
-१८
अध्याय ४
७० ते १००
३१
४२
-११
अध्याय ५
१०१ ते ११९
१९
२९
-१०
अध्याय ६
१२० ते १४६
२७
४७
-२०
अध्याय ७
१४७ ते १७७
३१
३०
+१
अध्याय ८
१७८ ते २१४
३७
२८
+९
अध्याय ९
२१५ ते २३७
२३
३४
-११
अध्याय १०
२३८ ते २८९
५२
४२
+१०
अध्याय ११
२९० ते ३३९
५०
५५
-५
अध्याय १२
३४० ते ३६१
२२
२०
+२
अध्याय १३
३६२ ते ३८५
२४
३५
-११
अध्याय १४
३८६ ते ४०७
२२
२७
-५
अध्याय १५
४०८ ते ४२६
१९
२०
-१
अध्याय १६
४२७ ते ४४५ 
१९
२४
-५
अध्याय १७
४४६ ते ४८३
३८
२८
+१०
अध्याय १८
४८४ ते ५५९
७६ 
७८
-२
सर्व मिळून

५५९
७००
-१४१ॐ श्रीपरमात्मने नमः ।
॥१॥ नमन गणेशा । कृपा असो द्यावी । सिद्धीस नेण्यास । उपक्रम ॥०-१॥
॥२॥ "अभंग" वृत्तात । रचण्या सारांश । भगवद्गीतेच्या । अध्यायांचा ॥०-२॥
॥३॥ अभंग वृत्त हे । सरळ रसाळ । भक्तिभावाचीही । हीच रीत ॥०-३॥
॥४॥ इदं न मम ह्या । श्रद्धेने सादर । करीतो श्रीपाद । अभ्यंकर॥०-४॥
अध्याय १
॥५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश पहिल्या । अध्यायाचा ॥१-१॥
॥६॥ राजे धृतराष्ट्र । पुसती सांग बा । सञ्जया रणात । काय झाले ॥१-२॥
॥७॥ दुर्योधनाने ना । द्रोणाना कथिले । कोणत्या पक्षात । कोणकोण ॥१-३॥
॥८॥ शेजारी भीष्मानी । उत्साहे गर्जूनी । फुंकीला त्वेषाने । सिंहनाद ॥१-४॥
॥९॥ तुंबळ माजले । अर्जुन कृष्णास । म्हणे रथ न्यावा । मधोमध ॥१-५॥
॥१०॥ ज्येष्ठ श्रेष्ठ आप्त । स्वकीय पाहूनी । सम्भ्रम जाहला । अर्जुनास ॥१-६॥
॥११॥ ज्यांचेसाठी घाट । राज्याचा करावा । तेच समर्पित । ठाकले कीं ॥१-७॥
॥१२॥ युद्धाने माजती । वैधव्य दुःशील । संकर बुडवी । कुलधर्म ॥१-८॥
॥१३॥ ऐसे पापी युद्ध । करण्यापरीस । मारोत मजला । निहत्थाच ॥१-९॥
॥१४॥ म्हणत ऐसेनी । गाण्डीव टाकूनी । अर्जुन उतारा । रथातूनी ॥१-१०॥
॥१५॥ इथेच संपला । अध्याय पहिला । अर्जुनविषाद- । योग नांव ॥१-११॥
अध्याय २
॥१६॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश दुसऱ्या । अध्यायाचा ॥२-१॥
॥१७॥ अर्जुन संमोही । पाहूनी श्रीकृष्ण । म्हणती हें काय । भलतेंच ॥२-२॥
॥१८॥ कैसे हें किल्बिष । अनार्य अयोग्य । अस्वर्ग्य मांडले । अशोभनीय ॥२-३॥
॥१९॥ अर्जुन म्हणतो । समोरी पहा ना । प्रिय वंदनीय । भीष्म द्रोण ॥२-४॥
॥२०॥ युद्ध म्हणूनी कां । यांनाही मारावे । भिक्षासेवनीही । स्मरावेसे ॥२-५॥
॥२१॥ गुरूना मारूनी । भोगूं जे कां भोग । रक्तरंजित ते । लांछनीय ॥२-६॥
॥२२॥ आम्ही जिंकावे कीं । ह्यानीच जिंकावे । दिशाहीन आहे । मन माझे ॥२-७॥
॥२३॥ सद्धर्म कोणता । कोणता अधर्म । तूंच आता मज । समजूं दे ॥२-८॥
॥२४॥ श्रीकृष्ण हंसूनी । म्हणती अर्जुना । प्रवाद हा किती । विपर्यस्त ॥२-९॥
॥२५॥ शोक करावेसे । नाहीत त्यांचाच । शोक तूं मांडीला । अनाठायी ॥२-१०॥
॥२६॥ तुझ्या मारण्याने । मरतील कोणी । ह्याच विचारी कीं । गफलत ॥२-११॥
॥२७॥ आत्मा तो केवळ । जाण देहधारी । देहहानीचे ना । त्यास कांहीं ॥२-१२॥
॥२८॥ वस्त्र जीर्ण होतां । टाकावें लागते । तैसेच आत्म्यास । देहाविशी ॥२-१३॥
॥२९॥ शस्त्राने ना कटे । आगीत ना जळे । पाण्याने ना भिजे । आत्मा ऐसा ॥२-१४॥
॥३०॥ शिवाय हे पहा । जन्मल्यास मृत्यू । अटळचि आहे । शोक कैसा ॥२-१५॥
॥३१॥ धर्माचे म्हणता । क्षत्रियास तरी । युद्धासम नाही । धर्मकार्य ॥२-१६॥
॥३२॥ युद्ध न करणे । अधर्म होईल । अपकीर्ती आणि । पाप माथी ॥२-१७॥
॥३३॥ कीर्तिवंतालागी । अपकीर्ती होणे । यावीण मरण । दुजे काय ॥२-१८॥
॥३४॥ युद्धात मेल्यास । पावशील स्वर्ग । जिंकशील तरी । राज्य भोग ॥२-१९॥
॥३५॥ फळाविशी चिंता । आत्ताच कशास । कर्मबन्धनेच । तोडावीत ॥२-२०॥
॥३६॥ मानी सुखदुःख । सम लाभहानी । जयपराजय । तेही सम ॥२-२१॥
॥३७॥ समत्व योगाने । बुद्धीस निश्चल । करीता कर्मात । कुशलता ॥२-२२॥
॥३८॥ अर्जुनाने केला । प्रश्न एक तेव्हां । बोले चाले कैसा । स्थितप्रज्ञ ॥२-२३॥
॥३९॥ सांगती श्रीकृष्ण । निष्काम तो सदा । नाही शुभाशुभ । ईर्षा द्वेष ॥२-२४॥
॥४०॥ विषयांचा तरी । सर्वत्र पसारा । इन्द्रिये चळती । सम्मोहित ॥२-२५॥
॥४१॥ सम्मोहाकारणे । स्मृतिभ्रंश होतो । मग बुद्धिनाश । सर्वनाश ॥२-२६॥
॥४२॥ निशा सर्वभूतां । योग्यास तो दिन । भूतांच्या उजाडी । रात्र पाहे ॥२-२७॥
॥४३॥ ऐसी ब्रम्हस्थिती । येतां अविचल । अन्तकाळी सुद्धा । शान्त शान्त ॥२-२८॥
॥४४॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । ऐशा संवादाने । गीतोपनिषदी । सांख्ययोग ॥२-२९॥
अध्याय ३ 
॥४५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश तिसऱ्या । अध्यायाचा ॥३-१॥
॥४६॥ अर्जुनाचा प्रश्न । म्हणसी तूं बुद्धि । कर्माहूनी श्रेष्ठ । निखालस ॥३-२॥
॥४७॥ तरी घोर कर्मी । गुंतवूं पाहसी । मनात दुविधा । होते पहा ॥३-३॥
॥४८॥ श्रीकृष्ण सांगती । कर्म टाकूनीया । नैष्कर्म्य न होते । मुळी सुद्धा ॥३-४॥
॥४९॥ कोणताही जीव । क्षणैक न राहे । कर्म न करीता । ध्यानी धरी ॥३-५॥
॥५०॥ कर्मास न व्हावे । माणसाने वश । अवश राहूनी । कर्म व्हावे ॥३-६॥
॥५१॥ संन्यास सम्पूर्ण । आणि समबुद्धि । झाली तरी सिद्धि । येत नाही ॥३-७॥
॥५२॥ मानव्य दिव्यत्व । यांचा कांहीं मेळ । जमेल तो योग । श्रेयस्कर ॥३-८॥
॥५३॥ यज्ञशिष्ट तेच । सेवूनीया सन्त । सर्व दोषाहून । मुक्त होती ॥३-९॥
॥५४॥ आत्मबुद्धीने जे । उपभोग घेती । पापांचा घडाच । सांचवीती ॥३-१०॥
॥५५॥ अन्नाने घडतो । भूतांचा पसारा । अन्न संभवते । पर्जन्याने ॥३-११॥
॥५६॥ पर्जन्य घडतो । यज्ञाचे कारणे । यज्ञ तो घडतो । कर्मातून ॥३-१२॥
॥५७॥ कर्मांची साखळी । ब्रम्हाने रचीली । ब्रम्हाचा उद्भव । अक्षरी गा ॥३-१३॥
॥५८॥ असे सारे चक्र । आहे गा नेमस्त । ठेवावी तयाची । बांधीलकी ॥३-१४॥
॥५९॥ असक्त राहूनी । रहावे कर्मात । परम साधते । ऐशा योगे ॥३-१५॥
॥६०॥ श्रेष्ठतेने वागे । त्याचे अनुयायी । वाढता बनतो । जनसंघ ॥३-१६॥
॥६१॥ इथे रणांगणी । स्वतःसाठी मज । आहे कांही काय । साधायाचे ॥३-१७॥
॥६२॥ जरी मीच कर्म । टाकूनी राहीन । उच्छाद माजेल । जगभर ॥३-१८॥
॥६३॥ संन्यास अध्यात्म । धरूनीया मनी । करी युद्धकर्म । मदर्पण ॥३-१९॥
॥६४॥ रहावे स्वधर्मी । गरीबीत सुद्धा । परधर्म तरी । भयावह ॥३-२०॥
॥६५॥ अर्जुन कृष्णास। करी एक प्रश्न । कोणी कां जातात । वाममार्गी ॥३-२१॥
॥६६॥ काम आणि क्रोध । जीवनाचे वैरी । युक्त झाकाळूनी । फसवीती ॥३-२२॥
॥६७॥ खेळ ह्यांचा चाले । ताबा घेऊनीया । मनाचा बुद्धीचा । इन्द्रियांचा ॥३-२३॥
॥६८॥ काम तोही शत्रू । नको थारा त्यास । विवेकी रहावे । सर्वकाळ ॥३-२४॥
॥६९॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । संवादाने सिद्ध । गीतोपनिषदी । कर्मयोग ॥।३-२५॥
अध्याय ४
॥७०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश चवथ्या । अध्यायाचा ॥४-१॥
॥७१॥ श्रीकृष्ण सांगती । अथपासूनीया । योगाचा तो कैसा । इतिहास ॥४-२॥
॥७२॥ विवस्वतालागी । मीच तो कथिला । त्याने तो कथिला । मनूलागी ॥४-३॥
॥७३॥ मनूने कथिला । इक्ष्वाकू राजास । परंपरा ऐसी । थोर ह्याची ॥४-४॥
॥७४॥ कालौघात पहा । नाशही पावला । आज उजळला । तुझेसाठी ।४-५॥
॥७५॥ अर्जुन विचारी । तुझी जन्मकथा । आहे वर्तमान । समोरीच ॥४-६॥
॥७६॥ विवस्वत तरी । पुराण पुरुष । तुवाच कथिले । त्यास कैसे ॥४-७॥
॥७७॥ श्रीकृष्ण सांगती । तुझे नि माझेही । जन्म खूप झाले । गुह्य तेही ॥४-८॥
॥७८॥ माझे स्मरणात । आहेत ते सारे । तुज नाही जाण । उरलेली ॥४-९॥
॥७९॥ प्रकृति असते । माझे ठायी नित्य । लय प्रकटन । करीतो मी ॥४-१०॥
॥८०॥ अधर्म माजता । घेतो अवतार । ताराया सुष्टाना । दुष्टनाशे ॥४-११॥
॥८१॥ गुण आणि कर्म । यांच्या निकषाने । चातुर्वर्ण्य मीच । स्थापीयेला ॥४-१२॥
॥८२॥ मीच जाण त्याचा । कर्ता नि अकर्ता । कर्मापासून त्या । अलिप्त मी ॥४-१३॥
॥८३॥ कर्मे करावीत । अलिप्त राहून । तेणे कर्मबाधा । नाही होत ॥४-१४॥
॥८४॥ मुळात कर्माची । व्याख्याच गहन । केल्याने होते ते । कर्म एक ॥४-१५॥
॥८५॥ विरुद्ध विशेष । विपरीत ऐशा । विकर्माने सुद्धा । कर्मज्ञान ॥४-१६॥
॥८६॥ अकर्म देखील । कर्माचाच पैलू । कर्म समजण्या । कामी येतो ॥४-१७॥
॥८७॥ कोणतेही कर्म । सुरू करताना । कामना संकल्प । असू नये ॥४-१८॥
॥८८॥ ज्ञानाग्नीने ज्याची । कर्मे भस्म झाली । पंडित त्यासीच । समजावे ॥४-१९॥
॥८९॥ कर्मफलाचे ना । ज्यास देणेघेणे । कर्मे करूनीही । निष्कर्मी तो ॥४-२०॥
॥९०॥ सर्व इन्द्रियांच्या । प्राणाच्या कर्मांचे । हवन अर्पावे । योगाग्नीत ॥४-२१॥
॥९१॥ योगाग्नी होतसे । ज्ञानदीपाने नि । आत्मसंयमाने । प्रज्वलित ॥४-२२॥
॥९२॥ ब्रम्हाने विशद । केले बहु यज्ञ । द्रव्ययज्ञ आणि । तपोयज्ञ ॥४-२३॥
॥९३॥ स्वाध्याययज्ञ नि । ज्ञानयज्ञ सुद्धा । प्राणायामयज्ञ । योगयज्ञ ॥४-२४॥
॥९४॥ साऱ्यांची निष्पत्ति । होते कर्मातून । अमृत असते । यज्ञशिष्ट ॥४-२५॥
॥९५॥ द्रव्ययज्ञाहूनी । ज्ञानयज्ञ श्रेष्ठ । ज्ञानात विरती । सारी कर्मे ॥४-२६॥
॥९६॥ ज्ञानबोध होण्या । करी प्रणिपात । आणि परिप्रश्न । सेवा सुद्धा ॥४-२७॥
॥९७॥ ज्ञानोपदेश तो । ज्ञानी तत्त्वदर्शी । ऐशा गुरुसंगे । मेळवावा ॥४-२८॥
॥९८॥ ऐसे ज्ञान होता । मोह ना होईल । पाहतां स्वस्थायी । सारी भूतें ॥४-२९॥
॥९९॥ अज्ञानाकारणें । झालासे सम्मोह । ज्ञानाने उच्छेद । करी त्याचा ॥४-३०॥
॥१००॥ ऐसा सिद्ध झाला । गीतोपनिषदी । ज्ञानकर्मसंन्यास । नामे योग ॥४-३१॥
अध्याय ५ 
॥१०१॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश पांचव्या । अध्यायाचा ॥५-१॥
॥१०२॥ अर्जुन कृष्णास । कर्मयोग आणि । कर्मसंन्यासही । सांगतोसि ॥५-२॥
॥१०३॥ मनी द्विधा होते । तरी दोहोमध्ये । श्रेयस्कर काय । समजावे ॥५-३॥
॥१०४॥ श्रीकृष्ण म्हणती । दोन्ही श्रेयस्कर । कर्मयोग परी । जास्त योग्य ॥५-४॥
॥१०५॥ कर्म करतां ही । द्वेष ना आकांक्षा । नित्य तो संन्यास । सहजीच ॥५-५॥
॥५-६॥ सांख्य आणि योग । वेगळे म्हणणे । बालिशपणा तो । पांडित्य ना ॥५-६॥
॥१०७॥ कोणतेही एक । जरी साध्य केले । सारखेच फळ । दोहोंचेही ॥५-७॥
॥१०८॥ योग न साधता । संन्यासचि केला । दुःखास कारण । तेंही होते ॥५-८॥
॥१०९॥ उठता बसता । ऐकता पाहता । जागेपणी किंवा । स्वप्नात वा ॥५-९॥
॥११०॥ इन्द्रियांची कार्ये । इन्द्रियार्थी ऐसे । म्हणूनी करावी । ब्रम्हार्पण ॥५-१०॥
॥१११॥ कर्मे तरी जाण । मनाने बुद्धीने । कायेने घडत । असतात ॥५-११॥
॥११२॥ साऱ्याच कर्मांची । फळे टाकल्याने । योग्यास साधते । मनःशान्ति ॥५-१२॥
॥११३॥ कर्म वा कर्तृत्व । देव ना निर्मीतो । देव नाही घेत । पापपुण्य ॥५-१३॥
॥११४॥ कर्मफलाविशी । आसक्त राहणे । अज्ञानाने ज्ञान । गुर्फटणे ॥५-१४॥
॥११५॥ अज्ञानतिमिर । ज्याचा दूर झाला । सूर्यासम ज्ञान । उजाळते ॥५-१५॥
॥११६॥ उल्हास न व्हावा । प्रिय मिळाल्याने । अप्रिय मिळतां । खेद नको ॥५-१६॥
॥११७॥ स्पर्शजन्य जे जे । भोग ते सारेच । नसती शाश्वत । सुखकारी ॥५-१७॥
॥११८॥ आदिअन्त त्यांच्या । प्रकृतीत आहे । त्यांत ना रमतो । बुद्धिवन्त ॥५-१८॥
॥११९॥ येणे रीती झाला । गीतोपनिषदी । कर्मसंन्यासाचा । योग सिद्ध ॥५-१९॥
अध्याय ६
॥१२०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सहाव्या । अध्यायाचा ॥६-१॥
॥१२१॥ श्रीकृष्ण सांगती । सदा सारी कर्मे । फळाविशी संग । सोडूनीया ॥६-२।
॥१२२॥ करणारा योगी । म्हणावा संन्यासी । जाण संन्यासही । योग एक ॥६-३॥
॥१२३॥ योगमार्गावर । स्वतःच स्वतःचा । बन्धू किंवा शत्रू । असतो गा ॥६-४॥
॥१२४॥ प्रमाणित हवे । सारेच वर्तन । नको अति खाणे । भुकेजणे ॥६-५॥
॥१२५॥ अति जागरण । स्वप्नशीलता वा । केल्याने योग ना । साध्य होतो ॥६-६॥
॥१२६॥ पुनीत प्रदेशी । स्थिर आसनाने । नाही अति उंच । किंवा खोल ॥६-७॥
॥१२७॥ एकाग्र मनाने । इन्द्रियावरती । ताबा ठेऊनीया । ध्यान व्हावे ॥६-८॥
॥१२८॥ जेव्हां जेव्हां मन । पळाया पाहील । काबूत आणावे । लगोलग ॥६-९॥
॥१२९॥ धीरे धीरे ऐसी । साधना वाढता । विचाररहित । मन व्हावे ॥६-१०॥
॥१३०॥ सर्वभूताठायी । आपणासी पाहे । पाही सर्वभूतें । स्वतःठायी ॥६-११॥
॥१३१॥ मज जळी काष्ठी । पाषाणीही पाहे । पाहे सर्वभूतें । मजठायी ॥६-१२॥
॥१३२॥ मजसी तो प्रिय । सर्वथा सदैव । मीही त्यासी प्रिय । सर्वकाळ ॥६-१३॥
॥१३३॥ अर्जुन विचारे । ऐसा साम्ययोग । सर्वकाळ स्थिर । राहील कां ॥६-१४॥
॥१३४॥ मानवी मनाचा । गुण चंचलता । वारा बन्धनात । राहतो कां ॥६-१५॥
॥१३५॥ श्रीकृष्ण सांगती । साम्यस्थिति आहे । कठीण जरूर । अशक्य ना ॥६-१६॥
॥१३६॥ मनास काबूत । ठेवाया लागती । प्रयत्न आणीक । साधनाही ॥६-१७॥
॥१३७॥ अर्जुनाचे मनी । तरीही जिज्ञासा । श्रद्धाळू चळता । त्याचे काय ॥६-१८॥
॥१३८॥ श्रीकृष्ण सांगती । भले जे जे केले । वांया नाही जात । कधीच तें ॥६-१९॥
॥१३९॥ योगभ्रष्टासही । शक्य पुनर्जन्म । पवित्र श्रीमन्त । कुळामध्ये ॥६-२०॥
॥१४०॥ किंवा कुणा योगी- । कुळामध्ये शक्य । जरी ऐसा जन्म। दुर्लभचि ॥६-२१॥
॥१४१॥ पूर्वसंचिताचा । संयोग लाभता । पुनश्च साधना । सुरू होते ॥६-२२॥
॥१४२॥ अनेक जन्मांच्या । ऐशा साधनेने । परम गतीची । प्राप्ति होते ॥६-२३॥
॥१४३॥ तपस्व्याहून नि । ज्ञान्याहून आणि । कर्मी लोकांपेक्षा । श्रेष्ठ योगी ॥६-२४॥
॥१४४॥ म्हणून अर्जुना । बन योगी बरा । माझा गा आग्रह । तुजलागी ॥६-२५॥
॥१४५॥ योग्यामध्ये सुद्धा । युक्ततम जाण । मद्गत जो झाला । अन्तरात्मी ॥६-२६॥
॥१४६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । आत्मसंयमाचा । योग सिद्ध ॥६-२७॥
अध्याय ७ 
॥१४७॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सातव्या । अध्यायाचा ॥७-१॥
॥१४८॥ श्रीकृष्ण सांगती । समग्रपणाने । मज जाणशील । ऐसे ज्ञान ॥७-२॥
॥१४९॥ अवगत होतां । जाणावेसे काहीं । बाकी न उरेल । ऐक तेंच ॥७-३॥
॥१५०॥ हजारोंच्या पैकी । एकादाच कुणी । सिद्धीसाठी यत्न । करूं जातो ॥७-४॥
॥१५१॥ त्यांच्यापैकी कोणी । एकादा क्वचित । तत्त्वाने मजसी । ओळखतो ॥७-५॥
॥१५२॥ अपरा प्रकृती । आहे गा अष्टधा । भूमी आप वायू । अग्नि आणि ॥७-६॥
॥१५३॥ आकाश नि मन । बुद्धि अहंकार । जीवांची प्रकृति । परा जाण ॥७-७॥
॥१५४॥ ऐशा साऱ्या जगा । प्रकट करीतो । मीच प्रलयही । घडवीतो ॥७-८॥
॥१५५॥ माझ्यावीण कांही । नाहीच आगळे । धाग्यात मणि कां । ओवलेले ॥७-९॥
॥१५६॥ प्रवाही पदार्था-। मधील रस मी । चन्द्र्सूर्यांचे ते । तेज मीच ॥७-१०॥
॥१५७॥ सर्व वेदांतील । ॐ कारही मीच । अवकाशी नाद । तोही मीच ॥७-११॥
॥१५८॥ मानवी पौरूष । हवेतील गंध । सर्वभूतांठायी । श्वास मीच ॥७-१२॥
॥१५९॥ सात्त्विक राजस । तामस ते भाव । माझ्यातून होती । प्रसृत गा ॥७-१३॥
॥१६०॥ त्रिगुणात्मक ह्या । भावांच्या मोहांत । असते जग गा । गुर्फटले ॥७-१४॥
॥१६१॥ माझ्याशी शरण । होती जे जे कोणी । तरून ते जाती । माया सारी ॥७-१५॥
॥१६२॥ आसूरी वृत्तीचे । अज्ञानी वा मूढ । मजकडे कधी । येतील ना ॥७-१६॥
॥१६३॥ मजकडे येण्या । प्रवृत्त होतात । चार कारणानी । जन पहा ॥७-१७॥
॥१६४॥ असह्य दुःखांचे । प्रयत्न थकतां । आर्त जन येती । मजकडे ॥७-१८॥
॥१६५॥ जिज्ञासा दाटतां । मनांत कोण मी । जिज्ञासूही येती । मजकडे ॥७-१९॥
॥१६६॥ इच्छित फलाच्या । प्राप्तीच्या आशेने । अर्थार्थीही येती । मजकडे ॥७-२०॥
॥१६७॥ ज्ञानी जे जाणती । मी कोण समग्र । ते तरी राहती । मम ठायी ॥७-२१॥
॥१६८॥ कामनांचा गुंता । हरपतो ज्ञान । ज्याची जी प्रकृति । तैसे होते ॥७-२२॥
॥१६९॥ अज्ञानी म्हणती । होतो मी अव्यक्त । आता व्यक्त झालो । समजती ॥७-२३॥
॥१७०॥ मी तरी अव्यय । मग जन्म कैसा । भूत वर्तमान । भविष्यही ॥७-२४॥
॥१७१॥ जाणतो मी सारे । मज न जाणती । कोणी युक्तभावे । मोहामुळे ॥७-२५॥
॥१७२॥ इच्छा द्वेष ह्यानी । मोहात् द्वंद्वात । पहा सारी भूतें । गुंतलेली ॥७-२६॥
॥१७३॥ पुण्यकर्मी जन । पापमुक्त होतां । द्वंद्व मोह त्यांचे । सरतात ॥७-२७॥
॥१७४॥ माझेठायी मग । आश्रय धरीतां । सारे ब्रम्हज्ञान । आकळते ॥७-२८॥
॥१७५॥ काय तें अध्यात्म । कर्म अधिभूत । काय अधिदैवी । अधियज्ञी ॥७-२९॥
॥१७६॥ सारे जाणूनीया । अन्तकाळी सुद्धा । युक्तच राहते । त्यांचे चित्त ॥७-३०॥
॥१७७॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ज्ञानविज्ञानाचा । योग सिद्ध ॥७-३१॥
अध्याय ८ 
॥१७८॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश आठव्या । अध्यायाचा ॥८-१॥
॥१७९॥ अर्जुनाचा प्रश्न । ब्रम्ह म्हंजे काय । अध्यात्म तें काय । कर्म काय ॥८-२॥
॥१८०॥ अधिभूत काय । अधिदैवी काय । अधियज्ञी काय । सांग मज ॥८-३॥
॥१८१॥ आत्म्यासी नियत । ठेऊनी तुजला । अन्तकाळी कैसा । जाणावें गा ॥८-४॥
॥१८२॥ अक्षर परम । तेचि ब्रम्ह जाण । अध्यात्म म्हणजे । स्वभावचि ॥८-५॥
॥१८३॥ कर्म तरी जाण । भूत वर्तमान । भविष्य हें सारे । घडवीते ॥८-६॥
॥१८४॥ जे जे नष्ट होते । अधिभूत सारे । पुरूष तो जाण । अधिदैवी ॥८-७॥
॥१८५॥ देहधाऱ्यामध्ये । श्रेष्ठ जो मी येथे । मीच अधियज्ञी । अर्जुना गा ॥८-८॥
॥१८६॥ अन्तकाळी जो कां । मजसी स्मरूनी । देह टाकण्याचा । यत्न करी ॥८-९॥
॥१८७॥ मजठायी तो गा । निश्चित पोचतो । होते हे ऐसेच । निःसंशय ॥८-१०॥
॥१८८॥ देह टाकताना । जो जो कांही भाव । स्मरणी राहतो । तैसी गति ॥८-११॥
॥१८९॥ आत्म्यास मिळते । म्हणूनी अर्जुना । सदैव मजसी । स्मरूनीया ॥८-१२॥
॥१९०॥ कर्म वा युद्ध वा । मजसी अर्पूनी । राहशील पहा । मम ठायी ॥८-१३॥
॥१९१॥ प्रयाणाचे वेळी । अचल मनाने । योगबलाने नि । भक्तिपूर्ण ॥८-१४॥
॥१९२॥ भुवयांच्या मध्ये । आणूनीया प्राण । दिव्यपुरुषत्व । प्राप्त होते ॥८-१५॥
॥१९३॥ सारी नऊ द्वारे । संयत करूनी । मनास रोधूनी । हृदयांत ॥८-१६॥
॥१९४॥ प्राण नेऊनीया । मस्तकीच्या चक्री । ॐ कार स्थितीत । स्थिर होत ॥८-१७॥
॥१९५॥ प्राण सोडण्यास । प्रयत्न केल्याने । परम गति गा । प्राप्त होते ॥८-१८॥
॥१९६॥ चित्ती माझ्याविना । अन्य कांही नाही । केवळ स्मरती । मज नित्य ॥८-१९॥
॥१९७॥ ऐशा नित्ययुक्त । योग्यास सुलभ । मजप्रत येणे । अन्तकाळी ॥८-२०॥
॥१९८॥ मजप्रत येतां । नाही पुनर्जन्म । तें तो अशाश्वत। दुःखपूर्ण ॥८-२१॥
॥१९९॥ पुनरावर्तन । भुवनी भरले । मजप्रत येतां । सरतें तें ॥८-२२॥
॥२००॥ ब्रम्हाचा दिवस । सहस्र युगांचा । रात्रही सहस्र । युगांची गा ॥८-२३॥
॥२०१॥ उजाडणे म्हंजे । अव्यक्तामधून । सारे व्यक्त होते । समजावे ॥८-२४॥
॥२०२॥ रात्री सारे पुन्हा । अव्यक्तात लीन । होते इतुकेच । समजावे ॥८-२५॥
॥२०३॥ भूतग्राम सारे । येणे रीती होते । अव्यक्त नि व्यक्त । पुनःपुन्हा ॥८-२६॥
॥२०४॥ परं भाव परी । आहे सनातन । जाण अविनाशी । अक्षर हा ॥८-२७॥
॥२०५॥ परम गति ती । परम धाम तें । तिथून नाहीच । परतणें ॥८-२८॥
॥२०६॥ आहेही संकेत । अन्तकाळासाठी । असतां उजेड । शुक्लपक्ष ॥८-२९॥
॥२०७॥ उत्तरायणाचा । महीना असतां । योग्यास ब्रम्हत्व । शक्य होते ॥८-३०॥
॥२०८॥ रात्री सायंकाळी । कृष्णपक्षामध्ये । दक्षिणायनाच्या । सहा मासी ॥८-३१॥
॥२०९॥ ज्यांना अन्तकाळ । येतो त्या योग्याना । चन्द्रज्योतीसम । प्रत्यय गा ॥८-३२॥
॥२१०॥ शुक्ल आणि कृष्ण । गति ऐशा दोन । आवृत्ति निवृत्ति । त्यांचे भाव ॥८-३३॥
॥२११॥ जगाची रहाटी । ऐसीच चालते । योग्यास नसते । त्याचे कांहीं ॥८-३४॥
॥२१२॥ वेदाध्ययनाने । यज्ञांनी तपाने । दानाने मिळते । जें जें पुण्य ॥८-३५॥
॥२१३॥ त्याहून श्रेष्ठसे । योग्यास मिळते । स्थान म्हणूनीया । व्हावे योगी ॥८-३६॥
॥२१४॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । अक्षरब्रम्ह हा । योग सिद्ध ॥८-३७॥
अध्याय ९
॥२१५॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश नवव्या । अध्यायाचा ॥९-१॥
॥२१६॥ श्रीकृष्ण सांगती । गुह्यतम ऐसे । विज्ञानासहित । ज्ञान ऐक ॥९-२॥
॥२१७॥ अव्यक्ती राहून । मीच सारे जग । निर्मीले मत्स्थायी । सारी भूतें ॥९-३॥
॥२१८॥ कल्पाचीये अन्ती । सारी भूतें जाती । मीच निर्मिलेल्या । प्रकृतीत ॥९-४॥
॥२१९॥ कल्पाचे प्रारंभी । पुन्हा सारी भूतें । प्रसृत करीतो । प्रकृतीत ॥९-५॥
॥२२०॥ भूतांचा मी कर्ता । धाताही भूतांचा । प्रकृतीचे योगे । चालवीतो ॥९-६॥
॥२२१॥ प्रकृतीचे वशी । ठेवूनीया भूतें । ऐसेनी असक्त । राहतो मी ॥९-७॥
॥२२२॥ परं भाव माझा । मूढ न जाणती । मजला मानव । समजती ॥९-८॥
॥२२३॥ परंतु महात्मे । मजसी अव्यय । जाणूनी अनन्य । भजतात ॥९-९॥
॥२२४॥ जगाचा मी पिता । माता आणि धाता। ऋक् साम यजु मी । ॐ कार मी ॥९-१०॥
॥२२५॥ अनन्य चित्ताने । भजती जे मज । त्यांचा योगक्षेम । वाहतो मी ॥९-११॥
॥२२६॥ इतर दैवते । भजतात जे कां । तीही भक्ती येते । मजप्रत ॥९-१२॥
॥२२७॥ देवयज्ञ आणि । पितृयज्ञ किंवा । भूतयज्ञ ऐसे । आचरती ॥९-१३॥
॥२२८॥ सर्वच यज्ञांचा । प्रभू मी भोक्ता मी । मजसी तत्त्वाने । जाणावे कीं ॥९-१४॥
॥२२९॥ पत्री फळे फुले । तोयही भक्तीने ।अर्पीतां होतो मी । संतुष्ट बा ॥९-१५॥
॥२३०॥ जें जें करशील । जें जें तूं खाशील । देशील घेशील । सर्व सर्व ॥९-१६॥
॥२३१॥ करी मदर्पण । तरी शुभाशुभ । कर्माचे तुजसी । राहील ना ॥९-१७॥
॥२३२॥ मदर्पण भाव । कोणी आचरती । स्त्रिया वैश्य शूद्र । कोणीही गा ॥९-१८॥
॥२३३॥ परम गतीच । मिळते अर्पणी । ब्राम्हण राजर्षी । यांना खास ॥९-१९॥
॥२३४॥ पुण्यशील वृत्ती । भक्तीमध्ये रत । होतां सुख मिळे । शाश्वत तें ॥९-२०॥
॥२३५॥ होई तूं मन्मना । मद्भक्त मद्याजी । करी तूं नमन । मजप्रत ॥९-२१॥
॥२३६॥ मत्परायणसा । योग साधशील । मम ठायी भक्ता । राहशील ॥९-२२॥
॥२३७॥ कृष्णार्जुन यांच्या । संवादाने सिद्ध । योग राजविद्या- ॥ राजगुह्य ॥९-२३॥
अध्याय १० 
॥२३८॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ दहाव्या । अध्यायास ॥१०-१॥
॥२३९॥ श्रीकृष्ण सांगती । माझे जें प्रभुत्व । महर्षीना सुद्धा । आकळे ना ॥१०-२॥
॥२४०॥ मीच बहुविध । भाव रुजवीले । भूतांचिये ठायी । पहा किती ॥१०-३॥
॥२४१॥ बुद्धि ज्ञान क्षमा । सुख दुःख भय । अभय अहिंसा । तप दान ॥१०-४॥
॥२४२॥ यश अपयश । भव नि अभाव । शम दम तुष्टि । समताही ॥१०-५॥
॥२४३॥ सात ते महर्षी । आणि चार मनु । माझेच भाव ते । ध्यानी घेई ॥१०-६॥
॥२४४॥ त्यांचेच वंशज । सारी प्रजा खरी । माझ्यातून सारे । प्रवर्तते ॥१०-७॥
॥२४५॥ ऐसे हे जाणून । बुद्ध जे जाहले । माझे संकीर्तनी । रमतात ॥१०-८॥
॥२४६॥ ऐशा प्रियजना । देतो बुद्धियोग । अनुकंपा माझी । समजती ॥१०-९॥
॥२४७॥ नाशीतो अंधार । त्यांच्या अज्ञानाचा । ज्ञानदीपाने मी । उजाळतो ॥१०-१०॥
॥२४८॥ अर्जुन रंगला । स्तुति उधळीत । तूंच परब्रम्ह । परंधाम ॥१०-११॥
॥२४९॥ शाश्वत पुरुष । दिव्य आदिदेव । कितीसे वर्णीती । ऋषीमुनी ॥१०-१२॥
॥२५०॥ देवर्षी नारद । असित व्यासही । स्वतःही मजसी । सांगीतले ॥१०-१३॥
॥२५१॥ मजसी सांगण्या । वाटते कारण । तुजसी जाणीले । नाही कोणी ॥१०-१४॥
॥२५२॥ केवळ तूंच तूं । स्वतःस जाणीसी । भूतभावन तूं । जगत्पते ॥१०-१५॥
॥२५३॥ कोणकोणत्या गा । विभूतीरूपांत । दिसतोस सांग । सांगोपांग ॥१०-१६॥
॥२५४॥ सांग विस्ताराने । कितीवेळा ऐकूं । कान अतृप्तचि । राहतात ॥१०-१७॥
॥२५५॥ श्रीकृष्ण सांगती । माझ्या विभूतींचा । नाही कांहीं अंत । तरी ऐक ॥१०-१८॥
॥२५६॥ प्रमुख उल्लेख । केवळ सांगतो । सर्वभूताठायी । आत्मा मीच ॥१०-१९॥
॥२५७॥ सर्वच भूतांचा । आदि मध्य अंत । आदित्यांच्यामध्ये । विष्णू जाण ॥१०-२०॥
॥२५८॥ ज्योतिर्मयामध्ये । रवि आहे जाण । मरीची मी जाण । मरुतात ॥१०-२१॥
॥२५९॥ नक्षत्रसमूही । चन्द्र मी शीतल । वेदांमध्ये श्रेष्ठ । सामवेद ॥१०-२२॥
॥२६०॥ देवांमध्ये तरी । वासुदेव ज्ञात । इन्द्रियांचे ठायी । संवेदना ॥१०-२३॥
॥२६१॥ भूतांची चेतना । रुद्रांचा शंकर । यक्षरक्षसांचा । वित्तेश मी ॥१०-२४॥
॥२६२॥ वसू मी पावक । पर्वतांचा मेरु । पुरोधसांमध्ये । बृहस्पति ॥१०-२५॥
॥२६३॥ सेनानीत स्कंद । जलाशयामध्ये । सागर मी भृगु । महर्षीत ॥१०-२६॥
॥२६४॥ ॐ कार वाणीत । यज्ञीं जपयज्ञ । स्थावरामध्ये मी । हिमालय ॥१०-२७॥
॥२६५॥ वृक्षांत अश्वत्थ । देवर्षी नारद । गन्धर्वांचा जाण । चित्ररथ ॥१०-२८॥
॥२६६॥ सिद्धांमध्ये मुनि । कपिल आणिक । अश्वांमध्ये जाण । उच्चैःश्रवा ॥१०-२९॥
॥२६७॥ अमृतातून गा । उद्भव माझा ही । गजेन्द्रामध्ये मी । ऐरावत ॥१०-३०॥
॥२६८॥ नरांमध्ये राजा । आयुधांत वज्र । गायींमध्ये जाण । कामधेनु ॥१०-३१॥
॥२६९॥ प्रजनी कन्दर्प । सर्पात वासुकी । अनन्त नागात । वरुण मी ॥१०-३२॥
॥२७०॥ पितरामध्ये मी । अर्यमा आणिक । संयमींच्यामध्ये । यम मीच ॥१०-३३॥
॥२७१॥ दैत्यांत प्रल्हाद । बदलांचा काल । मृगांचा मृगेन्द्र । मीच जाण ॥१०-३४॥
॥२७२॥ पक्षांत गरुड । वाहत्यांचा वात । शस्त्रधाऱ्यामध्ये । राम मीच ॥१०-३५॥
॥२७३॥ सरपटणाऱ्या । जीवांत मकर । प्रवाहामध्ये मी । भागीरथी ॥१०-३६॥
॥२७४॥ सर्गांचा मीच गा । आदि मध्य अंत । विद्यांमध्ये जाण । अध्यात्म मी ॥१०-३७॥
॥२७५॥ प्रवादीं वाद मी । अक्षरीं अकार । समासांमध्ये मी । द्वन्द्व जाण ॥१०-३८॥
॥२७६॥ अक्षय काल मी । धाता मी विश्वाचा । सर्वहर मृत्यू । मीच जाण ॥१०-३९॥
॥२७७॥ उद्भव करीतो । मीच भविष्याचा । कीर्ति श्री नि वाचा । स्मृति मेधा ॥१०-४०॥
॥२७८॥ धृति क्षमा सारे । नारीरूपी भाव । सामामध्ये मीच । बृहत्साम ॥१०-४१॥
॥२७९॥ छन्दांत गायत्री । मासी मार्गशीर्ष । ऋतूंत वसन्त । मज जाण ॥१०-४२॥
॥२८०॥ छळांमध्ये द्यूत । तेजस्व्यांचे तेज । जय व्यवसाय । तेही मीच ॥१०-४३॥
॥२८१॥ सात्विकांचे सत्त्व । वृष्णींचा मी कृष्ण । पाण्डवामध्ये मी । धनंजय ॥१०-४४॥
॥२८२॥ मुनींमध्ये व्यास । कवींचा उशना । दमनसाधनीं । दण्ड मीच ॥१०-४५॥
॥२८३॥ वर्तनांत नीति । गुह्यांमध्ये मौन । ज्ञानीयांचे ज्ञान । मीच जाण ॥१०-४६॥
॥२८४॥ सर्वच भूतांचे । मूळबीज मीच । त्यावीण नसते । चराचरीं ॥१०-४७॥
॥२८५॥ माझ्या विभूतींच्या । वैविध्यास कधी । नसतोच अन्त । झलक ही ॥१०-४८॥
॥२८६॥ जे जे विशेषत्व । ऊर्जित श्रीमंत । माझ्याच तेजाचा । जाण अंश ॥१०-४९॥
॥२८७॥ अन्यथा तुजसी । जाणून हे सारे । काय मतलब । अर्जुना गा ॥१०-५०॥
॥२८८॥ सारे जग पहा । अंश मात्र माझे । ऐशापरी जाण । प्रमाण गा ॥१०-५१॥
॥२८९॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । विभूतियोग हा । ऐसा सिद्ध ॥१०-५२॥
अध्याय ११ 
॥२९०॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अकराव्या ॥११-१॥
॥२९१॥ अर्जुन म्हणतो । गुह्य हें सांगूनी । केला अनुग्रह । मजवरी ॥११-२॥
॥२९२॥ ऐकूनी हें सारे । गेला माझा मोह । महान अव्यय । भगवंता ॥११-३॥
॥२९३॥ पहावे वाटते । ईश्वरी स्वरूप । शक्य कां पाहणें । इये डोळां ॥११-४॥
॥२९४॥ श्रीकृष्ण म्हणती । पहा गा अर्जुना । शेकडो हजारो । रूपें तरी ॥११-५॥
॥२९५॥ अनेक वर्णांच्या । अनेक आकृती । नानाविध दिव्ये । पाहूनी घे ॥११-६॥
॥२९६॥ पाही आदित्यांना । वसूना रुद्राना । दोन्ही अश्विनीना । मरुताना ॥११-७॥
॥२९७॥ कधी ना देखीली । ऐसीही आश्चर्ये । घेई पाहूनीया । प्रसन्न मी ॥११-८॥
॥२९८॥ एकवटलेली । चराचर सृष्टी । सारे जग पाही । एके ठायी ॥११-९॥
॥२९९॥ मानवी डोळ्यानी । पाहणे ना शक्य । दिव्यदृष्टी देतो । पाहण्यास ॥११-१०॥
॥३००॥ संजय वर्णीतो । धृतराष्ट्रालागी । दर्शन जे झाले । अर्जुनास ॥११-११॥
॥३०१॥ अनेक शरीरे । किती तळपत्या । दिव्य आयुधांनी । नटलेली ॥११-१२॥
॥३०२॥ दिव्य वस्त्रे माळा । दिव्य गन्धलेप । अद्भुत दर्शन । देवाचे ते ॥११-१३॥
॥३०३॥ हजारो सूर्यही । एकाच वेळी कां । प्रकट होतील । आकाशात ॥११-१४॥
॥३०४॥ निव्वळ भासच । महान तेजाचा । म्हणावे इतुके । तेजःपुंज ॥११-१५॥
॥३०५॥ रोमांच उठले । अर्जुनाचे देही । कृष्णास वंदन । करी म्हणे ॥११-१६॥
॥३०६॥ दिसतात देव । ब्रम्हा ईश ऋषी । विशेष भूतांचे । संघ किती ॥११-१७॥
॥३०७॥ अनेक बाहूनी । सजलेसे रूप । यासी आदि मध्य । अंत नाही ॥११-१८॥
॥३०८॥ आगीचा डोंब कां । झाला तेजोमय । प्रकाश प्रकाश । सर्वदूर ॥११-१९॥
॥३०९॥ विश्वाचे निधान । तूंच गा निश्चित । शाश्वत धर्माचे । गुपित तूं ॥११-२०॥
॥३१०॥ सूर्यचन्द्र डोळे। तेजाचेच वस्त्र । विश्वात भरला । तेजाग्नि तूं ॥११-२१॥
॥३११॥ पृथ्वी नि आकाश । यातील अंतर । आणि सर्व दिशा । व्यापल्यास ॥११-२२॥
॥३१२॥ अद्भुत नि उग्र । ऐशा ह्या रूपाने । कंपित जाहले । तीन्ही लोक ॥११-२३॥
॥३१३॥ सुरांचे संघही । कांहीसे भ्यालेले । स्तुतिसुमने की । उधळती ॥११-२४॥
॥३१४॥ महर्षी सिद्धांचे । संघ विनवती । स्वस्ति म्हणताती । स्तवनात ॥११-२५॥
॥३१५॥ रुद्रादित्य वसू । गंधर्व नि यक्ष । विस्मित पाहती । तुज सारे ॥११-२६॥
॥३१६॥ नभी भिडलेले । नेत्र विस्फारित । रूप ऐसे तुझे । पाहूनिया ॥११-२७॥
॥३१७॥ दिशाहीन मन । धृति हरपली । वाटते कालाग्नि । झेप घेतो ॥११-२८॥
॥३१८॥ साऱ्या कौरवाना । राजाना भीष्माना । द्रोण कर्ण ह्याना । कितीकाना ॥११-२९॥
॥३१९॥ वाटते सर्वाना । विक्राळ हें तोंड । ओढूनीया घेते । वेगे किती ॥११-३०॥
॥३२०॥ दातांमध्ये चूर्ण । होताहेत सारे । तुकडे तुकडे । होऊनीया ॥११-३१॥
॥३२१॥ जैसे कीं पतङ्गा । ज्योत आकर्षिते । नाश त्यांचा होतो । शीघ्रतेने ॥११-३२॥
॥३२२॥ तैसेच वाटते । कराल मुख हें । जगाचाच घास । घेते काय ॥११-३३॥
॥३२३॥ सांग तूं कोण बा । उग्ररूपधारी । प्रसन्न होई गा । वंदितो मी ॥११-३४॥
॥३२४॥ श्रीकृष्ण म्हणती । लोकक्षयासाठी । ठाकलो आहे मी । काल जाण ॥११-३५॥
॥३२५॥ तुजसी कांहीही । वाटत असेल । इथे जे समोरी । योद्धे उभे ॥११-३६॥
॥३२६॥ त्यांच्यापैकी कोणी । नाही उरायचे । आधीच मारले । मीच त्याना ॥११-३७॥
॥३२७॥ निमित्त केवळ । व्हावयाचे तुज । होई सज्ज यश । होईल गा ॥११-३८॥
॥३२८॥ भीष्म द्रोण कर्ण । जयद्रथ आणि । कितीक मृतांचे । दुःख कैचे ॥११-३९॥
॥३२९॥ ऐकून कृष्णाचे । वचन अर्जुन । वंदन करूनी । म्हणे ऐसे ॥११-४०॥
॥३३०॥ तुझ्या ह्या रूपाला । राक्षसही भ्याले । सारेच वंदन । करतात ॥११-४१॥
॥३३१॥ "सखा" ऐसे तुज । बरळलो किती । प्रमाद कितीक । झाले वाटे ॥११-४२॥
॥३३२॥ पिता पुत्रालागी । सखा सखयास । क्षमा करतो ना । तैसे कर ॥११-४३॥
॥३३३॥ कधी न देखीलें । ऐसें तुझें रूप । पाहूनी झालो मी । भयग्रस्त ॥११-४४॥
॥३३४॥ तरी नेहमीच्या । किरीटधारी नि । गदाधारी रूपी । राही बरा ॥११-४५॥
॥३३५॥ श्रीकृष्ण सांगती । केवळ प्रसन्न । होऊनी दावीलें । ऐसे रूप ॥११-४६॥
॥३३६॥ देवांचे मनीही । आस दर्शनाची । ऐशा ह्या रूपाच्या । नेहमीच ॥११-४७॥
॥३३७॥ वेदाभ्यास तप । दान यज्ञ केले । तरी ऐसे रूप । नव्हे साध्य ॥११-४८॥
॥३३८॥ केवळ अनन्य । भक्ती करणारा । मजसी तत्त्वाने । जाणतो गा ॥११-४९॥
॥३३९॥ गीतोपनिषदी । संवाद चालता । देखीले अर्जुने । विश्वरूप ॥११-५०॥
अध्याय १२ 
॥३४०॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ बाराव्या । अध्यायास ॥१२-१॥
॥३४१॥ अर्जुनाचा प्रश्न । नेहमीच युक्त । राहूनी जे भक्ती । करतात ॥१२-२॥
॥३४२॥ किंवा जे तुजसी । मानती अव्यक्त । अक्षर यांपैकी । श्रेष्ठ कोण ॥१२-३॥
॥३४३॥ माझेशी जे मन । ठेऊनी श्रद्धेने । भजती ते तरी । युक्त खरे ॥१२-४॥
॥३४४॥ अव्यक्त अक्षर । मानूनी स्वयत्ने । इन्द्रिये ताब्यात । ठेऊनीया ॥१२-५॥
॥३४५॥ सर्वभूतां हित । स्वतः समबुद्धि । तेही पहा येती । मजप्रत ॥१२-६॥
॥३४६॥ अव्यक्तीं आसक्ती । ती तो कष्टप्रद । अव्यक्त निधान । अखेरचे ॥१२-७॥
॥३४७॥ जे कां सारी कर्में । मजसी अर्पूनी । अनन्यपणाने । ध्याती मज ॥१२-८॥
॥३४८॥ भवसागरी मी । त्वरेने तारीतो । समुद्धार त्यांचा । करीतो मी ॥१२-९॥
॥३४९॥ बुद्धीचा निवेश । करी मम ठायी । माझेच निवासी । राहशील ॥१२-१०॥
॥३५०॥ मम ठायी चित्त । करणे कठीण । वाटल्यास इच्छा । मनी धरी ॥१२-११॥
॥३५१॥ इच्छा करणेही । वाटेल कठीण । मदर्थचि करी । सारी कर्मे ॥१२-१२॥
॥३५२॥ हेही जरी वाटे । कठीण तरी गा । सर्वकर्मफले । त्यागावीत ॥१२-१३॥
॥३५३॥ अभ्यासापरीस। ज्ञान जाण श्रेष्ठ । ज्ञानापेक्षा श्रेष्ठ । जाण ध्यान ॥१२-१४॥
॥३५४॥ ध्यानापेक्षा श्रेष्ठ । कर्मफलत्याग । त्यागाने मिळते । नित्य शांति ॥१२-१५॥
॥३५५॥ मित्र सर्वभूतां । सुखदुःखी सम । सतत संतुष्ट । क्षमाशील ॥१२-१६॥
॥३५६॥ माझे नाहीं कांही । ऐसा मनी दृढ । मनबुद्धि मज । अर्पिलेली ॥१२-१७॥
॥३५७॥ जयाविशी वाटे । सर्वानाच प्रेम । ज्याचे मनी प्रेम । सर्वांसाठी ॥१२-१८॥
॥३५८॥ नाही अति हर्ष । नाहीच उद्वेग । नाही आकांक्षा वा । नाही भय ॥१२-१९॥
॥३५९॥ नाही शुभाशुभ । ना मानापमान । स्तुति वा निंदा वा । मानी सम ॥१२-२०॥
॥३६०॥ ऐसा भक्त मज । नेहमीच प्रिय । हे जे सांगीतले । अमृतचि ॥१२-२१॥
॥३६१॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ऐसा झाला सिद्ध । भक्तियोग ॥१२-२२॥
अध्याय १३ 
॥३६२॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ तेराव्या । अध्यायास ॥१३-१॥
॥३६३॥ श्रीकृष्ण सांगती । देह जाण क्षेत्र । ह्यास जाणणारा । क्षेत्रज्ञ तो ॥१३-२॥
॥३६४॥ सारीच क्षेत्रे मी । जाणीतो म्हणूनी । क्षेत्रक्षेत्रज्ञत्व । तें ज्ञान माझे ॥१३-३॥
॥३६५॥ क्षेत्र म्हंजे काय । विकारही त्याचे । प्रभाव तयाचा । कैसा असे ॥१३-४॥
॥३६६॥ कितीक ऋषीनी । छंदात वर्णीले । मांडीली वैशिष्ट्ये । ब्रम्हसूत्री ॥१३-५॥
॥३६७॥ पांची महाभूतें । अहंकार मन । बुद्धि नि अव्यक्ती । दशेन्द्रियें ॥१३-६॥
॥३६८॥ पंचप्राण इच्छा । द्वेष सुख दुःख । चेतना नि धृति । ऐसा मेळा ॥१३-७॥
॥३६९॥ तोचि जाण क्षेत्र । ह्याचा स्वभावचि । सदा बदलतो । नाही स्थिर ॥१३-८॥
॥३७०॥ ज्ञान सिद्ध होण्या । हवें अमानित्व । अहिंसाही हवी । नको दंभ ॥१३-९॥
॥३७१॥ क्षांति नि ऋजुता । भावें गुरुसेवा । पावित्र्य नि स्थैर्य । विनिग्रह ॥१३-१०॥
॥३७२॥ सद्गुणचि ज्ञान । याच्या जें उलटें । अज्ञान म्हणती । भगवंत ॥१३-११॥
॥३७३॥ जाणावेसे जें जें । ज्ञेय तया नांव । प्रकाशते तेव्हां । ज्ञान होते ॥१३-१२॥
॥३७४॥ ज्ञान सिद्ध होण्या । क्षेत्र स्वच्छ हवें । म्हणूनी सद्गुण । जोपासावे ॥१३-१३॥
॥३७५॥ प्रकृति पुरुष । दोन्ही ते अनादि । प्रकृति स्वभावें । गुणमयी ॥१३-१४॥
॥३७६॥ प्रकृतिस्थ होतां । प्रकृतिनुरूप । पुरुष भोगतो । गुण तैसे ॥१३-१५॥
॥३७७॥ भोगांत गुंतला । जीव तें पाहून । दूरच राहतो । परमात्मा ॥१३-१६॥
॥३७८॥ जीवानें धरीतां । नैतिक भूमिका । शाब्बास म्हणतो । जवळूनी ॥१३-१७॥
॥३७९॥ आर्तता जाहल्या । देव धांव घेतो । जैसे द्रौपदीस । सांवरीले ॥१३-१८॥
॥३८०॥ भूतमात्री जरी । विखुरलें वाटे । अखंड सर्वत्र । एक तत्त्व ॥१३-१९॥
॥३८१॥ सर्वान्तरी वास । करीतें जरी हें । सर्वासभोंवती । हेंचि आहे ॥१३-२०॥
॥३८२॥ कोठेही न जाई । थांबे ना कधीही । जवळीच आहे । दूर सुद्धां ॥१३-२१॥
॥३८३॥ नव्हे हा व्यत्यास । आहे प्रमेयचि । ज्यास उमगलें । धन्य झाला ॥१३-२२॥
॥३८४॥ त्यानेच ना दिले । सारेच जीवन । अर्पण करावें । त्याचें त्यास ॥१३-२३॥
॥३८५॥ क्षेत्रक्षेत्रज्ञाचा । ऐसा पहा योग । गीतोपनिषदी । झाला सिद्ध ॥१३-२४॥
अध्याय १४ 
॥३८६॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ चौदाव्या । अध्यायास ॥१४-१॥
॥३८७॥ आधी तेराव्यात । म्हटले पुरुष । होतो गुणमयी । प्रकृतिस्थ ॥१४-२॥
॥३८८॥ सत्त्व रज तम । गुणांचे प्रभाव । इथे चौदाव्यात । सांगीतले ॥१४-३॥
॥३८९॥ गुण ठेवताती । पुरुषा देहात । अपुल्या प्रकारे । गुंतवूनी ॥१४-४॥
॥३९०॥ सुख आणि ज्ञान । बंधने सत्त्वाची । रजाची बंधने । राग तृष्णा ॥१४-५॥
॥३९१॥ प्रमाद आळस । निद्रा तमोगुणी । बंधने ही भूल । पाडताती ॥१४-६॥
॥३९२॥ रज आणि तम । याहूनी अधिक । जरी सत्त्वगुण । सात्त्विक तो ॥१४-७॥
॥३९३॥ तसेंच ठरतें । कोण बा राजसी । कोण बा तामसी । म्हणावा तें ॥१४-८॥
॥३९४॥ फळ तें निर्मळ । सात्त्विक गुणांचे । निष्पत्ति दुःखद । राजसाची ॥१४-९॥
॥३९५॥ तामस्यास फळ । अज्ञान म्हटलें । कनिष्ठ तें पहा । दुःखाहून ॥१४-१०॥
॥३९६॥ त्रिगुणांचा खेळ । माझाच हें ज्यास । समजलें तोच । खरा द्रष्टा ॥१४-११॥
॥३९७॥ देहधारी होणें । कारण त्रिगुणा । त्यांच्या पलीकडे । ध्यान हवें ॥१४-१२॥
॥३९८॥ ऐसे ज्ञान होतां । जन्म मृत्यू जरा । ऐसी सारी दुःखें । नष्ट होती ॥१४-१३॥
॥३९९॥ ऐसे मुक्त होणें । तेंच अमरत्व । त्रिगुणापल्याड । ध्यान हवें ॥१४-१४॥
॥४००॥ अर्जुनाचा प्रश्न । कैशा आचाराने । त्रिगुणापल्याड । जाणें शक्य ॥१४-१५॥
॥४०१॥ श्रीकृष्ण सांगती । प्रसंग येतात । सुखाचे दुःखाचे । जातातही ॥१४-१६॥
॥४०२॥ प्रसंगांचे सुद्धा । असतात गुण । त्यांना त्यांचेजागी । असो द्यावें ॥१४-१७॥
॥४०३॥ सुख वा दुःख वा । लोह कीं सुवर्ण । प्रिय कीं अप्रिय । सारे सम ॥१४-१८॥
॥४०४॥ निंदा किंवा स्तुति । मान अपमान । मित्र किंवा शत्रू । सारे सम ॥१४-१९॥
॥४०५॥ ऐशा मनोभावें । माझे ठायीं भक्ति । अविचल होतां । ब्रम्हस्थिति ॥१४-२०॥
॥४०६॥ तेंच तरी माझे । अमृत अव्यय । शाश्वत धर्माचें । अधिष्ठान ॥१४-२१॥
॥४०७॥ गीतोपनिषदी । त्रिगुणात्मभेद । विवरणारा हा । योग ऐसा ॥१४-२२॥
अध्याय १५ 
॥४०८॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । पंधराव्या ॥१५-१॥
॥४०९॥ अश्वत्थ वृक्षाच्या । उदाहरणाने । सांगीतले कैसे । फोफावती ॥१५-२॥
॥४१०॥ मानव जीवनी । विषयप्रवाळ । गुणही ठेवती । गुंतवूनी ॥१५-३॥
॥४११॥ ऐशा अश्वत्थास । छाटण्या समूळ । शस्त्र तें केवळ । निःसङ्गता ॥१५-४॥
॥४१२॥ वाटेतील गुंता । छाटतां दिसतो । राजमार्ग आणि । नित्यस्थान ॥१५-५॥
॥४१३॥ तैसे नित्यस्थान । लाभण्यास हवी । मानमोहशून्य । अध्यात्मता ॥१५-६॥
॥४१४॥ माझे सुद्धा जाण । तेंच स्थान नित्य । चन्द्रसूर्याविना । तेजाळतें ॥१५-७॥
॥४१५॥ माझेच अंश गा । जीवांत राहूनी । मन नि इन्द्रियें । चालवीती ॥१५-८॥
॥४१६॥ केवळ ज्ञानीच । जाणती मजसी । गुणमयी तरी । गुणातीत ॥१५-९॥
॥४१७॥ सूर्याचें चन्द्राचें । अग्नीचें जें तेज । जग उजाळतें । माझेंच तें ॥१५-१०॥
॥४१८॥ मीच सोमरस । पोषीतो औषधी । जीवांच्या देही मी । वैश्वानर ॥१५-११॥
॥४१९॥ प्राण नि अपान । समान वायूनी । पचवीतो अन्न । चतुर्विध ॥१५-१२॥
॥४२०॥ वेदाभ्यासानेही । माझे ज्ञान होते । वेद मी वेदान्त । करवीता ॥१५-१३॥
॥४२१॥ सर्वांचे हृदयीं । निविष्ट असा मी । स्मृति मी ज्ञान मी । विवेकही ॥१५-१४॥
॥४२२॥ पुरुष असतो । क्षर नि अक्षर । सर्व देहीं स्थित । क्षर तरी ॥१५-१५॥
॥४२३॥ दुसरा अक्षर । परमात्मा ऐसा । ईश्वरीय वास । लोकत्रयी ॥१५-१६॥
॥४२४॥ मी तरी उत्तम । अक्षराहूनही । पुरुषोत्तमसा । सर्वश्रुत ॥१५-१७॥
॥४२५॥ ऐसे गुह्यांमध्ये । गुह्यतम शास्त्र । जाणून होई गा । बुद्धिमंत ॥१५-१८॥
॥४२६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । पुरुषोत्तमाचा । योग सिद्ध॥१५-१९॥
अध्याय १६ 
॥४२७॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ सोळाव्या । अध्यायास ॥१६-१॥
॥४२८॥ प्रथमच्या तीन । श्लोकांमध्ये यादी । मांडली सव्वीस । सद्गुणांची ॥१६-२॥
॥४२९॥ मग सांगीतले । अज्ञान मत्सर । क्रोध लोभ आणि । मद दंभ ॥१६-३॥
॥४३०॥ गुणसंपदा ही । दैवी वा आसुरी । असते बहुधा । अभिजात ॥१६-४॥
॥४३१॥ दैवी संपदेने । मोक्ष तो सुलभ । आसुरी संपदा । गुंतवीते ॥१६-५॥
॥४३२॥ आसुरी वृत्तीचे । लोक न मानती । आचारसंहिता । शुचिता वा ॥१६-६॥
॥४३३॥ आशाअपेक्षांत । सदा रममाण । भ्रष्टाचारा देती । खतपाणी ॥१६-७॥
॥४३४॥ कामभोगासाठी । अन्याय मार्गानी । द्रव्यार्जना देती । प्रोत्साहन ॥१६-८॥
॥४३५॥ आज मिळवीलें । उद्या आणीकचि । मिळवीन हीच । खुमखुमी ॥१६-९॥
॥४३६॥ आज ह्या शत्रूस । दिली खास मात । जिंकेन अजून । इतराना ॥१६-१०॥
॥४३७॥ मी तो सार्वभौम। माना ईश्वरचि । कोणाची हिम्मत । माझेपुढे ॥१६-११॥
॥४३८॥ अशांची पूजने । ढोंगे ती केवळ । गर्विष्ठपणाचा । तमाशाच ॥१६-१२॥
॥४३९॥ ऐसे कामातुर । अहंकारी क्रोधी । मनाने मजसी । हेटाळती ॥१६-१३॥
॥४४०॥ ऐशा नराधमा । हीन योनिक्रम । मिळतो सदैव । जन्मोजन्मी ॥१६-१४॥
॥४४१॥ काम क्रोध लोभ । नरकास नेती । रहावे सावध । निरंतर ॥१६-१५॥
॥४४२॥ शास्त्र विधी ह्याना । देऊनीया छाट । कामकारकशा । कर्मी रत ॥१६-१६॥
॥४४३॥ कैसेनी पावेल । सिद्धि सुख गति । कार्य नि अकार्य । ध्यान हवें ॥१६-१७॥
॥४४४॥ शास्त्रविधियुक्त । करावीत कर्मे । सतर्क सशक्त । आचरावी ॥१६-१८॥
॥४४५॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । दैवासुरभेद । विवरला ॥१६-१९॥
अध्याय १७
॥४४६॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । सतराव्या ॥१७-१॥
॥४४७॥ सोळाव्याचे अंती । श्रीकृष्ण म्हणाले । शास्त्रविधियुक्त । कर्म करी ॥१७-२॥
॥४४८॥ इथे अर्जु्नाने । प्रश्न विचारीला । जरी श्रद्धायुक्त । कर्म केले ॥१७-३॥
॥४४९॥ शास्त्रविधियुक्त । नाहीच जाहले । कैसी ती म्हणावी । कर्मनिष्ठा ॥१७-४॥
॥४५०॥ अर्जुनाने प्रश्नी । श्रद्धा आणि निष्ठा । ऐसे दोन शब्द । वापरले ॥१७-५॥
॥४५१॥ उत्तरांत कृष्ण । म्हणाले श्रद्धा ही । सात्त्विक राजसी । तामसीही ॥१७-६॥
॥४५२॥ व्यक्तीची श्रद्धा गा । सत्त्वानुरूपचि । पुरुष असतो । श्रद्धामय ॥१७-७॥
॥४५३॥ ज्याची जैसी श्रद्धा । तैसाचि तो वागे । सात्त्विक करीती । देवपूजा ॥१७-८॥
॥४५४॥ राजस पूजीती । यक्षराक्षसास । तामसी पूजीती । भूतेंप्रेतें ॥१७-९॥
॥४५५॥ शास्त्रविधिविना । घोर तपे केली । दंभ अहंकार । माजतती ॥१७-१०॥
॥४५६॥ देहांत वसतो । माझाही जो अंश । त्याचेही करीती । उच्चाटन ॥१७-११॥
॥४५७॥ आहार असतो । त्रिविध आणिक । यज्ञ तप दान । त्रिविधचि ॥१७-१२॥
॥४५८॥ सात्त्विक आहारें । आयुष्य वाढतें । बल सत्त्व सुख । वाढताती ॥१७-१३॥
॥४५९॥ रस्य स्निग्ध स्थिर । हृद्य ऐसी सत्त्वें । आहारीं असतां । सात्त्विक तो ॥१७-१४॥
॥४६०॥ कटू वा आंबट । खारट तिखट । दाहक कोरड्या । पदार्थांचे ॥१७-१५॥
॥४६१॥ सेवन ठरतें । राजस आहार । देती दुःख शोक । अस्वस्थता ॥१७-१६॥
॥४६२॥ तामस सेवीती । नासलें आंबलें । नीरस उच्छिष्ट । चवहीन ॥१७-१७॥
॥४६३॥ नसतां फलांची । अपेक्षा तरीही । यज्ञ विधियुक्त । सात्त्विक ते ॥१७-१८॥
॥४६४॥ राजसींचे यज्ञ । फलाशा धरून । दंभही असतो । कार्यात त्या ॥१७-१९॥
॥४६५॥ मंत्रतंत्राविना । शास्त्रविधिविना । घडतात यज्ञ । तामस्यांचे ॥१७-२०॥
॥४६६॥ तपांचे प्रकार । कायिक वाचिक । आणि मानसिक । जाणावेत ॥१७-२१॥
॥४६७॥ देव द्विज गुरु । प्राज्ञ यांची पूजा । शौच आर्जव नि । ब्रम्हचर्य ॥१७-२२॥
॥४६८॥ अहिंसा पाळणें । ऐसी सारी तपें । कायिक ठरती । लाभदायी ॥१७-२३॥
॥४६९॥ उद्वेगरहित । बोलण्याची रीत । सत्य प्रिय आणि । हितकारी ॥१७-२४॥
॥४७०॥ स्वाध्याय अभ्यास । सारे मिळूनिया । वाङ्मयीन तप । सिद्ध होते ॥१७-२५॥
॥४७१॥ मनीं प्रसन्नता । सौम्यत्व संयम । शुद्धतेने तप । मानसिक ॥१७-२६॥
॥४७२॥ त्रिविध तपांचा । श्रद्धेने आचार । फलाकांक्षेविना । सात्त्विकांचा ॥१७-२७॥
॥४७३॥ राजस करीती । तपाचरण तें । व्हावा सत्कार हा । दंभ मनीं ॥१७-२८॥
॥४७४॥ तामस्यांचे तप । वेड्या कल्पनांचे । काढण्यास कांटा । शत्रूंचा वा ॥१७-२९॥
॥४७५॥ सात्त्विक करीती । दानासाठी दान । मनी न धरीती । उपकार ॥१७-३०॥
॥४७६॥ राजस्यांचे दान । उपकार मनीं । कांहीं फलाशाही । दानापोटी ॥१७-३१॥
॥४७७॥ तामस्यांचे दान । अयोग्य लोकांना । स्थान काळवेळ । अयोग्यचि ॥१७-३२॥
॥४७८॥ ब्रम्हाचा प्रसिद्ध । मंत्र ॐ तत्सत् हा । त्याचेही त्रिविध । उपचार ॥१७-३३॥
॥४७९॥ ब्रम्हवादी लोक । यज्ञतपदाना । प्रारंभ करीती । ॐ काराने ॥१७-३४॥
॥४८०॥ मुमुक्षु जनांचे । ध्यान "तत्" वरती । यज्ञी तपी दानी । फलत्यागी ॥१७-३५॥
॥४८१॥ साधुभाव ज्यांचा । त्यांची सारी कर्मे । केवळ सत्कर्मे । असतात ॥१७-३६॥
॥४८२॥ श्रद्धेविना यज्ञ। तप दान केले । इहपरलोकी । असत्य तें ॥१७-३७॥
॥४८३॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । त्रिविध श्रद्धेचे । विवेचन ॥१७-३८॥
अध्याय १८ 
॥४८४॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अठराव्या ॥१८-१॥
॥४८५॥ अध्यायाप्रारंभी । अर्जुन विनवी । संन्यास नि त्याग । स्पष्ट करा ॥१८-२॥
॥४८६॥ श्रीकृष्ण म्हणाले । कामनाप्रेरित । कर्मांचा त्याग जो । संन्यास तो ॥१८-३॥
॥४८७॥ साऱ्याच कर्मांच्या । फलाशेचा त्याग । तोच समजावा । त्याग खरा ॥१८-४॥
॥४८८॥ कांहींचे म्हणणें । कर्मे सदोषचि । असतात तरी । त्यागावीत ॥१८-५॥
॥४८९॥ माझे मत तरी । यज्ञ तप दान । कर्में ही पावन । करणारी ॥१८-६॥
॥४९०॥ त्यागूं नयेत ती । परि कर्मीं संग । आणि त्यांची फलें । त्यागावीत ॥१८-७॥
॥४९१॥ नियत कर्मांचा । संन्यास अशक्य । तैसा प्रयत्नही । तामसी तो ॥१८-८॥
॥४९२॥ दुःखकष्टप्रद । वाटती जी कर्में । त्यागणे राजस । अर्थशून्य ॥१८-९॥
॥४९३॥ कर्में जी नियत । करणें फलाशा । त्यांची सोडूनीया । सात्त्विक तें ॥१८-१०॥
॥४९४॥ देहधारी होतां । कर्में न करीता । राहणें केवळ । अशक्य तें ॥१८-११॥
॥४९५॥ श्वासोच्छ्वास तरी। घडत असतो । कर्म तें टाळणें । अशक्यचि ॥१८-१२॥
॥४९६॥ कर्मफलत्याग । करणारा तोच । म्हटला जातसे । त्यागी खरा ॥१८-१३॥
॥४९७॥ कर्मांची फळेंही । असती अनिष्ट । इष्ट किंवा मिश्र । म्हणावीसी ॥१८-१४॥
॥४९८॥ परंतु ही दृष्टी । त्यानाच ना लागू । ज्यानी फलत्याग । नाही केला ॥१८-१५॥
॥४९९॥ कर्मसिद्धीलागी । पांच तत्त्वें पहा । कृतान्ती सांख्यानी । सांगीतली ॥१८-१६॥
॥५००॥ अधिष्ठान कर्ता । करणें विविध । विविध चेष्टा नि । दैव ऐसी ॥१८-१७॥
॥५०१॥ ऐसे असताना । कर्माचें कर्तृत्व । कर्त्याचे केवळ । कैसे होय ॥१८-१८॥
॥५०२॥ ’मी केलें’ हा भाव । नाही ज्याचे मनीं । अलिप्त ठेवीतो । बुद्धिस जो ॥१८-१९॥
॥५०३॥ त्याच्या युद्धकर्मी । कितीकही मेले । त्याचा दोष त्यास । नाही येत ॥१८-२०॥
॥५०४॥ ज्ञान ज्ञेय आणि । परिज्ञाता सारे । उद्युक्त करीती । कर्माप्रत ॥१८-२१॥
॥५०५॥ कर्माचे फलित । राहते संचित । कर्म कर्ता आणि । करणांत ॥१८-२२॥
॥५०६॥ ज्ञान कर्म कर्ता । यांचे त्रिगुणात्म । विश्लेषण घेई । समजून ॥१८-२३॥
॥५०७॥ सर्वांभूतीं भाव । एकचि अव्यय । ह्याचें ज्ञान होणें । सात्त्विक तें ॥१८-२४॥
॥५०८॥ सर्वांभूतीं भाव । वेगळाले ऐसे । ज्ञान तें राजस । समजावें ॥१८-२५॥
॥५०९॥ तत्त्वार्थहीन नि । अत्यल्प उथळ । ज्ञान तें तामसी । समजावें ॥१८-२६॥
॥५१०॥ नियत कर्माचा । आचार निःसंग । रागद्वेषाविना । सात्त्विक तें ॥१८-२७॥
॥५११॥ कामप्रेरित वा । अहंकारयुक्त । कर्म तें राजसी । समजावें ॥१८-२८॥
॥५१२॥ मोहाने प्रेरित । हिंसाक्षययुक्त । कर्म तें तामसी । समजावें ॥१८-२९॥
॥५१३॥ निःसंगवृत्तीचा । भाव अकर्त्याचा । तरी योग्य धृति । उत्साहही ॥१८-३०॥
॥५१४॥ सिद्धि कीं असिद्धि । याची नाही खंत । कर्ता तो सात्त्विक । समजावा ॥१८-३१॥
॥५१५॥ रागलोभ दावी । दृष्टी कर्मफलीं । हिंसाही करेल । राजस तो ॥१८-३२॥
॥५१६॥ कर्मायोग्य ज्ञान । कसब नसतां । हट्टी वा आळसी । खीळ पाडी ॥१८-३३॥
॥५१७॥ करी टाळाटाळ । हेतू ही अस्वच्छ । कर्ता तो तामसी । समजावा ॥१८-३४॥
॥५१८॥ बुद्धि धृति सुख । यांचेही त्रिविध । भेद कैसे होती । ध्यानी घेई ॥१८-३५॥
॥५१९॥ कार्य तें कोणतें । कोणतें अकार्य । बुद्धि ती सात्त्विक । विवेकाची ॥१८-३६॥
॥५२०॥ कार्य-अकार्याचा । विवेक ना जाणे । बुद्धि ती राजस । समजावी ॥१८-३७॥
॥५२१॥ अधर्मास धर्म । अकार्यास कार्य । विपरीत बुद्धि । तामसी ती ॥१८-३८॥
॥५२२॥ मन-इन्द्रियांची । कर्में योगयुक्त । चालवीते धृति । सात्त्विक ती ॥१८-३९॥
॥५२३॥ धर्म-अर्थ-कामी । रमणारी धृति । कधी फलाकांक्षी । राजस ती ॥१८-४०॥
॥५२४॥ स्वप्न-शोक-भय । दुःखानी ग्रसित । धृति असमर्थ । तामसी ती ॥१८-४१॥
॥५२५॥ सुखही असते । तीन प्रकारांचे । सात्त्विक राजस । तामसही ॥१८-४२॥
॥५२६॥ आधी जणूं विष । अंती अमृतशा । सात्त्विक सुखात । प्रसन्नता ॥१८-४३॥
॥५२७॥ विषयवासना । इन्द्रियोपभोग । ह्यानी अमृतसे । वाटे आधी ॥१८-४४॥
॥५२८॥ अंती विषासम । ज्याचा परिणाम । सुख तें राजस । समजावें ॥१८-४५॥
॥५२९॥ प्रारंभापासून । मोही गुंतवून । निद्रा नि आळस । वाढवीती ॥१८-४६॥
॥५३०॥ बेताल वागणें । तेंही वाढवीती । सुखें ती तामसी । समजावी ॥१८-४७॥
॥५३१॥ ऐसे पाहूं जाता । त्रिगुणात्म भेद। जीवनाच्या साऱ्या । पैलूमध्ये ॥१८-४८॥
॥५३२॥ ब्राम्हण क्षत्रिय । वैश्य शूद्र संज्ञा । कर्मांची वाटणी । करण्यास ॥१८-४९॥
॥५३३॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५०॥
॥५३४॥ ब्राम्हण म्हणावें । कोणास त्यासाठी । ब्रम्हकर्मछटा । ऐशा जाण ॥१८-५१॥
॥५३५॥ शांति नि संयम । तपाचरण नि । शुद्धता आणिक । क्षमावृत्ति ॥१८-५२॥
॥५३६॥ पारदर्शकता । ज्ञानी व विज्ञानी । देवावर श्रद्धा । ब्राम्हण्य तें ॥१८-५३॥
॥५३७॥ क्षात्रतेज शौर्य । धृति नि दाक्षिण्य । युद्धातून नाही । पलायन ॥१८-५४॥
॥५३८॥ दानशूरता नि । ईश्वरीय निष्ठा । क्षत्रिय वृत्तीचे । प्रमाण हे ॥१८-५५॥
॥५३९॥ कृषि गोरक्षण । वाणिज्य वैश्याचे । सेवातत्परता । शूद्रकर्म ॥१८-५६॥
॥५४०॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५७॥
॥५४१॥ श्रीकृष्ण सांगती । आपापल्या कामी । राहूनही सिद्धि । शक्य सर्वां ॥१८-५८॥
॥५४२॥ उद्धारास हवा । समर्पण भाव । रहावें मच्चित्त । अर्जुना गा ॥१८-५९॥
॥५४३॥ अहंकारामुळे । जरी तुझे मनी । युद्ध न करीन । करशील ॥१८-६०॥
॥५४४॥ प्रत्येकाचा पिंड । स्वभावानुरूप । स्वतःच्या कर्मानी । घडतसे ॥१८-६१॥
॥५४५॥ आणि सर्वाभूती । ईश्वराचा अंश । चालवीतो सारी । यंत्रे जणूं ॥१८-६२॥
॥५४६॥ त्यासी जा शरण । पार्था सर्वभावें । त्याच्या प्रसादाने । यश होतें ॥१८-६३॥
॥५४७॥ शिष्यधर्म किंवा । पौत्रधर्म सारे । सोडूनी शरण । मजसी ये ॥१८-६४॥
॥५४८॥ पापांचे क्षालन । करेन तूं नको । संशय मुळीच । मनी धरूं ॥१८-६५॥
॥५४९॥ जें जें कांही गुह्य । तुज सांगीतलें । अभक्तास नाही । सांगायाचें ॥१८-६६॥
॥५५०॥ कांही कैसे गुह्य । एकाग्र चित्ताने । ऐकून मनांत । ठसलें का ॥१८-६७॥
॥५५१॥ संशय मनींचे । निवलेसे काय । अज्ञानतिमिर । निमाला कां ॥१८-६८॥
॥५५२॥ अर्जुन म्हणाला । कबूली देतसा । संशय कसला । नाही आतां ॥१८-६९॥
॥५५३॥ मोह निरसला । तुझ्या प्रसादाने । पाळीन आदेश । तुझे सारे ॥१८-७०॥
॥५५४॥ संजय म्हणतो । श्रीकृष्ण अर्जुन । यांचा हा संवाद । रोमांचक ॥१८-७१॥
॥५५५॥ ऐकाया मिळाला । व्यासांच्या कृपेने । सद्गदित आहे । मन माझे ॥१८-७२॥
॥५५६॥ कानांत घुमतो । जणूं तो संवाद । आनंदलहरी । उसळती ॥१८-७३॥
॥५५७॥ आठवतें रूप । कृष्णाचें अद्भुत । विस्मयचकित । पुन्हां होते ॥१८-७४॥
॥५५८॥ जेथें जेथें कृष्ण । अर्जुन आहेत । तेथेंच विजय । निश्चयीच ॥१८-७५॥
॥५५९॥ गीतोपनिषदी । मोक्षसंन्यासाचा । योग अखेरचा । ऐसा सिद्ध ॥१८-७६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

No comments: